बायबल आणि कुराणमध्ये ज्या पर्वताला 'देववाणी' झालेलं ठिकाण म्हटलं, ते वादाचं केंद्र का बनलंय?

    • Author, योलांदे क्नेल
    • Role, बीबीसी न्यूज, जेरुसलेम

वर्षानुवर्षे पर्यटक त्यांच्या बदायून गाईडबरोबर माउंट सिनाई चढून जातात. तिथे जाऊन ते सुंदर, स्वच्छ, खडकाळ भूप्रदेशावरून सुर्योदय पाहतात. बदायून गाईडच्या मार्गदर्शनाखाली ते इतरत्रही भटकंती करतात.

माउंट सिनाई हे ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायांमध्ये पवित्र मानलं जातं, ते श्रद्धेचं ठिकाण आहे. ते आता इजिप्तमधील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. मात्र हे पवित्र ठिकाण त्याचं रूपांतर एका नवीन प्रचंड पर्यटन प्रकल्पात करण्याच्या योजनेवरून वादाच्या केंद्रस्थानी आलं आहे.

माउंट सिनाई किंवा सिनाई पर्वत स्थानिक लोकांमध्ये जबल मुसा म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी मोझेसनं (मोशे) 10 कमांडमेंट म्हणजे आज्ञा दिल्याचं मानलं जातं. अनेकांचा असाही विश्वास आहे की बायबल आणि कुराणनुसार, याच ठिकाणी अल्लाह जळत्या झुडुपातून पैगंबरांशी बोलला होता.

तिथे ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चकडून संचालित 6 व्या शतकातील सेंट कॅथरीन मठदेखील आहे. ग्रीक दबावाखाली इजिप्तमधील अधिकाऱ्यांनी हा मठ बंद करण्याची योजना असल्याचं नाकारलं आहे. त्यामुळे आता या मठातील संन्यासी तिथेच राहतील असं दिसतं.

हे युनेस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळ देखील आहे. मात्र मठ, शहर आणि पर्वत यांचा समावेश असलेल्या आणि दीर्घकाळापासून अलिप्त असलेल्या वाळवंटातील या ठिकाणाचं रूपांतर आता कशात होतं आहे याबद्दल अजूनही मोठी चिंता आहे. तिथे आता आलिशान हॉटेल, व्हिला आणि शॉपिंग मार्केट बांधलं जातं आहे.

विकासाच्या नावाखाली जबरदस्तीनं लादण्यात आलेला प्रकल्प

इथं जेबेलेया जमात या पारंपारिक बदायून समुदायाचं वास्तव्यदेखील आहे. सेंट कॅथरीनचे संरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जमातीची आधीपासून तिथं असलेली घरं आणि पर्यटकांचे इको-कॅम्प अत्यल्प किंवा कोणतीही नुकसान भरपाई न देता पाडण्यात आले आहेत.

या समुदायाच्या स्थानिक कब्रस्तानातील कबरींमधील मृतदेह त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढावे लागले आहेत. कारण तिथे आता कार पार्किंगसाठी नवीन जागा तयार करायची आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक असा पर्यावरणपूरक विकास म्हणून सादर करण्यात आला असेल. मात्र तिथल्या स्थानिक बदायून समुदायाच्या इच्छेविरोधात तो लादण्यात आला आहे, असं बेन हॉफलर म्हणतात. ते एक ब्रिटिश प्रवास लेखक असून सिनाईमधील जमातींवर त्यांनी जवळून काम केलं आहे.

"जेबेलेयाला ज्या प्रकारचा विकास हवा आहे, ते विकासाकडे ज्याप्रकारे पाहतात तसा हा विकास नाही. स्थानिक समुदायाच्या हितांचं दमन करून बाहेरच्या लोकांच्या हितसंबंधांसाठी वरून खालपर्यंत लादण्यात आलेला हा विकास आहे, असं दिसतं," असं बेन यांनी बीबीसीला सांगितलं.

" पांरपारिकरीत्या भटक्या समजल्या जाणाऱ्या बदायून जमातीभोवती एक नवीन शहरी जग बांधलं जातं आहे. बदायून समुदाय याप्रकारच्या जगापासून लांब, अलिप्त राहत आला आहे. या बांधकामाला त्यांनी संमती दिलेली नाही आणि या प्रकल्पामुळे त्यांच्या मातृभूमीतील त्यांचं स्थान कायमचं बदलणार आहे," असं बेन पुढे म्हणाले.

