जगातील सगळ्यात मोठ्या म्युझियममध्ये 7 मिनिटात चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक, आतापर्यंत काय समोर आलं?

फ्रेंच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिसमधील लूव्र संग्रहालयातल्या चोरीच्या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पॅरिसमधील अभियोक्ता कार्यालयाने म्हटलं की, एकजण चार्ल्स द गॉल विमानतळावरून पळण्याच्या तयारीत होता. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आलं.

च्अ भियोक्ता कार्यालयाने सांगितले की, त्यापैकी एकाला चार्ल्स दे गॉल विमानतळावरून उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले.

जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या या संग्रहालयातून गेल्या रविवारी (19 ऑक्टोबर) जवळपास 102 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या वस्तू चोरीला गेल्या. चार चोरट्यांनी पॉवर टूल्स वापरून दिवसा-दिवसा संग्रहालयात घुसखोरी केली होती.

या घटनेनंतर फ्रान्सच्या न्याय मंत्र्यांनी हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश असल्याचं म्हटलं. त्यामुळे देशाची प्रतिमा खराब झाल्याचंही मान्य केलं.

पॅरिस अभियोक्ता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (25 ऑक्टोबर) संध्याकाळी ही अटक करण्यात आली.

पोलिस सूत्रांनी फ्रेंच माध्यमांना सांगितले की, अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी एक अल्जेरियाला जाण्याची तयारी करत होता, तर दुसरा मालीला जाण्याच्या तयारीत होता.

विशेष पोलिस पथक त्यांना जास्तीत जास्त 96 तासांपर्यंत ताब्यात ठेवून चौकशी करू शकते.

रविवारी फ्रेंच माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, चोरीच्या ठिकाणी सापडलेल्या डीएनए नमुन्यांमुळे एका संशयिताची ओळख पटली.

पॅरिसमधील लूव्र म्युझियममध्ये चोरीची एक घटना समोर आल्यानंतर म्युझियम बंद करण्यात आलं होतं.

फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्री राशिदा दाती यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्टद्वारे सांगितलं की, ही चोरी रविवारी (19 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास म्युझियम उघडताना झाली.

घटनास्थळाजवळ चोरी झालेला एक दागिना सापडला आहे, बहुतेक तो चोरीदरम्यान पडला असावा, असंही त्यांनी सांगितलं. मात्र, ही नेमकी कोणती वस्तू होती, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

चोरीबाबत बोलताना मंत्री दाती म्हणाल्या की, 'चोरांनी अगदी सफाईने काम केलं, कोणतीही भीती न बाळगता आणि हिंसा न करता.'

या घटनेनंतर म्युझियमच्यावतीनं सांगण्यात आलं की 'विशेष कारणांमुळे म्युझियम दिवसभर बंद राहणार' आहे. मात्र, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

लूव्र जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिलं जाणारं संग्रहालय आहे. या म्युझियममध्ये मोनालिसा पेंटिंगसह जगभरातील प्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती आणि बहुमुल्य खजिना प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

आतापर्यंत काय माहिती समोर आली?

बीबीसीचे पॅरिस प्रतिनिधी ह्यू शोफिल्ड यांनी फ्रेंच मीडियाच्या हवाल्यानं सांगितलं की, सकाळी म्युझियम सुरू होत असताना तीन मास्कधारी व्यक्ती तेथे दाखल झाले.

फ्रान्सच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9च्या सुमारास काही लोकांनी खिडकी तोडून अपोलो गॅलरीतून आत प्रवेश केला.

ही गॅलरी सीन नदीकिनारी आहे आणि यात फ्रेंच क्राउन ज्वेल्सचे उर्वरित अवशेष ठेवण्यात आले आहेत.

गृहमंत्री लॉरेंट नुनेज म्हणाले, तीन-चार चोरांनी म्युझियमजवळ उभ्या ट्रकवरील फोर्कलिफ्टचा वापर केला. आत प्रवेश करून त्यांनी दागिने चोरून दुचाकीने पळ काढला.

नुनेज यांच्यानुसार ही चोरी केवळ सात मिनटात करण्यात आली. या चोरीत चोरट्यांनी कोण-कोणत्या वस्तू पळवल्या याचा तपास सुरू आहे.

या वस्तूंना मोठं व्यावसायिक महत्त्व तर आहेच, परंतु ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वदेखील असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

बीबीसीचे अँड्र्यू हार्डिंग यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी म्युझियम आणि त्यासमोरील नदीकिनारी असलेला रस्ता बंद केला आहे.

तपास प्रामुख्याने इमारतीच्या आग्नेय कोपऱ्यावर केंद्रित आहे, हा भाग सीन नदीच्या दिशेने येतो.

दूरवर एक मोठी हलवता येणारी शिडी दिसते, जी अग्निशमन दल किंवा छतावरील कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या शिडीसारखीच आहे. ती पॅरिसमध्ये उंच मजल्यांवर सामान वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनवर बसवलेली होती.

