'आम्ही मुलाला पालिका शाळेतून काढून खासगी शाळेत टाकले,' सध्या मुंबई पालिका शाळांची परिस्थिती काय?

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"पालिकेच्या शाळेत सर्व बाजूंनी परिस्थिती पाहिली. त्यामुळे मी मुलाला पालिका शाळेतून काढले आणि खासगी शाळेत टाकले. शिक्षणाच्या बाबतीत ठीक आहे, पण तिथे शिक्षक कमी आहेत. क्रीडा आणि कौशल्याच्या गोष्टी नाहीत. त्यामुळे मला हा बदल जड अंतःकरणाने करावा लागला."

माहीम येथे राहणारे नितीन दळवी यांनी मुलाला पालिका शाळेतून काढून 17 नोव्हेंबर 2025 रोजी खाजगी शाळेत का टाकले, याबाबत ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत महापालिकेच्या काही शाळा मोडकळीस आल्या आहेत. शाळांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आहे. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण नाही, मिळणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे.

पुरेशा देखभालीचा अभाव आहे. अस्वच्छता या विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळांकडे विद्यार्थी आणि पालक पाठ फिरवत असल्याचे चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे.

पालिका शाळांच्या सद्यस्थितीबाबत मुंबई महापालिका जनसंपर्क विभाग आणि शिक्षण आयुक्त यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री यांनी एका कार्यक्रमादरम्यान पालिका शाळांमध्ये मुलं अधिक परिवर्तित कशी होतील, याबाबत आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

शिक्षकांच्या कमतरतेपासून ते कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील सद्यस्थिती पाहण्यासाठी आम्ही मुंबईच्या कुलाबा, दादर, माहीम, मानखुर्द आदी परिसरातील पालिका शाळांमध्ये फिरलो.

शिक्षकांच्या कमतरतेपासून ते कौशल्यपूर्ण शिक्षणापर्यंत अनेक बाबी पालिका शाळांमध्ये मिळत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई महापालिकेच्या दादर येथील शाळेत नितीन दळवी यांचा मुलगा उदयन सातवीत शिकत होता. मात्र पालिका शाळेतील व्यवस्थापन, क्रीडा आणि इतर कौशल्यपूर्ण शिक्षण व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी मुलाला मध्य सत्रातच काढून खाजगी शाळेत टाकले.

मुंबईतील काही पालिकेच्या पब्लिक स्कूलचे कौतुक केले जाते. मात्र अनेक पालिका शाळांमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे समस्या असल्याचे पालक सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना नितीन दळवी म्हणाले, "माझ्या बाबतीत चिंता अशी होती की माझा मुलगा शिक्षणात कमकुवत होत चालला होता. त्याला शिकवणारे बहुतांश शिक्षक एनजीओमधील होते. शाळेत पालिकेचे शिक्षक कमी होते. जे शिक्षक होते, त्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत ते कोणत्या मानसिकतेने शिकवत असतील, याचाही विचार करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून मी मुलाला शाळेतून काढले."

पालिकेच्या शाळांच्या व्यवस्थेमुळे पालक हैराण

नितीन दळवी यांच्यासारखेच मुंबईतील अनेक पालक पालिकेच्या शाळांच्या अवस्थेमुळे हैराण आहेत.

मोफत आणि दर्जेदार शिक्षण महापालिकेच्या शाळांमधून घेऊन अनेक प्रतिष्ठित आणि गुणवान विद्यार्थी घडले आहेत. मात्र सध्या पालिका शाळांमध्ये विविध समस्या आणि त्रुटी असल्याचे विद्यार्थी आणि पालक सांगतात.

युनायटेड विद्यार्थी पालक संघटनेच्या प्रतिनिधी श्वेता पावसकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "माझ्या मुलीसह अनेक पालक पालिका शाळांमध्ये आपल्या मुलांना शिकवत आहेत. आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या करावर पालिका प्रशासन चालते. मात्र त्याबदल्यात पालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. मिळणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव आहे. शाळांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि त्यांच्या भविष्याची चिंता आम्हा पालकांना भेडसावत आहे."

लाखो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मात्र...

मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प 74 हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामधून दरवर्षी हजारो कोटी रुपये पालिका शिक्षण व्यवस्थेवर खर्च केले जातात. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 3 हजार 955.64 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. CBSE आणि इतर बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये गेल्या काही वर्षांत सुधारणा झाल्याचे दिसते.

मात्र इतर हजारांपेक्षा अधिक शाळांमध्ये परिस्थिती चांगली नसल्याचे पालिका शाळा प्रणालीचे अभ्यासक, वरिष्ठ पत्रकार आणि पालक सांगतात.

पालिका शाळा प्रणाली अभ्यासक आणि शिक्षण विषयक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार घनश्याम सोनार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मुंबईतील काही शाळा मोडकळीस आल्या आहेत. शाळांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आहे. सीसीटीव्ही यंत्रणा नाही. शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. मिळणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. पुरेशा देखभालीचा अभाव आहे. पालिकेच्या अनेक इमारती धोकादायक आहेत. एका बेंचवर तीन विद्यार्थी बसून शिक्षण घेत आहेत. या सर्व कारणांमुळे पालिका शाळांकडे विद्यार्थी आणि पालक पाठ फिरवत आहेत. याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध होऊनही आणि पालक संघटनांनी आवाज उठवूनही प्रशासन दखल घेत नाही."

