लैंगिक सुखाच्या उत्कट कविता ते सेक्स टिप्सचं पत्र; प्राचीन महिलांचं 'असं' होतं कामजीवनाबद्दलचं मत

    • Author, डेसी डन

महिलांच्या दृष्टिकोनातून इतिहास मांडणारं एक नवीन पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाच्या लेखिका डेसी डन यांनी हा लेख लिहिला आहे.

स्त्रीद्वेषी, पारंपरिक पुरुषी विचारसरणीत जगताना महिलांना स्वतःच्या लैंगिकतेबद्दल काय वाटत असेल, याची चर्चा डेसी यांनी या लेखात केली आहे.

अमॉर्गोसमधला सेमोनाइड्स नावाचा एक कवी इसवी सन पूर्व सातव्या शतकात ग्रीसमध्ये होऊन गेला.

त्याने महिलांचे प्रमुख दहा प्रकार सांगितलेत. ज्या महिलांना स्वच्छता करण्याऐवजी खाण्याची जास्त आवड असते त्या डुकरासारख्या असतात, असं त्यानं म्हटलं. तर अगदी बारीक निरीक्षणं करणाऱ्या महिलांना त्यानं कोल्ह्याची उपमा दिली.

तसंच, गाढवासारख्या महिला अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवतात आणि कुत्र्यासारख्या महिला आज्ञाधारक वृत्तीच्या असतात, असंही त्याने म्हटलं.

वादळासारख्या असतात त्या सागरी महिला, लालची असतात त्या जमिनीसारख्या, चोरी करतात त्या मुंगूसासारख्या, आळशी असतात त्या घोड्यासारख्या, कुरूप असतात त्या माकडासारख्या आणि ज्या चांगल्या, मेहनती असतात त्या महिला मधमाशीसारख्या असतात, अशी वर्णनं या कवीनं केली होती.

या यादीतलं त्या काळचा स्त्रीद्वेषी दृष्टीकोन दाखवणारं उदाहरण म्हणजे अनेक पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलेला दिलेली गाढवाची उपमा. हे खरंतर कोड्यात टाकणारंही आहे.

प्राचीन काळापासून महिलांचं जगणं बंद दाराआड, बंधनात होतं. ग्रीसमध्ये तर महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकूनच फिरता येत असे.

तर त्यानंतरच्या रोम काळात महिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सोबत एखादा संरक्षक (म्हणजे वडील किंवा नवरा) असणं गरजेचं होतं. इतक्या बंधनात असताना महिला अनेक जोडीदारांसोबत संबंध कशा ठेऊ शकणार होत्या?

मग, अशी कामुक महिला हे पुरूषांच्याच डोक्यातलं स्वप्नरंजन होतं का? की प्राचीन काळातल्या महिला खरंच लैंगिक संबंधात एवढ्या खुलेपणानं रस घेत होत्या?

'द मिसिंग थ्रेड' या पुस्तकासाठी संशोधन करताना माझ्या असं लक्षात आलं की, या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला इतिहासाकडे फार चिकित्सकपणे पहायला हवं.

खरंतर, हे पुस्तक म्हणजे महिलांच्या दृष्टीकोनातून इतिहासाकडे बघणं आहे. याआधी असा प्रयत्नच कधी झाला नव्हता.

इतिहासाबद्दलचे जे काही दस्तऐवज मिळतात ते शक्यतो पुरूषांनीच लिहिलेले आहेत. त्यात त्यांनी महिलांच्या लैंगिकतेविषयी एकांगी आणि अतिशोयोक्ती वर्णनं केलेली दिसतात.

काहींनी महिला किती सद्गुणी असतात, तिची भोळ्या भाबड्या, संत, दैवी असतात हे दाखवायचे प्रयत्न केले. तर काहींनी महिला लैंगिक सुखासाठी नेहमीच किती कामुक असतात हे दाखवून त्यांचं चारित्र्य बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

ही वर्णनं खरी मानली, तर आपल्याला जुन्या काळातल्या सगळ्या महिला एकतर फार पवित्र होत्या; नाहीतर लैंगिक संबंधांसाठी वेड्या होत्या, असं मानावं लागेल.

