पेटीएमचे 99 रुपये वाचवण्यासाठी कोट्यवधींचा गंडा, व्यापाऱ्याच्या डायरीमुळे असा सापडला माजी सेल्समन

    • Author, भार्गव पारीख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

यूपीआय पेमेंटसंबंधित फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ही घटना गुजरातमध्ये घडली. पेटीएम कंपनीच्या एका माजी सेल्समनने व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

कंपनीच्या कामाची माहिती आणि आपण कंपनीबरोबर काम करत असलेल्या ओळखीचा फायदा या आरोपीनं घेतला. त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. पण सेल्समनने सुमारे 500 व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. सेल्समनने सर्व पैसे त्याच्या खात्यात जमा केल्याचे समोर आलं आहे.

पेटीएम कंपनीला 99 मासिक रुपये शुल्क भरावे लागणार नाही, असे सांगून आरोपी सेल्समनने व्यापाऱ्यांची फसवणूक केली.

केवळ 99 रुपये वाचवण्याच्या अमिषाला बळी पडून या व्यापाऱ्यांनी स्वतःचं लाखो रुपयाचं नुकसान करून घेतलं.

अहमदाबादमधील एका व्यापाऱ्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांच्या तपासानंतर हा सेल्समन आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी उत्तर गुजरात, राजस्थान आणि वडोदरा येथून अटक केली आहे.

अशी केली व्यापाऱ्यांची फसवणूक?

अहमदाबादमधील पालडी येथे 57 वर्षीय जयेश देसाई यांचं किराणा दुकान आहे. पाच वर्षांपूर्वी ग्राहकांना ऑनलाइन पैसे भरता यावेत यासाठी त्यांनी त्यांच्या दुकानात पेटीएम मशीन बसवलं होते.

जयेश देसाई यांनी बीबीसीला सांगितलं की, "मी आधी माझ्या दुकानात पेटीएम मशीन लावलं नव्हतं. कारण, मला टेक्नॉलॉजीबद्दल फारशी माहिती नव्हती. पण कोरोनाच्या काळात लोक ऑनलाइन पेमेंट करू लागले, म्हणून मी 2020 मध्ये पेटीएम मशीन बसवलं.

मशीन बसवल्यानंतर दर 15 दिवसांनी कंपनीचा एक सेल्समन येऊन मशीन नीट काम करत आहे की, नाही हे तपासत असे. काही वर्षांपूर्वी ब्रिजेश नावाचा सेल्समन होता. मग त्यानं अचानक येणं बंद केलं. त्याच्याऐवजी दुसरे सेल्समन येऊ लागले."

ते पुढे म्हणाले, "डिसेंबरच्या अखेरीस अचानक ब्रिजेश माझ्या दुकानात आला, आणि त्यानं मला सांगितलं की. आता कंपनीचं प्रमोशन संपलं आहे. पण कंपनीने जुन्या ग्राहकांसाठी एक नवीन स्कीम तयार केली आहे. पेटीएमच्या साउंड मशीनचं भाडं दरमहा 99 रुपये आहे. परंतु, कंपनी जुन्या ग्राहकांना फक्त एक रुपया भाड्यानं मशीन देईल."

"कंपनीचा सेल्समन आहे, त्यामुळं कंपनीनं नवीन स्कीम आणली असावी, असं मला वाटलं. त्यामुळं मी त्याला मशीन बदलायला सांगितलं."

"त्यानं मला माझं बँक खातं, डेबिट कार्ड नवीन मशीनशी लिंक करण्यास सांगितलं आणि म्हणाला की, पैसे थेट खात्यात जमा होतील. यामुळं माझे 98 रुपये मासिक शुल्क वाचेल.

त्यावेळी मी त्याला माझ्याकडे डेबिट कार्ड नसल्याचं सांगितलं. मग तो मला म्हणाला की, ते लोक जुन्या ग्राहकांना बँक खाती उघडून डेबिट कार्ड देण्याचंही काम करत आहेत."

"या कामाचे त्यांना प्रति कार्ड कमिशन मिळतं आणि ग्राहकांना कार्ड मोफत मिळतं, असं सांगून त्यानं फोनवर अर्ज करावा लागतो असं म्हणत माझा फोन मागितला. मी त्याला फोन दिला."

जयेशभाईंच्या म्हणण्यानुसार, ब्रिजेशनं त्यांना आठवड्यात डेबिट कार्ड मिळाल्यानंतर त्यांच्या मशीनमध्ये दरमहा एक रुपया आकारण्याची योजना लागू होईल, असं सांगितलं.

'फोनवरून बँकेचे डिटेल्स घेतले हे माहीत नव्हतं'

जयेशभाई म्हणाले की, ब्रिजेशसोबत असलेला प्रितेशही आधी पेटीएममध्ये सेल्समन होता. सुरुवातीला मला पेटीएममधून पैसे मिळण्यास अडचण आली तेव्हा त्या लोकांनी मदत केली.

