पुष्पा 2: रात्र तुरुंगात घालवल्यानंतर अल्लू अर्जुनची सकाळी सुटका, प्रेमासाठी मानले चाहत्यांचे आभार

    • Author, बीबीसी प्रतिनिधी

तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनची शनिवारी सकाळी चांचलगुडा तुरुंगातून सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यानं चाहत्यांचे प्रेमासाठी आभार मानले आहेत.

हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक केली होती. नामपल्ली कोर्टाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर, तेलंगणा हाय कोर्टाने अल्लू अर्जुनला आता अंतरिम जामीन मंजूर केला. पण प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यानं त्याला रात्र तुरुंगात काढावी लागली.

कठोर सुरक्षा बाळगत शुक्रवारी (13 डिसेंबर) त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केली आणि चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की त्यांना अटक करण्यात आली होती.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा - 2 सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाच्या प्रिमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जूनच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

अल्लू अर्जूनने कोर्टाला विनंती केली होती की, त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यात यावा.

या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम 105, 118(1)आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

4 डिसेंबर रोजी अल्लू अर्जूनचा चित्रपट 'पुष्पा-2 : द रुल' च्या रिलीजच्या पूर्वसंध्येला हैद्राबादलमधील 'संध्या थिएटर'मध्ये चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी बऱ्याचशा लोकांनी अॅडव्हान्स तिकीट खरेदी करून चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

अल्लू अर्जूनच्या टीमनं अचानकच इथे हजेरी लावून कार्यक्रम करण्याचं नियोजन केलं. जेव्हा अल्लू अर्जून थिएटरमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एकच झुंबड उडाली.

अल्लू अर्जून आणि त्याची सुरक्षा करण्यासाठी तैनात असलेले 30 ते 40 जण थिएटरच्या खालच्या भागात चित्रपट पाहण्यासाठी हजर झाले.

त्यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि सुरक्षा कर्मचारी कमी जागेत उपस्थित असल्यानं एकच झुंबड उडाली. या दरम्यान तिथे रेवती नावाच्या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

रेवती या त्यांचे पती भास्कर आणि आपला लहान मुलगा आणि लहान मुलीसोबत आल्या होत्या. मात्र, थिएटरमधील चेंगराचेंगरीत रेवती आणि त्यांचा मुलगा खाली पडले आणि बेशुद्ध झाले.

या चेंगराचेंगरीतच रेवती यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्लू अर्जूनसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आज शुक्रवारी (13 डिसेंबर) अल्लू अर्जूनला पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर हैद्राबादचे अॅडिशनल सीपी विक्रम सिंह मान यांनी म्हटलं, "पोलीस प्रक्रियेचं पालन करत आहेत."

मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर हा खटला दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

चिकडपल्लीचे एसीपी रमेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचं एक पथक शुक्रवारी (13 डिसेंबर) अल्लू अर्जूनच्या घरी दाखलं झालं आणि त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर पोलिसांनी सांगितलं की, अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे.

अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर त्याला गांधी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आलं.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीवर या प्रकरणासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की, "अल्लू अर्जून चित्रपट पाहून गाडीत शांतपणे बसून गेला नाही. पण तिथे त्याने गाडीतून बाहेर निघून लोकांकडे हातवारे करून, लोकांकडे पाहून हात हालवून लोकांमध्ये उत्साह भरला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली."

"त्यांना चित्रपट पहायचाच होता तर ते घरीही होम थिएटरमध्ये बसून पाहू शकले असते. जर जनतेत जाऊन चित्रपट पहायचा होता तर पोलिसांना आधी कळवायला हवं होतं," असंही त्यांनी म्हटलं.

दुसऱ्या बाजूला, अल्लू अर्जूनच्या अटकेवर टीका करताना बीआरएसचे नेते के. टी. रामाराव यांनी म्हटलं, "हे राज्य सरकार किती असुरक्षित आहे, ते यावरुन दिसून येतं."

एका व्हिडिओमध्ये पोलीस अल्लू अर्जूनला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाताना दिसत आहे. तर याच व्हिडिओमध्ये अल्लू अर्जून म्हणताना दिसतो, "मी कपडे बदलून येत आहे. मला थोडा वेळ द्या."

पोलिसांनी बेडरुममध्ये घुसून घेऊन जाणं चुकीचं असल्याचंही तो या व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

या व्हिडिओमध्ये, त्याची पत्नी स्नेहा यांच्या डोळ्यांत अश्रू दिसतात तर अल्लू अर्जून त्यांना धीर देताना दिसत आहे.

अल्लू अर्जूनला चिकडपल्ली ठाण्यामध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याच्यासोबत त्याचे वडिल अल्लू अरविंद आणि भाऊ अल्लू शिरीषदेखील उपस्थित होते.

चार डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी 8 डिसेंबरला तीन लोकांना अटक केली होती.

पोलिसांनी संध्या थिएटरचे मालक एम संदीप, सिनीयर मॅनेजर एस. एम. नागाराजू आणि लोअर बाल्कनीचे इंचार्ज जी. विजया चंद्रा यांना अटक केली आहे.

