सिग्नल शाळा ठाणे : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना पुलाखालच्या या शाळेनं नवी स्वप्नं कशी दाखवली?

फोटो स्रोत, Shardul Kaddam/BBC
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
शहरात रस्त्यावरून जाताना सिग्नलजवळ गाडी थांबली, तर लगेच कुणीतरी येऊन काहीबाही विकताना किंवा भीक मागताना तुम्ही पाहिलं असेल. अनेकदा त्यात लहान मुलांचाही समावेश अ्सतो.
ही मुलं कुठून आली, ते काय करतात एरवी, कुठे राहतात आणि कधी शाळेत जातात का? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
भटू सावंत यांना हेच प्रश्न पडायचे आणि त्यांनी या प्रश्नांवर उत्तरही शोधलं.
ठाणे शहरात रस्त्यावरच जगणाऱ्या, कुठेतरी उघड्यावरच राहणार्या आणि शिक्षणापासून दूर राहिलेल्या या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच काम त्यांची ‘सिग्नल शाळा’ करते आहे.
आठ वर्षांत इथे शिकून सातजणांनी दहावी पास केली आहे, तीनजण इंजिनियर झाले आहेत, एक पोलीस अकादमीत आहे तर आणखी तिघं व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत. ही त्याच शाळेची गोष्ट आहे.
ठाणे शहरातला तीन हात नाका हा या शहरातला एक महत्त्वाचा चौक आणि देशातल्या सर्वात व्यस्त सिग्नल्सपैकी एक आहे. इथे रस्ते आणि गल्ल्या मिळून वेगवेगळे 21 ‘अप्रोच रोड्स’ एकत्र येतात.
ठाण्याला थेट मुंबईशी जोडणारा हा चौक आहे. त्यामुळे दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि अगदी रात्रीही शेकडो गाड्या इथून ये-जा करतात.
इथल्याच मुख्य सिग्नलजवळ, फ्लायओव्हरखाली शिपिंग कंटेनर्समध्ये सिग्नल शाळा भरते. अगदी भर रस्त्यावरच शाळेचं छोटं पण सुटसुटीत असं आवार आहे.
आसपास तसा ट्रॅफिकचा गोंगाट, पण कंटेनरमध्ये आत शिरल्यावर मुलं वेगळ्या जगात शिरतात.

भटू सांगतात, “आपल्या सगळ्या मुख्य धारेतल्या शाळा त्यांच्या पद्धतीनं लवचिक होऊ शकत नव्हत्या. शाळेत शिकायचं असेल तर आधी कमीत कमी आंघोळ तरी करायला लागेल? बरं, शाळेत सोडायला कोण जाणार, परत कोण घेऊन येणार?
“तिसरा प्रश्न भाषेचा आहे. यातली बहुतांश मुलं भटक्या-विमुक्त गटातील, पारधी समाजातली आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेत एरवी शालेय शिक्षण मिळत नाही.”
“ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, आणि तरीही त्यांना शिकवायचंय तर शाळाच त्यांच्यासारखी बनवावी लागेल, शाळेलाच त्यांच्याजवळ आणावं लागेल. म्हणूनच मग पुलाखाली ही शाळा सुरू करावी अशी ही कल्पना आली.”
आधी आंघोळ, मगच शिक्षण
रोज सकाळी एक बस आसपासच्या सिग्नलवरून तिथे राहणाऱ्या मुलांना शाळेत घेऊन येते.
एरवी बाकीच्या शाळांचा दिवस कसा असतो? तर मुलं शाळेत येतात, घंटा वाजते, प्रतिज्ञा किंवा प्रार्थना होते आणि वर्गात अभ्यास सुरू होते. इथे तसं नाही.
इथे आल्यावर मुलं आधी आंघोळ करतात, छान तेल-बिल लावून तयार होतात. मग दूध-बिस्किटं किंवा काही नाश्ता करतात. शाळेतच त्यांना दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं खाणंही मिळतं.
खाऊन झालं, की राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेची वेळ येते.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
“पुलाखाली माझी शाळा आहे, तिचे नाव सिग्नल शाळा आहे...” सिग्नल शाळेची ही प्रतिज्ञा ऐकूनच ही शाळा काहीतरी वेगळी आहे हे पुन्हा लक्षात येतं..
इथेच मुलं अभ्यासासोबतच खेळ, रोबॉटिक्स आणि व्यवसाय प्रशिक्षणही घेतात. त्यासाठी वेगळ्या छोट्या प्रयोगशाळा आणि कार्यशाळाही इथे तयार करण्यात आल्या आहेत.
पण हा सगळा डोलारा उभं करणं अजिबात सोपं नव्हतं.
असा झाला सिग्नल शाळेपर्यंतचा प्रवास
भटू सावंत सांगतात, “माझा जन्म धुळे जिल्ह्यातल्या म्हसदी या गावी झालेला आहे. आमचं मुळ गाव दिगावे आहे. माझे वडील शेती करत असत पण मी शिक्षणासाठी इथे काकाकडे आलो.”
भटू यांचे एक आजोबा गावचे पोलीस पाटील आणि स्वातंत्र्याच्या चळवळीतले होते. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करायला हवं हा विचार त्यांच्यात अगदी सुरुवातीपासून रुजला.
ठाण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भटू एनएसएस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले. पुढे पुस्तक प्रदर्शनात नोकरी करू लागले आणि त्यानिमित्तानं त्यांनी राज्यभर भ्रमंती केली.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
भटू सांगतात, “गांधीजी म्हणत असत ना की तुम्हाला जर सामाजिक काम करायचं असेल तर तुम्ही देश फिरा. जोपर्यंत तुम्ही जमिनीवर जाऊन पाहात नाही, ती माणसं वाचत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं कुठलं काम करू शकत नाही.”
काही काळ पत्रकारिता केल्यावर ते समाज कार्याकडे वळले. त्यांचे समविचारी मुकुंद घुरे यांनी स्थापन केलेल्या समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेत भटू सहभागी झाले.
शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांना एकत्र आणून वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. ठाणे शहरातले अनेक मान्यवर त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत.
शहराचे विकास आराखडे करणं, सर्वेक्षण करणं अशी कामं करता करता त्यांना रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करायला हवं याची जाणीव झाली आणि त्यातूनच 2016 साली सिग्नल शाळेचा जन्म झाला.
‘गांधीजींच्या अंत्योदय पासून प्रेरणा
“वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या शहरात राहूनही ती कधी इथे मिसळू शकलेली नाहीत. कारण त्यांच्यावर अनेक गोष्टींचा पगडा आहे आणि बाकीचा समाजही त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो. जणू ते आपलं एक बेट करून राहतात.” असं निरीक्षण भटू नोंदवतात.
सिग्नल शाळेच्या शिक्षकांनी मग या मुलांची भाषा शिकण्यापासून सुरुवात केली. त्यांना त्यांच्या भाषेतून शिक्षणाची गोडी लावली.

