You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मानवाच्या प्रजातीत सर्जनशीलता जन्मजात होती? जगातील सर्वात जुन्या गुहाचित्रांमधून काय उलगडतंय?
- Author, पल्लब घोष
- Role, वरिष्ठ प्रतिनिधी
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर सापडलेली 67, 800 वर्षे जुनी हाताची रूपरेषा आणि कथा सांगणारी चित्रं मानवाची कल्पकता युरोपपूर्वीच अस्तित्वात होती, हे दाखवतात.
या शोधामुळे आता मानवी इतिहासातील कला, प्रतीकात्मक विचार आणि मानवांचा प्राचीन प्रवास पुन्हा नव्याने समजण्याची मोठी संधी मिळाली आहे.
इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर सापडलेली हाताची स्टॅन्सिल (रंग फुंकून किंवा लावून बाह्यरेषा बनवण्याची पद्धत) स्वरूपातील आकृती ही जगातील आतापर्यंतची सर्वात जुनी गुहाचित्रकला (केव्ह पेंटिंग) आहे, असं संशोधकांचं मत आहे.
संशोधक सांगतात की, या चित्रात लाल रंगात हाताची बाह्यरेषा दिसते. नंतर त्या हाताच्या बोटांमध्ये बदल करून नखांसारखा, पंजासारखा आकार देण्यात आला आहे. यावरून तेव्हाच्या माणसाची कल्पनाशक्ती आणि प्रतिकात्मक विचार करण्याची क्षमता दिसून येते.
हे चित्र किंवा पेंटिंग किमान 67, 800 वर्षांपूर्वीचं असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. म्हणजेच, याआधी जगात सर्वात जुने मानले जाणारे स्पेनमधील वादग्रस्त हाताचं स्टॅन्सिल यापेक्षा आता सापडलेलं चित्र सुमारे 1,100 वर्षांनी जुने आहे.
'सुलावेसी बेटावरील शोधामुळे जुन्या कल्पना मोडीत'
या शोधामुळे हे स्पष्ट होतं की, आपली प्रजाती होमो सेपियन्स ही काही संशोधक म्हणतात त्यापेक्षा सुमारे 15,000 वर्षे आधीच ऑस्ट्रेलिया-न्यू गिनीचा मोठा भाग, म्हणजे साहुल, येथे पोहोचली होती.
गेल्या दहा वर्षांत सुलावेसी बेटावर झालेल्या अनेक शोधांमुळे एक जुनी समजूत किंवा कल्पना मोडून पडली आहे.
आधी असं मानलं जायचं की, मानवाची कला आणि कल्पनाशक्ती युरोपातील हिमयुगात सुरू झाली. पण सुलावेसीतील शोधांनी हे मत चुकीचं ठरवलं आहे.
गुहाचित्रकलेला मानवाच्या विचारांतील मोठा टप्पा मानलं जातं. कारण यावरून माणूस कल्पना करून, अर्थ लावून विचार करू लागला हे दिसतं. आणि याच विचारांमधून पुढे भाषा, धर्म आणि विज्ञान तयार झाले.
या जुन्या चित्रांमधून दिसतं की माणूस फक्त आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहत नव्हता. तो त्या गोष्टी चित्रांतून मांडत होता, कथा सांगत होता आणि आपली ओळखही दाखवत होता. असं आजवर कोणत्याही इतर प्रजातीने केलेलं नाही.
या प्रोजेक्टचं सह-नेतृत्त्व करत असलेले ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ॲडम ब्रुम यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, हा नवीन शोध नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
यामुळे असं लक्षात येतं की, मानवतेसाठी युरोपमध्ये अचानक कुठलीही 'जागृती' झाली नाही. आपल्या प्रजातीमध्ये कल्पनाशक्ती किंवा सर्जनशीलता जन्मजात होती, आणि त्याचे पुरावे आफ्रिकेत मिळतात, जिथे आपण विकसित झालो होतो.