या प्रकरणी संध्या थिएटरच्या व्यवस्थापनानं तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

'पुष्पा' चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदानानेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. तिने म्हटलं आहे की, "मी आता जे काही बघत आहे, त्यावर मला विश्वास बसत नाहीये. जे काही घडलं ते फारच दुर्दैवी होतं. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी एका व्यक्तीला दोषी ठरवणं, निराशाजनक आहे."

अल्लू अर्जूनने काय म्हटलं?

पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रचंड चर्चा होती. शुक्रवारी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला.

सध्या या चित्रपटाला संपूर्ण देशभरात उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, त्यादरम्यानच ही घटना घडली असल्याने अल्लू अर्जूनच्या चिंता वाढल्या आहेत.

आपल्याविरोधात दाखल खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अल्लू अर्जूनने तेलंगणा हायकोर्टामध्ये दाखल केली आहे.

त्याने आपल्या याचिकेमध्ये म्हटलं आहे की, थिएटरमध्ये पोहोचण्याआधीच आपण तिथे जाणार असल्याचं पोलिसांना कळवण्यात आलं होतं. झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आपला काहीही सहभाग नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

त्याने याआधीही एक व्हीडिओ प्रसारित करुन महिलेच्या मृत्युवर दु:ख व्यक्त केलं होतं.

तसेच, मृत महिलेच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये देणार असल्याची घोषणाही त्याने केली होती.

दुसऱ्या बाजूला ज्या चित्रपटामुळे अल्लू अर्जून सध्या चर्चेत आहे, तो चित्रपट बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सगळे विक्रम मोडणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'गंगोत्री' या पहिल्या चित्रपटापासून 'पुष्पा - 2' पर्यंतचा अल्लू अर्जुनचा प्रवास आपण जाणून घेऊयात.

चाहत्यांचा लाडका 'बनी'

कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते अल्लू अर्जुनला प्रेमाने 'बनी' म्हणतात.

80 च्या दशकात दोन सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर 2003 साली 'गंगोत्री' सिनेमाद्वारे अल्लू अर्जुनने नायक म्हणून पदार्पण केलं. गेल्या 20 वर्षांत त्याने केलेल्या विविध भूमिका आणि अभिनेता म्हणून त्याच्यात झालेले बदल प्रेक्षकांनी वाखाणले आणि अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.

सर्व प्रकारच्या तेलुगू प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. 'पुष्पा' या गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही तितकंच प्रभावित केल्याचं स्पष्ट झालं.

अल्लू अर्जुनचा पहिला चित्रपट 'गंगोत्री' मार्च 2003 मध्ये प्रदर्शित झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

पहिल्या चित्रपटामध्ये अभिनय करत असताना अल्लू अर्जुनला त्याचे वडील आणि आघाडीचे निर्माते अल्लू अरविंद यांचा आणि त्याचे मामा अभिनेते चिरंजीवी यांचा मोठा आधार लाभला होता. परंतु, त्यानंतरचं यश मात्र त्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं आहे.

'गंगोत्री'मधील अजाण सिंहाद्री हे पात्र आणि 'पुष्पा'मधील पुष्पाराज हा सराईत तस्कर यामध्ये बराच फरक आहे. 'गंगोत्री' प्रदर्शित झाला तेव्हा अल्लू अर्जुन केवळ 21 वर्षांचा होता. नवोदित कलाकार म्हणून त्याचा स्वतःचा अजाणपणा आणि अवघडलेपणा चित्रपटातील पात्राच्याही स्वभावाशी जुळणारा होता.

पहिल्या चित्रपटातील त्याच्या कामावर बरीच टीका झाली. पण, पुढच्याच वर्षी आलेल्या 'आर्या' या चित्रपटात मात्र त्याने स्वतःच्या अभिनयाने टीकाकारांना आपलंसं केलं.

अल्लू अर्जुने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 'आर्या', 'आर्या 2', 'हॅपी', 'जुलाई', या चित्रपटांमध्ये त्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणाऱ्या उत्साही भूमिका केल्या, तर 'परुगू', 'वेदम्', 'वरुडू' या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका लोकांच्या डोळ्यांमधून अश्रू काढणाऱ्या होत्या.

अल्लू अर्जुन प्रत्येक पात्रावर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचा चित्रपट भरपूर कमाई करणारा ठरला, तरी तो अत्यानंदी होत नाही किंवा एखाद्या चित्रपटाने खराब कामगिरी केली, तरी निराश होत नाही. 'ना पेरू सूर्या' या चित्रपटाचं अपयश त्याने उमदेपणाने स्वीकारलं.

तुलनेने अल्लू अर्जुनच्या चित्रपटांमधील कारकिर्दीवर कमी टीका झालेली आहे. पण 2016 साली हैदराबादमध्ये चित्रपटांशी संबंधित एका कार्यक्रमात त्याने केलेलं विधान टीकेचं लक्ष्य ठरलं होतं. 'मेगास्टार' चिरंजीवीचा धाकटा भाऊ आणि विख्यात अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल काही बोलावं, अशी मागणी त्या कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी अल्लू अर्जुनकडे केली.

