You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅन्सर पुन्हा होऊ शकतो का? ताहिराच्या पोस्टनंतर चर्चा, या गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या
- Author, सुशीला सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
आजकाल कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्वांनाच चिंतेत टाकलं आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राच्या मदतीने अनेक लोक कर्करोगावर मात करतात आणि बरे होतात, परंतु काही लोकांना पुन्हा कर्करोग होण्याची शक्यताही असते.
या लेखात, कर्करोगाच्या पुनरावृत्तीची कारणं, त्यावर काय काळजी घ्यावी आणि त्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल, यावर चर्चा केली आहे.
निर्माती, दिग्दर्शक आणि लेखिका ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा स्तनाच्या कर्करोगानं (ब्रेस्ट कॅन्सर) ग्रासलं आहे. ताहिरानं स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती शेअर केली आहे.
ताहिरा ही अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आहे. 2018 मध्ये तिला पहिल्यांदा स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते.
ताहिरानं इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सात वर्षांचा त्रास किंवा सतत स्क्रिनिंग (चेकअप) करण्याची शक्ती याबाबत प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा आहे आणि मी यातला दुसरा पर्याय निवडते. नियमित मॅमोग्राफी करत राहा, हेच मी प्रत्येकाला सुचवेन. माझी ही दुसरी फेरी आहे.''
यापूर्वीही ताहिरा कश्यप तिच्या कॅन्सरबद्दल उघडपणे बोलताना दिसली आहे.
कर्करोगाविरोधातील संघर्ष ती सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करत आली आहे. केमोथेरपीनंतरचा 'बाल्ड लूक' असो किंवा पाठीवरचे चट्टे. कॅन्सरविरुद्धची लढाई तिने सर्वांसमोर धैर्याने मांडली आहे.
एकदा जागतिक कर्करोग दिनानिमित्त तिने पोस्ट केली होती, "आज माझा दिवस आहे. आपण या दिवसाशी निगडित डाग मिटवले पाहिजेत. कर्करोगाबद्दल आपण जनजागृती केली पाहिजे.
काहीही असो, स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. याच्यामुळं मला मिळालेल्या डागांना मी आलिंगन देते आणि स्वतःच्या अभिमानाची निशाणी म्हणून त्यांना स्वीकारते."
सेलिब्रेटी कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर
पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची पदवी घेतलेली ताहिरा कश्यप ही पूर्वी रेडिओ जॉकी होती. यानंतर ती लेखनाकडे वळली.
वर्ष 2011 मध्ये तिने 'आय प्रॉमिस' हे पुस्तक लिहिलं. प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, यानंतर तिने दिग्दर्शनाकडे वाटचाल केली आणि 'जिंदगी इन शॉर्ट', 'शर्माजी की बेटी' सारखे चित्रपट केले. तिने काही पुस्तकंही लिहिली आहेत.
ताहिराच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर अनेकांनी तिला मेसेज लिहिले आहेत. यामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं लिहिलं की, "माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. तुला खूप प्रेम, धैर्य आणि तुझ्यासाठी प्रार्थना करते आहे."
सोनाली बेंद्रे स्वतः कॅन्सरचा सामना केला आहे. याबद्दल ती उघडपणे बोलते आणि जनजागृतीवरही भर देत आहे.
अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "मी तुझ्यासोबत आहे. तू आम्हा सर्वांना बॉलिंगमध्ये हरवतेस, त्याचप्रमाणे तू यालाही हरवशील. खूप प्रेम."
केवळ ताहिराच नाही तर बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कॅन्सरशी झालेल्या त्यांच्या संघर्षाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. त्यांच्यापैकी अनेकांना पुन्हा कर्करोगानं ग्रासलं असून त्याबाबत त्या सातत्यानं जनजागृती करण्याचं काम करत आहेत.
नुकताच हिना खानने तिच्या ब्रेस्ट कॅन्सरबाबत माहिती दिली होती. किरण खेर, लिसा रे, मनीषा कोईराला, छवी मित्तल, महिमा चौधरी अशी नावे आहेत ज्यांनी कर्करोगाचा सामना केला आहे. काहींची अजूनही थेरपी सुरू आहे.
अमेरिकन अभिनेत्री कॅथी बेट्स हिला दोनदा कॅन्सरचा सामना करावा लागला आहे. आधी तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला आणि नंतर स्तनांचा कर्करोग झाला.
अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी 'बायलॅटरल मास्टेक्टॉमी' अर्थात दोन्ही स्तन काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापैकी काहींना सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग झाला होता किंवा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना हा आजार जडला होता.
अमेरिकन कॉमेडी ड्रामा सेक्स अँड द सिटीची अभिनेत्री सिंथिया निक्सनने वयाच्या 35 व्या वर्षी नियमित मॅमोग्राम सुरू केले होते. कारण तिच्या आईला स्तनाचा कर्करोग झाला होता.
त्यापैकी एक अभिनेत्री अँजेलिना जोली आहे, जिने कर्करोग टाळण्यासाठी 'प्रिव्हेंटिव्ह डबल मास्टेक्टॉमी' केली होती.
दरवर्षी हजारो मृत्यू, तरीही स्क्रीनिंग खूपच कमी
बायोमेड सेंट्रल मेडिकल पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालात असं दिसून आलं आहे की, जगभरातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे आणि त्यामुळं होणाऱ्या मृत्यूची संख्या देखील पहिल्या स्थानावर आहे.
तर भारतात 45 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या केवळ 1.3 टक्के महिलांनी मॅमोग्राफी केली आहे.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल का आणि स्तनाचा कर्करोग हा भारतात आणि जागतिक स्तरावर सर्वात सामान्य कर्करोग आहे का? कर्करोगाशी संबंधित चर्चेदरम्यान हा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता.
यावर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री, प्रा. सत्यपाल सिंह बघेल यांनी उत्तर दिलं होतं की, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम (आयसीएमआर-एनसीआरपी) नुसार 2022 मध्ये भारतात कर्करोगाचे 14.61 लाख रुग्ण होते, जे 2025 पर्यंत 15.7 लाखांपर्यंत वाढू शकतात.
स्तनांच्या कर्करोगाबाबत ते म्हणाले की, ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी, आयएआरसी-डब्ल्यूएचओ 2022 नुसार, स्तनाचा कर्करोग हा जागतिक स्तरावर सर्वात सामान्य कर्करोग आहे.
उत्तरात असं सांगण्यात आलं की, 2022 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगानं 98,337 महिलांचा मृत्यू झाला. जगभरात या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.
कॅन्सर पुन्हा डोकं वर काढतो?
ताहिरा कश्यपचे प्रकरण समोर आल्यानंतर कॅन्सर परत येऊ शकतो का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कॅन्सर पूर्ण बरा होणं शक्य नाही का?
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार (एनआयएच), जेव्हा कर्करोग उपचारानंतर परत येतो तेव्हा डॉक्टर त्याला 'पुनरावृत्ती' (रिकरन्स) किंवा 'पुनरावर्ती कर्करोग' (रिकरंट कॅन्सर) म्हणतात. यामुळं रुग्णाला धक्का बसतो, चिडचिड होते, दुःखी होतो आणि घाबरतोही.
एनआयएच वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, रिकरंट कॅन्सरची सुरुवात कॅन्सरच्या त्या पेशींपासून होते ज्या पहिल्या उपचारादरम्यान पूर्णपणे काढून टाकल्या गेल्या नाहीत किंवा नष्ट झाल्या नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की दिलेले उपचार चुकीचे होते.
कॅन्सरवर उपचार करणाऱ्या कॅन्सर तज्ज्ञ डॉ. राशी अग्रवाल सांगतात की, कॅन्सर हा एक जुनाट आजार आहे. तो शरीरात हळूहळू वाढतो. अशा परिस्थितीत उपचारादरम्यान कॅन्सरच्या काही पेशी मागे राहतात.
या पेशी हळूहळू जमा होतात आणि त्यांना कॅन्सर रिकरन्स किंवा रिलॅप्स म्हटलं जातं. त्याच वेळी, आपण हे देखील पाहिलं पाहिजे की आता लोक कॅन्सर होऊनही दीर्घ आयुष्य जगत आहेत. त्यामुळंही कॅन्सरची प्रकरणे पुन्हा परत येताना दिसत आहेत.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, कर्करोग पुन्हा होण्याची किती शक्यता आहे, याचा अंदाज लावणं कठीण आहे.
परंतु जर तो वेगाने वाढत असेल, पसरत असेल किंवा अॅडव्हान्स अवस्थेत असेल तर तो पुन्हा येण्याची शक्यता असते.
कर्करोग परत येण्याचे प्रकार
उपलब्ध माहिती दर्शवते की, विविध प्रकारचे कर्करोग परत येतात. त्यात एक अशी स्थिती असते, कर्करोग तिथेच येतो, जिथून त्याची सुरुवात झाली होती. याला स्थानिक पुनरावृत्ती (लोकल रिकरन्स) म्हटलं जातं.