पायऱ्यांचा वरचा भाग बाल्कनीला स्पर्श करत होता, कदाचित याच मार्गाने ते तीन चोर वरच्या मजल्यावर पोहोचले असतील.

अपोलो गॅलरीमध्ये फ्रेंच क्राउन ज्वेल्सचे उर्वरित भाग ठेवण्यात आले आहेत.

यातील बहुतेक दागिने फ्रान्सच्या क्रांतीनंतर हरवले किंवा विकण्यात आले होते. यातीलच काही उर्वरित बहुमुल्य दागिने या म्युझियममध्ये ठेवण्यात आहे आहेत.

या वस्तूंमध्ये फ्रान्सच्या क्रांतीनंतर सम्राट नेपोलियन, त्यांचा भाचा नेपोलियन तृतिय आणि त्यांच्या पत्नीपैकी मेरी-लुईस आणि युजनी यांच्या वस्तूंचाही समावेश आहे.

लूव्रच्या वेबसाईटनुसार, या गॅलरीमध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये रिजेंट, सँसी आणि हॉर्टेंसिया हे तीन हिरे सर्वाधिक मौल्यवान आहेत.

जगातलं सर्वात मोठं म्युझियम

पॅरिसमधील लूव्र म्युझियम जगातील सर्वात मोठं म्युझियम आहे. याचा प्रदर्शनी भाग जवळपास 73,000 वर्ग मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. हा भाग इतका मोठा आहे की, यात दहा फुटबॉल मैदानं सामावू शकतात.

ही इमारत 1546 साली फ्रान्सच्या शाही कुटुंबासाठी राजवाडा म्हणून तयार करण्यात आली होती. या महालात राहणारी पहिली व्यक्ती होती राजा फ्रान्सिस. ते कलाप्रेमी होते. त्यांना लूव्रमध्ये संग्रहित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन करायचं होतं.

त्यांच्यानंतर आलेल्या राजांनीदेखील या शाही कला संग्रहाचा विस्तार केला. यानंतर चौदाव्या लुईने इंग्लिश सिव्हील वॉरदरम्यान इंग्लंडचा राजा चार्ल्स प्रथम याला मृत्यूदंड दिल्यानंतर त्यांच्या संग्रहातील वस्तूही ताब्यात घेतल्या.

1789 च्या फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत हा कला संग्रह सामान्य लोकांसाठी बंद होता. 1793 साली लूव्र संग्रहालय सार्वजनिकरित्या कलादालन म्हणून पुन्हा उघडण्यात आलं.

आज लूव्रमध्ये 35,000 हुन अधिक कलाकृती आहेत. त्यात लियोनार्दो दा विंची यांची जगप्रसिद्ध 'मोनालिसा' या पेंटिंगचाही समावेश आहे.

दररोज सुमारे 30,000 लोक लूव्र म्युझियमला भेट देतात.

लूव्रमध्ये चोरीच्या घटना

म्युझियममध्ये चोरीच्या घटना तशा कमी घटतात, कारण येथे अत्यंत कडक सुरक्षा यंत्रणा असते.

मात्र, तरीही लूव्रमध्ये चोरीच्या काही घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यापैकी सर्वात प्रसिद्घ घटना होती ती 1911 सालची जेव्हा लियोनार्डो दा विंची यांची जगप्रसिद्घ कलाकृती मोना लीसा या पेंटिंगची चोरी झाली होती.

त्यावेळी पोलिसांनी संशयित म्हणून कवि गिलॉम अपोलिनेर आणि चित्रकार पाब्लो पिकासो यांचीही चौकशी केली होती. पंरतु, चोर एक इटालियन व्यक्ती निघाला. तो राष्ट्र प्रेमापोटी ही पेंटिंग इटलीला परत नेऊ इच्छित होता.

तीन वर्षांनंतर, ही पेंटिंग फ्लोरेन्समध्ये सापडली आणि नंतर पॅरिसला परत आणण्यात आली. त्यावेळी मोनालिसाचं हे चित्र आजच्याइतकं प्रसिद्ध नव्हतं.

याव्यतिरिक्त 1983 साली 16 व्या शतकातील काही चिलखत गायब झाले होते, जे 2011 मध्ये पुन्हा सापडले.

अगदी अलिकडेच सांगायचं झाल्यास, 19 व्या शतकातील कलाकार कॅमिल कोर्सो यांचे 'द सेव्हियर रोड' हे चित्र 1998 मध्ये चोरीला गेले.

हे चित्र भिंतीवरून सरळ काढून टाकण्यात आलं होतं पंरतु, ते कोणाच्याही लक्षात आलं नाही. आणि आजतागायत ते चित्र सापडलेलं नाही.

या घटनेनंतर, म्युझियमची सुरक्षा यंत्रणा अधिक मजबुत करण्यासाठी व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.