पण अल्लू अर्जुन म्हणाला, "भावा, मी यावर काहीच बोलणार नाही." त्याचे हे उद्गार उद्धटपणाचे मानले गेले आणि पवन कल्याणच्या चाहत्यांनी त्यावर जोरदार टीका केली

मायकल जॅक्सनचा चाहता

अल्लू अर्जुनच्या बाबतीत बोलताना त्याचा नाच पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो.

'पुष्पा'मधील 'श्रीवल्ली' या गाण्यात त्याची स्लिपर पायातून निसटते आणि तो पुन्हा त्या दिशेने जात ती स्लिपर पायात घालतो. ही स्टेप देशभरात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक विख्यात व्यक्तींपासून ते लहान मुलामुलींपर्यंत सर्वांनी या स्टेपचं अनुकरण करणारे व्हीडिओ बनवले होते.

'आला वैकुंटपुरामुलो' या चित्रपटातील 'बुट्ट बोम्मा' या गाण्यामधील अल्लू अर्जुनचा नाचही असाच प्रसिद्ध झाला होता.

प्रत्येक चित्रपटात त्याची अशी एक खास स्टेप असते.

लहानपणापासूनच अल्लू अर्जुनला नाचाची भरपूर आवड होती. लहानपणी त्याच्या खोलीत फक्त मायकल जॅक्सन आणि चिरंजीवी या दोनच माणसांची छायाचित्रं होती, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

या दोघांकडून आपण खूप काही शिकल्याचंही तो म्हणाला. मायकल जॅक्सनचा तो कट्टर चाहता आहे. मायकल जॅक्सनच्या निधनानंतर त्याला आदरांजली म्हणून अल्लू अर्जुनने स्वतः मंचावरून नाच सादर केला होता.

'पुष्पा' चित्रपटातील 'मैं झुकेगा नही, साला' या संवादासारखे अनेक खटकेबाज संवादही अल्लू अर्जुनच्या नावावर आहेत.

केरळमध्ये चाहत्यांची प्रचंड संख्या

इतर भाषांमधील प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेल्या तेलुगू अभिनेत्यांच्या यादीत अल्लू अर्जुनचं स्थान सर्वोच्च आहे.

तेलुगू खालोखाल मल्याळी भाषेतही अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता लाभली. केरळमध्ये मल्याळी तारेतारकांच्या चित्रपटांसोबत अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची अटीतटीची स्पर्धा होताना दिसते.

केरळमध्ये 2018 साली पूर आला, तेव्हा अल्लू अर्जुनने मदतकार्यासाठी देणगी दिली होती.

डबिंगद्वारे हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली

'पुष्पा' चित्रपट हिंदी प्रदेशांमध्ये इतका प्रचंड यशस्वी होईल, असं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा प्रदर्शनावेळीसुद्धा कोणाला जाणवलं नव्हतं.

पण, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अल्लू अर्जुनचा चेहरा हिंदी बाजारपेठेत परिचयाचा झालेला होता.

डबिंगद्वारे अनेक तेलुगू चित्रपट हिंदी प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहेत. 'दुव्वडा जगन्नाधम' आणि 'सराईनोडू' यांसारख्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची हिंदी रूपं 'यू-ट्यूब'वर प्रदर्शित झाल्यानंतर लाखो लोकांनी हे चित्रपट पाहिले.

प्रयोगशीलता आणि चिकाटी

अल्लू अर्जुन प्रयोगशील असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. अर्थात, त्याचे प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होतातच असं मात्र नाही.

अलीकडच्या काळात अल्लू अर्जुनसारखे कष्टाळू अभिनेते मिळणं अवघड आहे, असं सुकुमार, त्रिविक्रम श्रीनिवास, पुरी जगन्नाथ यांसारख्या लोकप्रिय तेलुगू दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये म्हटलेलं आहे.

उदाहरणार्थ, 'बद्रीनाथ' या चित्रपटासाठी तलवारबाजीचं प्रशिक्षण घेण्याकरता तो मलेशियाला गेला होता.

इन्स्टाग्रामवर 2 कोटी 73 लाख फॉलोअर

अल्लू अर्जुन समाजमाध्यमांवर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या चित्रपटांशी संबंधित माहिती तो समाजमाध्यमांवरून चाहत्यांशी शेअर करत असतो.

फेसबुकवर त्याचे 2 कोटी 10 लाख फॉलोअर आहेत, तर ट्विटरवर 84 लाख लोक त्याला फॉलो करतात.

इन्स्टाग्रामवर त्याचे 2 कोटी 73 लाखांहून अधिक (27.3M) फॉलोअर आहेत. इतके फॉलोअर असलेला तो एकमेव तेलुगू अभिनेता आहे.

कुटुंबात रमणारा अल्लू अर्जुन

चित्रीकरण नसेल तेव्हा अल्लू अर्जून त्याचा पूर्ण वेळ कुटुंबाला देतो आणि त्याच्या मुलासोबत व मुलीसोबत खेळतो.

यातलीही काही छायाचित्रं तो समाजमाध्यमांद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोचवत असतो.