पण, त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही.

सुदैवानं महिलांच्या मनात स्वतःच्या लैंगिकतेविषयी नेमकं काय सुरू होतं, याची काही जुन्या महिलांनी लिहून ठेवलेली वर्णनं उपलब्ध आहेत.

मोहात पडल्याची कबुली

इसवीसन पूर्व सातव्या शतकातच सॅफो नावाची एक कवयित्री ग्रीकमधल्या भागात रहात होती.

एका पुरूषाशी गप्पा मारत बसलेल्या एका महिलेकडे टक लावून पहात असताना सॅफोनं तिला जाणवलेल्या उत्कट शारीरिक संवेदनांचं वर्णन एका कवितेत केलं आहे.

"त्याला पाहताच हृदय धडधडतं, शब्द चाचपडतात, धमण्यांमध्ये आग लागली असल्याचं वाटतं, समोरचं सारं धुसर दिसू लागतं, कानात घंटी वाजू लागते, भर थंडीत घाम फुटतो, थरथरायला होतं, चेहरा पांढरा पडतो," असं ती लिहिते. ही सगळी एखाद्याबद्दल आकर्षण वाटल्यानंतर दिसणारी लक्षणं आहेत.

एका दुसऱ्या कवितेत सॅफो एखादी महिला फुलांनी सजून, मऊ पलंगावर झोपून स्वतःची लैंगिक इच्छा कशी शमवेल याचं उत्कट वर्णन करते.

तिची ही कविता म्हणजे, मोहाची भावना ही अनिवार, न थांबवता येणारी असते हे समजून घेणाऱ्या महिलेचा कबुलीजबाबच आहे.

सॅफोच्या कविता सुट्या स्वरूपात उपलब्ध असल्यानं त्या वाचायला फार अवघड जातात. पण पपायरसच्या कागदांवर लिहिलेल्या तिच्या एका कवितेत डिल्डोचा उल्लेख असल्याचंही संशोधकांना सापडलं आहे.

ग्रीक भाषेत त्याला ओलीसबॉई म्हटलंय. म्हणजे, लैंगिक उत्तेजनेसाठी वापरलं जाणारं शिश्नाप्रमाणे दिसणारं एक खेळणं.

ग्रीक संस्कृतीत त्याचा वापर लैंगिक सुखासोबतच प्रजननासंबंधीचे विधी करतानाही केला जात असे. शिवाय, काही फुलदाण्यांवरही त्याचं चित्र काढल्याचं दिसतं.

आजच्या काळात संरक्षक कवच म्हणून एखादी अंगठी घातली जाते, ताईत घातला जातो. तसा रोमन काळात शिश्नासारख्या दिसणाऱ्या या वस्तूंचा वापर केला जाई. अशी वस्तू जवळ असल्याने चांगल्या गोष्टी घडतात, असं मानलं जात असे.

थोडक्यात, प्राचीन काळातल्या महिला कामुक भावनांपासून स्वतःला लांब ठेवत नव्हत्या.

त्याबद्दलची इतकी मोकळीकता समाजात होती की काहींना तर त्यांच्या मृत्यूनंतर या शिश्नासारख्या दिसणाऱ्या वस्तूंसोबत पुरलं जाईल.

रोमकाळापूर्व काळात 'एट्रस्कॅन' या संस्कृतीचा इटलीवर प्रभाव होता. या एट्रस्कॅन संस्कृतीच्या लोकांना शिल्पकलेचं वरदान लाभलं होतं.

त्यांनी इटलीचा सगळा परिसर रोमँटिक, लैंगिक क्रिडा दाखवणाऱ्या शिल्पकलांनी आणि चित्रांनी भरून टाकला.

