You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'शाळा पाडून तुम्ही आम्हाला सतवायचं म्हटलं तर कसं चालणार?' महानगरपालिकेच्या शाळांसाठी का होतंय आंदोलन?
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इंच इंच जागेच्या किमती जिथे गगनला भिडल्या आहेत अशा मुंबईत आता शाळांच्या जागेसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
अभिनेत्री आणि मराठी अभ्यास केंद्राच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमित सांगतात, "आता असा संशय यायला लागला आहे की जिथे जिथे हे भूखंड आहेत ते मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे जिथे मराठी किंवा प्रादेशिक भाषांच्या शाळा सुरू आहे त्यांचं ऑडिट करून महानगरपालिका जाणीवपूर्वक या इमारती धोकादायक आहेत असे रिपोर्ट्स आणतं आहे का? मग या इमारतींचं पाडकाम करून त्यांचे काही निराळे प्लॅन्स आहेत का? निराळे काही प्रकल्प उभारायचे आहेत का याबाबत सर्वच जनसामान्यांच्या मनात शंका आहे."
चिन्मयी सुमित यांनी ही शंका बोलून दाखवण्याचं कारण आहे, मुंबईच्या मधोमध मोक्याच्या ठिकाणी असलेली माहीममधली शाळा. मुंबई महानगरपालिकेची न्यू माहीम शाळा पाडली जाणार आहे आणि या विरोधात मराठी अभ्यास केंद्र, पालक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली आहे.
इमारत धोकादायक असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्याची पुनर्बांधणी आवश्यक आहे. परंतु इमारत खरंच धोकादायक आहे का? याबाबत काही पालक, स्थानिक कार्यकर्ते आणि मराठी अभ्यास केंद्राकडून शंका उपस्थित केली जात आहे.
केवळ ही एकच शाळा नाही तर मुंबईतल्या अशा अनेक शाळांच्या जागेच्याबाबतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकं हे प्रकरण काय आहे? आणि याचा गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईत खासगी शाळांमधलं शिक्षण दिवसेंदिवस महाग होत चाललेलं असताना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये परवडणारं शिक्षण घेऊ शकत आहेत.
गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षण देणं ही कोणत्याही सरकारची किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाचीही जबाबदारी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार तर पहिली ते आठवीचं शिक्षण हे सक्तीचं आहे.
परंतु मुंबईत महानगरपालिकेच्या शाळांच्या जागा बळकवण्यासाठी काही डाव सुरू आहे का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते, काही पालक आणि मराठी अभ्यास केंद्राकड़ून उपस्थित केला जात आहे. तसंच यासाठी आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलं आहे.
मुंबईतील न्यू माहीम ही महानगरपालिकेची शाळा अतिधोकादायक असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. यासाठी पालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सुद्धा करून घेतलेला आहे. त्यानुसार शाळेची इमारत पाडून पुन्हा त्याच ठिकाणी शाळा बांधली जाईल असं पालिकेचं म्हणणं आहे.
परंतु मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून किंवा पाडून मुंबईतल्या मराठी शाळा आजारी पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केला आहे. यासाठी गेल्या आठवड्यात मराठी अभ्यास केंद्र, स्थानिक कार्यकर्ते आणि काही पालकांकडून माहीम आणि धारावी या ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आलं.
मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्हाला असं जाणवतंय की मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद पाडणं हा एका व्यापक कारस्थानाचा भाग आहे. शाळा आजारी पाडणं हे गिरण्या आजारी पाडण्यासारखं आहे. यात लोकप्रतिनिधी, प्रशासक, जमीन भांडवलदार हितसंबंध या सगळ्यांचं नातं आहे. यामुळे मोक्याच्या शाळा ठरवून आजारी पाडण्याच्या कारस्थानाचा हा भाग आहे."
न्यू माहीम शाळेच्या या प्रकरणाचा पाठपुरावा आम आदमी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्या प्रणाली राऊत यांनी गेल्या काही महिन्यांपासून केला. त्यांनीही यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मुलांना तोंडी सांगितलं गेलं की शाळा आता तुमच्या डोक्यावर कधीही पडेल. तुम्हाला शाळेतून काढलं जाईल आणि दुसरीकडे शाळा दिली जाईल. गेल्या नोव्हेंबरला रिपोर्ट येतो आणि शाळा जून 2025 ला मुलांना दुसरीकडे पाठवलं जातं. बरं ही तुमच्यादृष्टीने अतिधोकादायक शाळा झाली तर सहा सात महिने तुम्ही मुलांना शाळेत ठेवलं कसं? याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की शाळा धोकादायक नाही."
