बायपोलर डिसऑर्डर : विमानतळावर मी फायर अलार्म वाजवला आणि अख्खं विमानतळ रिकामं झालं

फोटो स्रोत, ROSIE ALIVE
मॉडेल रोझी व्हिवा ही त्यावेळी 22 वर्षांची होती. उत्तर लंडनमधील स्टॅनस्टेड विमानतळावरून ती प्रवास करत होती. दरम्यान, अचानक तिने विमानतळावरील फायर अलार्म दाबला आणि सर्वत्र गोंधळ माजून सगळं विमानतळ रिकामं झालं. या प्रकारानंतर रोझीला बायपोलर डिसऑर्डर असल्याचं निदान झालं.
त्या दिवशी रोझी रात्रभर झोपलेली नव्हती. क्रोएशियामध्ये असलेल्या आपल्या पालकांना भेटण्यासाठी ती प्रचंड उत्सुक होती. काही दिवस आपल्या पालकांसोबत सुटी घालवण्याचा तिचा विचार होता.
काही दिवसांपूर्वीच रोझीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेक-अप झालं होतं. पण तरीही घरी जाण्याच्या विचाराने रोझीचं मन प्रफुल्लित झालेलं होतं. कधी एकदा विमानात बसते आणि घरी पोहोचते, असं तिला झालं होतं.
मध्यरात्री एक वाजता लंडनच्या रस्त्यांवर फिरण्याचं तिच्या मनात आलं. फिरून झाल्यानंतर न झोपता ती थेट विमानतळावर गेली. आपण एखाद्या स्वप्नात आहोत की काय, असं तिला त्यावेळी वाटत होतं.
दरम्यान, रोझीने रस्त्यातच एका अनोळखी व्यक्तीला किस केलं. मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना तिने तिच्या पैशांनी खाद्यपदार्थ घेऊन दिले.
आरोग्यविषयक चर्चेसाठी प्रसिद्ध असलेल्या बीबीसी अॅक्सेस ऑल या पॉडकास्टमध्ये बोलताना रोझीने त्यादिवशी तिच्या मनात सुरू असलेली चलबिचल कथन केली.
ती म्हणते, "हे वास्तविक आयुष्य नाही, असंच मला त्यावेळी वाटत होतं."
त्याचवेळी तिला वाटलं की तिची दृष्टीक्षमता आणि ऐकण्याची क्षमता वाढली आहे. तिचे हृदयाचे ठोकेही वेगाने वाढत होते. आपल्यासोबत काहीतरी वेगळंच घडतंय, असं तिला त्यावेळी वाटलं.
स्टॅनस्टेड एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आपल्याला हे काय होत आहे, या प्रश्नाने रोझीला भंडावून सोडलं. आईला फोन करून बोलावं, असंही तिला त्यावेळी वाटलं.
"आईने उत्तर दिलं, तेव्हा माझा भ्रम मोडला," असं रोझी सांगते.
"मला त्यावेळी लक्षात आलं की वास्तविक आयुष्यात काय घडत होतं. मी एका टोकाच्या स्थितीवर जाऊन पोहोचले होते. मला प्रचंड मोठा धक्का बसला."
अचानक रोझीने आजूबाजूला पाहिलं भिंतीवर एका ठिकाणी आग लागल्यानंतर आपोआप पाणी पडण्याची व्यवस्था केली होती. त्या दिशेने ती गेली.

फोटो स्रोत, CHANNEL 4
जवळच असलेल्या फायर अलार्मवर तिने आदळाआपट सुरू केली. फायर अलार्मच्या काचेवर ती हाताने प्रहार करत होती.
त्यानंतर, मोठ्या आवाजात फायर अलार्म वाजत राहिला आणि नंतर पोलीस माझ्या दिशेने धावत आले, इतकंच मला लक्षात आहे, असं रोझी सांगते.
पोलिसांनी रोझीला ताब्यात घेतलं. काही वेळापूर्वी प्रवाशांनी भरलेल्या या विमानतळावर आता एक चिटपाखरूही दिसत नव्हता.
