'50 वर्षांपासून इथं राहतोय, पण अजून पाण्यासाठी लढतोय', पाणी धोरण असून लाखो मुंबईकर तहानलेले का?

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"पाणी येत नाही, खूप त्रास होतो. बाहेरून पाणी आणावं लागतं. पन्नास वर्षांपासून इथे राहतोय, मात्र आजही पालिकेचं अधिकृत पाणी मिळत नाही. आम्ही आजपर्यंत पाण्यासाठी लढतोय."

ही संतप्त प्रतिक्रिया आहे मुंबईतील गोरेगावातील आरे भवानी नगरमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय लक्ष्मी नाडर यांची.

मुंबईच्या विविध भागांतील नागरिक पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. गेले अनेक वर्षे वस्त्यांमध्ये पालिकेची अधिकृत पाणीपुरवठ्याची व्यवस्था नसल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत अधिकृत आणि अनधिकृत वस्त्यांमधील सर्वांपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी मुंबई महानगर पालिकेनी 2022 मध्ये 'सर्वांना पाणी धोरण' लागू केले होते. मात्र अर्ज करूनही अनेक वस्त्यांमध्ये पालिकेचे अधिकृत पाणी अद्याप पोहोचलेले नाही.

या धोरणामुळे सर्व मुंबईकरांना पाणी मिळेल अशी आशा होती. मात्र सध्या 15 लाखांपेक्षा अधिक मुंबईकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

मे 2022 पासून नोव्हेंबर 2025 पर्यंत 29,185 अर्ज आले असून त्यापैकी 23,677 कनेक्शन देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

मात्र तहानलेल्या मुंबईकरांपर्यंत पाणी कसं आणि कधी पोहोचेल, याबाबत महानगर पालिकेने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मुंबईच्या विविध भागांत मुंबईकर तहानलेले

मुंबईतील गोरेगाव आरे भवानी नगर परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी नाडर यांच्यासारखे अनेक मुंबईकर पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

हे पाहण्यासाठी बीबीसी मराठीने गोरेगाव, कुर्ला, शिवडी आणि इतर भागांना भेट दिली. या भागांमध्ये नागरिक आजही कष्टाने पाणी भरताना दिसतात.

अनेक दिवस पाण्याची वाट पाहावी लागते. पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागते, अशी परिस्थिती आहे.

आई-वडील, आम्ही आणि मुलं देखील...

गोरेगाव भवानी नगर परिसरामध्ये आजपर्यंत पालिकेची अधिकृत पाण्याची लाईन घरोघरी पोहोचलेली नाही.

त्यामुळे या परिसरात अनेक महिला डोक्यावर आणि कमरेवर पाणी घेऊन रस्त्याने सार्वजनिक नळावरून पाणी भरताना दिसतात. याच ठिकाणी लक्ष्मी नाडर पाण्यासाठी पुटपुटत कमरेवर पाणी घेऊन जाताना दिसल्या.

लक्ष्मी नाडर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, "आम्ही 50 वर्षांपासून इथे राहतोय. आमची तिसरी पिढी मुंबईत राहते. मात्र आजपर्यंत पालिकेचं व्यवस्थित पाणी मिळालेलं नाही. पाणी आठवड्यातून एकदाच येतं. त्यामुळे आधी सगळी भांडी भरून ठेवावी लागतात. पाणी रोज येत नाही. पाण्यासाठी लांब जावं लागतं आणि तिथे पाण्यावरून भांडणं होतात. रस्त्यावरून पाणी आणावं लागतं. डोक्यावर आणि खांद्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतं. आमच्या आई-वडिलांनी केलं तेच आम्ही करतोय, आणि आमची मुलंही तेच करत आहेत."

भवानी नगर वस्तीत ही परिस्थिती जवळपास प्रत्येक घरासमोर आहे. काही भागांमध्ये आठवड्यातून एकदाच पाणी येतं. 50 ते 60 वर्षांपूर्वी दक्षिण भारतातून आलेले हे लोक आजही मुंबईत पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती

15 लाखांपेक्षा अधिक मुंबईकर आजही तहानलेले आहेत, अशी माहिती मुंबईतील 'पाणी हक्क समिती'ने दिली आहे.

  • गोरेगावमधील भवानी नगर, केल्टी पाडा, मोराचा पाडा, नवा पाडा,
  • बोरिवलीतील गौतम नगर, गोराई, गणपत पाटील नगर, नॅशनल पार्कमधील 11 आदिवासी पाडे,
  • मालाडमधील क्रांती नगर, कांदिवली पश्चिमेकडील अप्पा पाडा, जामरुशी नगर, आंबेडकर नगर,
  • शिवडीतील इंदिरा गांधी नगर, रेती बंदर, रामगड, कौल डेपो, जकारिया बंदर, कुलाब्यातील काही वस्त्या,

तसेच मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, वडाळा, भांडुप, घाटकोपर, विक्रोळी पार्क साईट डोंगराळ भागातील वस्त्यांमध्ये पालिकेचे अधिकृत पाणी पोहोचलेले नाही.