मुंबई महापालिका शाळांमध्ये सद्यस्थितीतील अडचणी

मुंबईत एकूण 1118 पालिका शाळा आहेत. त्यापैकी अनेक शाळा मोडकळीस आल्या असून इमारतींची पडझड सुरू आहे.

200 पेक्षा अधिक माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांविना सुरू आहेत.

मुंबईत महानगर पालिकेच्या 254 शाळा आहेत. त्या ठिकाणी एकूण 36,205 विद्यार्थी शिकतात आणि शिक्षकांची संख्या 926 आहे.

शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची संख्या पुरेशी नाही. तसेच, अनेक शाळांमध्ये लिपिक आणि शिपाई पदे रिक्त आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिली.

कांजूरमार्ग, दादर, मालवणी, कुलाबा आदी ठिकाणी एका बेंचवर तीन विद्यार्थी बसून शिक्षण घेत आहेत.

भांडुप, माहीम, दादर, कुलाबा, माटुंगा आणि इतर भागांतील शाळा पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहेत.

शाळांमध्ये संस्थांचा आणि विविध उपक्रमांचा हस्तक्षेप वाढलेला आहे.

शिक्षकांवर प्रशिक्षण आणि अशैक्षणिक कामांचा बोजा वाढलेला आहे.

ही माहिती विद्यार्थी, पालक, शिक्षक, संघटना आणि बीबीसी प्रतिनिधींच्या पाहणीतून समोर आली आहे.

सर्वांनी एकत्र येऊन व्यवस्था सुधारण्याची गरज

शिक्षणतज्ज्ञ रवी कृष्णमूर्ती बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "पालिका शाळा गरीब ते सर्वच वर्गातील मुलांसाठी उपयुक्त आहेत. मात्र सध्या या पालिका शाळांमध्ये शिक्षक नाहीत. पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही. शिक्षक नसतील तर मुले शाळेत का येतील. काही शाळांमध्ये पिण्याचे पाणीही नीट उपलब्ध नाही. या अवस्थेमुळे शाळांची संख्या कमी होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मूलभूत हक्कांपासून सर्वसामान्य विद्यार्थी वंचित राहत आहेत."

ते पुढे म्हणाले की पालिका शाळांमधून अनेक गुणवान विद्यार्थी घडले आहेत. मात्र सध्या अनेक कारणांमुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. पालिकेच्या शिक्षण विभागाकडे माहिती मागवूनही ती अनेकदा दिली जात नाही. गेल्या काही वर्षांत निवडणुका न झाल्यामुळे शिक्षण समित्याही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. पालक, विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ, प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधींनी एकत्र येऊन ही व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. अन्यथा या किफायतशीर शिक्षण व्यवस्थेला भविष्यात धोका निर्माण होईल.

पालिका शाळांची सद्यस्थिती

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या 1118 शाळा असून त्यामध्ये 8630 शिक्षक कार्यरत आहेत. या शाळांमध्ये सुमारे 3 लाख 10 हजार 426 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मुंबईत

माहिती अधिकार आणि विविध अहवालांनुसार ही संख्या गेल्या काही वर्षांत घटली आहे. शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा बोजा असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे आणि शिक्षणाची गुणवत्ता कमी होत असल्याचेही सांगितले जाते.

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षक संघर्ष संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षक रवींद्र पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शिक्षक अनेक वर्षांपासून मन लावून विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत शिक्षकांवर अनेक अतिरिक्त कामे सोपवली जात आहेत. सुट्टीवर असतानाही शिक्षकांना तात्काळ त्या कामांकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे मानसिक तणाव वाढला आहे. शिकवण्याव्यतिरिक्तची कामे बंद व्हायला हवीत. शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या प्रशासनाकडे आहेत. त्याकडे लक्ष दिल्यासच शिक्षक योग्य पद्धतीने शिक्षण देऊ शकतील."

पालिकांच्या शाळेबाबत राज्य सरकार काय म्हणतं?

पालिका शाळांच्या सद्यस्थितीबाबत मुंबई महापालिका जनसंपर्क विभाग आणि शिक्षण आयुक्त यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली नाही.

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान पालिका शाळांबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, "खासगी शाळांबाबत पालक जास्त प्रभावित असतात. 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक उपाय केले. त्या काळात खासगी शाळांमधून दोन लाख विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले. खाजगी शाळा चांगल्या आहेतच, पण अनेक पालिका शाळाही त्याहून चांगल्या आहेत. पालकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची गरज आहे. पालिका शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालिकेकडे ती ताकद आहे, फक्त स्पष्ट दृष्टीकोनाची गरज आहे."

शाळांबाबत महानगर पालिका प्रशासनाची भूमिका

मुंबई महानगर पालिकेतील शाळांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न विचारण्यासाठी बीबीसी मराठीने महानगर पालिका प्रशासनाशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या उप-आयुक्त (शिक्षण विभाग) डॉ. प्राची जांभेकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर या ठिकाणी अपडेट करण्यात येईल.

तसेच, महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडूनही प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला, पण ती उपलब्ध होऊ शकली नाही.

शाळांची संख्येतही घसरण

मुंबई महापालिका शाळांमध्ये सध्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. विविध कारणांमुळे पालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे शाळांची संख्याही घटत आहे.

पालिका शिक्षण व्यवस्था योग्य पद्धतीने राबवली जात नसल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याचे शिक्षण अभ्यासक सांगतात.

मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने, पुढील काळात नगरसेवक आणि शिक्षण समित्या नियुक्त झाल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)