अनेक शिल्पांतून आणि थडग्यावर बांधलेल्या पुतळ्यातूनही त्यांनी स्त्री आणि पुरूष एकमेकांशेजारी झोपून लैंगिक सुख अनुभवत असल्याचं दाखवलं.

इसवी सन पूर्व आठव्या शतकातल्या एका एट्रस्कॅन महिलेला तिच्या मृत्यूनंतर धूप जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दिव्यासोबत पुरलं गेलं होतं. त्या दिव्यावरही एकमेकांच्या लैंगिक अवयवांना हात लावणाऱ्या एका जोडप्याचं शिल्प आहे.

वेश्या व्यवसायाकडे कसं पाहिलं जात होतं?

पोम्पेई शहरात जतन केलंय तशा एखाद्या प्राचीन वेश्यालयात गेलं की समजतं, लैंगिक संबंधात त्याकाळात फार सहजता होती.

वेश्या त्यांचा व्यवसाय करायच्या त्या छोट्या, जेलसारख्या खोल्यांच्या भिंतीवर ग्राफिटी म्हणजे भित्तीचित्र रेखाटलेली दिसतात.

ही चित्र पुरूष ग्राहकांनी काढलेली आहे. ज्यांच्याकडे ते लैंगिक संबंधांसाठी आले होते त्या महिलेचं नाव लिहून त्यांनी कशी चांगली सेवा दिली ते या चित्रांसोबत लिहिलं आहे.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सोसाव्या लागणाऱ्या गोष्टींचं वर्णन अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांत केलेलं दिसतं.

इसवीसन पूर्व चौथ्या शतकात नाईरा नावाच्या एका वेश्येविरोधात सुरू असलेल्या खटल्यात अपोलोडोरस नावाच्या अथेन्समधल्या एका राजकीय नेत्यानं एक भाषण दिलं होतं.

त्या भाषणातूनही या महिलांच्या आयुष्यातली अनिश्चितता स्पष्ट दिसून येते. पण फार कमी वेळा वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलांनी स्वतः लिहिलेलं, बोललेलं आपल्या वाचनात येतं. पण जेव्हा त्या बोलतात त्यांचे शब्द आपल्याला आश्चर्यचकीत करून सोडतात.

इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात नोसीस नावाची इटलीत राहणारी एक कवयित्री होती. एका शिल्पाचं वर्णन करताना त्यासाठी एका वेश्येनं निधी दिल्याचं तिनं लिहिलं आहे.

ॲफ्रोडिट या लैंगिक संबंधांच्या आणि प्रेमाच्या देवतेचा पुतळा एका मंदिरात पोलिआर्चिस नावाच्या वेश्येनं दिलेल्या दानातून उभारला असल्याचं कवितेत लिहिलंय.

असं करणारी पॉलिआर्चिस पहिली नव्हती. तिच्या आधी डोरिचा नावाच्या गणिकेनंही तिची कमाई अन्न शिजवण्यासाठी वापरलं जाणारं एक यंत्र सार्वजनिक जागेत बसवण्यासाठी दिली होती. डेल्फि नावाच्या एका धार्मिक स्थळात हे यंत्र बसवण्यात आलं होतं.

पुरूष लेखकांचा दृष्टीकोन

पुरूषांनी पूर्वग्रहातून लिहिलेल्या साहित्यातूनही स्त्री आणि लैंगिक संबंध याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात.

इसवीसन पूर्व 411 मध्ये ॲरिस्टोफेनेस नावाचा एक हास्य कलाकार होता. त्याने 'लिसिस्ट्राटा' नावाचं एक नाटक लिहिलं होतं. त्यात अथेन्समधल्या महिला लैंगिक संबंधांचा संप पुकारायचं ठरवतात.

आपल्या नवऱ्यांनी पेलोपेनिशिअन युद्ध थांबवावं आणि शांतता प्रस्थापित करायला मान्यता द्यावी, अशा त्यांच्या मागण्या असतात.

