'अहमदाबाद अपघातातील विमानात सुरुवातीपासूनच समस्या', अमेरिकेतील संस्थेनं काय दावा केला?

    • Author, थिओ लेगेट
    • Role, आंतरराष्ट्रीय बिझनेस प्रतिनिधी

अहमदाबादेत गेल्यावर्षी झालेल्या विमानात पूर्वी अनेक तांत्रिक बिघाड झाले होते, याबद्दलचे पुरावे असल्याचं अमेरिकेतील विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षिततेसाठी मोहीम चालवणाऱ्यांचं (एव्हिएश सेफ्टी कॅम्पेनर) म्हणणं आहे.

या बिघाडांमध्ये उड्डाणादरम्यान लागलेल्या आगीचाही समावेश आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारं बोईंग 787 ड्रीमलायनर हे विमान, 12 जूनला उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्येच कोसळलं होतं. या अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता.

'द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी' हा अमेरिकेतील विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षिततेसंदर्भात मोहीम चालवणारा गट किंवा संस्था आहे.

या गटानं त्यांच्या निष्कर्षांची मांडणी करणारं एक सादरीकरण (प्रेझेन्टेशन) अमेरिकेतील सीनेटला पाठवलं आहे. हे निष्कर्ष त्यांच्या हाती आलेल्या कागदपत्रांवर आधारित असल्याचं या गटाचं म्हणणं आहे.

या अपघाताचा अधिकृत तपास सुरू आहे. मात्र जुलै महिन्यात तपासाचा अंतरिम अहवाल प्रसिद्ध झाला होता.

या अहवालामुळे मोठ्या प्रमाणात अंदाज बांधले गेले होते आणि वाद निर्माण झाला होता. बोईंग कंपनीनं यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

अपघातापूर्वीही अनेकदा बिघाड?

अपघात झालेल्या विमानाची व्हीटी-एएनबी म्हणून नोंदणी करण्यात आली होती. हे विमान 787 मॉडेलच्या सुरुवातीच्या विमानांपैकी एक होतं.

या विमानानं पहिलं उड्डाण 2013 च्या शेवटी केलं होतं. तर 2014 च्या सुरुवातीला ते एअर इंडियाच्या सेवेत दाखल झालं होतं.

'द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी'चं म्हणणं आहे की, कागदपत्रांमधून दिसतं की एअर इंडियाच्या सेवेत दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच या विमानातील प्रणालीत बिघाड होत होते.

या गटानं आरोप केला आहे की हे बिघाड, 'अभियांत्रिकी, उत्पादन, गुणवत्ता आणि देखभाल याच्याशी संबंधित विविध आणि गोंधळात टाकणाऱ्या अनेक समस्यांमुळे' झाले होते.

या बिघाडांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरमधील दोष, सर्किट ब्रेकर्स वारंवार बंद पडणं, वायरिंगचं नुकसान होणं, शॉर्ट सर्किट, विद्युत प्रवाह खंडीत होणं आणि पॉवर सिस्टममधील भाग जास्त गरम होणं या गोष्टींचा समावेश होता.

द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टीचं म्हणणं आहे की, जानेवारी 2022 मध्ये विमानातील पी100 पॉवर डिस्ट्रीब्यूशन पॅनलमध्ये आग लागली होती.

इंजिनमधून निर्माण होणारी उच्च व्होल्टेजची वीज घेण्याचं आणि ती विमानात वितरित करण्याचं काम पॉवर डिस्ट्रिब्युशन पॅनल करतात. अशा पाच पॅनलपैकी हे एक पॅनल होतं.

फ्रँकफर्ट विमानतळावर उतरत असताना वैमानिकांना पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे संदेश येऊ लागले होते.

नंतर या नुकसानीबद्दल लक्षात आलं होतं. एफएएसचं म्हणणं आहे की हा बिघाड इतका गंभीर स्वरुपाचा होता की, त्यामुळं संपूर्ण पॅनलच बदलावं लागलं होतं.

बोईंग 787 मॉडेलच्या रचनेतील बदलांमुळे समस्या?

