बाळ पाळण्यासह वादळाच्या भोवऱ्यात सापडलं, वडिलांनी तो धरण्याचा प्रयत्न केला, पण...

बाळ

फोटो स्रोत, Caitylin Moore

    • Author, क्लो किम
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेतल्या टेनेसी शहरातील एका चक्रीवादळात अडकलेला चार महिन्यांचा मुलगा देवाच्या कृपेने वाचल्याचं त्याचे पालक सांगतात.

शनिवारी (16 डिसेंबर) आलेल्या भीषण वादळात त्यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ज्यामध्ये त्यांचं बाळ झोपलं होतं, तो पाळणाही वाऱ्याने उडून गेला.

पण म्हणतात ना, देव तारी, त्याला कोण मारी?

हा पाळणा झाडाला अडकला आणि त्यात असलेलं बाळही सुखरूप राहिलं.

या चार महिन्यांच्या बाळाला एक वर्षाचा भाऊ असून चक्रीवादळामुळे कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत.

मुलाची आई सिडनी मूर यांनी सांगितलं की, या चक्रीवादळात त्यांच्या घराचं छत देखील उडून गेलं.

त्या पुढे म्हणाल्या की, चक्रीवादळात घराचं छत उडू लागलं, तेव्हाच पाळणाही उडायला लागला. बाळाच्या वडिलांनी तो धरण्याचा प्रयत्न केला, पण तरीही बाळ या वादळाच्या भोवऱ्यात सापडलं.

पाळणा उडून गेल्यावर मूर यांनी ताबडतोब त्यांचा एक वर्षाचा मुलगा प्रिन्स्टनला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने उडी मारली.

त्या सांगतात, "माझा अंतरात्मा मला माझ्या मुलाच्या दिशेने धाव असं म्हटला, त्याबरोबर मी मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने गेले. त्या क्षणी आमच्या घराच्या सर्व भिंती कोसळल्या."

या भिंतीखाली अडकलेल्या मूर यांना श्वास घेता येत नव्हता.

बाळ

फोटो स्रोत, Catylin Moore

चक्रीवादळाने त्यांचं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर मूर यांनी प्रिन्स्टनला घराच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. लवकरच मूर आणि त्यांचे पती त्यांचा धाकटा मुलगा लॉर्डचा शोध घ्यायला निघाले.

त्या सांगतात, त्यांनी मुसळधार पावसात आपल्या मुलाचा शोध सुरू ठेवला आणि शेवटी तो सुखरुप सापडला. त्यांना एका झाडाला पाळण्यासारखं काहीतरी लटकलेलं दिसलं.

"मला वाटलं तो या तुफान वादळात वाचला नसेल, पण देवाच्या कृपेने तो जिवंत होता."

मूरची यांची धाकटी बहीण, कॅटलिन मूर यांनी चक्रीवादळामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी GoFundMe मोहीम सुरू केली.

कॅटलिन मूर सांगतात, की मूर आणि त्यांच्या मुलांना किरकोळ दुखापत झाली असली तरी ते बचावले आहेत. मूरच्या पतीचा हात तुटला असून खांदा निखळला आहे.

सिडनी मूर सांगतात, "गरज पडली तर मी माझ्या मुलांसाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)