भारतात कॅन्सरचे महिलांमध्ये प्रमाण जास्त, पण मृत्यूचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक; अशी स्थिती का आहे?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा आज जगभरात आणि भारतातही आरोग्यासाठी वाढता धोका बनत आहे. लाखो लोक दरवर्षी याचा सामना करतात आणि भारतात ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते.

महिला आणि पुरुष यांना वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो आणि यात मृत्यूचे प्रमाणही लिंगानुसार वेगळे दिसून येते. जीवनशैली, आहार, विविध तपासण्या, आणि वैद्यकीय सुविधा यांचा कॅन्सरवर मोठा प्रभाव असतो.

भारतात महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे, परंतु यातून पुरुषांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे.

देशाच्या नवीन कॅन्सर नोंदणीच्या अभ्यासातून समोर आलेलं हे विरोधाभासाचं एक वास्तविक चित्र आहे.

कॅन्सरच्या नव्या रुग्णांमध्ये महिला अधिक आहेत, परंतु मृत्यूचं प्रमाण जास्त करून पुरुषांमध्ये दिसून येतं.

भारताचं चित्र या बाबतीत जरा वेगळं दिसतं. 2022 मध्ये जगभरात प्रत्येक 1 लाख लोकांपैकी सरासरी 197 लोकांना कॅन्सर असल्याचे निष्पन्न (निदान) झाले. यात पुरुषांची स्थिती अधिक वाईट होती. पुरुषांमध्ये हे प्रमाण 212 तर 186 महिलांना कॅन्सरचे निदान झाले, असे वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडने म्हटलं आहे.

संपूर्ण जगात 2022 मध्ये सुमारे 20 दशलक्ष कॅन्सरच्या रूग्णांची नोंद झाली. त्यापैकी सुमारे 10.3 दशलक्ष पुरुष रुग्ण आणि 9.7 दशलक्ष महिला रुग्ण होत्या.

अमेरिकेत पुरुष आणि महिलांना आयुष्यभरात कर्करोग होण्याचा धोका जवळजवळ सारखाच आहे, असं अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सांगितलं आहे.

'जीवनशैली आणि आहार-विहारामुळे धोका जास्त'

भारतात महिलांमध्ये सर्वात जास्त होणारा कॅन्सर म्हणजे स्तन (ब्रेस्ट), गर्भाशय ग्रीवा (सर्व्हायकल) आणि अंडाशयाचा (ओवेरियन) कॅन्सर. स्तन आणि गर्भाशय ग्रीवा कॅन्सर महिला रुग्णांच्या 40 टक्के प्रकरणात आढळतो.

गर्भाशय ग्रीवा कॅन्सर प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमाव्हायरससारख्या (एचपीव्ही) संसर्गामुळे होत असला तरी स्तन आणि अंडाशयाचा कॅन्सर अनेकदा हॉर्मोनल बदलांमुळे होतो.

या हॉर्मोनल कॅन्सरच्या वाढत्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीतील बदलही महत्वाचे आहेत- ज्यात उशिराची गर्भधारणा, कमी स्तनपान, जास्त वजन किंवा लठ्ठपणा आणि बसून राहण्याची सवय (बैठी सवय) यांचा समावेश आहे.

पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसांचा आणि प्रोस्टेटच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येते. तंबाखूमुळे टाळता येऊ शकणाऱ्या कॅन्सरपैकी सुमारे 40 टक्के प्रकरणे याच्याशी संबंधित आहेत, विशेषतः तोंड आणि फुफ्फुसांचा कॅन्सर.

मग भारतात काय सुरू आहे? महिलांमध्ये याचं लवकर निदान होतं का? पुरुषांचा कॅन्सर जास्त गंभीर असतो का, की धूम्रपान आणि तंबाखूच्या सवयीमुळे त्यांचे परिणाम वाईट होतात? किंवा पुरुष आणि महिला यांच्यातील उपचार, माहिती आणि सुविधा यामध्ये फरक असल्यामुळे हे अंतर किंवा फरक दिसतो का?

