वाघांपासून मुलांचं रक्षण करणाऱ्या 4 माता; रात्रीच्या काजळीत 'वाघाच्या काळजा'चे दर्शन

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल. इथला प्रत्येकजण वाघाच्या दहशतीत जगतोय. कधी कुठून वाघ येईल सांगता येत नाही. जंगलातील प्राण्यांपासून संरक्षणासाठी गावाला तारेचं कुंपण. जंगलात प्राणी मोकाट आणि माणूस पिंजऱ्यात असं या गावाचं दृश्य.

चंद्रपूर जिल्ह्यातील मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सितारामपेठ गावातलं हे दृश्य आहे. हे गाव ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरात येतं.

गावापासून बसस्टँडवर जायला 400 मीटर कच्चा रस्ता आहे. एका बाजूला घनदाट जंगल आणि एका बाजूला शेती, त्यातही रस्त्यावर एकही लाईट नाही. या रस्त्यावर ग्रामस्थांना नेहमी वाघ दिसतो. कधी गुरांवर हल्ला करताना, तर कधी जंगलातून गावाकडे येताना वाघाचं दर्शन होतं. त्यामुळे या रस्त्यानं ये-जा करणारे गावातले लोक दहशतीत आहेत.

वनविभागाच्या माहितीनुसार या गावाच्या परिसरात नेहमी 10-12 वाघांचं दर्शन नियमितपणे होतं. अशा वाघाच्या दहशतीत आपल्या गावातल्या मुलांनी शाळेत सुखरूप जावं आणि घरी यावं यासाठी याच गावातील चार महिलांनी स्वतः पुढाकार घेतला.

रात्रीच्या किर्र अंधारात जिथं वाघ कधीही हल्ला करू शकतो अशा रस्त्यानं या चार महिला हातात लाकडाची काठी आणि टॉर्च घेऊन मुलांचं संरक्षण करतात.

किरण गेडाम, वेणू रंदये, रिना नाट आणि सीमा मडावी असं या चार धाडसी महिलांचं नाव असून त्या वाघांच्या दहशतीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उभ्या राहिल्या आहेत.

याच चार महिलांचं हे धाडसी काम बघण्यासाठी आम्ही ताडोबाच्या परिसरात असलेल्या सीतारामपेठ गावात पोहोचलो. साधारण 200 लोकसंख्या असलेलं हे गाव आहे.

या गावातून 11 विद्यार्थी 7 किलोमीटरवर असलेल्या मुधोली इथं शिकायला जातात. त्यासाठी त्यांना गावापासून चारशे मीटरवर असलेल्या बस स्टँडवर बस पकडायला जावं लागतं. पण, चारशे मीटरचा रस्ता वन्यप्राण्यांमुळे धोकादायक आहे.

या रस्त्यावर सर्वांना वाघाचं दर्शन होतं. दहावीत शिकणारा विद्यार्थी सुशांत नाट सांगतो, "गेल्या महिन्यात आम्ही शाळेत जायला निघालो तेव्हा गावाच्या जवळच वाघ दिसला. गाईच्या मागे धावला होता. वाघ दिसताच आम्ही गावाकडे पळालो. आरडाओरडा केला तर तेव्हा काय झालं, काय झालं असं विचारत ग्रामस्थ जमले. इथं वाघ होता असं आम्ही सांगितलं. वाघ कधी रस्त्यानं चालताना दिसतो, कधी गाईवर हल्ला करताना दिसतो. मग आम्ही तर लहान मुलं आहोत. आमच्यावरही हल्ला करू शकतो. आम्ही शाळेत कसं जाऊ? असं आम्ही सगळ्या मुलांनी गावातल्या लोकांना म्हटलं."

सुशांतसह त्याच्या गावातील मुलं याआधी बस स्टँडपासून पळत गावात यायची. पण, यामध्येही धोका होताच. त्यामुळे मग गावातील चार महिला या मुलांचं संरक्षण करण्यासाठी पुढे आल्या.

किर्र अंधारात मुलांना असं देतात संरक्षण

सकाळी 9.45 वाजता मुधोलीला जाणारी बस येते. त्यासाठी सगळी मुलं तयार होऊन गावातल्या चौकात जमतात. त्यानंतर या चारही महिला मुलांना घेऊन बसस्टँडपर्यंत जातात. मध्ये मुलं आणि त्यांच्या भोवती चार बाजूला महिलांचं संरक्षण असतं.

