नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमातील अभिनेत्याची निर्घृणपणे हत्या, पोलिसांनी काय सांगितलं?

झुंड सिनेमातील अभिनेता प्रियांशू उर्फ (बाबू) छेत्री

फोटो स्रोत, INSTAGRAM/babuchhetriofficial

फोटो कॅप्शन, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड सिनेमातील अभिनेता प्रियांशू उर्फ (बाबू) छेत्री याची नागपुरात हत्या करण्यात आली आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' सिनेमातील अभिनेता प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री याची नागपुरात हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी (7 ऑक्टोबर) मध्यरात्री 12 ते 3 च्या दरम्यान ही घटना घडली.

अमिताभ बच्चन झुंड चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याच चित्रपटात बाबूनेही भूमिका केली होती. बाबूच्या निधनानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून बाबूची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबू हा 22 वर्षांचा होता. त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या एका मित्रावरच संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अभिनेता प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री

फोटो स्रोत, NITIN NAGARKAR

फोटो कॅप्शन, अभिनेता प्रियांशू ठाकूर उर्फ बाबू छेत्री

जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू हा रात्री त्याच्या एका मित्रासोबत बाहेर गेला होता. पण तो रात्री घरी परतला नाही.

क्षीरसागर म्हणाले, "आम्हाला रात्री 3 वाजता नारा परिसरात कोणाची तरी हत्या झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचल्यावर आम्हाला तिथं एक मुलगा जखमी अवस्थेत आढळला. त्याला वायरनं बांधलं होतं. त्याच्या शरीरावर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते. आम्ही त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं."

मृताबद्दलची माहिती घेतल्यावर तो बाबू छेत्री असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी बाबूच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वैयक्तिक वादातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

सध्या एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

बाबूच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजता बाबूचा मित्र त्याला आपल्यासोबत घेऊन गेला होता.

हत्या झाली ते ठिकाण आणि वायर

फोटो स्रोत, BBC/BhagyashriRaut

फोटो कॅप्शन, वायरने बांधून क्रूरपणे बाबू छेत्रीची हत्या करण्यात आली आहे.

बाबूवर याआधीही गुन्हे दाखल होते. तसेच त्याची हत्या झाली तेव्हा तो दारूच्या नशेत होता अशीही माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

बाबू

फोटो स्रोत, Instagram/Babu Chhetri

फोटो कॅप्शन, प्रियांशू उर्फ बाबू छेत्री (मध्यभागी गाडीच्या टपावर बसलेला - झुंड चित्रपटातील दृश्य )

ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण चौकशीनंतर या हत्येमागचं खरं कारण समोर येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बाबू छेत्री हा नागपुरातील लुंबिनी नगर, मेकोसाबाग परिसरात राहत होता, तर संशयित आरोपी हा जवळच्याच परिसरात राहतो.

झुंडचे पोस्टर

फोटो स्रोत, INSTAGRAM/ANKUSH GEDAM

फोटो कॅप्शन, झुंड या चित्रपटात नागपुरातील झोपडपट्टीतील काही मुलांना संधी देण्यात आली होती. प्रियांशूने एका फुटबॉल खेळाडूची भूमिका साकारली होती.

'झुंड' हा चित्रपट विजय बारसे या निवृत्त शिक्षकाच्या आयुष्यावर आधारित होता. याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते आणि चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

याच चित्रपटात नागपुरातील झोपडपट्टीतील काही मुलांना अभिनयाची संधी देण्यात आली होती.

बाबूने 'झुंड'मध्ये एका फुटबॉल खेळाडूची भूमिका साकारली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)