आपल्याकडून भलतंच काहीतरी चुकीचं घडलंय, आपल्याला रुग्णालयात जावं लागेल, हे रोझीला कळून चुकलं. तिच्या मनात वेगवेगळे भ्रम तयार होत होते.
पोलिसांनी रोझीला पकडून नेत असताना खरं तर त्यांच्या रुपाने आपल्याला मदत मिळत आहे, असं तिला एका क्षणी वाटलं.
त्या घटनेच्या काही दिवस आधीपासूनच रोझीचं काहीतरी बिनसलेलं होतं. कोणत्याही घटनेवर रोझीची प्रतिक्रिया ही तिच्या मित्रमैत्रिणींपेक्षा टोकाची असायची.
रोझी म्हणते, "मी त्यावेळी डिप्रेशनमध्ये होते. माझ्या बॉयफ्रेंडने माझ्यासोबत घोस्टिंग (जाणूनबुजून कोणताही संपर्क न ठेवता गायब होणे) केलं होतं. मी सारखा त्याचाच विचार करायचे. कुणी काही बोललं तरी मी डिप्रेशनच्या स्थितीत जायचे. मी तसं का करत होते, मला बिलकुल कळत नव्हतं."
रोझीने डॉक्टरांचा सल्लाही घेतला. पण त्यातून तिला काहीही मदत झाली नाही.
ती म्हणते, "बॉयफ्रेंडसोबतचं ब्रेकअप हे खरं तर माझ्यासोबत काही चुकीचं घडत आहे, हे दर्शवणारं पहिलं लक्षण होतं. पण ते दुःख लपवण्यासाठी मी विनाकारण खुश राहिल्याचा आव आणू लागले. मित्रांमध्ये विनाकारण जास्त आनंदी असल्याचं, ऊर्जावान असल्याचं भासवू लागले. मी दुःख लपवण्यासाठी हे करत होते, हे मित्रांनीही कदाचित ओळखलं असावं."
यानंतर रोझीची वागणूकच बदलली. ती धार्मिक किंवा परलौकिक शक्तींवर जास्त विश्वास ठेवू लागली.
ती सांगते, "माझा एक भाऊ होता. तो 7 वर्षांचा असताना ल्युकेमियाने त्याचं निधन झालं होतं. त्याचा पुनर्जन्म झाला आहे, असं मला वाटू लागलं आणि हे सगळं मी सोशल मीडियावर शेअरही करू लागले."
रोझीची ही वागणूक म्हणजे तिची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं लक्षण होतं. शिवाय झोपेच्या अभावामुळे रोझी एका भ्रमाच्या अवस्थेत गेली. या काल्पनिक जगात तिला वास्तव आणि भ्रम यांच्यातील फरकही कळू शकत नव्हता.
निदान
स्टॅनस्टेड एअरपोर्टवरील घटनेनंतर रोझीला अँब्युलन्समधून तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे ती सुमारे 24 तास होती. रोझीच्या या स्थितीबाबत कळताच तिची आई आणि मोठी बहीण तडकाफडकी क्रोएशियावरून लंडनला आले.
रोझी त्या घटनेबाबत सांगते, "माझ्याबाबत काय घडतंय हे मला समजत होतं. पण त्यानंतर मी सारखा एकच प्रश्न विचारायचे, "मी सुटीवर जाऊ शकते का?"
रोझीला मानसोपचार विभागात हलवण्यात आलं. मानसिक आरोग्य कायद्यानुसार, रोझीला सुरक्षित वाटावं, तिच्यावर योग्य उपचार व्हावेत, अशी तजवीज करण्यात आली. तिथे तिला किमान 3 महिने उपचार घ्यावे लागणार होते.
रोझी पुढे म्हणते, "मला तिथल्या अनेक गोष्टी लक्षात आहेत. पण तिथेही तब्बल दोन महिने मला झोप यायची नाही. टोक म्हणजे मी दोन आठवडे माझ्या आई-वडिलांनाही ओळखू शकले नव्हते."
"माझ्यासोबत त्यावेळी घडत असलेल्या अनेक गोष्टी मी शब्दांत सांगू शकणार नाही. तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांमुळे तुम्ही एका खोलीत बंद होता, हे अतिशय भयानक आहे."