फोटो स्रोत, SHardul Kadam/BBC
पण याच मुलांसाठी काम करायला हवं असं भटू यांना का वाटलं? ते सांगतात,
“कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गांधी तुम्हाला प्रश्न विचारत राहतो की तू हे का करतो आहेस? गांधी असंही म्हणायचे की अंत्योदयासाठी आपल्याला काम करायला पाहिजे. म्हणजे शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या घटकापर्यंत आपण जायला पाहिजे.”
हाच विचार घेऊन ही शाळा काम करते आहे आणि त्यांच्या प्रयत्नांना यशही येत आहे.
गजरे विकणारा ते इंजिनीअर
मोहन काळे शिक्षण अर्धवट सोडून मुंबईला आला होता. रस्त्यावर गजरे, खेळणी विकून गुजराण करणाऱ्या मोहनला सिग्नल शाळेनं दुसरी संधी दिली. इंजिनीअरिंगची पदविका घेऊन तो आता नोकरी करू लागला आहे.
मोहन या शाळेविषयी अगदी जिव्हाळ्यानं बोलतो. दहावीला मला 76.80 टक्के मिळाले, मग डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये मला प्रवेश मिळवून दिला. दोन वर्षांचा कोर्स केला. आता एका स्टोरमध्ये मी काम करतोय.
“शाळा जर आली नसती जीवनात तर आजही मी रस्त्यावर फुलं किंवा खेळणी विकत राहिलो असतो. परंतु ही शाळा आल्यामुळे मला शिक्षण परत घेता आलं आणि मला अजूनही शिकायचं आहे.”

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
प्रीती देवरे पाचवीत शिकते, पण तिला फक्त शाळा शिकून थांबायचं नाहीये.. ती सांगते “मला मोठं होऊन कॉलेज शिकायचं आहे. मला डॉक्टर बनायचंय आणि लोकांची मदत करायची आहे.”
सहावीत शिकणारा महादू सध्या एका फ्लायओव्हरखाली आपले आईवडील आणि लहान भावासोबत राहतो. त्यांचं घर म्हणजे साड्या, पत्रे यांचा वापर करून आडोसाच आहे.
महादूचे वडील आधी सिग्नलवर काहीबाही विकायचे, आता भटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांनाही एक रिक्षा मिळवून दिली आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर या कुटुंबाचं पोट भरतं. अधूनमधून ते वेगवेगळ्या वस्तू आणूनही विकतात.

इथून बाहेर पडायचा आपला इरादा असल्याचं महादू अगदी स्पष्टपणे बोलतो,
“मला रस्त्यावर राहायचं नाही. काहीतरी शिकून नोकरी करणार. कुठेतरी घर घेणार. मला असंच जगायचं नाही.”
शिक्षकांचा मोठा वाटा
ब्रिजखाली असलेली ही शाळा, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापर्यंतचा ब्रिज बनली आहे आणि इथल्या काही विद्यार्थ्यांना आपल्या नेहमीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे.
आपण रस्त्यावरच आहोत, हेच आपलं आयुष्य आहे या मानसिकतेतून ही मुलं बाहेर पडू लागली आहेत. हा बदल घडवून आणण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका आरती परब आणि अन्य शिक्षकांचाही मोठा वाटा आहे.
शैला देसले सिग्नल शाळेत प्राथमिक वर्गात शिकवतात. त्या सांगतात “बाकीच्या मुलांना शिकवणं तुलनेनं सोपं असतं आणि ते लवकर शिकवतात. कारण त्यांना घरी सर्व सुविधा मिळतात, त्यांचे आईवडील मदत करतात. पण या मुलांचं तसं नसतं. शाळाच सर्वस्व असते त्यांच्यासाठी.”