दुसऱ्या स्थितीला रिजनल रिकरन्स म्हणतात. यामध्ये, कर्करोग ज्या भागापासून सुरू झाला त्या लिम्फ नोड्समध्ये परत येतो. लिम्फ नोड्स आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच वेळी, जेव्हा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो तेव्हा त्याला डिस्टेंट रिकरन्स म्हणतात.
डॉ. राशी अग्रवाल म्हणतात, "कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, ज्यात काहींमध्ये औषधे, केमोथेरपी इत्यादी उपचार दीर्घकाळ चालतात. काही प्रकरणांमध्ये हे शक्य नसतं.
स्तनाच्या कर्करोगात या पेशी सक्रिय होऊ नयेत म्हणून किमान दहा वर्षे औषधे दिली जातात. मात्र, आता 20 वर्षांच्या मुलींमध्येही स्तनाचा कर्करोग दिसून येत आहे. पूर्वी तो 40 वर्षानंतर होत असे.
कर्करोग पुन्हा होण्याचे कारण ट्यूमर फॅक्टर असू शकतो, जे वाईट आहे. जर पेशी ट्रिपल निगेटिव्ह असतील तर कितीही उपचार केले तरी ते फेल जाण्याची शक्यता जास्त असते.''
एका खासगी रुग्णालयात कर्करोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. स्वस्ती सांगतात, "सामान्य भाषेत सांगायचं म्हटलं तर, आपल्या शरीरात असे जनुके असतात जे कर्करोगाला तयार होण्यापासून रोखतात. कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या पेशी वाढल्या तर त्यापासून वाचण्यासाठी असलेली संरक्षणात्मक यंत्रणा कमकुवत होते.''
त्या स्पष्ट करतात की, कर्करोग परत येण्याचा धोका शरीरात कधीपासून सुरू झाला, तो किती पसरला आणि तो त्याची माहिती कधी झाली यावर अवलंबून असतो.
उपचार शक्य आहेत का?
आता तरुण मुलींमध्येही स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे समोर येत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत रिकरन्स (पुनरावृत्ती) होण्याची शक्यता जास्त मानावी का?
या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. स्वस्ती म्हणतात, "महिलेला कोणत्या टप्प्यावर हे समजलं यावर ते अवलंबून असेल. त्याचा ट्युमर कसा होता आणि त्यांनी पूर्ण उपचार घेतले आहेत की नाही.
आम्ही रुग्णाला नेहमी सांगतो की, कॅन्सर परत येऊ शकतो पण घाबरण्याची गरज नाही, कारण त्यावर इलाज आहे.''
हाच मुद्दा पुढे नेत डॉ. राशी म्हणतात, "अशा महिलांची प्रकृती कशी होती हेही पाहिलं जातं?" कारण अनेक वेळा कॅन्सर परत येण्यामागे वातावरणही कारणीभूत असते. तुम्ही अत्यंत प्रदूषित वातावरणात राहत आहात. हे कारणही तुमच्या शरीरात पुन्हा कर्करोग होण्यात भूमिका बजावू शकते.''
डॉक्टर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीला कॅन्सरमुक्त घोषित केले, तरी त्याची वैद्यकीय तपासणी सुरूच असते. अशा व्यक्तीला दर तीन महिन्यांनी दोन वर्षांसाठी बोलावलं जातं.
तिसऱ्या वर्षी दर चार महिन्यांनी आणि चौथ्या-पाचव्या वर्षांत दर सहा महिन्यांनी डॉक्टर बोलावतात. यासोबतच रुग्णालाही नियमितपणे स्वत:ची तपासणी करावी लागते.
तसेच, धूम्रपान, तंबाखू किंवा मद्यपान करण्यास मनाई केली जाते. याशिवाय डॉक्टर खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींवर भर देतात, जे रुग्णाच्या स्थितीनुसार ठरवले जाते. नियमित व्यायामावर भर दिला जातो.
ते असेही म्हणतात की, वातावरण सतत बदलत आहे आणि आता काहीही पूर्णपणे शुद्ध नाही. अशा परिस्थितीत लोकांना स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल.
मात्र, कोरोना महामारीने एक चांगली गोष्ट शिकवली आहे की, लोक त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत.
एक जबाबदार समाज म्हणून आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी काय मागे सोडत आहोत याचा विचार करायला हवा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)