प्रवासी विमानांच्या आधीच्या आवृत्त्यांपेक्षा, बोईंगचं 787 मॉडेलचं विमान इलेक्ट्रिकल सिस्टमवर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

कार्यक्षमता सुधारण्यासाठी विमानाच्या डिझायनर्सनी अनेक मेकॅनिकल आणि न्युमॅटिक भाग (हवा किंवा गॅसच्या मदतीनं यांत्रिक काम करणारे) विमानातून काढून टाकले.

त्याऐवजी त्यांनी विमानाच्या रचनेत इलेक्ट्रिकल भागांचा समावेश केला. हे भाग तुलनेनं वजनानं हलके असतात.

मात्र यामुळे विमानाच्या सुरुवातीच्या काळातच समस्या निर्माण झाल्या. यात 2013 मध्ये जपान एअरलाइन्सच्या विमानातील बॅटरीत लागलेल्या मोठ्या आगीचा समावेश आहे.

यामुळे 787 मॉडेलच्या विमानांच्या ताफ्याचं उड्डाण तात्पुरतं थांबवावं लागलं होतं. एका विमानाच्या चाचणीच्या वेळी आग लागल्यानंतर, 2010 मध्ये पी 100 पॅनलचं डिझाइन बदलण्यात आलं होतं.

'द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी'चा अहवाल अमेरिकेच्या सीनेटच्या तपासासाठीच्या स्थायी उप समितीला पाठवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी या समितीनं 'बोईंगच्या सदोष सुरक्षा संस्कृती'बाबत (बोईंग्स ब्रोकन सेफ्टी कल्चर) सुनावणी घेतली होती.

अहमदाबादला झालेल्या विमान अपघाताचा अधिकृत तपास इंडियाज एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) म्हणजे भारताचा विमान अपघात तपास ब्युरो करतो आहे.

अमेरिकेचे अधिकारीदेखील यात सहभागी होत आहेत. कारण अपघातग्रस्त विमान आणि त्याच्या इंजिनचं डिझाइन अमेरिकेत तयार करण्यात आलं होतं. तसंच त्यांचं उत्पादनदेखील अमेरिकेतच झालं होतं.

अपघाताच्या प्राथमिक अहवालावरून वाद आणि प्रश्न

हा विमान अपघात झाल्यानंतर एक महिन्यानं एएआयबीनं एक प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला होता. विमान अपघातांच्या तपासांमध्ये ही एक स्टँडर्ड पद्धत आहे.

तसंच अहवाल प्रसिद्ध होत असताना ज्ञात असलेल्या तथ्यांचा सारांश देण्यासाठी हे केलं जातं. या प्राथमिक अहवालात सहसा कोणतेही ठोस निष्कर्ष काढले जात नाहीत.

मात्र, 15 पानांच्या या अहवालातील एका छोट्या भागामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

त्यात म्हटलं आहे की विमानानं उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्येच, विमानाचे इंधनावर नियंत्रण ठेवणारे स्विच (फ्यूल कंट्रोल स्विच) 'रन' स्थितीतून 'कट-ऑफ' स्थितीत हलवण्यात आले होते.

हे स्विच सामान्यपणे उड्डाणाच्या आधी इंजिन सुरू करण्यासाठी आणि नंतर ते बंद करण्यासाठी वापरले जातात.

फ्यूल कंट्रोल स्विचच्या स्थितीत बदल झाल्यामुळे इंजिनांना होणारा इंधनाचा पुरवठा थांबला असेल. त्यामुळे त्यांची शक्ती वेगानं कमी झाली असेल.

इंजिन पुन्हा सुरू करण्यासाठी या स्विचची स्थिती बदलण्यात आली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो अपघात टाळता येणं शक्य राहिलं नव्हतं.

या अहवालात नंतर म्हटलं आहे, "कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये, एक वैमानिक दुसऱ्या वैमानिकाला असं विचारताना ऐकू येतो की, त्यानं हा स्विच का बंद केला. म्हणजे इंधन पुरवठा का बंद केला. त्यावर दुसऱ्या वैमानिकानं उत्तर दिलं की त्यानं असं केलेलं नाही," हे मूळ संभाषण मात्र देण्यात आलेलं नाही.