दोन दिवसांनी रोझीचा तपासणी अहवाल आला. यामध्ये रोझीला टाईप 1 बायपोलार डिसऑर्डर असल्याचं निदान झालं.
रोझीला आपल्याला काय झालं आहे आणि हे उपचार का गरजेचे आहेत, हे कळण्यासाठी सहा आठवडे लागले.
ध्यानधारणा, व्यायाम आणि पथ्य
युकेतील मेंटल हेल्थ युके या मानसिक आरोग्यासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या माहितीनुसार, टाईप 1 बायपोलार डिसऑर्डरमध्ये भ्रमाचा एखादा प्रसंग किमान एक आठवडाभर कायम असतो. याला मॅनिया असंही संबोधलं जातं. या काळात संबंधित रुग्णांना डिप्रेशनही वाटू शकतं.
रोझीला सायक्लोथिमियाही होता तसंच तिचा मूडही सतत बदलत असायचा.
हा आजार बराच काळपर्यंत राहतो. पण त्यावर औषध-गोळ्यांसह इतर प्रकारेही उपचार शक्य आहेत.

फोटो स्रोत, CHANNEL 4
रोझी म्हणते, "अशी काही नियमावली नाही. पण मी आता हे व्यवस्थित हाताळत आहे. मी ध्यानधारणा करते. मी माझ्यासोबत जे घडलं ते स्वीकारलं आहे. पुढील काही वर्षे हे माझ्यासोबत राहणार आहे, हेसुद्धा मला माहीत आहे."
"मला एखाद्या गोष्टीचा त्रास होत असल्यास, त्याने मी विचलित होत असल्यास मी ध्यानधारणेचा उपाय करते. माझं डिप्रेशन ध्यानधारणेमुळे पूर्ण नाहीसं होतं, असं नाही. पण यादरम्यान विचार करून मी आणखी तर्कशुद्ध पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ शकते."
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रोझी ही गेल्या 3 वर्षांपासून युकेतील NHS संस्थेच्या संपर्कात आहे.
अशा प्रकारच्या स्थितीवरील उपचार, व्यायाम आणि पथ्य काय असावेत, याबाबत NHS तिला मार्गदर्शन करत असतं.
आता रोझीच्या एक लक्षात आलंय, ते म्हणजे ती जेव्हा थोडीशीच दारू पिते, चांगला सकस आहार घेते आणि उत्तम झोप घेते तेव्हा तिला आपण अधिक सक्षम, बलवान झाल्यासारखं वाटतं. दररोज धावण्याच्या सवयीमुळे साचलेल्या ऊर्जेला योग्य वाट करुन दिल्यासारखं तिला वाटतंय.
फोन न घेता आणि सगळ्या कोलाहलापासून दूर चालायला जाणं तिला जीवनाचा अर्थ शोधून देण्यासाठी मदत करतं तसेच कठीण काळात याचा तिला उपयोग होतो.
तिने आपल्या या अनुभवावर मॉडेलिंह, मॅनिया आणि मी नावाची फिल्मच तयार केली आहे. युकेच्या चॅनल 4 वर ती प्रसिद्ध झाली आहे. तिचं आयुष्य आणि बायपोलार आजारावर प्रकाश टाकण्यासाठी ही फिल्म तयार करण्यात आली.
ती सांगते, आपल्या अनुभवांना वाट करुन दिल्यासारखंच हा अनुभव होता. जणूकाही मी माझ्या थेरपिस्टशीच बोलतेय असं तेव्हा वाटलं.
आता स्टॅनस्टेड विमानतळावर झालेल्या घटनेला चार वर्षं पूर्ण झाली आहे. रोझीने या आजाराबरोबर जुळवून घेत तिचं मॉडेलिंगमधलं करियर सुरू ठेवलं आहे. ती गुची य्वेस सेंट लॉरेंटसारख्या ब्रँड्सबरोबर काम केलेलं आहे.
मी अजूनही 27 वर्षांची सामान्य मुलगीच आहे. या सगळ्याचं आणि इतर गोष्टींचं काय करायचा हा प्रश्न मनात येतोच. हे सोपं नाहीये हे खऱं पण नक्की सुधारता येते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