"ही शाळा सी 1 नाही म्हणजेच अतिधोकादायक नाही असं रिपोर्ट सांगतो. सध्याच्या इमारतीत छोट्यामोठ्या दुरुस्त्या कराव्या. मुलांना याच शाळेत ठेवा असा रिपोर्ट आहे. आता पालिकेने तिसरा रिपोर्ट काढला आहे. गिरण्याच्या जमिनी लाटल्या गेल्या. त्यानंतर मालामाल मॉल आले. त्याच पद्धतीने शाळेच्या जमिनी लाटल्या जात आहेत का?" असा प्रश्न त्या उपस्थित करतात.
मोरी रोडच्या शाळेचं काय झालं?
मुंबईतील एका शाळेच्या पुनर्बांधणीचा हा प्रश्न नाही तर काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने माहीम मधलीच मोरी रोड इथल्या शाळेची इमारत पाडली परंतु अद्याप त्याठिकाणी शाळा पुन्हा सुरू झालेली नाही.
प्रणाली राऊत सांगतात, "मोरी रोडला चार वर्षांपूर्वी महापालिकेची शाळा पाडली. ती अजून बांधलेली नाही. एकही वीट रचली गेली नाही. इथून पाच मिनिटांवरची शाळा. याबाबत काही माहिती दिली जात नाही. त्यानंतर आता ही शाळा पाडायचा घाट केला जातो. ती शाळा आधी बांधली असती."
न्यू माहीममध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांच्या पालक सोनाली दाभाडे यांनीही याबबात नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "मोरी रोडची शाळा पण तोडली मग आमची मुलं शिकणार कुठे. इथे शाळा तुटते, तिथे शाळा तुटते; तर पोरं जाणार कुठे?"
माहीम लेबर कॅम्प याठिकाणी अत्यंत लहान खोल्यांमध्ये राहणाऱ्या अनेक पालकांची मुलं शिक्षणासाठी माहीमच्या महानगरपालिकेच्या शाळांवरच शिक्षणासाठी अवलंबून आहेत.
इथे राहणाऱ्या रजिया शेख यांची दोन्ही मुलं मराठी शाळेत शिकतात. आता नववीत शिकणारी त्यांची मुलगी काही वर्षांपूर्वी मोरी रोडच्या मनपा शाळेत शिकत होती. ती शाळा पाडणार असल्याने न्यू माहीम शाळेत तिचं शिक्षण सुरू झालं आता ही शाळा सुद्धा पाडणार असल्याने याच विद्यार्थिनीला आता माहीम बाहेर सायन याठिकाणी शाळेत समाविष्ट केलं आहे.
रजिया शेख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "माझी मुलगी सध्या नववीत आहे. न्यू माहीममध्ये आहे. आता ती शाळा पाडायचं म्हणतात. आता सायनला ट्रान्सफर केलं आहे. आधीही माझी मुलगी दुसऱ्या शाळेत होती. मोरी रोडच्या शाळेत होती. बीएमसीची शाळा होती.
चार वर्षं मुलगी तिथे होती. ही शाळा पाडायची आणि नवीन बनवायची आहे म्हणून तिथून काढलं आणि न्यू माहीममध्ये टाकलं. मोरी रोडची शाळा अजून बनवली नाही. चार वर्ष झाली. शाळा किती बदली करणार?"
त्या पुढे सांगतात, "बनवणार म्हणतात पण अजून काहीच बनलं नाहीय तिथे. आता ही शाळा पाडून तुम्ही आम्हाला सतवायचं म्हटलं तर कसं चालणार. आम्हाला पाडायची नाहीय शाळा. कारण एकदा शाळा पडली की ती पुन्हा बनत नाहीय," अशी भीती पालकांच्या मनात आहे.
शिवाय, ह्या दोनच शाळा नसून आम्ही अनेक शाळांच्याबाबतीत हे बोलतोय असं डॉ.दीपक पवार सांगतात.
"फक्त माहीमची शाळा नव्हे तर परळमध्ये पार्कींग लॉटमध्ये चार वर्ग दिली गेलेली शाळा, भांडुपची शाळा, कुलाब्याची शाळा आणि मुंबईतल्या अनेक भागातील शाळांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत." असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महानगरपालिकेने मोरी शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, 'माहीम मोरी शालेय इमारत पुनर्बांधणीची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. त्याची निविदा प्रकाशित झाली आहे. नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश (Work Order) देण्यात येतील.'
पालकांचं म्हणणं काय?
यासंदर्भात आम्ही न्यू माहीम याठिकाणी शिकत असलेल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोललो.