जवळपास 4,000 स्थानिक लोक या बदलांबद्दल थेट बोलण्यास इच्छुक नाहीत.

आतापर्यंत, इजिप्तमधल्या या योजनेबद्दल इतर देशांमध्ये ग्रीक हा देश सर्वाधिक बोलतो आहे. कारण माउंट सिनाईवरील मठाशी त्यांचा संबंध आहे.

सेंट कॅथरीन मठाचं महत्त्व आणि चर्चची भूमिका

सेंट कॅथरीन हा सातत्यानं वापरात असलेला जगातील सर्वात जुना ख्रिश्चन मठ आहे. मे महिन्यात इजिप्तमधील न्यायालयानं सेंट कॅथरीन सरकारी जमिनीवर असल्याचा निकाल दिला. त्यानंतर इजिप्त आणि ग्रीस या दोन देशांमधील तणाव वाढला.

कित्येक दशकांपासूनच्या वादानंतर, न्यायाधीशांनी सांगितलं की मठ ज्या जमिनीवर आहे आणि त्याच्या अवतीभोवतीच्या पुरातत्वीय धार्मिक स्थळांचा 'वापर करण्याचा अधिकार' मठाला आहे.

अथेन्सचे आर्चबिशप इरोनिमॉस द्वितीय ग्रीसमधील चर्चचे प्रमुख आहेत. त्यांनी न्यायालयाच्या या निकालाचा लगेचच निषेध केला.

"मठाची मालमत्ता जप्त केली जाते आहे. ऑर्थोडॉक्सी आणि हेलेनिझमच्या या अध्यात्मिक दीपस्तंभाला अस्तित्वाचा धोका आहे," असं त्यांनी एका वक्तव्यात म्हटलं आहे.

सेंट कॅथरीनचे प्रदीर्घ काळापासूनचे आर्चबिशप डॅमियानोस यांनी एका दुर्मिळ मुलाखतीत एका ग्रीक वृत्तपत्राला सांगितलं की या निकालानं "आम्हाला प्रचंड धक्का बसला...आणि तो आमचा अपमान आहे."

न्यायालयाच्या निकालाबाबत त्यांनी ही भूमिका घेतल्यामुळे धर्मगुरूंमध्ये कटुता निर्माण झाली. त्यातून त्यांनी अलीकडेच त्यांचं पद सोडण्याचा निर्णय घेतला.

जेरसलेममधील ग्रीक ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्चेटनं निदर्शनास आणलं की चर्चच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या या पवित्र स्थळाला स्वत: मोहम्मद पैगंबर यांनी संरक्षणाचं पत्र दिलं होतं.

त्यात म्हटलं आहे की बायझंटाईन मठ हा "ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायांमधील शांततेचं पवित्र केंद्र आणि संघर्षानं भरलेल्या जगासाठी आशेचं आश्रयस्थान होतं." बायझंटाईन मठात फातिमिद काळात बांधलेली एक छोटी मशीददेखील आहे.

न्यायालयानं दिलेला वादग्रस्त निकाल कायम असतानाच, शेवटी ग्रीक आणि इजिप्तमध्ये झालेल्या मुत्सद्देगिरीच्या हालचालींचा परिणाम दोन्ही देशांच्या संयुक्त घोषणेमध्ये झाला.

यात सेंट कॅथरीनची ग्रीक ऑर्थोडॉक्स ओळख आणि सांस्कृतिक वारसा यांचं जतन करण्याची खात्री देण्यात आली.

'विशेष भेट' की असंवेदनशील हस्तक्षेप?

2021 मध्ये इजिप्तनं पर्यटकांसाठी सरकारच्या पाठिंब्यानं ग्रेट ट्रान्सफिगरेशन प्रकल्प सुरू केला.

या प्रकल्पात हॉटेल, इको-लॉज आणि एक मोठं व्हिजिटर्स सेंटर उभारण्याचं नियोजन आहे. तसंच त्यात जवळच्याच छोट्या विमानतळाचा विस्तार करणं आणि माउंट मोझेसला केबल कार सुरू करण्याचाही समावेश आहे.

