खून, छळ आणि शोषण करणाऱ्या महिला सीरियल किलर्सच्या डोक्यात काय चालू असतं?

- Author, कॅथरिन क्वार्मबी
- Role, बीबीसी फ्युचर
एक अशी भेट जी आपल्या कोणाच्याही नशिबात कधीच न येवो. पोलीस तुमच्या घरी येऊन सांगतात की तुमच्या घरातल्या एका सदस्याचा खून झालाय. मेरियन पार्टींग्टनसाठी ती भेट 1994 च्या मार्च महिन्यातल्या एका शनिवारी सकाळी घडली.
त्याच्या 20 वर्षं बेपत्ता असलेल्या बहिणीची बातमी घेऊन पोलीस आले होते.
लुसी 1973 च्या डिसेंबर महिन्यात बसची वाट पाहाताना बेपत्ता झाली होती. ती गायब झाली तेव्हा 21 वर्षांची होती आणि इंग्लिश विषयात पदवी घेत होती. यानंतर 20 वर्षं तिचा काही ठावठिकाणा लागला नाही.
तिचं अपहरण झालं होतं, तिचा छळ करण्यात आला होता, खून करण्यात आला आणि तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून तिला पुरण्यात आलं होतं.
तिच्याजवळ आणखी अनेक मृतदेहांचे अवशेष सापडले होते. तिचा खून सीरियल किलर्स आणि नवरा बायको असणाऱ्या फ्रेड आणि रोझमेरी वेस्ट यांनी केले होता.
फ्रेड वेस्ट याने 1 जानेवारी 1995 साली तुरूंगात आत्महत्या केली, पण त्याच्या बायकोला 10 खूनांसाठी शिक्षा झाली.
तिला ज्या खूनांसाठी शिक्षा झाली त्यात तिची स्वतःची 16 वर्षांची मुलगी, तिची 8 वर्षांची सावत्र मुलगी आणि तिच्या नवऱ्याच्या गरोदर प्रेयसीचा समावेश होता. तिला जन्मठेपेची शिक्षा झाली.
मेरियन पार्टींग्टन म्हणतात, “लुसीचा मृत्यू लैंगिक छळ, क्रूरतेतून झाला होता. तिला हालहाल करून मारण्यात आलं. तिचा शेवटचं ओरडता देखील आलं नाही, तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. तिचे अवशेष सापडल्यानंतर मला वाटलं मी तिची कहाणी जगाला सांगितली नाही तर मीही मरून जाईन,”
महिला पराकोटीच्या क्रूर असू शकतात अशा कल्पनेनेच सामान्यांना धक्का बसतो. पण का? महिलांनी केलेला हिंसाचार किंवा क्रूरता पुरुषांनी केलेल्या क्रूरतेपेक्षा वेगळी असते का? वेगळी असली काय किंवा नसली काय, हाती आलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की एक समाज म्हणून आपण महिला आणि पुरुष गुन्हेगारांना समान वागणूक देत नाही.

आजही जवळपास 80 टक्क्यांहून जास्त हिंसाचार, क्रूरता आणि हत्या पुरुषांकडून होतात. जर घरगुती हिंसाचाराची गोष्ट केली तर त्यातही सर्वाधिक आरोपी पुरुषच असतात, पण पुरुषांकडून असं वागण्याची कदाचित समाजाला सवय असते, त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे धक्का बसत नाही.
याउलट महिलांनी केलेले गुन्हे, हिंसाचाराकडे समाज, माध्यमं आणि न्यायव्यवस्था वेगळ्या दृष्टीने पाहातात आणि त्यातून महिला गुन्हेगारांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा वेगळी वागणूक मिळते. पण त्याआधी आपण हे समजायला हवं की महिला गुन्हेगारांच्या मनात, विशेषतः खूनासारखे क्रूर गुन्हे करणाऱ्या महिलांच्या डोक्यात काय सुरू असतं?
महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास गेल्या काही वर्षांपूर्वी गावित भगिनींनी केलेलं हत्याकांड गाजलं होतं.
अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा केलेला खून म्हणजे बालहत्याकांड.
किरण शिंदे याच्या साथीने 1990 ते 1996 या काळात 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान अंजनाबाई हिने अनेक मुलांना ठार मारले आहे अशी कबुली दिली. त्यामुळं या गुन्ह्याची व्याप्ती केवळ नाशिक आणि कोल्हापूर इतकी राहिली नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या या मायलेकींना पुणे पोलिसांनी 15 ते 20 वेळा पकडलं. जामिनावर सूटून आल्यावर देखील या तिघी हेच करायच्या.
1990 साली एप्रिल महिन्यात रेणुका, सीमा, किरण या त्यांचा मुलगा आशिषला घेऊन चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या.