"मी विश्वासाने माझा फोन दिला. त्यांनी डेबिट कार्डसाठी अर्ज केला. पाच दिवसांत माझे डेबिट कार्ड आले. मग ते लोक माझ्या दुकानात आले. ते अशा वेळी आले, जेव्हा माझ्या दुकानात खूप गर्दी होती. म्हणून मी त्यांना माझा फोन पुन्हा दिला. त्यांनी पेटीएम महिन्याला 99 रुपयांऐवजी फक्त एक रुपया आकारेल अशी स्किम ॲक्टिव्ह केली."

ते म्हणाले, "त्यांनी माझ्या फोनमधून बँकेचे डिटेल्स घेतले होते, हे मला माहीत नव्हतं. त्यांनी मला डेबिट कार्ड ॲक्टिवेट होत असल्याचं सांगितलं आणि नंतर माझ्या खात्यातून आधी 4,99,000 आणि नंतर एक लाख असे दोन व्यवहार केले.'"

"खात्यातून पैसे काढल्याचा बँकेचा फोनवर आलेला मेसेज त्यानं डिलिट केला. त्याचबरोबर माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह असलेला त्याचा फोन नंबरही त्यानं डिलिट केला. माझा फोन एअरप्लेन मोडमध्ये ठेवून मला परत दिला."

जयेशभाई सांगतात की, ग्राहकांच्या गर्दीमुळं फोन न पाहताच मी बाजूला ठेवला. पण घरी जाऊन फोन पाहिल्यावर लक्षात आलं की तो एअरप्लेन मोडवर ठेवलेला होता.

"मला दुसऱ्या व्यापाऱ्याला पैसे द्यायचे होते, म्हणून मी माझ्या मुलाला बँकेतील शिल्लक तपासायला सांगितली. तेव्हा मला कळलं की, बँक खात्यात पैसेच नाहीत. त्यानं माझ्या फोनवरून त्याचा नंबर डिलिट केल्याचंही मला लक्षात आलं. पण माझ्या सवयीप्रमाणे मी त्याचा नंबर डायरीत लिहून ठेवला होता."

"मी जेव्हा त्यांच्या नंबरवर कॉल केला तेव्हा फोन बंद होता. दुसऱ्या दिवशी मी पेटीएम कंपनीकडे चौकशी केली, तेव्हा मला कळलं की ते लोक आता तिथे काम करत नाहीत. पेटीएमनं अशी कोणतीही योजना आणलेली नाही, हे त्यांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली."

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचचे एसीपी हार्दिक माकाडिया यांनी, बीबीसीशी बोलताना या आरोपींनी व्यापाऱ्यांना जाळ्यात कसं ओढलं याची माहिती दिली.

ते म्हणाले, "हे लोक टेक्नोसॅव्ही नसलेल्या आणि वयानं मोठे असलेल्या व्यापाऱ्यांना टार्गेट करायचे. तक्रारदाराने दिलेल्या फोन नंबरवर तांत्रिक निगराणी (टेक्निकल सर्वेलन्स) केली असता, फोनमधील सिमकार्ड राजस्थानमधील असल्याचे आढळून आले. खोट्या पुराव्याच्या आधारे हे सिमकार्ड घेण्यात आले होते."

"जेव्हा आम्ही पाळत ठेवायला सुरुवात केली तेव्हा असं आढळून आलं की, वडोदरा येथील मोहसीन पटेल, सद्दाम पठाण आणि सलमान शेख यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. नेट बँकिंगद्वारे जमा केलेल्या पैशांचा आयपी ॲड्रेस राजस्थानमधील एका सिम कार्डचा होता."

एसीपी माकाडिया पुढे म्हणाले, "सर्वात आधी आम्ही या तिघांना अटक केली आणि तपासाअंती असं आढळून आलं की, आरोपी ब्रिजेश राणीप येथे एका घरात भाड्यानं राहत होता.

त्यानं 2021 पर्यंत पेटीएममध्ये सेल्समन म्हणून काम केलं. परंतु सेल्समनच्या नोकरीदरम्यान त्यानं नॉन टेक्नोसॅव्ही वृद्ध व्यापाऱ्यांकडून फसवणूक करून पैसे उकळले. जेव्हा कंपनीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं."

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, "30 वर्षीय ब्रिजेशने आपली एक गँग तयार केली होती. पेटीएममध्ये काम करणारे प्रीतम सुथार आणि डिलक्स सुथार यांना आपल्या गँगमध्ये घेतलं. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बँकेत नोकरी करणाऱ्या पराग मिस्त्री यालाही आपल्या गँगमध्ये सामील केलं.