"मी 1990च्या दशकात विद्यापीठात शिकत असताना आम्हाला मानवी सर्जनशीलतेची सुरुवात युरोपमध्ये झाली, असं सांगितलं जायचं. पण आता इंडोनेशियामधील कथा सांगणारी कला आणि आधुनिक माणसाचं वर्तन दिसत आहे, त्यामुळे ही युरोप-केंद्रित कल्पना टिकवणं कठीण आहे," असं प्रा. ब्रुम म्हणतात.
स्पेनमधील माल्ट्राव्हिसो गुहेतील लाल हाताचं स्टॅन्सिल चित्र हे सर्वात जुने मानलं जातं, ते किमान 66,700 वर्षे जुने आहे. पण हे वादग्रस्त आहे; काही तज्ज्ञांना ते इतकं जुनं वाटत नाही.
2014 मध्ये सुलावेसीमध्ये किमान 40,000 वर्षांपूर्वी माणसाने हाताचा छाप आणि प्राण्यांची आकृती काढलेलं चित्र सापडलं. त्यानंतर किमान 44,000 वर्षांपूर्वीच्या शिकाराची दृश्य आढळून आले, आणि नंतर किमान 51,200 वर्षांपूर्वीचा मनुष्य आणि डुक्कर यांचं कथात्मक चित्र सापडलं.
प्रा. मॅक्सिम ऑबर्ट यांच्या मते, या शोधांमुळे चित्रकलेचा इतिहास खूप मागे जातो.
'चित्रातील बदल कल्पक'
"सुरुवातीला आम्ही सुलावेसीतील चित्रांचं किमान वय 40,000 वर्षे मानलं होतं, जे युरोपसारखं होतं. पण रंग जवळून तपासल्यावर, या गुहाचित्रांचा इतिहास किमान आणखी 28,000 वर्षांनी जुना असल्याचे दिसून आले."
ताज्या शोधात सापडलेली गुहा लियांग मेटांडुनो नावाची आहे, जी सुलावेसीच्या दक्षिण-पूर्वेकडील मुना बेटावर आहे.
हे स्प्रे पेंटसारखं आहे. येथे प्राचीन कलाकाराने आपला हात भिंतीवर ठेवला आणि नंतर तिथे रंग फुंकला किंवा थुंकला, त्यामुळे हात काढल्यावर भिंतीवर हाताची उलट रूपरेषा (निगेटिव्ह आऊटलाइन) राहिली.
तिथली एक हाताची तुटलेली रूपरेषा खडकाच्या पातळ थराखाली होती. तपास केल्यावर त्याचं वय किमान 67,800 वर्षे असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही जगातील सर्वात जुनी निश्चित वयाची गुहाचित्रकला आहे.
संशोधकांच्या मते, महत्त्वाचं म्हणजे, कलाकाराने फक्त हात भिंतीवर ठेवून रंग फुंकण्यापेक्षा (स्प्रे) बरंच काही केलं.
मूळ हाताचं चित्र तयार झाल्यानंतर, बोटांना अरुंद आणि लांब करून पंज्यासारखं बनवलं गेलं. प्रा. ब्रुम म्हणतात की, हा कल्पक बदल करणं म्हणजे माणसाचं खास वैशिष्ट्य आहे.
ते सांगतात की, स्पेनमधील निअँडरथल्सच्या 64,000 वर्षांपूर्वीच्या गुहा चित्रांमध्ये अशा प्रकारचा प्रयोग दिसत नाही. तसेही, हे वादग्रस्त आहे कारण काही संशोधक त्या चित्रांचं वय मोजण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करतात.
मुना बेटावरील ताज्या शोधापर्यंत, सुलावेसीमधील सर्व चित्रं दक्षिण-पश्चिम भागातील मारोस पांगकेप कार्स्टमध्ये सापडली होती.
पण आता जे जुने हाताचं चित्र बेटाच्या दुसऱ्या बाजूला, स्वतंत्र बेटावर सापडलं आहे, त्यातून दिसतं की गुहांच्या भिंतींवर चित्र काढणं फक्त एका ठिकाणची गोष्ट नव्हती, तर हा प्राचीन कला आणि कल्पकतेचा भाग संपूर्ण परिसरात पसरलेला होता.
