‘नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल,’ ठाकरे गटाची टीका, #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. ‘नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल,’ ठाकरे गटाची टीका

शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात एकनाथ शिंदे गटाकडून तसंच भाजप नेत्यांकडून विविध आरोप करण्यात येत आहेत.

दरम्यान, नितेश राणेंच्या टीकेला शिवसेना उपनेत्या संजना घाडी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल, अशा शब्दांत घाडी यांनी राणेंवर टीका केली.

त्या म्हणाल्या, “नितेश राणे आणि निलेश राणे यांचीच पहिल्यांदा नार्को टेस्ट झाली पाहिजे. तसेच, कधी काँग्रेस, कधी भाजप, तर कधी शिवसेनेला तुम्ही शिव्या घातल्या.

"नारायण राणेंची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. त्यामुळे याविषयावर बोलायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” ही बातमी लोकसत्ताने दिली.

2. राज्यात कोव्हिड टास्कफोर्सची पुनर्रचना, आढावा बैठकीत निर्णय

राज्यात कोव्हिड टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात येणार आहे. काल (22 डिसेंबर) आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते तसेच अधिकारी उपस्थित होते.

ई-सकाळने दिलेल्या बातमीनुसार, नव्या टास्कफोर्समध्ये आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांचा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. राज्यात कोव्हिडची परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आपण तयार आहोत का? याची बैठकीच चर्चा झाली.

तसंच सर्व आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती राज्यांच्या प्रमुखांना द्यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

3. सीमाप्रश्नाच्या विरोधात कर्नाटकात एकमताने ठराव मंजूर

कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नाच्या विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. आमच्यासाठी सीमाप्रश्न आता संपला आहे, असं या ठरावात म्हटलं आहे.

एबीपी माझाच्या बातमीनुसार, महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव कर्नाटकाच्या विधिमंडळात काल (22 डिसेंबर) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडला होता. या ठरावाला कर्नाटक विधानसभेत सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

तसेच कर्नाटकाकडे कोणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला यावेळी दिला.

महाराष्ट्रातील नेते बेळगावात येऊन वातावरण बिघडवत आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद आता उरला नसून कर्नाटकातील सीमाभागात सगळं काही सुरळीत चाललं आहे, असंही बोम्मई म्हणाले.

4. गरिबी निर्मूलनाच्या बाबतीत 2022 वर्ष सर्वाधिक वाईट

अमेरिका आणि इतर विकसित देशांसह जगभरातील आर्थिक मंदी गडद होण्याची शक्यता आहे. 1970 नंतर सर्वाधिक वेगाने मंदीचा शिरकाव होत असून गरिबी निर्मूलनाच्या बाबतीत 2020 नंतर 2022 हे वर्ष सर्वाधिक वाईट ठरलं, अशी माहिती जागतिक बँकेच्या अहवालात देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस, रशिया-युक्रेन युद्ध, इंधन आणि खाद्यक्षेत्रातील महागाई यांमुळे जगभरातील 60 टक्के देश कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत.

या देशांत आर्थिक सुधारणांसह आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणविषयक सुधारणांना खीळ बसली आहे. जगभरात मंदीचा फटका बसत असल्याने गरिबीमध्ये आणखी वाढ होत असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. ही बातमी लोकमतने दिली.

5. कोरोना पसरतोय, मास्क लावा, यात्रा थांबवा, ही सरकारची बहाणेबाजी – राहुल गांधी

'भारत जोडो यात्रा' रोखण्यासाठी केंद्र सरकार निमित्त शोधत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. चीनसह काही देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांना यात्रा थांबण्याचे आवाहन केले होते.

हरियाणातील नूह जिल्ह्यातील घासेडा गावात एका सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी त्याचा उल्लेख केला.

ते म्हणाले, “ही यात्रा काश्मीरपर्यंत जाईल. आता त्यांनी नवीन पद्धत आणली आहे. त्यांनी मला पत्र लिहिले की कोविड पसरत आहे, मास्क घाला, यात्रा थांबवा, कोरोना पसरत आहे, हे सगळे बहाणे आहेत. त्यांना सत्याची भीती वाटते.” ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)