गर्दीचा फायदा घेऊन रेणुकाने एका व्यक्तीचे पाकिट चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यक्तीने रेणुकाला पकडले आणि जाब विचारला.
गर्दी जमा झाल्यानंतर कडेवर असलेल्या आपल्या मुलाला त्या व्यक्तीच्या पायावर आपटले. गयावया आणि गोंधळ केल्यामुळे तिची सुटका झाली.
याच प्रसंगातून आपल्या सोबत मुलं असतील तर आपल्याला सहानुभूती मिळते हे या तिघींच्या लक्षात आलं आणि त्यामुळे चोरी करण्यासाठी अपहरण करुन इतरांच्या लहान मुलांचा वापर करायचा कट आखला गेला.

यासाठी अंजनाबाई हिने जुलै 1990 मध्ये कोल्हापूर बसस्थानक परिसरातून भिकारी महिलेला फसवून तिच्या दीड वर्षाच्या बाळाचं अपहरण केलं. त्याचं नाव संतोष ठेवलं.
त्यानंतर एका गुन्ह्यात शिक्षा भोगून या तिघी संतोष, तसंच आशिष नावाच्या आणखी एका मुलासह तुरुंगाबाहेर आल्या. याच दरम्यान रेणुकाने एका मुलाला जन्म दिला त्याच नाव किशोर ठेवले. या तिघी या तीन मुलांना घेऊन किरणसोबत चोरी करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरला आल्या.
मंदिरापासून जवळ असलेल्या महालक्ष्मी धर्मशाळेत 10 रुपये डिपॉझीट आणि दिवसाला 7 रुपये भाडे भरत हे सगळे जण चार ते पाच दिवस राहिले. मंदिरासमोर सीमा चोरी करताना पकडली गेली.
लोक जमा झाल्यानंतर अंजनाबाई हिने कडेवर असलेल्या संतोषला जमिनीवर आपटले. त्याच्या डोक्याला जखम झाल्याने तो रडू लागला. त्यामुळं संबंधित व्यक्तीने सीमाला सोडून दिले. विव्हळणाऱ्या संतोषला घेऊन अंजनाबाई मुलींसह बसस्थानक परिसरात आली. रात्री अकरा वाजता वडापाव खाऊन या तिघींनी चोरी करत त्यावेळी अडीच ते तीन हजार रुपये मिळवले.
पण संतोष सतत रडत असल्याने त्याच्यामुळे पोलीस आपल्याला पकडतील असा विचार करत आता तो आपल्या कामाचा नाही त्यामुळे अंजनाबाई हिने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 ची वेळ असल्याने तिथं कुणीच नव्हतं. अंजनाबाई हिने एका क्षणात संतोषचं तोंड दाबून त्याला लोखंडी बारवर आपटले यातच चिमुकल्या संतोषचा मृत्यू झाला. किरणने त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका भंगार रिक्षात ठेवला आणि हे सगळे तिथून पसार झाले. अशी ही पहिली हत्या.
अशाच पद्धतीने चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुलं त्रास देऊ लागली तर त्यांना निघृणपणे ठार करायचं हे सत्र सुरू झालं.
1991 ते 1996 च्या दरम्यान या मायलेकींनी नरेश, बंटी, स्वाती, गुड्डू, मिना, पिंकी, राजा, श्रद्धा, क्रांती, देवली, गौरी आणि पंकज अशा एकुण 13 मुलांचं अपहरण केलं.
यातील मिनाची सुटका करण्यात यश आलं तर इतर बालकांची हत्या झाली होती. यात नऊ महिन्यापासून ते पाच वर्ष वयाच्या चिमुरड्यांचा समावेश होता.
अंजनाबाई आणि तिच्या मुलींनी चोरी करण्यासाठी कधीही स्वतःच्या मुलांचा वापर केला नाही. अपहरण केलेल्या मुलांचा वापर करत चोरी करणं आणि मूल त्रास द्यायला लागलं की त्याची हत्या करणं असा प्रकार सलग सहा वर्ष सुरू होता.
रडणाऱ्या मुलाला चापट्या मारत कधी गळा दाबून तर कधी फरशी किंवा भिंतीवर आपटून या मुलांची हत्या करत होत्या. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेणुकाचा पती किरण शिंदे मदत करत होता.
ताजी घटना म्हणजे 2022 साली गाजलेली आणखी एक केस. एका आईने महाडच्या एका विहिरीत आपल्या 6 मुलांना ढकलून दिलं आणि त्यांची हत्या केली.

प्राथमिक माहितीनुसार पतीसोबत भांडण झालं. पती दाऊन पिऊन येतो, वारंवार मारहाण करतो, चारित्र्यावर संशय घेतो या रागातून रूना सहानी या महिलेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांना सांगितलं.
