व्हिसा संपला, लग्न झालं आणि दोघेही गायब; पाकिस्तानात इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या भारतीय महिलेचा शोध

    • Author, एहतेशाम शमी
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पोलीस एका भारतीय महिलेचा शोध घेत आहेत. 13 नोव्हेंबरला या महिलेचा व्हिसाचा कालावधी संपला होता. मात्र त्यानंतर देखील ती भारतात परतलेली नाही.

ही महिला शीख यात्रेकरूंबरोबर पाकिस्तानात आली होती. त्यानंतर तिथं तिनं कथितरित्या एका पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केलं आहे.

शेखपुरा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी बिलाल जफर शेख यांनी सांगितलं की 48 वर्षांच्या सरबजीत कौर या शीख महिलेनं पाकिस्तानी नागरिक नासिर हुसैन याच्याशी लग्न केलं आहे.

लग्न झाल्यानंतर हे दोघेही गायब झाले आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांचं म्हणणं आहे की, चौकशीनंतरच सर्व माहिती समोर येऊ शकेल.

4 नोव्हेंबरला सरबजीत कौर, शीख यात्रेकरूंबरोबर पाकिस्तानात आली होती.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बाबा गुरू नानक जयंतीनिमित्त ननकाना साहिबला जाणार होती.

अर्थात 7 नोव्हेंबरला शेखपुराचे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिनं तिचा जबाब नोंदवला होता.

या जबाबात म्हटलं आहे की तिनं स्वेच्छेनं इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि नासिर हुसैन नावाच्या एका पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केलं आहे.

तिचे वकील अहमद हसन पाशा यांनी म्हटलं आहे की या लग्नाची नोंदणी शेखपुराशी संबंधित युनियन कौन्सिलमध्ये करण्यात आली होती.

त्यांचं म्हणणं आहे की सरबजीत कौर आणि नासिर हुसैन यांचा परिचय सोशल मीडियावर झाला होता.

इस्लाम स्वीकारला आणि मग लग्न केलं

वकील अहमद हसन पाशा यांनी सांगितलं की, 15 नोव्हेंबरला त्यांनी "दोघांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं होतं. जेणेकरून त्यांनी दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांचा जबाब नोंदवावा. मात्र ते आले नाहीत आणि आता नासिर हुसैनचा मोबाईलदेखील बंद आहे."

'ते दोघेही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याच्या शक्यतेनं घाबरलेले असावेत', अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

पाशा म्हणाले की सरबजीत कौरच्या व्हिसाचा कालावधी अजून वाढवण्यात आलेला नाही. या प्रकरणात त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सोमवारी (24 नोव्हेंबर) या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते.

शेखपुरा पोलिसांनुसार, सरबजीत आणि नासिर हुसैन यांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम फारुखाबादला पाठवण्यात आली होती. मात्र तिथल्या घरी कुलूप लावण्यात आलेलं आहे.

पोलिसांचं म्हणणं आहे की नासिर हुसैन आणि त्याचं कुटुंबं कुठे आहे, याबद्दल अजूनही माहिती मिळालेली नाही.

शेखपुराचे न्यायदंडाधिकारी मुहम्मद खालिद महमूद वराइच यांच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, सरबजीत कौरनं इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यानंतर तिला 'नूर' हे नाव देण्यात आलं होतं.

5 नोव्हेंबरला इस्लाम धर्म स्वीकारल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं होतं.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रानुसार, नासिर हुसैनचं वय 43 वर्षे आहे. तसंच मेहरसाठी 10,000 रुपयांची रक्कम ठरवण्यात आली होती.

यात प्रमाणपत्रात असंही म्हटलं आहे की नासिर हुसैन आधीच विवाहित आहे आणि त्याला दुसऱ्या लग्नासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.

'नऊ वर्षांपासून होता परिचय'

सरबजीत भारतात पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिथल्या पोलिसांचं म्हणणं आहे की या प्रकरणात तपास सुरू आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरबजीत जवळपास 2,000 यात्रेकरूंच्या एका समूहाचा भाग होती.

हे सर्व यात्रेकरू 10 दिवसांच्या प्रवासानंतर 13 नोव्हेंबरला भारतात परतले होते. मात्र सरबजीत कौर त्यांच्याबरोबर परतली नव्हती.

कपूरथळाचे पोलीस एएसपी धीरेंद्र वर्मा यांचं म्हणणं आहे की सरबजीत कौरनं धर्मांतर केल्याची पुष्टी होऊ शकलेली नाही. त्याचं म्हणणं आहे की जानेवारी 2024 मध्ये सरबजीतला पासपोर्ट जारी करण्यात आला होता.

भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, सरबजीत विवाहित आहे. या विवाहातून तिला दोन मुलं आहेत. तिचे आधीचे (पहिले) पती जवळपास तीन दशकांपासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत.

कपूरथला जिल्ह्यातील तलवंडी चौधरियां गावचे एसएचओ निर्मल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना गावातील सरपंचाकडून यासंदर्भात माहिती मिळाली.

त्यांनी सांगितलं की अद्याप सरबजीत कौरच्या कुटुंबाशी पोलिसांचं बोलणं झालेलं नाही.

दुसरीकडे, वकील अहमद हसन पाशा यांनी बीबीसीला एक व्हीडिओ शेअर केला.

त्यात सरबजीत असं म्हणताना दिसते आहे की ती घटस्फोटित आहे. तिनं स्वेच्छेनं इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आणि नासिर हुसैनशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. नासिर हुसैनबरोबर तिचा नऊ वर्षांपासून परिचय आहे.

वकील अहमद हसन पाशा म्हणाले की सरबजीत कौर आणि नासिर इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या संपर्कात होते. सहा महिन्यांआधी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप

या प्रकरणात पाकिस्तान पोलिसांवर धमकावण्याचा आणि खोटी तक्रार नोंदवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीला असलेल्या खटल्यात सरबजीत कौरनं सांगितलं होतं की तिनं तिच्या इच्छेनं नासिर हुसैनशी लग्न केलं होतं.

तिनं म्हटलं आहे, "कोणीही माझं अपहरण केलेलं नाही. मी स्वेच्छेनं लग्न केलं आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या घरून फक्त तीन कपडे घेऊन आले होते आणि माझ्याकडे दुसरं काहीही नव्हतं."

"माझ्या लग्नामुळे पोलीस खूप चिडलेले आहेत. 5 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता पोलीस अधिकारी जबरदस्तीनं आमच्या घरात शिरले. त्यांनी मला त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र मी नकार दिल्यावर ते चिडले."

सरबजीतनं न्यायालयाला विनंती केली आहे की तिला आणि तिच्या पतीला पोलीस सुरक्षा देण्यात यावी.

दुसऱ्या बाजूला, शेखपुरा पोलिसांचे प्रवक्ते राणा यूनिस यांनी बीबीसीला सांगितलं की पोलिसांनी कोणतीही भारतीय महिला किंवा तिच्या पाकिस्तानी पतीला त्रास दिलेला नाही.

ते म्हणाले, "याबाबत करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीपेक्षा वेगळे आहेत. पोलिसांचा याच्याशी काहीही संबंध नाही."

ते पुढे म्हणाले, "हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे वेगवेगळ्या यंत्रणा यावर लक्ष ठेवून आहेत. या प्रकरणात पाकिस्तानमधील कायद्यानुसार कारवाई केली जाईल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.