या अप्रत्यक्षपणे नोंदवण्यात आलेल्या संभाषणामुळे अमेरिका आणि भारतातील अनेक भाष्यकारांनी असं सुचवलं की, हा विमान अपघात दोघांपैकी एका वैमानिकामुळे झालेला आहे. एकतर तो जाणूनबुजून झाला होता किंवा नकळत झाला होता.

मात्र, त्यानंतर अपघातातील पीडितांचे वकील, सुरक्षा मोहिमेसाठी काम करणारे, वैमानिकांची संघटना, तसंच भारत आणि अमेरिकेतील काही तांत्रिक तज्ज्ञांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया आली.

त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यांना वाटतं की अपघाताच्या कारणात वैमानिकांवर जे लक्ष केंद्रित करण्यात आलं, हे दिशाभूल करणारं आहे. याद्वारे विमानात तांत्रिक समस्या असण्याच्या शक्यतेपासून लक्ष इतरत्र वळवण्यात आलं आहे.

तपास अहवाल अपुरा असल्याचा आक्षेप

हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून बीबीसीनं विविध लोकांशी याबाबत संवाद साधला आहे. यात यात वैमानिक, अपघाताचा तपास करणारे आणि इंजिनीअर्स अशा विमान क्षेत्रातील विविध लोकांचा समावेश आहे.

प्रत्यक्षात नेमकं काय घडलं असावं, याबद्दल वेगवेगळे सिद्धांत असले तरीदेखील, महत्त्वाची माहिती उपलब्ध नाही किंवा पुरवण्यात आलेली नाही, याबद्दल व्यापक सहमती आहे.

'द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी' हा गट किंवा संस्था एड पिअरसन यांच्या नेतृत्वाखाली काम करते. पिअरसन हे सिएटलमधील बोईंगच्या रेंटन कारखान्यातील माजी वरिष्ठ व्यवस्थापक आहेत.

बोईंगसारख्या विमान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रक मानकांवर ते अनेक वर्षांपासून थेट, स्पष्टपणे टीका करत आहेत.

एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल हा 'अतिशय अपुरा, लज्जास्पदरित्या अपुरा' असल्याचं म्हटलं होतं.

'द फाउंडेशन फॉर एव्हिएशन सेफ्टी'चं म्हणणं आहे की, त्यांना फक्त त्या अपघातातील विमानापुरतीच चिंता वाटत नाही. तर त्यापलीकडे संपूर्ण 787 मॉडेल आणि त्याच्या वापराबद्दल चिंता वाटते.

ते म्हणतात की त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधील शेकडो इतर विमानांमधील बिघाडांशी संबंधित जवळपास 2,000 अहवालांचा अभ्यास केला आहे.

विमानातील वायरिंगच्या कप्प्यांमध्ये पाण्याची गळती होण्याचाही त्यात समावेश आहे. याची नोंद आधी फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशननं घेतली आहे. ही अमेरिकेतील नियामक यंत्रणा आहे. इतर काही वर्तुळांमध्येही या विमानाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्या आहेत.

बोईंगनं सातत्यानं म्हटलं आहे की 787 हे सुरक्षित विमान असून त्याचा सुरक्षिततेचं रेकॉर्ड अतिशय चांगलं आहे. अहमदाबादच्या विमान अपघातापूर्वी, हे विमान जवळपास दीड दशकापासून सेवेत होतं. या कालावधीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बीबीसीनं या फाउंडेशनच्या अहवालात संदर्भ देण्यात आलेली कागदपत्रं पाहिलेली नाहीत.

एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताचा तपास अजूनही सुरू असल्यामुळे बोईंगनं याबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला. अपघातासंदर्भातील प्रश्नांची उत्तर स्वत: देण्याऐवजी बोईंगनं हे प्रश्न एएआयबी विचारण्यात यावेत असं म्हटलं.

प्रतिक्रियेसाठी एअर इंडिया आणि एएआयबी यांना संपर्क साधण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)