अमर चित्र कथा : भिवंडीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या ऐतिहासिक कॉमिक्सचा डिजिटलपर्यंतचा प्रवास

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राम असो वा कृष्ण, पृथ्वीराज चौहान किंवा शिवाजी महाराज. अशा पौराणिक कथा आणि इतिहासातील व्यक्तींची पहिली ओळख करून देणारी 'अमर चित्र कथा' कॉमिक्स आजही अनेक भारतीय मुलांच्या आठवणींचा महत्त्वाचा भाग आहेत.

जवळजवळ सहा दशकं विशेषतः लहान मुलांमध्ये हे कॉमिक लोकप्रिय आहे.

धार्मिक पुराणकथा, लोककथा, जातककथा आणि ऐतिहासिक कथांवरील कॉमिक बुक्सचा समावेश असलेल्या या मालिकेत सगळ्या कथा सांगताना चित्रं आणि सोप्या भाषेचा वापर केला आहे.

पण यातल्या अनेक कॉमिक्सची मूळ रेखाचित्रं आता आगीत भस्मसात झाली आहेत.

मुंबईजवळच्या भिवंडी इथे 'अमर चित्र कथा' या प्रकाशन संस्थेच्या मुख्य गोदामात 1 ऑक्टोबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल चार दिवस लागले.

या आगीत अमर चित्र कथा आणि टिंकलची सुमारे 6 लाख पुस्तके, तसेच विशेष आवृत्तींच्या बॉक्स सेट्स आणि बबल हेड्ससारखी खेळणी ही जळून नष्ट झाली आहेत, अशी माहिती प्रकाशनाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

हाताने तयार केलेल्या प्रती नष्ट

जळून खाक झालेल्या गोष्टींमध्ये 200 हून अधिक प्रसिद्ध आवृत्त्यांची हातानं काढलेली मूळ रेखाचित्रे, आणि पारदर्शक फिल्मवरील मूळ पॉझिटिव्ह्ससह इतर मौल्यवान साहित्याचा समावेश आहे.

त्यात कृष्णा, राम, पांडव प्रिन्सेस, सावित्री, पृथ्वीराज चौहान आणि शिवाजी महाराज यांची रेखाचित्रंही होती, जी 1960-1970 च्या दशकांत काढलेली होती.

अमर चित्र कथा आणि टिंकल कॉमिक्सच्या विपणन विभाग प्रमुख दामिनी बाथम यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "बहुतांश पॉझिटिव्ह्स डिजिटल स्वरूपात जतन केले आहेत, पण मूळ हाताने तयार केलेल्या प्रती या गोदामात होत्या, त्या नष्ट झाल्या आहेत. त्या अनमोल होत्या, त्यांची किंमत सांगता येत नाही. आम्ही कधीही या मूळ रेखाचित्रांची विक्री केली नव्हती, ती आम्ही फक्त जपून ठेवली होती."

आगीमुळे झालेले आर्थिक नुकसान अद्याप निश्चित झालेले नाही, पण भारतातील कॉमिक बुक प्रेमींचं यात भावनिक नुकसानही झालं आहे.

ही चित्र का महत्त्वाची होती, याविषयी लेखक आणि साहित्य समीक्षक गणेश मतकरी सांगतात, "आजही एखादं चित्र पाहिलं तरी लगेच ओळखता येतं की ते अमर चित्र कथेतील आहे."

भारतातील मुलांना वाचनाची गोडी लावण्यात या पुस्तकांची आणि त्यातल्या चित्रांची महत्त्वाची भूमिका होती, असं गणेश मतकरी यांना वाटतं.

ते सांगतात, "अगदी सोप्या भाषेत आणि मुलांच्या आवडीनुसार हे साहित्य त्यांना समजेल, यामध्ये अमर चित्र कथेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

थेट मोठे ग्रंथ किंवा कथा मुलांसमोर ठेवल्या तर त्यांना ते समजणं अवघड असतं, पण अमर चित्र कथेच्या छोट्या "कॅप्सूल" स्वरूपातील लेखनातून त्या गोष्टी त्यांना सहज समजतात."

भारतीय कथांचे कॉमिकबुक्स

'अमर चित्र कथा'ची स्थापना 1967 साली अनंत पै यांनी केली. ते अंकल पै म्हणून मुलांमध्ये लोकप्रिय होते.

पै 'टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात' कनिष्ठ अभियंता म्हणून काम करायचे. ते इंद्रजल कॉमिक्सशी संबंधित होते, ज्यात अमेरिकन लेखक ली फॉकचं लोकप्रिय नायक फँटम आणि मँड्रेक यांच्यावर कॉमिक पुस्तके प्रकाशित केली जात.

अनंत पै यांच्या मृत्यूनंतर 2012 मध्ये अमर चित्र कथाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या सचित्र चरित्रानुसार, अमर चित्रकथाची सुरुवात पै यांनी पाहिलेल्या एका टीव्ही शोपासून झाली.

एकदा दिल्लीत गेले असताना पै यांनी दूरदर्शनवर प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम पाहिला. त्यात मुलांना ग्रीक पुराणकथांवरची उत्तरं तर देता आली, पण रामाची आई कोण याचं उत्तर माहिती नव्हतं.

त्या घटनेनंतर पै यांनी भारतीय संस्कृती, पुराणकथा, लोककथा, जातककथा आणि इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणारी कॉमिक्स तयार करण्याचं ठरवलं.

खरंतर अमर चित्रकथाच्या पहिल्या 10 आवृत्त्यांमध्ये सिंडरेला आणि स्नो व्हाईटसारख्या पाश्चिमात्य परीकथा होत्या.

पण 11वी आवृत्ती "कृष्णा" (1970) ही पहिली भारतीय पुराणकथा ठरली आणि याच आवृत्तीने अमर चित्रकथेच्या प्रवासात एक नवं वळण मिळालं.

