सिगारेट ओढणं सोडल्यावर भरपूर भूक का लागते? अशावेळेस काय करायचं? वाचा

    • Author, लॉरा टिल्ट
    • Role, बीबीसी

ॲक्शन ऑन स्मोकिंग अँड हेल्थ (ASH) या सार्वजनिक आरोग्य सेवाभावी संस्थानं दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाची सुरुवात हा धूम्रपान सोडण्यासाठी अतिशय चांगला काळ असतो.

धूम्रपान किंवा व्हेपिंग सोडणं सोपं नाही. ई-सिगारेटद्वारे केल्या जाणाऱ्या धूम्रपानाला व्हेपिंग म्हणतात.

क्रेविंग (खाण्याची तीव्र इच्छा) ही अत्यंत अवघड गोष्ट ठरू शकते आणि हे फक्त निकोटीनच्याच बाबतीत होतं असं नसतं.

धूम्रपान सोडल्यानंतर अनेक लोकांना जास्त भूक लागते म्हणून असे लोक जंक फूडकडे वळतात.

मी एक आहारतज्ज्ञ आहे म्हणूनच ही तल्लफ का वाढू शकते आणि ती टाळण्यासाठी काय केले पाहिजे हे मी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.

धूम्रपान सोडल्याचे फायदे

बऱ्याच लोकांना धूम्रपान सोडायची इच्छा असते. त्यापैकी अनेकजण त्यात यशस्वी देखील होतात.

जर तुम्ही धूम्रपान सोडलं असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी एक अतिशय चांगलं पाऊल उचललं आहे.

तुम्हाला धूम्रपान सोडल्याचे फायदे 20 मिनिटांच्या आतच मिळायला सुरू होतात.

48 तासांच्या आत तुमच्या रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत घसरते.

त्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटू लागतं.

तुम्ही जर खुप काळ धूम्रपान सोडलं तर 50 हून अधिक आजारांना वेळीच रोखू शकता.

तुम्ही अधिक तंदुरुस्त होत जाता. तुम्ही आधीपेक्षा अधिक सहजपणे श्वास घेऊ शकता आणि तुम्हाला अन्नाची चव पूर्वीपेक्षा आता अधिक चांगली वाटायला लागते.

पण या फायद्यापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नक्कीच नाही. निकोटिनचं व्यसन खोलवर रुजलेलं असतं आणि ते सोडण्याचे काही परिणाम ही होत असतात.

जसं की तुम्हाला खूप खाण्याची इच्छा होत राहते शिवाय तुमची भूकही वाढू शकते.

तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं किंवा तुम्हाला झोप लागण्यात देखील अडचणी येऊ शकतात. तसेच धूम्रपान सोडल्यानं काही लोकांचं वजनही वाढू शकतं.

मात्र थोडं वजन वाढण्यापेक्षा धूम्रपान करणं हे तुमच्या शरीरासाठी जास्त हानिकारक असतं, हे जाणून घेणं खुप महत्त्वाचं आहे

संशोधनातून असं समोर आलं आहे की धूम्रपान सोडल्यानं तुमच्या शरीराला जे काही फायदे मिळतात, त्याच्यावर थोडं वजन वाढल्यानं कोणताही परिणाम होत नाही.

शिवाय धूम्रपान सोडल्यावर जर तुमचं वजन वाढत असेल तर ते नियंत्रित करण्याचे काही मार्ग देखील आहेत.

भूक आणि निकोटीन

धूम्रपान सोडल्यानं तुम्हाला जास्त भूक का लागते? त्याचीही काही कारणं आहेत.

निकोटीन ही अशी गोष्ट आहे जी तुमची भूक कमी करत असते.

प्राण्यांवर केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, जेव्हा उंदरांना निकोटिन दिलं जातं तेव्हा ते कमी अन्न खातात.

पण जेव्हा त्यांना निकोटिनं दिलं जात नाही तेव्हा ते जास्त खायला लागतात आणि त्यांचं वजन वाढायला लागतं.

माणसांवरही असेच परिणाम दिसून येतात. लॉफबरो विद्यापीठानं केलेल्या एका अभ्यासात ब्रिटनमधील धूम्रपान करणाऱ्या आणि धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या खाण्याच्या सवयींवर भाष्य केलं आहे.

या अभ्यासानुसार, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणारी माणसं तीन तासांपेक्षा जास्त काळ उपाशी राहतात.

संशोधनातून असंही दिसून आलं आहे की निकोटिन सोडल्यानंतर साखर आणि मिठाचं प्रमाण जास्त असलेल्या जंक फूड खाण्याची इच्छा वाढते.