महिला सीरियल किलर्सचा अभ्यास केला तर लक्षात येतं की त्यांचे बळी हे अनेकदा लहान मुलं असतात किंवा अशा व्यक्ती असतात ज्या त्यांच्या घरातल्या असतात, किंवा त्यांच्यावर अवलंबून असतात.
पुरुष सीरियल किलर्स आपले बळी शोधताना लांबवर जातात, अनोळखी लोकांना लक्ष्य करतात, पण महिलांची पद्धत वेगळी असते.
उदाहरणार्थ मे 1993 मध्ये हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स बेव्हर्ली ऑलीटला शिक्षा झाली. तिने चार लहान बाळांचा खून केला होता आणि अनेक लहान बाळांना गंभीर जखमी केलं होतं. तिला माध्यमांनी नाव दिलं होतं ‘एजंल ऑफ डेथ’.
ती यूकेतल्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि तिने त्या दवाखान्यात अॅडमिट असणाऱ्या बाळांसह एका अकरा वर्षांच्या बालकाचा खून केला होता.
ती या लहान मुलांना इन्सुलिनचा ओव्हरडोस देऊन किंवा त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शनव्दारे एअर बबल घुसवून त्यांना ठार करायची.
तिला शिक्षा झाली त्यानंतर यूकेच्या एका वर्तमानपत्रात लिहिलं होतं, “महिलांचं काम काळजी घेणं आहे, शारिरीक इजा करणं नाही आणि बहुतांश महिला तसंच करतात. त्या माया लावतात. आजही सर्वाधिक हिंसा पुरुषांकडून केली जाते. एक नर्स तर काळजी घेणाऱ्यांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असते. त्यामुळे जेव्हा एखादी महिला असं काही करते तेव्हा ते सैतानी असतं, अनैसर्गिक असतं, तिच्या स्वतःच्या शारीरिक जडणघडणीच्या विपरीत असतं.”
या लेखातही महिलांच्या हिंसेकडे बघण्याचा पारंपारिक दृष्टीकोनच प्रतीत होतो की स्त्री ही मुळात प्रेमळ असते, काळजी करणारी असते आणि इजा करणं किंवा हत्या करणं हे तिच्या मुळ प्रकृतीच्या विरोधात असतं.
स्त्रीच्या मेंदूत असा काही भाग असतो का जो तिला हिंसा करण्यापासून रोखतो? कोणती संप्रेरकं किंवा जनुकं असतात का जी स्त्रीला आक्रमक होऊ देत नाही? आणि मग ज्या स्त्रिया हिंसा करतात त्या इतर महिलांपेक्षा वेगळ्या असतात का?
पुरुष आणि स्त्रीचा मेंदू हिंसेच्या बाबतीत वेगवेगळा काम करतो असं लोकांना वाटत असलं तरी नव्या संशोधनातले निष्कर्ष त्याच्या उलट आहेत.
जिना रिपन या मानवी स्वभावावर अभ्यास करतात. त्या अॅस्टन विद्यापीठात लिहिलेल्या आपल्या शोधनिबंधात म्हणतात, “मेंदूची पुरुषी आणि बायकी असे भाग करणं चुकीचं आहे. काही गोष्ट या बायकी समजल्या जातात, जसं की हळूवारपणा, प्रेमळपणा तर काही गोष्टी पुरुषी समजल्या जातात जसं की आक्रमकता. पण बायकी-पुरुषी असं काही नसतं. हे दोन्हीकडे आढळतात.”
स्त्रीची ओळख ही आईपणाच्या व्याख्येत केली जाते. अनेक महिलांची पहिली ओळख ही आई म्हणूनच केली जाते आणि म्हणून आई या भूमिकेची चिकित्सा करणं अवघड असतं असं क्लीनिकल सायकोलॉजिस्ट अॅना मॉत्झ यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणतात, “स्त्रिया त्यांच्या आई किंवा पालनकर्ता या भूमिकेचा गैरवापर करू शकतात.”
गावित बहिणींच्या केसमध्ये हेच आपल्याला पाहायला मिळालं. त्या लहान मुलांचं अपहरण करून त्यांचं पालन करायच्या, पण शोषणही करायच्या आणि एखादं मूल जास्त त्रासदायक ठरलं की त्याला ठार करायच्या.
एस्टेला वेल्डन मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते महिलांच्या हिंसेचा रोख त्यांच्या स्वतःच्या शरीराकडे आणि त्याच्या शरीराचा कधीकाळी भाग असलेल्या, किंवा त्यांच्या शरीराने तयार केलेल्या त्यांच्या मुलांकडे असतो.
म्हणून अनेकदा आया नैराश्यातून आपल्या स्वतःला आणि आपल्या मुलांना मारताना दिसतात, महाडच्या केसमध्ये दिसलं तसं त्यांचा जीवही घ्यायला जातात.