नाटकात ज्याचं वर्णन केलंय ते युद्ध खरंच घडलं होतं. अथेन्स आणि स्पार्टामधे झालेल्या या युद्धात दोघांची मित्रराष्ट्रही उतरली होती. जवळपास तीन दशकं हे युद्ध सुरू होतं.

लैंगिक संबंधांचा संप पुकारल्यानंतर नाटकात लैंगिक सुखापासून लांब रहावं लागणार या विचाराने अनेक महिला नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

विनोद निर्माण करण्यासाठी नाटककारानं ग्रीक कवीच्या गाढवासारख्या महिलांच्या चौकटीत या महिलांना बसवलंय.

पण नाटकाला नंतर गंभीर वळण मिळतं आणि ॲरिस्टोफेनेस स्त्रियांच्या दृष्टीकोनातून वास्तववादी विचार मांडतो.

'लिसिस्ट्राटा' हे या नाटकातलं प्रमुख पात्र असतं. तिनेच या संपासाठी महिलांना संघटित केलेलं असतं. युद्धकाळात महिलांची नेमकी काय अवस्था होते याचं वर्णन ती करते.

युद्धाच्या चर्चा केल्या जातात त्या संसदेत महिलांना प्रवेश नसतो. पण, जवळच्या माणसाला गमावल्याचं दुःखंही सतत त्यांच्या वाट्याला येतं.

अशा प्रदीर्घ संघर्षात, विवाहित महिलांचे हाल तर होतातच. पण त्यासोबतच अविवाहित महिलांना लग्नच करता येत नसल्यानं त्यांनाही वेगळ्या संघर्षाला सामोरं जावं लागतं, असं लिसिस्ट्राटा सांगते.

युद्धावरून परत आल्यानंतर केस पिकले असले तरी पुरूष लग्न करू शकतात. पण युद्ध संपायची वाट बघतच वय उलटून गेलेल्या व्हर्जिन म्हणजे कुमारिका मुलींना तसं करता येत नाही, असंही लिसिस्ट्राटा पुढे म्हणते.

स्त्री आणि पुरूष यांच्यासाठी युद्ध किती वेगळं असतं, हे तिच्या या ओळीतून चपखलपणे व्यक्त होतं.

ग्रीक शोकांतिकांमधूनही महिलांना लैंगिक संबंधाविषयी वाटणाऱ्या भितीचं दर्शन होतं. 'ओडिपस रेक्स' ही प्रसिद्ध शोकांतिका लिहिणाऱ्या सोफोक्लिस या नाटककारानं 'टिरियस' हे नाटकही लिहिलं होतं.

त्यातलं प्रोस्ने नावाच्या एका महिलेचं पात्र कुमारिका ते कुणाची तरी बायको हा प्रवास कसा होतो याबद्दल सांगत असतं.

प्रोस्ने सांगते की, एका रात्रीत लैंगिक संबंध किती चांगले आणि सुंदर असतात असं महिलांनी म्हणावं अशी अपेक्षा केली जाते. त्यांना खरंच काय वाटतं त्याचा विचारच केला जात नाही.

त्याकाळात उच्यभ्रू वर्गात लग्न पालकांनी ठरवण्याची प्रथा होती. त्यामुळे प्रोस्नेला आला तसाच लैंगिक संबंधांचा पहिला अनुभव हा अनेक महिलांसाठी वाईट ठरत असे.

प्राचीन काळातल्या सेक्स टिप्स

पपायरसच्या पानांवर महिला अनेकदा त्यांचे विचार लिहून ठेवत असत. थिएनो ही ग्रीक महिला तत्त्ववेत्ती पायथागोरच्या गटात होती. ती त्याची पत्नीही होती, असं काही जण म्हणतात. तिच्या मैत्रिणीला, युरीडाइसला लिहिलेल्या एका पत्रात तिने एक सल्ला लिहिला आहे.