त्यानंतर त्यानं ऑनलाइन गेम खेळण्यात व ऑनलाइन मनी ट्रान्सफरमध्ये तरबेज असलेल्या गोविंद खाटिकला त्याच्या टोळीत भरती केलं. "

"मग त्यानं ट्रेनी सेल्समन असलेल्या राज पटेलला सोबत घेतलं. पैसे ट्रान्सफर होत असताना आणि बँकेतून येणारे मेसेज डिलिट होत असताना राज पटेल व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवत असे. जर व्यापाऱ्याचं लक्ष गेलं तर त्याला दुसऱ्या विषयात गुंतवून ठेवत असे."

व्यापाऱ्यांच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करतानाही आरोपींनी खूप काळजी घेतली होती.

एसीपी माकाडिया यांनी सांगितलं की, "हे लोक व्यापाऱ्यांच्या खात्यातील शिल्लक पाहून 4.99 लाख रुपये काढायचे. कारण जर रक्कम 5 लाख असेल तर बँक खातेदाराला ताबडतोब फोन करते. बँकेत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर पराग मिस्त्रीने या सर्व गोष्टी संपूर्ण टोळीला समजावून सांगितल्या होत्या."

"आरोपींनी 4.99 लाख रुपये ट्रान्सफर केल्यानंतर लगेचच आणखी एक लाख रुपयांचा व्यवहार केला आणि फोन एअरप्लेन मोडवर ठेवला. जेणेकरून खातेदाराला बँकेकडून कॉल आला तर ते बोलू शकणार नाहीत."

कोण आहेत या टोळीचे सदस्य ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा सूत्रधार 30 वर्षीय ब्रिजेश पटेल हा कडीजवळील मोखासन गावचा राहणारा आहे. तो फक्त दहावी पास आहे. त्याने आयटीआयचा कोर्स केला. पण चांगली नोकरी न मिळाल्याने तो पेटीएममध्ये सेल्समन म्हणून रुजू झाला होता.

तो पैशांची उधळपट्टी करण्यात तरबेज होता. त्यामुळं दोन वर्षे नोकरी करत असताना त्यानं पैशांचा अपहार केला होता. परंतु, त्याची चोरी पकडली गेल्यावर पेटीएम कंपनीने त्याला कामावरून काढून टाकलं होतं.

त्यानंतर, त्यानं स्वतःची टोळी तयार केली. ज्यामध्ये त्यानं पेटीएममध्ये काम करणाऱ्या मूळ राजस्थानचे असलेले प्रीतम, गोविंद खाटिक आणि डिलक्स सुथार यांना आपल्या सोबत घेतलं.

प्रीतमने त्याच्याच गावातील सॉफ्टवेअर इंजिनियर आणि बँकेत नोकरी करणाऱ्या पराग मिस्त्रीला या कामात सामील केलं होतं, त्यामुळं त्यांचं बँकिंगचं काम सोपं झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून आणि मारहाणीच्या तीन आरोपांखाली फरार असलेला प्रीतम राजस्थानमधून गुजरातमध्ये आला होता. इथे तो पेटीएममध्ये काम करत होता.

या संपूर्ण टोळीकडे अहमदाबाद, वडोदरा, आणंद, नडियाद, खेडा, कडी, कलोल, मेहसाणा, उंझा, पालनपूर, सुरेंद्रनगर लिंबडीसह अनेक गावं आणि शहरातील व्यापाऱ्यांची माहिती होती.

आतापर्यंत या टोळीनं सुमारे 500 व्यापाऱ्यांचे पैसे अशा प्रकारे हडप केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, " गोविंद खाटिक राजस्थानमधून डमी सिमकार्ड आणत असत. प्रीतम सुथार फायनान्सचं काम करत होता त्यामुळं तो बँकेत भाड्याने खाते आणून देत असत. प्रीतम सुथार हा भाडे खात्यात कुठेही पकडला गेला नसल्याने त्याला मदत करत होता.

तर डिलक्स सुथार ऑनलाइन गेमिंग खात्यात पटकन पैसे ट्रान्सफर करून ते ई-वॉलेटमध्ये जमा करत असे. त्यानंतर हे लोक भाड्याच्या खात्यातून पैसे काढायचे.

पराग नवीन बँक खाती घेऊन यायचा. दोन वर्षांपासून ही टोळी छोट्या व्यापाऱ्यांना लुटत होती. त्यावेळी ते लोक फोनमध्ये सेव्ह केलेले नंबर डिलिट करायचे.

ऑनलाइन गेमिंगमध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर केल्यामुळं ते पकडले गेले नाही. मात्र, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यानं डायरीत ब्रिजेशचा नंबर लिहिला होता. त्यामुळं त्या आयपी ॲड्रेसवरून तीन महिन्यांच्या तपासानंतर या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं.

हे आरोपी कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत या लोकांनी गुजरातबाहेरील लोकांची फसवणूक केली आहे का, याचा तपशील समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

बीबीसीने आरोपी ब्रिजेश पटेल आणि राज पटेलच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.