जनजागृती मोहिमा आणि सुधारित वैद्यकीय सुविधांमुळे महिलांमध्ये आढळून येणारा कॅन्सर बऱ्याचदा लवकरच शोधला जातो.

कॅन्सर निर्माण होणाऱ्या कारणांपासून ते कॅन्सर दिसेपर्यंत जास्त वेळ लागतो, त्यामुळे महिलांमध्ये उपचाराचे निकाल तुलनेने चांगले असतात. म्हणून महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी असते.

'पुरुषांमध्ये आरोग्य तपासणीबाबत उदासीनता'

पुरुषांची स्थिती वाईट असते. त्यांचा कॅन्सर अनेकदा जीवनशैलीशी संबंधित असतो- तंबाखू आणि दारू फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरला चालना देतात, जे जास्त गंभीर असतात आणि उपचाराला कमी प्रतिसाद देतात.

पुरुष बहुतेक वेळा तपासण्या किंवा वैद्यकीय मदत घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. परिणामी, कॅन्सरच्या प्रकरणांची संख्या कमी असली तरी त्यांचा मृत्यूदर महिलांच्या तुलनेत जास्त दिसून येतो.

"महिलांच्या आरोग्यावर सार्वजनिक आरोग्य मोहिमांमध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं गेलं आहे, आणि त्याचे दोन परिणाम आहेत. अधिक जागरूकता आणि तपासण्यांमुळे कॅन्सर लवकर ओळखला जातो.

पुरुषांबद्दल चर्चा बहुतेक वेळा फक्त तंबाखू आणि तोंडाच्या कॅन्सरपुरतीच राहते," असं कॅन्सर तज्ज्ञ आणि सेंटर फॉर हेल्थ इनोव्हेशन अँड पॉलिसी फाउंडेशनचे (चिप) प्रमुख रवी मेहरोत्रा यांनी सांगितलं.

महिला प्रजनन आरोग्य तपासणी करण्यासाठी कधीतरी किंवा एखाद्या टप्प्यावर डॉक्टरांकडे जातात. त्याउलट, अनेक पुरुष संपूर्ण आयुष्यात क्वचितच चाचणी करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात," असे डॉ. मेहरोत्रा म्हणाले.

पण जेव्हा खरी गोष्ट पाहिली तर लक्षात येतं की, भारतात कॅन्सर सर्वत्र सारखा नाही. तो प्रदेशानुसार आणि प्रकारानुसार वेगवेगळा आहे.

43 नोंदणी वहींच्या आकडेवारीनुसार, भारतातील प्रत्येक 100 पैकी 11 लोकांना आयुष्यात कधी ना कधी कॅन्सर होण्याचा धोका आहे. 2024 साली अंदाजे 15.6 लाख रुग्ण आणि 8.74 लाख मृत्यू होऊ शकतात.

डोंगराळ आणि तुलनेने दूर असलेला ईशान्य प्रदेश हा भारतातील कॅन्सरचा केंद्रबिंदू राहिला आहे. मिझोरामच्या आयझॉल जिल्ह्यात कॅन्सर होण्याचा धोका देशाच्या सरासरीपेक्षा दुपटीने जास्त आहे.

'ईशान्य भारत कॅन्सरच्या केंद्रस्थानी'

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, यामागे जीवनशैली हे एक मोठं कारण आहे.

"ईशान्य राज्यांतील बहुतांश कॅन्सरसाठी जीवनशैलीच महत्वाचा घटक आहे, याबद्दल मला खात्री आहे. इथे तंबाखूचा वापर खूप जास्त आहे आणि तो इतर भागांपेक्षा खूप जास्त आहे," असं आसाममधील कचर कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख आर. रवी कन्नन यांनी सांगितलं.

"आसाममधील बराक व्हॅलीमध्ये तंबाखू मोठ्याप्रमाणात चघळली जाते, तर तिथून अवघ्या 25 किमी दूर मिझोराममध्ये सिगारेट पिण्याची म्हणजेच धुम्रपानाची सवय जास्त आहे. त्यात दारू, सुपारी आणि मांस कसे तयार केले जाते हेही येतं.

