हृदयाची शस्त्रक्रिया करणारा 'लंडनचा डॉक्टर' निघाला बनावट, 7 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप

    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, भोपाळ

मध्य प्रदेशातील दमोह शहरात सकाळच्या सुमारास रहीसा कुरैशी यांना अचानक छातीत जोरानं दुखू लागलं. त्यांचा मुलगा नबी त्यांना घेऊन मिशन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे डॉक्टरांनी त्यांना 'लगेच शस्त्रक्रिया' करण्याचा सल्ला दिला.

14 जानेवारीला रहीसा यांच्यावर अँजियोप्लास्टी झाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला. मग त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, मात्र काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर हॉस्पिटलनं त्यांच्या कुटुंबीयांना सांगितलं की "हा हृदयविकाराचा झटका होता, त्यामुळे त्यात काहीही करता येणार नव्हतं."

त्यानंतर काही महिन्यांनी नबी टीव्ही पाहत असताना, त्यांनी एक बातमी पाहिली. दमोहच्या मिशन हॉस्पिटलमधील डॉ. एन. जॉन कॅम या नावाने प्रॅक्टिस करणाऱ्या बनावट डॉक्टरनं 15 शस्त्रक्रिया केल्या आहेत. ती बातमी पाहताच ते हादरले.

या बनावट डॉक्टरचं खरं नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असून पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली आहे. आता त्याला दमोहला नेण्यात येणार आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात नरेंद्र यादव उर्फ डॉ. जॉन कॅन प्रॅक्टिस करत होता. आपण लंडनहून शिकून आल्याचे त्याने सांगितले होते. त्याच्या उपचाराच्या काळात किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले.

दमोहच्या जिल्हा प्रशासनानंदेखील पाच प्रकरण झाली असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र पीडित कुटुंबानी केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत सात जण या बनावट डॉक्टरच्या उपचारामुळे दगावले आहेत.

सहा एप्रिलला रात्री जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मुकेश जैन यांनी तक्रार केल्यावर दमोह पोलिसांनी बनावट डॉक्टर एन जॉन कॅम आणि दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल करत तपास सुरू केला आहे.

दमोहचे जिल्हाधिकारी सुधीर कोचर यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यात नकार दिला. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आरोग्य विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दमोहचे सुपरिटेंडंट अभिषेक तिवारी यांनी बीबीसीला सांगितलं की प्राथमिक स्तरावर फसवणूक आणि कोणताही वैद्यकीय परवाना नसताना उपचार केल्याच्या आरोपांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अभिषेक तिवारी म्हणाले, "आरोपी डॉक्टर नरेंद्र विक्रमादित्य यादव उर्फ एन जॉन कॅम याला सोमवारी (7 एप्रिल) रात्री उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला घेऊन पोलीस पथक दमोहला पोहोचल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल."

या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांची कलमंदेखील लावली जाऊ शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

'फोनवरुनच सांगितले मृतदेह घरी न्या'

दमोह जिल्ह्यातील भारतला गावातील 64 वर्षांच्या मंगल सिंह यांना गॅसची समस्या असल्यामुळे चार फेब्रुवारीला मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

या प्रकरणात देखील रहीसा यांच्या कथेचीच पुनरावृत्ती झाली.

मंगल सिंह यांचे पुत्र जितेंद्र सिंह म्हणतात, "तीन फेब्रुवारीला वडिलांना छातीत दुखत असल्यामुळे आम्ही मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तिथे आयुष्मान कार्डवर त्यांची अॅंजियोग्राफी झाली. त्यांना हृदयात गंभीर ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात आलं."

"डॉक्टरांनी लगेच अॅंजियोप्लास्टीची शस्त्रक्रिया केली आणि तेव्हाच वडिलांची तब्येत बिघडली. स्टाफनं बराच वेळ पंपिंग केली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. थोड्या वेळानं त्यांचा मृत्यू झाला."

"डॉक्टर एन जॉन कॅम यांनी फोनवरूनच आम्हाला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं. आम्हाला वाटलं की हृदयविकाराच्या झटक्यानं हा मृत्यू झाला आहे, म्हणून आम्ही गप्प बसलो. मात्र आता समोर आलेल्या बातम्यांमधून माहित झालं की तो डॉक्टर बनावट होता."

प्रकरण उघडकीस कसं आलं?

चार एप्रिलला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं.