माहीमच्या लेबर कॅम्पमध्ये अगदी लहान खोलीत राहणाऱ्या सोनाली दाभाडे यांची तिन्ही मुलं या शाळेत शिकतात.
आता या विद्यार्थ्यांना माहीमबाहेर सायन इथल्या मनपा शाळेत पाठवलं जात आहे.
परंतु ही शाळा घरापासून लांब असून जाण्या-येण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही असं पालकांचं म्हणणं आहे.
त्या सांगतात, "माझी पोरं आधी इराणी हॉटेलच्या इथे शिकायची. आता तिथून ट्रान्सफर करून एक वर्ष नाही झालं तर त्यांना सायनच्या इथे पाठवलं आहे. शाळा दुरुस्तीला काढत आहेत. दुरुस्ती होत नाही म्हणून तोडायला घेतली. आम्हाला माहीमचीच शाळा पाहिजे. मुलं इकडे आजारी पडायला लागली आहेत. इथून सायनची शाळा लांब आहे. जाऊन-येऊन तास लागतो. जाण्या-येण्याची सोय नाही. मुलं लहान आहेत त्यांना चालत जावं लागतं."
तर दुसऱ्या पालक रजिया शेख सांगतात, "हातावर पोट असतं इथल्या लोकांचं. प्रायव्हेट शाळा परवडत नाही. आम्हाला महानगरपालिकेचीच शाळा परवडते. शाळा पाडायची म्हटलं तर खूप त्रास होतो आम्हाला. एक-दीड तास जाऊन येऊन करावा लागतो."
मागणी काय आहे?
पालिकेच्या शाळेची इमारत पाडत असताना त्या जागेवर पुन्हा शाळाच बांधली जाईल आणि कधीपर्यंत बांधली जाईल याबाबत पालिका आणि सरकारने आश्वासन द्यावं अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने करण्यात आली आहे.
ते म्हणाले, "नाशिकमध्ये बीडी भालेकर शाळा पाडल्यानंतर त्याठिकाणी शाळाच बांधली जाईल असं आश्वासन सरकारकडून घेतलं तशापद्धतीने मुंबईत शाळांच्या जमिनी गिळंकृत होणार नाहीत अशाप्रकारचं ठोस आश्वासन आम्ही सरकारकडून घेणार आहोत."
तर अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी सांगितलं, "मला असं वाटतं की आता सर्वजण जागरूक झालेले आहेत. हे आपण होऊ देता कामा नये.त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महापालिकेशी आम्ही सतत संवाद साधायचा प्रयत्न करत आहोत.
पण ते आम्हाला उत्तरदायी आहेत असं त्यांना वाटत नाही. म्हणून मी आवाहन करते सर्वसामान्यांना की आपल्या अवतीभोवती ज्या घटना आहेत त्याकडे आपण सजगपणे पाहिलं पाहिजे. नाहीतर मुंबईतून हा मराठी टक्का कमी होत होत नाहीसा होईल की काय अशी शंका माझ्या मनामध्ये आहे."
मुंबई महानगरपालिकेचं उत्तर
या प्रकरणी आम्ही मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधला. न्यू माहीम शाळा आणि मोरी शाळेबाबतीत पालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तर काही इतर प्रश्नांच्या बाबतीत अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्याशी संपर्क साधला असून त्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळू शकलेली नाही.
माहीमच्या शाळांच्याबाबतीत मुंबई पालिकेने निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
यानुसार, 'बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या न्यू माहीम शाळेबाबत दिशाभूल करणारे वृत्त समाज माध्यम आणि प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होत आहे.
महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण (Structural Audit) करण्यात आले. त्यामध्ये ही इमारत C1 श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली.
असे असले तरी पालक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे त्रयस्थ सल्लागार संस्थांमार्फतदेखील संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले.
या संरचनात्मक लेखापरीक्षणातदेखील ही इमारत 'अतिधोकादायक' असल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यू माहीम शाळा विविध भाषिक आहे. केवळ मराठी माध्यमाची नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने या शालेय इमारतीतील मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे नजिकच्या शाळेत नियोजनबद्ध स्थलांतरण करण्यात आले आहे.
सर्व शालेय विद्यार्थ्यांचे पर्यायी व्यवस्थेत स्थलांतरण करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असे म्हणणे योग्य ठरत नाही.'
'या जमिनीचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठीच केला जाणार आहे. तसेच, या शालेय इमारतीची बांधणीदेखील महानगरपालिकेमार्फत केली जाणार आहे. खासगी विकासकामार्फत पुनर्बांधणी केली जाणार नाही अथवा कोणतेही खासगीकरण विचाराधीन नाही,'
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.