नवऱ्यासोबत लैंगिक संबंध ठेवताना कपड्यांसोबत महिलेने लाजही बाजूला काढून ठेवली पाहिजे, असं ती म्हणते. सगळं झाल्यावर नवऱ्यापासून वेगळं होताना बाई कपडे आणि लाज पुन्हा अंगावर चढवू शकते.

थिएनोचं हे पत्र गेली अनेक वर्ष वादात सापडलंय. त्याच्या सत्यतेची खात्री झालेली नाही. तसं असलं तरीही, आधुनिक युगातल्या दोन महिला एकमेकींना जसा सल्ला देतील, तसाच त्या काळातल्या महिलाही देत होत्या हेच त्यातून समोर येतं.

इलिफन्टिस या ग्रीक कवयित्रीलाही महिलांना अशा सेक्स टिप्स द्यायची फार हौस होती. तिने याविषयावर एक छोटं पुस्तकच लिहिलं होतं.

दुर्दैवाने ते पुस्तक आज कुठेही उपलब्ध नाही. पण रोमन कवी मार्शल आणि रोमन चरित्रलेखक आणि संग्रहकार सुईटोनिस यांनी या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकाच्या प्रती राजा टीबेरिअस कडे असल्याची नोंद सुईटोनिस याने केली आहे. विशेष म्हणजे, हा राजा टीबेरिअस त्याच्या चावट लैंगिक प्रयोगांसाठी प्रसिद्ध होता.

साधारणपणे पुरुषांनी लिहिलेल्या साहित्यात आपण महिलांचे दृष्टीकोन वाचतो तेव्हा ते थेटपणे लैंगिक संबंधांबद्दल न बोलता प्रेमाबद्दल बोलणारे असतात असं लक्षात येतं.

पण मार्शल आणि कॅटुलस हे दोन पुरूष लेखक त्याला अपवाद ठरतात. त्यांनी लैंगिक गोष्टीबद्दल खूप मोकळेपणाने लिहिलेलं दिसतं.

लेस्बिया हे कॅटुलसच्या प्रेमिकेचं बदलेलं नाव. ती त्याला सांगते की कामुक होताना एखादी महिला तिच्या जोडीदाराच्या कानात जे काही सांगते ते वाऱ्यावर किंवा वाहणाऱ्या पाण्यावर लिहिलेल्या शब्दांसारखं क्षणभंगुर आहे. आजच्या जगात त्याला 'पिलो टॉक' म्हणतात.

रोमन काळातल्या कवयित्रींपैकी मोजक्या जणींच्या कविता टिकून राहिल्यात. त्यातली सल्पिशिया एका वाढदिवशी जोडीदारापासून लांब शहराबाहेर रहात असल्याचं दुःख मांडते आणि नंतर निदान दोघं एकाच भागात असल्याचं समाधान व्यक्त करते.

आपल्या जोडीदारासोबतच्या लैंगिक संबंधांचं वर्णन करताना या महिलांना सगळे बारकावे सांगत बसण्याची गरज पडत नाही. त्यांनी लिहिलेल्या भावनांतून त्यांचे नेमके विचार काय होते हे स्पष्टपणे दिसून येतं.

आज पुरूषांनी लिहिलेलं साहित्य जास्त प्रमाणात उपलब्ध असलं तरी महिलांच्या व्यथा मांडणाऱ्या या थोड्या कलाकृती टिकून राहिल्या आहेत. त्यातून प्राचीन काळातल्या महिला लैंगिक संबंधांकडे कसं पहात होत्या याचा अंदाज लावता येतो.

'द मिसिंग थ्रेड : अ न्यू हिस्ट्री ऑफ द अन्शिअन्ट वर्ल्ड थ्रू द वुमेन हू शेप्ड इट' हे डेसी डन यांचं पुस्तक 30 जुलैला युकेमधल्या वायडन्फेल्ड अँड निकोल्सन या प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)