वांद्रे, सांताक्रुज, अंधेरी, कांदिवली आणि दहिसरमधील काही वस्त्यांमध्येही अद्याप पालिकेचे अधिकृत पाणी उपलब्ध नाही.

अजून किती वर्ष पाण्याची वाट पाहायची?

या सर्व मुंबईतील वस्त्या 30 ते 50 वर्षांपेक्षा अधिक जुन्या असून नागरिक रस्त्यावरील सार्वजनिक नळ, शौचालय, टँकर किंवा खासगी विक्रेत्यांकडून पैसे देऊन पाणी घेतात.

मुंबईतील कुर्ला कुरेशी नगर डोंगराळ भागात राहणाऱ्या गुलनास तुले गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येमुळे संतप्त आहेत.

त्या म्हणाल्या, "पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून आमच्या भागात पाण्याची समस्या आहे. आम्ही खासगीतून पैसे देऊन पाणी घेतो. कधी कधी दहा ते पंधरा दिवस पाणी मिळत नाही. डोंगरावर राहतो, त्यामुळे खालून पाणी आणणं खूप कठीण आहे. पन्नास ते शंभर रुपये देऊन पाणी घ्यावं लागतं. इतके पैसे सतत कुठून आणायचे. डोंगराच्या खाली पाणी आहे पण वर चढत नाही. अर्ज केला आहे, अधिकारी येऊन पाहणी करतात, पण पुढे काहीच होत नाही."

हीच परिस्थिती मुंबई शहरातील शिवडी कौल वस्ती परिसरातही आहे. 45 वर्षांच्या शिल्पा खापरे गेल्या 30 वर्षांपासून इथे राहतात. त्या म्हणाल्या, "आम्हाला पाणी नसल्यामुळे खूप त्रास होतो. आजपर्यंत पालिकेचे अधिकृत पाणी मिळालेले नाही. अर्ज केला आहे, पण जागा पोर्ट ट्रस्टची असल्याने परवानगी मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक शौचालयातून पाणी भरावं लागतं. पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं. अजून किती वर्ष पाण्याची वाट पाहायची?"

या मुंबईकरांपर्यंत अद्याप पाणी का पोहोचले नाही?

सर्वांना पाणी धोरणांतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट आहे. नियम आणि अटी अधिक असल्याने कनेक्शन मिळवणं कठीण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

पालिकेची मंजुरी मिळूनही राज्य आणि केंद्र सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याचं सांगितलं जातं. प्रशासनाकडून वस्त्यांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक इच्छाशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचा आरोप नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करतात.

जलद गतीने कार्यवाही होत नाही

मुंबईत सर्वांपर्यंत पाणी पोहोचावे यासाठी अनेक नागरिकांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत. मात्र हे अर्ज वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यावर जलद गतीने कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिक अजूनही तहानलेले आहेत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

गोवंडीतील रहिवासी आणि कुर्ला भागात पाण्यासाठी अर्ज करणाऱ्या रुकसार शेख म्हणाल्या, "भारतीय संविधानात मूलभूत अधिकार स्पष्ट असतानाही 2025 पर्यंत आम्हाला पाणी मिळालेलं नाही. एवढी मोठी महानगरपालिका असूनही या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनास्था दिसते. आम्ही अजून किती वर्ष पाण्यासाठी संघर्ष करायचा?"

या माणसांना आत्मसन्मानाचं जगणं मिळत नाही

मुंबईत सर्वांना पाणी मिळावे यासाठी काम करणारे पाणी हक्क समितीचे समन्वयक सिताराम शेलार म्हणाले, "देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 15 लाख लोक अजूनही तहानलेले आहेत. त्यांना पाण्यासाठी भीक मागावी लागते. त्यांना आत्मसन्मानाचं जगणं मिळत नाही. सर्वांना पाणी धोरण आहे, मात्र त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारची परवानगी मिळत नाही. केवळ योजना जाहीर करून पाणी मिळणार आहे का, याचा विचार व्हायला हवा."

सर्वांना पाणी धोरणांतर्गत नळ जोडणी

मुंबईतील विविध भागांमध्ये आजही पाणी का पोहोचलेलं नाही आणि आतापर्यंत सर्वांना पाणी धोरण अंतर्गत किती कनेक्शन दिले गेले या संदर्भात बीबीसी मराठीने पालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधला.

पालिकेनी आतापर्यंत किती अर्ज आले आणि किती कनेक्शन दिले याची माहिती दिली परंतु अनेक भागांमध्ये आजही पाणी का पोहोचलेलं नाही, काय अडचणी आहेत ? या प्रश्नांवर पालिकेने प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यामुळे मुंबईत आजही अनेक मुंबईकरांना पालिकेच्या हक्काच्या अधिकृत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या परिस्थितीत या तहानलेल्या मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं पाणी नेमकं कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.