त्यांनी आरोप केला की मिशन हॉस्पिटलमधील एक बनावट डॉक्टरनं स्वत:ला ब्रिटनमधील हृदयरोगतज्ज्ञ दाखवून 15 रुग्णांवर हृदयाची शस्त्रक्रिया केली, त्यात सात जणांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची सर्वात आधी तक्रार दमोह बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी केली होती. त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी फेब्रुवारी 2025 मध्येच सीएमएचओ डॉ मुकेश जैन यांच्याकडे तक्रार केली होती.

दीपक तिवारी म्हणाले, "जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडे फेब्रुवारीमध्येच या प्रकरणाची तक्रार करण्यात आली होती. 12 फेब्रुवारीला काही कुटुंब माझ्याकडे तक्रार घेऊन आले होते."

"आम्ही तीन दिवस सर्व माहिती गोळा केली आणि मग 15 फेब्रुवारीला मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात तक्रार केली. मात्र आमच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही."

या आरोपांबाबत बीबीसीनं जिल्हा वैद्यकीय अधिकारी मुकेश जैन यांच्याशी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही.

डॉक्टर एन जॉन कॅम नावाचा हा व्यक्ती अनेक वर्षांपासून वादग्रस्त होता.

या बनावट डॉक्टरनं ज्या नावाचा वापर केला, ते प्रत्याक्षात प्राध्यापक ए जॉन कॅम लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल कार्डिओलॉजीचे प्राध्यापक आहेत. ते कार्डियक अरिदमिया, एट्रियल फिब्रिलेशन, कार्डियोमायोपॅथी आणि पेसमेकर थेरेपीमध्ये तज्ज्ञ आहेत.

बूम लाईव्ह नावाच्या एका फॅक्ट चेक वेबसाईटवर 2023 मध्ये देण्यात आलेल्या एका लेखात दावा करण्यात आला होता की ब्राउनवाल्ड हेल्थकेअर या वेबसाईटवर नरेंद्र विक्रमादित्य यादव उर्फ एन जॉन कॅम यांना लंडनचा डॉक्टर दाखवण्यात आलं होतं आणि ही वेबसाईट याच उद्देशानं तयार करण्यात आली होती.

बूम लाईव्हच्या बातमीत अनेक पुराव्यांच्या आधारे नरेंद्र यादव हाच प्राध्यापक एन जॉन कॅम असल्याचं सांगितलं होतं.

मिशन हॉस्पिटलचं काय म्हणणं आहे?

मिशन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनच्या सदस्य पुष्पा खरे म्हणाल्या, "तपास अधिकाऱ्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रं त्यांना देण्यात आली आहेत. आमच्या रेकॉर्डमध्ये डॉक्टरचं नाव नरेंद्र जॉन कॅम असं आहे. ते मूळचे उत्तराखंडचे रहिवासी आहेत."

"त्यांची नियुक्ती इंटीग्रेटेड वर्कफोर्स इंक्वायरी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (आयडब्ल्यूयूएस) या अधिकृत एजन्सीद्वारे करण्यात आली होती. एक जानेवारीला ते रुजू झाले आणि फेब्रुवारीमध्ये कोणतीही माहिती न देता निघून गेले."

पुष्पा खरे यांनी डॉक्टरांची विश्वासार्हता, त्यांची प्रमाणपत्र यांची जबाबदारी एजन्सीची असल्याचं म्हटलं आहे.

तर आयडब्ल्यूयूएसच्या डीके विश्वकर्मा यांचं म्हणणं आहे की आमचं काम हॉस्पिटल आणि डॉक्टरांचा संपर्क करून देण्याचं आहे. या प्रकरणात डॉक्टर कॅम यांची नियुक्ती आमच्या माध्यमातून करण्यात आली नव्हती तर हॉस्पिटलनं थेट डॉक्टरांशी संपर्क करून त्यांची नियुक्ती केली होती. जर आमच्या माध्यमातून नियुक्ती झाली असती तर आम्ही सर्व व्हेरिफिकेशन केलं असतं.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितलं की "असे बनावट डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. या प्रकरणात पुढील कारवाई केली जाते आहे."

तर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवर म्हटलं आहे, "या मारेकऱ्याला भाजपानं मोठं केलं, आयटी सेलनं हिरो बनवलं, याचे ट्वीट तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी शेअर केले. या डॉक्टरला उपचार करण्याची परवानगी कोणी दिली? रुग्णांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. डॉक्टर जॉन उर्फ विक्रमादित्य की भाजपा?"

बीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.