You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गर्भवतीला साफ करायला लावले रुग्णालयाच्या बेडवरचे रक्त, उपचारादरम्यान पतीचा मृत्यू, नेमके प्रकरण काय?
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील डिंडौरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका गर्भवती महिलेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
रक्ताने माखलेली खाट साफ करतानाचा हा व्हीडिओ समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर कडाडून टीका होत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना 31 ऑक्टोबर रोजी घडली असून व्हायरल व्हिडीओत दिसत असलेल्या पीडितेचं नाव रोशनी मडावी असं आहे.
रुग्णालयातील ज्या खाटेवर रोशनीच्या नातेवाईकांचा उपचार करण्यात आला ती खाट तिच्याकडून साफ करून घेण्यात आली. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या प्रकरणी दिंडोरीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून आदेश जारी करण्यात आला आहे. ‘अतिशय निंदनीय घटना’ असल्याचं यात म्हटलं आहे.
या प्रकरणी दोन नर्सिंग अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे.
महिलेने काय सांगितले?
दिवाळीच्या दिवशी डिंडौरी जिल्ह्यातील एका कुटुंबावर जमिनीच्या वादातून दुसऱ्या पक्षाने हल्ला केला. त्यात रोशनीचे 65 वर्षीय सासरे धरम सिंह, तिचा पती शिवराज आणि दीर गंभीर जखमी झाले.
रोशनी आणि इतर कुटुंबीयांनी जखमी अवस्थेतील तिघांना रुग्णालयात नेले. ज्या खाटेवर जखमींचा उपचार करण्यात आला, ती खाट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गर्भवती रोशनीला स्वच्छ करायला लावल्याचा आरोप आहे.
रोशनी सांगते, “माझ्या दिराला रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं. ज्या खाटेवर त्यांच्यावर उपचार करण्यात आलेली खाट माझ्याकडून साफ करून घेतली.
एकीकडे माझ्या दिराचं रक्त वाहत होतं आणि दुसरीकडे माझ्याकडून रक्तानं माखलेली खाट साफ करवून घेण्यात आली. त्यावेळी काय करावं काहीच सूचत नव्हतं. त्यांनी मला जे म्हटलं मी तसं तसं करत गेले.” माझ्यावर अन्याय झाला, त्यांनी असं करायला नको होतं, असं रोशनी म्हणाली.
आमच्या कुटुंबात चार पुरुष होते, त्यातील तिघांचा मृत्यू झाला आणि आता तिच्या कुटुंबाला आधार नाही, असं रोशनी सांगते.
रोशनी म्हणाली, “मला तीन मुलं आहेत. सध्यी मी पाच महिन्यांची गर्भवती असून काही दिवसांत चौथं मुलंही येईल. माझ्या कुटुंबात कर्तापुरुष उरलेला नाही, आमचा सांभाळ कोण करणार? जी जमीन होती त्यावरही दुसऱ्यांनी कब्जा केला आहे.”
रोशनी पुढं म्हणाली की, “त्यांचे मृतदेह पडून होते आणि माझ्याकडून खाटेवरील रक्त साफ करून घेण्यात आलं. मला काहीच भान नव्हतं, कमीतकमी रुग्णालयातील लोकांनी माणुसकी दाखवायला पाहिजे होती.”
विरोधकांची टीका, सरकारने केली कारवाई
रोशनीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. रुग्णालय व्यवस्थापनावर कडाडून टीका होत आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसने ही घटना अमानुषतेचे उदाहरण असल्याचं म्हणत एक्स (पूर्वीचं ट्विटर)वर व्हीडिओ शेअर केलाय. व्हीडिओ शेअर करत लिहीले की, “राज्यातील भाजप सरकारमध्ये, बेलगाम नोकरशाहीच्या अमानुषतेची उदाहरणे दररोज समोर येतात!
पण आदिवासीबहुल डिंडौरी जिल्ह्यात पतीच्या मृत्यूनंतर गर्भवती महिलेकडून साफ सफाई करवून आली. अमानुषतेची पराकाष्ठा करणारी अशी ही घटना आहे.”
“पतीला गमावलेल्या महिलेला रुग्णालयाकडून अशाप्रकारची वागणूक देणं अत्यंन निंदनीय आणि लज्जास्पद आहे”, अशी टीका मध्य प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आली.
आम आदमी पार्टीनंही घटनेचा व्हीडिओ शेअर करत म्हटलं, “भाजपच्या आरोग्य प्रशानाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय! मध्य प्रदेशातील सरकारी रुग्णालयात भाजप सरकारने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.”
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गडसराय येथे कार्यरत आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रशेखर सिंग यांची 2 नोव्हेंबर रोजी बदली करण्यात आली. तसेच येथील दोन नर्सिंग अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.