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
मुळात पालकांना त्यांच्या मुलांना इथे पाठवण्यासाठी तयार करणंही सोपं नव्हतं, असं भटू सांगतात.
“आम्ही सांगायचो, की तुमची मुलं शिकतील आणि चांगले पैसे कमावतील, तुमचं आयुष्य सुधारतील. त्यांचं उत्तर असायचं की मग ते आत्ता काय करतायत? ते वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून कमावतायत.
“तुमचं शिक्षण 15-20 वर्षांनंतर त्यांना नोकरी देणार आहे, ते पण देणार की नाही हे सांगता येणार नाही, असा कोंडीत पाडणारा प्रश्न ते विचारायचे. पण मग कुठल्याही आईला आपल्या मुलानं भीक मागावी, मुलांनी रस्त्यावरच राहावं असं वाटत नाही हेही तेवढचं खरंय.”
मग हळूहळू मुलांचं यश पाहून पालकांचं मत बदलत गेलं.
भटू काहीसं गंमतीत सांगतात, “मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांना तयार करणं हा अत्यंत त्रासदायक, वेदनादायी काम होतं. लहान वयात माझे केस पांढरे होण्याची वेळ आली.”
घरच्यांचा आधारही महत्त्वाचा
आधी भटू यांच्या पत्नी क्रांती यांना आपल्या नवऱ्यानं इतरांसारखं वेळेत घरी यावं, आपलं सामान्य आयुष्य असावं असं क्रांती यांना वाटायचं. पण हे चित्र बदलत गेलं आणि आता त्या भटू यांच्या कामात हातभार लावत आहेत.
भटू त्याविषयी सांगतात “वेळप्रसंगी तिनं तिचं स्त्रीधन विकलं, सोननाणं गहाण ठेवून शाळेसाठी पैसे उभे केले. मी खरंतर तिचीच काय माझ्या मुलाची सुद्धा माफी मागायला पाहिजे कारण त्यांच्यावर अन्याय करत मी कुणाला तरी न्याय देत होतो.”

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
क्रांती बोलता बोलता एक आठवण सांगतात की भटू नेमकं काय करतात हे सुरुवातीला त्यांना फारसं माहिती नव्हतं, पण ते कचऱ्याचं सर्वेक्षण करत होते. “एक दिवस कचऱ्याची गाडी आली आणि मी कचरा टाकायला गेले तर भटू त्या गाडीवर होते. मला तेव्हा धक्काच बसला.”
पण त्याच क्रांती आता भटू आणि त्यांच्या टीमसोबत शहरात कचरा निवारणाच्या कामात उतरल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या रिसायकलिंग प्लांटमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांसोबत त्या काम करत आहेत.
बदल हा असा सगळीकडे, अगदी आपल्या घरापासून घडवता येतो.
‘सिग्नल शाळा बंद व्हायला हवी’
सिग्नल शाळेला सुरुवातीपासूनच ठाणे महानगरपालिकेची मान्यता मिळाली आहे. महापालिकेच्या शाळेशी संलग्न झाल्यानं मुलांना शिकून बाहेर पडताना सर्टिफिकेट्सही मिळतात आणि महापालिकेकडून कामात सहकार्यही लाभतं.
सरकारसोबत “संघर्ष नसला पाहिजे, समन्वय असला पाहिजे. सामाजिक संस्था ही एक स्वतंत्र चूल नसली पाहिजे. ते वेगळं संस्थान होऊन बसता कामा नये. सरकारला सोबत घेतलं तर तो धोरणाचा भाग होऊ शकतो पॉलिसीचा भाग होऊ शकतो.” असं भटू सांगतात.
सिग्नल शाळेनं तेच प्रत्यक्षात करून दाखवलं आहे. आठ वर्षांनी चित्र बदलताना दिसत आहे. पण ते बदलायला आणखी बराच वेळ लागणार आहे, हेही वास्तव आहे.
“हे आमच्यासमोरचं चॅलेंज आहे, की सिग्नलशाळा लवकरात लवकर बंद झाली पाहिजे,” असं भटू सांगतात.
ते पुढे म्हणतात, “एक भारत जो एका वेळेला शंभर शंभर सॅटेलाईट सोडतो, त्यांची पोरं रस्त्यावर पुलाखाली शिकतायत हे काही गौरवास्पद नाहीये. ही मुलं लवकरात लवकर मुख्य प्रवाहातल्या शाळेत गेली पाहिजेत आणि या शाळेची गरज नैसर्गिकरित्या संपली पाहिजे.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