असं का घडतं हे तर स्पष्ट झालेलं नाही. परंतु असे पुरावे आहेत की जंक फूड मेंदूच्या काही भागांवर धूम्रपानाप्रमाणेच परिणाम करतं.

म्हणूनच हे समजतं की निकोटिनची गरज पूर्ण करण्यासाठी लोक मसालेदार अन्नाचा आधार घेतात.

दुसरी गोष्ट अशी की धूम्रपान सोडल्यानंतर खाणंपिणं आवडायला लागतं.

काही धूम्रपान करणाऱ्यांना तोंडात सिगारेट किंवा व्हेप घालण्याचीही इच्छा असते. त्यामुळे मसालेदार आणि चटपटीत अन्न पदार्थ ती इच्छा पूर्ण करण्यास मदत करतात.

म्हणूनच निकोटिन सोडल्यानंतर ती सवय बदलण्याचा हा ही एक नवा मार्ग बनतो.

धूम्रपान सोडल्यानंतर आरोग्याला हानिकारक असलेल्या अन्न पदार्थांचं सेवन कसं टाळायचं?

धूम्रपान सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या अन्न सेवन करण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकता.

तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की निकोटिन सोडल्यानंतर भूक लागणं ही एक सामान्य गोष्ट आहे आणि ती पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नक्कीच नसते. मात्र तुम्ही आरोग्यादायी अन्नाचं सेवन करून स्वतःची काळजी घेऊ शकता.

तुमचं लक्ष नियमित आणि संतुलित आहारावर असलं पाहिजे. यामुळे तुम्हाला पुरेसं पोषण तर मिळेलच शिवाय अतिरिक्त भूकेवर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल.

तुम्ही यातून मार्गही काढू शकता.जसं की तुम्हाला जर चॉकलेट खाण्याची इच्छा झाली असेल तर त्याऐवजी तुम्ही पिनट बटरसह टोस्ट खाऊ शकता.

कशा ऐवजी काय खावं याचं नियोजन आधीच करून ठेवलं तर तुमच्यासाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकतं.

खाण्याच्या सवयींबाबतचं एक चांगलं नियोजन तुमचं मन विचलित होण्यापासून वाचवू शकतं.

चांगल्या आहाराची तयारी आधीच करून ठेवा

तुम्ही चांगलं जेवण आधीच तयार करून ठेवू शकता आणि ते तुमच्या दुपारच्या जेवणाच्या डब्यामध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता.

प्रथिनयुक्त पदार्थांचा वापर जास्त करा. यासाठी तुम्ही हरभरा, डाळी किंवा अंडी यांचा वापर करू शकता.

दही देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतं. तुम्ही तुमच्या जेवणाच्या बॅगमध्ये गाजर किंवा काकडी देखील ठेवू शकता.

निरोगी अन्न म्हणजे प्रथिनं आणि फायबर पुरेपूर असलेल्या अन्नाचं सेवन करणं. यासाठी फळं आणि हिरव्या भाज्या हा एक चांगला पर्याय आहे.

बरेच लोक रात्रीच्या जेवणात जास्त प्रथिनं खातात. पण नाश्त्यात जास्त प्रथिनं घेतल्यानं तुम्हाला दिवसभरात भूक कमी लागते.

अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जर तुम्ही नाश्त्यात 20 ते 30 ग्रॅम प्रथिनं घेतली तर ते जास्त फायदेशीर ठरतं.

जर दोन अंड्यांमध्ये सुमारे 25 ग्रॅम प्रथिनं असतात. म्हणून तुम्ही त्यांना उकडून किंवा ऑम्लेट बनवून खाऊ शकता. नाहीतर तुम्ही उकडलेले हरभरे देखील खाऊ शकता.

दोन चमचे पिनट बटरमध्ये सुमारे 8 ग्रॅम प्रथिनं असतात. म्हणून तुम्ही ते नाश्त्यासोबत खाऊ शकता.

तुम्हाला गोड पदार्थांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची गरज नाही, मात्र तसं न करता तुम्ही गोड पदार्थांचं सेवन अधिक चांगल्या पद्धतीनं नियंत्रित करू शकता.

तुमच्या जेवणात आवश्यक पोषक घटक असले पाहिजेत आणि तुम्ही त्यासोबत काहीतरी गोड खाऊ शकता.

जसं की तुम्ही बदामांसह काही बिस्किटं खाऊ शकता किंवा टोस्टसोबत चॉकलेट खाऊ शकता किंवा तुम्ही केळीचा शेक देखील घेऊ शकता.

धूम्रपान सोडणारे तुम्ही एकटेच आहात असा विचार तुम्ही अजिबात करू नका . जर तुम्हाला काही मदत मिळाली तर धूम्रपान सोडण्याची शक्यता अधिकच वाढते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.