ज्या स्त्रिया आपल्या मुलांचा छळ करतात किंवा त्यांची हत्या करतात, त्यांच्या दृष्टीने त्या स्वतःचा एक तिरस्कृत भाग नष्ट करत असतात.
तर मॉत्झ म्हणतात की काही ‘विषारी’ जोडपी असतात जिथे दोन विकृती प्रवृत्तीचे स्त्री-पुरुष एकत्र येतात आणि स्वतःच्याच कुटुंबाला हानी पोहचवतात. फ्रेड आणि रोझलिन वेस्ट हे या प्रकारचं विकृत जोडपं होतं.
ज्या स्त्रिया त्यांच्या घरच्यांची हत्या करतात त्यांच्याकडे समाज म्हणून आपण जेव्हा पाहातो तेव्हा आपला दृष्टीकोन असतो की एकतर त्या मानसिक रोगी आहेत किंवा घरगुती हिंसाचारापासून स्वतःचा बचाव करत आहेत, किंवा आपल्या मुलांची हत्या करून एकप्रकारे सुटका करत आहे.
त्यामुळे त्यांना न्यायप्रक्रियेत नाही म्हटलं तर थोडी सहानुभुती मिळते. पुरुष कितीही मानसिकदृष्ट्या अस्थिर असला तरी जर त्याने लहान मुलांचा खून केला तर त्याची सुटका होणं तर दूरच, त्याला त्या प्रकारची सहानुभुतीही मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
क्रिमिनोलॉजिस्ट डॉ एलिझाबेथ यार्डली म्हणतात की त्यांच्या अंदाजे एकूण सीरियल किलर्सपैकी 15 टक्के महिला असतात. पण आता कुठे समाजाने आणि कायद्याने ही गोष्ट मान्य केलीये की महिला सीरियल किलर्स असतात.
अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयला अजूनही वाटतं की खून करणाऱ्या महिला या फक्त कोणत्या पुरुषाच्या साथीदार असतात आणि बहुतांश वेळा त्याच्या प्रभावाखाली काम करत असतात.
घर वगळता आणखी एक जागा म्हणजे जिथे आजारी लोक, लहान मुलं, वृद्ध यांची काळजी घेतली जातेय. उदाहरणार्थ दवाखाने किंवा वृद्धाश्रम. धोकेदायक महिला अशा ठिकाणी आपले पुढचे बळी शोधतात.
डॉ यार्डली आणि त्यांचे सहकारी डेव्हिड विल्सन यांनी अजून एका गटावर संशोधन केलं आहे – हेल्थकेअर किलर्स. म्हणजे दवाखाने, किंवा उपचार मिळतात अशा तत्सम जागांवर खून करणारे सीरियल किलर्स.
नर्स बेव्हर्ली ऑलीट याच गटात मोडते. डॉ यार्डली आणि विल्सन यांच्या संशोधनातून समोर आलं की इथे त्या लोकांना लक्ष्य केलं जातंय जे स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. त्यांच्या संशोधनात असंही लक्षात आलं की हेल्थकेअर किलर्समध्ये महिलांचा आकडा लक्षणीय आहे. बाकी कोणत्याच गटात महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खून करताना दिसत नाहीत.
मायर हिंडली यूकेमध्ये कुख्यात आहे. इयान ब्रेडी या पुरुषासह 1963 ते 1965 या काळात तिने पाच लहान मुलांचा खून केला. तिने या मुलांच्या खूनात तिच्या सहकाऱ्याची मदत केली.
हेलेना केनेडी तेव्हा तरूण होत्या आणि त्यांनी मायराची वकील म्हणून काम पाहिलं.

फोटो स्रोत, Alamy
त्या म्हणतात, “मायरा एक कमी शिकलेली मुलगी होती आणि एका शक्तीशाली पुरुषाच्या प्रेमात होती. त्याच्यासाठी ती वाट्टेल ते करायला तयार होती. पण म्हणून तिची जबाबदारी संपते का? तिने खून केले नसतील, पण तिने ते घडवण्यात मोठी मदत केली. एका पाठोपाठ एक अशी पाच लहान मुलं एका परक्या पुरुषाच्या गाडीत एकटी कधीच बसली नसती. पण त्या गाडीत एक महिला पाहून त्यांचं मत बदललं. त्यांना त्या महिलेच्या सान्निध्यात सुरक्षित वाटलं.”
महिलांनी केलेली हिंसेवर आता अभ्यास होतोय. त्यांना सहानुभुती देणं, किंवा डाकीण ठरवणं दोन्ही तितकंच घातक आहे हे त्यातून समोर येतंय. त्यानुसार कायदा आणि समाजाने बदलायला हवं.
मेरियन म्हणतात तसं, “आपण जे भोगलं ते पुढच्या पिढीला आंदण द्यायला नको.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