इजिप्त सरकार, 'संपूर्ण जगाला आणि सर्व धर्मांना इजिप्तची भेट' म्हणून या प्रकल्पाचा प्रचार करतं आहे.

इजिप्तचे गृहनिर्माण मंत्री शेरीफ एल-शेर्बिनी गेल्या वर्षी म्हणाले होते, "या प्रकल्पामुळे पर्यटकांना सर्व प्रकारचं पर्यटन आणि मनोरंजनाच्या सेवा उपलब्ध होतील. त्यात सेंट कॅथरीन शहर आणि त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराच्या विकासाला चालना मिळेल."

"हा विकास करत असताना तिथल्या नैसर्गिक भूप्रदेशातील पर्यावरण, दृश्यमानता आणि वारशाचं स्वरुप जतन केलं जाईल. तसंच सेंट कॅथरीनच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था केली जाईल."

निधीच्या कमतरतेमुळे तात्पुरत्या स्वरुपात का होईना या प्रकल्पाचं काम थांबलेलं दिसल असलं तरीदेखील सेंट कॅथरीन मठाच्या पार्श्वभूमीवर एल-राहाचं मैदानाचं स्वरूप आधीच बदललं आहे. नवीन रस्त्यांचं बांधकाम सुरू आहे.

युनेस्कोनं व्यक्त केली चिंता

मोझेसचे अनुयायी म्हणजे इस्रायली माउंट सिनाईवर इथेच त्याची वाट पाहत थांबले होते असं म्हटलं जातं. टीकाकार म्हणतात की या बांधकामांमुळे या भागातील नैसर्गिक वैशिष्ट्यं नष्ट होत आहेत.

या जागेचं अद्भूत जागतिक मूल्याचं तपशीलवार वर्णन करताना युनेस्कोनं नमूद केलं आहे की कशाप्रकारे याच्या "सभोवतालचा खडकाळ डोंगराळ प्रदेश...मठासाठी एक परिपूर्ण पार्श्वभूमी तयार करतो."

त्यात म्हटलं आहे, "या ठिकाणातून एका बाजूला निसर्ग सौंदर्य आणि त्याची अलिप्तता आणि दुसऱ्या बाजूला मानवाची अध्यात्मासाठीची कटिबद्धता यांच्यातील घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न दिसून येतो."

2023 मध्ये, युनेस्कोनं या प्रकल्पासंदर्भातील त्यांची चिंता व्यक्त केली. तसंच हा प्रकल्प थांबवण्याचं, त्याचे परिणाम लक्षात घेण्याचं आणि या भागाच्या संवर्धनाची योजना तयार करण्याचं आवाहन इजिप्तला केलं.

मात्र असं घडलं नाही.

जुलै महिन्यात, वर्ल्ड हेरिटेज वॉचनं एक खुलं पत्र पाठवलं. त्यात युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीला सेंट कॅथरिनचा परिसराचा समावेश धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

"हा एक महान अध्यात्मिक खजिना'

सेंट कॅथरीन फाउंडेशनचे संरक्षक म्हणून याच्या संवर्धनाची मागणी करणाऱ्यांनी किंग चार्ल्स यांनादेखील संपर्क केला आहे. हे फाउंडेशन, मौल्यवान प्राचीन ख्रिश्चन हस्तलिखितांचा संग्रहासह मठांच्या वारशाचं जतन आणि अभ्यास करण्यासाठी निधी उभारतं.

किंग चार्ल्स यांनी हे स्थळ म्हणजे, "एक महान अध्यात्मिक खजिना असून ते भावी पिढ्यांसाठी जतन केलं पाहिजे", असं म्हटलं आहे.

इजिप्तच्या अद्वितीय इतिहासाबद्दल असंवेदनशील असल्याची टीका होणारा हा काही इजिप्तमधील पहिलाच मेगा-प्रकल्प नाही.

मात्र इजिप्तचं सरकार त्यांच्या भव्य योजनांची मालिका ही देशाच्या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी महत्त्वाची असल्याचं मानतं.