प्रसिद्ध कलाकार राम वाईरकर यांनी या आवृत्तीचं रेखाचित्रण केलं होतं. वाईरकर यांनी पुढे अमर चित्र कथाच्या 90 हून अधिक कॉमिक्ससाठी चित्रं काढली. सूक्ष्म रेषा, जिवंत चेहरे आणि नाट्यमय दृश्य मांडणी ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्यं होती

कृष्णा आवृत्तीच्या यशानंतर भारतीय कथांमधल्या इतर अनेक व्यक्तीरेखांवर अमर चित्र कथानं कॉमिक्स आणली.

"नैतिक गाभा असलेल्या या कथा लोकप्रिय झाल्या आणि जगभरात पालक तसंच शाळा भारतीय वारसा शिकवण्यासाठी त्यांचा वापर करू लागले," असं बाथम म्हणतात.

प्रसिद्ध व्यंगचित्रकार अलोक लहानपणापासून अमर चित्रकथाचे चाहते आहेत. ते सांगतात, "याच चित्रकथा पाहतच मी स्वतः देखील एक व्यंगचित्रकार म्हणून नावारूपाला आलो.

अमर चित्र कथेविषयी आयुष्यात एक हळुवार कोपरा प्रत्येकाच्या मनात आहे. आग लागून मूळ दस्तऐवज जळाल्याचे वृत्त ऐकून फार दुःख झालं. अनेकदा साहित्य डिजिटल केलं तरी मूळ साहित्य मूळ असतं."

त्यानंतर पै यांनी पुढे 1980 मध्ये 'टिंकल' हे हलक्या-फुलक्या गोष्टींवर आधारित मासिकही सुरू केलं, त्यातली सुपांडी आणि शिकारी शंभूसारखी पात्रं अत्यंत लोकप्रिय ठरली.

अमर चित्र कथा आणि टिंकल हे इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये प्रकाशित होऊ लागले.

दरवर्षी 45 लाख प्रतींची विक्री

57 वर्षांच्या प्रवासात अमर चित्र कथा आणि टिंकल यांनी मिळून 1,600 हून अधिक कथा प्रकाशित केल्या आहेत. दरवर्षी सुमारे 3 ते 4 अमर चित्र कथा आणि 12 टिंकल मासिके प्रसिद्ध होतात.

अलिकडे डिजिटल उपकरणांच्या मदतीनं रेखाचित्रं तयार केली जातात, पण पूर्वी रेखाचित्रं फिल्मवर प्रोसेस करून रंगवली जात असत.

साहजिकच ही चित्रं कलेचा एक उत्तम नमूना होती. आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतला महत्त्वाचा ठेवाही होती. त्यातला बहुतांश भाग आता आगीत नष्ट झाला आहे.

दरवर्षी अमर चित्र कथाच्या सुमारे 45 लाख प्रती विकल्या जातात. तसंच अ‍ॅप्समधून त्यांच्या डिजिटल आवृत्त्या पाच लाखांहून अधिक जण वापरतात, असं कंपनीच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलंय.

सणासुदीच्या दिवसांत लागलेली आग अमर चित्र कथा आणि टिंकल परिवारासाठी मोठा धक्का ठरली आहे. कारण भिवंडीच्या गोदामात रेखाचित्रांसोबतच लाखो पुस्तके, नवीन उत्पादने आणि मर्चंडाइज साठवलेली होती.

टिंकलच्या मुख्य संपादक गायत्री चंद्रशेखरन सांगतात "ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा आमचा सर्वोत्तम हंगाम असतो. दिवाळी, पुस्तक मेळे आणि कॉमिक कॉन्सच्या निमित्ताने आम्ही दहा ठिकाणी सहभागी होणार होतो. पण गेल्या सहा महिन्यांत छापलेलं सर्व साहित्य आगीत नष्ट झालं."

मात्र यातूनही आपण सावरू असा विश्वास अमर चित्र कथाच्या संपादक रीना पुरी यांना वाटतो.

"1994 सालीही अशीच आग लागली होती. त्या आगीतून आम्ही फिनिक्स पक्ष्यासारखे पुन्हा उभे राहिलो होतो. वाचकांचं प्रेम आणि आमच्या टीमचा दृढ निश्चय आजही आम्हाला पुन्हा उभं करेल."

1994 मध्ये मुंबईतील इंडिया बुक हाऊसच्या कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती, जिथे अमर चित्र कथा प्रकाशित होत असे. त्यावेळी सुमारे 3000 संदर्भ पुस्तके आणि अनेक अप्रकाशित आवृत्त्यांच्या कलाकृतींचं नुकसान झालं होतं.

ही डिजिटल माध्यमातून नवीन फॉरमॅट्समध्ये प्रयोग करण्याची संधी आहे असंही त्यांना वाटतं.

"आमच्या 1,500 हून अधिक पुस्तकांचं संग्रहालय आता डिजिटल स्वरूपात अ‍ॅप्सवर उपलब्ध आहे," असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

पण कलेच्या चाहत्यांना मात्र हे न भरून येणारं नुकसान वाटतं.

अलोक सांगतात, "आज बाळासाहेब ठाकरे यांची फ्री प्रेस जनरल मध्ये काढलेली मूळ चित्र विशिष्ट पाहायला मिळत नाहीत. आर के लक्ष्मण यांची देखील मूळ व्यंगचित्र कुठे आहेत याबाबत स्पष्टता नसल्याने ते रसिकांना पाहता येत नाही.

त्यात अमर चित्रकथा यांच्या कार्यालयाबाबत देखील अशी घटना घडल्यानंतर मूळ साहित्य आपल्या लोकांना पाहता येणार नाही याचं दुःख आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)