अन्नाची निवड आणि तयारी कॅन्सरचा धोका वाढवतात. इथे कोणतेही खास कॅन्सर तयार करणारे जीन नाहीत, आनुवांशिकतेने होणाऱ्या कॅन्सरचे प्रमाण इतर भागांपेक्षा जास्त नाही," असं डॉ. कन्नन यांनी सांगितलं.

पण हा पॅटर्न फक्त ईशान्येपुरताच मर्यादित नाही. भारत प्रशासित काश्मीरमधील श्रीनगरमध्ये पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आढळून येते, तर दक्षिण भारतातील हैदराबादमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. राजधानी दिल्लीतील पुरुषांमध्ये वयानुसार फरक करूनही सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची नोंद इतर भागांपेक्षा जास्त होते.

तोंडाचा कॅन्सरही वाढत आहे. 14 लोकसंख्या नोंदणी अहवालामध्ये यात पुरुषांमध्ये वाढ दिसून आली आणि महिलांमध्ये 4 इतकी वाढ झाली आहे.

'दर्जेदार उपचारांची कमतरता'

भारतामधील कॅन्सरचा धोका वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळा आहे, आणि हे एक मोठं सत्य आहे. कॅन्सर हा सर्वत्र आहे, पण त्याचा परिणाम सारखा नाही. भारतीय राज्यांमधील फरक जागतिक पातळीवरील भौगोलिक, आर्थिक आणि वैद्यकीय सुविधा यांच्यातील अंतर दाखवतो.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, श्रीमंत देशांमध्ये प्रत्येक 12 पैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात स्तनाचा कॅन्सर होईल, पण त्यापैकी फक्त एका महिलेचा यामुळे मृत्यू होईल.

गरीब देशांमध्ये मात्र चित्र उलट आहे. प्रत्येक 27 पैकी फक्त एका महिलेला कधीही कॅन्सरचं निदान होईल, परंतु 48 पैकी एका महिलेचा या आजारामुळे मृत्यू होऊ शकतो.

"कमी मानव विकास निर्देशांक (एचडीआय) असलेल्या देशांमध्ये महिलांना स्तनाच्या कॅन्सरचं निदान होण्याची शक्यता जास्त एचडीआय असलेल्या देशांतील महिलांपेक्षा 50 टक्क्यांनी कमी आहे, तरीही त्यांना आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे, कारण उशिराने निदान आणि दर्जेदार उपचारांची सुविधा कमी आहे," असं आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेतील (आयएआरसी) कॅन्सर देखरेख शाखेच्या उपप्रमुख इसाबेल सोर्जोमातारम म्हणतात.

त्यानंतर इतर फरकही आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत स्थानिक अमेरिकेच्या लोकांना कॅन्सरमुळे सर्वात जास्त मृत्यूचा धोका आहे, ज्यात मूत्रपिंड, यकृत, पोट आणि गर्भाशय ग्रीवा कॅन्सरमुळे मृत्यू गोऱ्या लोकांच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त आहे; कृष्णवर्णीय लोकांचा प्रोस्टेट, पोट आणि गर्भाशय कॅन्सरमुळे मृत्यू गोऱ्या लोकांच्या तुलनेत दुपटीने जास्त आहे, असे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सांगितलं आहे.

भारतामध्ये कॅन्सरचा फक्त भारच वाढत नाहीये, तर तो जास्त गुंतागुंतीचा होत चालला आहे. नोंदणी वहींचा डेटा सांगतो की, आयुष्य, जीवनशैली आणि पर्यावरणामुळे आरोग्याच्या जोखमीत बदल होत आहेत.

या बदलत्या परिस्थितीतही बरेच प्रश्न शिल्लक राहतात, ज्यामुळे योग्य प्रतिबंध, लवकर निदान आणि आरोग्यदायी जीवनशैली, जसं की चांगला आहार आणि सवयी, आवश्यक आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)