ब्रुम सांगतात की, इंडोनेशियातील सहकाऱ्यांच्या फिल्डवर्कमुळे दूरच्या भागात शेकडो नवीन गुहाचित्र स्थळं सापडली आहेत, आणि काही गुहा हजारो वर्षांपासून पुन्हा-पुन्हा वापरल्या गेल्या.
लियांग मेटांडुनोमध्ये, त्याच भिंतीवर अजून नवीन चित्रं आहेत, काही 20,000 वर्षांपूर्वीची. यावरून दिसतं की, ही गुहा किमान 35,000 वर्षांपासून कलाकारांसाठी महत्त्वाची होती.
सुलावेसी बेट आशियाच्या मुख्य भागापासून प्राचीन साहुलकडे जाणाऱ्या समुद्री मार्गावर आहे. या चित्रांचं वय पाहता, ऑस्ट्रेलियातील अबोरिजिनल (ऑस्ट्रेलियन आदिवासी) लोकांचे पूर्वज कधी आले हे समजण्यास मदत होते.
काही काळ लोक असा विचार करत होते की, होमो सेपियन्स पहिल्यांदा प्राचीन ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी, म्हणजे साहुल येथे सुमारे 50,000 वर्षांपूर्वी पोहोचले. हे प्रामुख्याने डीएनए अभ्यास आणि पुरातत्त्वाच्या ठिकाणी सापडलेल्या पुराव्यांवरून ठरवण्यात आलं होतं.
'कल्पकतेचा इतिहास खूप जुना'
पण आता ठोस पुराव्यांमुळे लक्षात येतं की, होमो सेपियन्स सुलावेसीमध्ये किमान 67,800 वर्षांपूर्वीच राहात होते आणि संकल्पनात्मक चित्र काढत होते.
यावरून इंडोनेशियाच्या राष्ट्रीय संशोधन संस्थेचे (बीआरआयएन) अधी अगस ऑक्टावियाना यांच्या मते, सुमारे 65,000 वर्षांपूर्वी उत्तर ऑस्ट्रेलियात मानव होता, असा आधीचा वादग्रस्त पुरावा बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे.
"सुलावेसीमध्ये ज्या लोकांनी ही चित्रे काढली, ते मोठ्या लोकसंख्येचा भाग असण्याची शक्यता आहे. जे नंतर या प्रदेशात पसरले आणि शेवटी ऑस्ट्रेलियाला पोहोचले."
अनेक पुरातत्व शास्त्रज्ञ पूर्वी असं म्हणत होते की, युरोपमध्ये माणसाची कल्पकता अचानक जागृत झाली. कारण सुमारे 40,000 वर्षांपूर्वी होमो सेपियन्स फ्रान्स आणि स्पेनमध्ये आले तेव्हा गुहाचित्रे, कोरलेली आकृती, दागिने आणि नवीन पाषाणाची साधनं सर्व एकत्र दिसू लागली.
अल्तामिरा आणि एल कॅस्टियोसारख्या गुहाचित्रांमुळे लोकांना वाटू लागलं की, युरोपमध्ये कला आणि प्रतीकात्मक विचार अचानक सुरू झाले.
पण दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहेसारख्या ठिकाणी, 70,000 ते 1,00,000 वर्षांपूर्वीची कोरलेली चिन्हं, मणी आणि अमूर्त चित्रं सापडल्यामुळे हे समजलं की, आफ्रिकेत ही कल्पकता खूप आधीपासूनच होती.
सुलावेसीतील खूप जुनी कथा सांगणारी चित्रं पाहून, संशोधक आता असे मानू लागले आहेत की, कल्पकतेचा इतिहास खूप जुना आणि खूप मोठ्या भागात पसरलेला होता, असं ऑबर्ट यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
"यावरून दिसतं की, माणसांकडे खूप आधीपासून कल्पकतेची क्षमता होती, किमान ते आफ्रिकेतून बाहेर निघाल्यापासून किंवा कदाचित त्यापूर्वीही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)