इजिप्तमधील पर्यटन क्षेत्र एकेकाळी भरभराटीला आलेलं होतं. मात्र कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका या क्षेत्राला बसला होता. त्यातून सावरत असतानाच गाझामधील क्रूर युद्ध आणि प्रादेशिक अस्थैर्याच्या नवीन लाटेचा फटका या क्षेत्राला बसला आहे.

इजिप्त सरकारची भूमिका

2028 पर्यंत 3 कोटी पर्यटकांचं उद्दिष्ट गाठण्याचं इजिप्त सरकारनं जाहीर केलं आहे.

इजिप्तमध्ये एकापाठोपाठ एक आलेल्या सरकारांनी, स्थानिक बदायून समुदायांशी विचारविनिमय न करता माउंट सिनाईचा व्यावसायिक विकास केला आहे.

1967 च्या पश्चिम आशियातील युद्धाच्या वेळेस इस्रायलनं हा द्वीपकल्प ताब्यात घेतला होता. त्यानंतर 1979 मध्ये इजिप्त आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाल्यानंतरच हा प्रदेश इजिप्त परत मिळाला होता.

तेव्हापासून दुय्यम दर्जाच्या नागरिकांसारखी वागणूक मिळत असल्याची तक्रार बदायून समुदाय करतो आहे.

लाल समुद्रातील इजिप्तच्या लोकप्रिय ठिकाणांच्या बांधकामाची सुरुवात 1980 च्या दशकात दक्षिण सिनाईमधून झाली. यात शर्म एल-शेखचा समावेश होता. या गोष्टीशी सेंट कॅथरीनच्या परिसरात सध्या जे होतं आहे, त्याच्याशी अनेकांना साम्य दिसतं.

"बदायून हे या प्रदेशातील लोक होते. ते गाईड, कामगार आणि भाड्यानं काम करणारे लोक होते," असं इजिप्तमधील पत्रकार मोहम्मद साब्री म्हणतात.

"मग औद्योगिक पर्यटन आलं आणि बदायून समुदायाला बाजूला सारण्यात आलं. त्यांना फक्त उद्योग-व्यवसायातूनच बाहेर काढण्यात आलं नाही, तर समुद्रातून प्रत्यक्षपणे या समुदायाला मागे रेटण्यात आलं," असं ते पुढे म्हणतात.

स्थानिक बदायून समुदायावर कायमस्वरूपी परिणाम होणार

ज्याप्रमाणे लाल समुद्रातील ठिकाणांवर काम करण्यासाठी इजिप्तच्या इतर भागातील लोकांना कामासाठी आणण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे सेंट कॅथरिनच्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आणलं जाईल अशी अपेक्षा आहे.

मात्र इजिप्त सरकारचं म्हणणं आहे की ते बदायून समुदायाच्या निवासी भागांमध्येदेखील 'सुधारणा' करत आहेत.

सेंट कॅथरीनच्या मठानं गेल्या दीड हजार वर्षांच्या कालखंडात अनेक मोठाल्या उलथापालथींना तोंड दिलं आहे. मात्र जेव्हा या ठिकाणावरील सर्वात जुने संन्यासी जेव्हा तिथे स्थलांतरित झाले, तेव्हा ते अजूनही एक दुर्गम ठिकाण होतं.

लाल समुद्रातील रिसॉर्टच्या विस्तारामुळे गर्दीच्या वेळेस इथे दिवसा सहलींसाठी हजारो यात्रेकरू येत असल्यामुळे परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये, जळालेल्या झुडुपांच्या अवशेषांना किंवा कोडेक्स सिनायटिकसमधील पानं प्रदर्शित करणाऱ्या संग्रहालयाला मोठ्या संख्येनं लोक भेट असतात.

कोडेक्स सिनायटिकस ही नव्या कराराची (न्यू टेस्टामेंट) जगातील सर्वात जुनी, जवळपास पूर्ण अशी हस्तलिखित प्रत आहे.

आता, जरी मठ आणि या स्थळाचं मोठं धार्मिक महत्त्व कायम राहिलं तरीदेखील, त्याच्या अवतीभोवतीचा परिसर आणि शतकानुशतकं चालत असलेली जीवनशैली किंवा जीवनपद्धती कायमस्वरुपी बदलणार असं दिसतं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)