You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'चॉकलेट चोरीच्या संशयात मारहाण केल्यानं मुलीचा मृत्यू', चर्चेत असलेलं हे प्रकरण नेमकं काय?
- Author, अजादेह मोशिरी आणि उस्मान जाहीद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
(या बातमीतील काही तथ्य तुम्हाला विचलित करू शकतात)
पाकिस्तानात एका दाम्पत्याला 13 वर्षाच्या मुलीच्या हत्येच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे. चॉकलेट चोरल्याच्या संशयानं घरी काम करणाऱ्या या मुलीला त्यांनी प्रचंड मारहाण केली आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे.
इकरा नावाच्या या मुलीनं गेल्या बुधवारी (12 फेब्रुवारी) रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तिला खूप मारहाण झालेली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मुलीवर प्रचंड अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं.
रावळपिंडीतील या घटनेमुळं संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट पसरली. त्यानंतर सोशल मीडियावर #JusticeforIqra ट्रेंड करू लागलं.
सोशल मीडियावर न्यायाची मागणी
संपूर्ण पाकिस्तानात बालमजुरीबाबत वेगवगळ्या प्रांतांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत.
पण ही घटना घडली त्या पंजाब प्रांतात 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून मजुरी करून घेण्यावर बंदी आहे.
इकराचे वडील सनाउल्लाह बीबीसी बरोबर बोलताना म्हणाले की, "तिच्या मृत्यूनं मी उद्ध्वस्त झालो आहे. पोलिसांनी मला बुधवारी फोन केला. मी रुग्णालयात पोहोचलो तेव्हा इकरा अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडली होती. काही वेळातच तिनं प्राण सोडला."
इकरा आठ वर्षांची होती तेव्हापासून काम करते. तिचे 45 वर्षीय वडील म्हणाले की, त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळं त्यांच्या मुलीलाही काम करावं लागत होतं.
दोन वर्षांपूर्वी तिनं या कुटुंबाकडे काम करायला सुरुवात केली होती.
त्या मोबदल्यात इकराला सुमारे साडे आठ पाकिस्तानी रुपये (अडीच हजार भारतीय रुपये) मिळत होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, "इकराच्या मालकांनी तिच्यावर चॉकलेट चोरीचाही आरोप केला. तसंच तिला टॉर्चर करण्यात आलं. तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुरेसे पुरावे आहेत."
बीबीसीला इकराचे जे फोटो मिळाले त्यावरून तिच्या पाय आणि हाताला फ्रॅक्चर आणि डोक्यालाही गंभीर जखमा झाल्याचं स्पष्ट झालं.
पोलीस आता इकराच्या ऑटोप्सी आणि संपूर्ण मेडिकल रिपोर्टची वाट पाहत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या सेहेर बानो यांनी एक्सवर लिहिलं की, "मला प्रचंड त्रास होत आहे. अशा प्रकारच्या घरांमध्ये कित्येक निरागस चिमुलक्यांबरोबर हिंसाचार होत असेल. गरिबांनी आणखी किती दिवस मुलींना अशाप्रकारे स्वतःच्या हाताने कबरींमध्ये ढकलावं लागणार."
एका चॉकलेटसाठी मुलीची हत्या झाल्याने अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एका पाकिस्तानी यूझरनं, 'एक चॉकलेटसाठी मृत्यू' असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं.
दुसऱ्या एका यूझरने लिहिलं की, "हा फक्त गुन्हा नाही. ही आपली व्यवस्था आहे, ज्यात श्रीमंत गरिबांबरोबर असं वर्तन करतात."
आरोपी अटकेत
इकरा ज्यांच्याकडे घरकामाला होती त्या राशीद शफीक आणि त्यांच्या पत्नी सना यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
तसंच त्यांच्या घरी मुलांना शिकवणाऱ्या एका कुराण टीचरलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. जखमी इकराला तेच शिक्षक रुग्णालयात घेऊन आले होते.
मुलीचे वडील जिवंत नाहीत आणि आईही सापडत नाही, असं त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना खोटं सांगितलं होतं.
आरोपींना तुरुंगात पाहायचा असल्याचं इकराच्या वडिलांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानात अशा प्रकरणांवर नागरिकांचा प्रचंड संताप समोर आलेला असतानाही, अशी प्रकरणं अनेकदा कोर्टाबाहेरच सोडवली जातात. त्यामुळं दोषींना शिक्षाही मिळत नाही.
2018 मध्ये एका जज आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या घरी काम करणाऱ्या 10 वर्षीय चिमुकल्या मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
नंतर ती शिक्षा कमी करून एक वर्ष करण्यात आली होती. त्यावेली पाकिस्तानात या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली होती.
पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सनुसार त्या प्रकरणात पीडित चिमुकली तय्यबाच्या शरीरावर गंभीर जखमा आणि हाता पायाला चटके दिल्याचं पाहायला मिळालं होतं.
मुलीच्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर घाव आणि नखांनी ओरखडल्याचे व्रणही पाहायला मिळाले होते. तसेच तिचे डोळेही सुजलेले होते. तिच्यावर घरातला झाडू हरवल्याचा आरोप करण्यात आला होता, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार पीडित कुटुंबाला अनेक गंभीर प्रकरणांत संशयिताला माफ करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना कोर्टात ते'अल्लाहच्या नावाने' असं करत असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं.
पण कायद्याचे अभ्यासक सांगतात की, अशा प्रकारच्या माफी मागचं मुख्य कारण हे, पीडित कुटुंबाला दोषींकडून दिले जाणारे पैसे हे असतं. कायद्यानुसार अशाप्रकारे पीडितांना पैसे देणं बेकायदेशीर नाही.
युनिसेफच्या माहितीनुसार पाकिस्तानात 33 लाख मुलं बालमजुरी करतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार पाकिस्तानात काम करणाऱ्या 85 लाख घरगुती कामगारांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलं आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.