बस स्टँडवरही नेहमीच वाघ दिसतो. तिथंही बस येईपर्यंत मुलांना संरक्षण देण्याचं काम या महिला करतात. सगळी मुलं मध्ये असतात आणि चार महिला एकमेकींकडे चेहरा करून उभे असतात जेणेकरून कोणाच्या मागून वाघ आला तरी तो दिसेल.

सायंकाळी पावणेसातच्या सुमारास येणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या बसनं मुलं शाळेतून येतात. तोपर्यंत किर्र अंधार पडलेला असतो. गावातून बस स्टँडपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर एकही लाईट नाही. कधीही वाघ येऊ शकतो किंवा कुठलाही प्राणी येऊ शकतो. त्यामुळे हातात लाकडी काठी आणि हातात टॉर्च घेऊन चौघी जणी मुलांना घ्यायला बस स्टँडवर जातात.

बस आली की पुन्हा मुलांभोवती संरक्षण साखळी तयार करून त्या मुलांना घेऊन गावाकडे निघतात. रस्त्यानं येताना महिला हातातील टॉर्चनं कुठे प्राणी आहे का यावर लक्ष ठेवतात. तसेच हातातल्या काठीचा आवाज करत, आरडाओरडा करत, गप्पा गोष्टी करत सगळेजण येतात जेणेकरून वाघ असेल तर तो पळून जाईल.

या चार महिलांपैकी एक असलेल्या किरण गेडाम सांगतात, "रात्रीच्या अंधारात बस स्टँड ते गाव हे 15 मिनिटाचं अंतर खूपच धोक्याचं आहे. कुठून वाघ तर येणार नाही, साप तर निघणार नाही, आपल्याला इजा तर होणार नाही अशी भीती मनात असते. मुलांना घ्यायला जाताना वाघ पण दिसतो. पण, मुलांना आम्ही सांगत नाही. कारण, मुलं घाबरतात. येताना वाघ दिसला की आम्ही आरडाओरड करतो किंवा त्याचं लक्ष दुसरीकडे असेल तर आम्ही निघून येतो. गावात येईपर्यंत भीतीच असते मनात. गावात आल्यावर वाटतं आपण सुटलो."

पण, या महिलांना मुलांच्या संरक्षणासाठी स्वतः पुढाकार का घ्यावा लागला?

गावाच्या आजूबाजूला वाघ नेहमी फिरत असतात. शाळेत जाताना मुलांना नेहमी वाघ दिसायचा.

किरण सांगतात, "मुलं वाघाला चालताना, कधी गुरांवर हल्ला करताना बघत होते. त्यांच्या मनात खूप भीती बसली होती. आम्ही शाळेत जात नाही खूप भीती वाटते अशी त्यांची नेहमीची तक्रार असायची. त्यामुळे वनविभागाची लोक गावात आली तेव्हा त्यांना म्हटलं की आमच्या मुलांना बस स्टँडपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीतरी पहारेकरी द्या, आमच्या मुलांसाठी काहीतरी करा. पण, त्यांनी काहीच केलं नाही. त्यामुळे आपल्या मुलांचं संरक्षण आपणच करू असं आम्ही ठरवलं."

शाळेत जाणाऱ्या या 11 मुलांमध्ये या चारही महिलांची मुलं आहेत. पण, त्या गावातल्या सगळ्याच मुलांचं संरक्षण करतात.

पण, हे संरक्षण करताना आपल्यावर वाघाचा हल्ला होणार नाही ना अशी भीती या महिलांच्या मनात असते. यासाठीच वनविभागानं त्यांना मदत करावी अशी मागणी त्या करतात.

किरण म्हणतात, "आमच्या गावाला बस स्टँड पासून तर गावापर्यंत लाईट दिली पाहिजे. आम्ही चारच महिला मुलांच्या संरक्षणासाठी काम करतो. त्याची जबाबदारी वनविभागानं घेतली पाहिजे. त्यासाठी आम्हाला पहारेकरी दिली पाहिजे. आम्हाला इलेक्ट्रीक काठी द्यायला पाहिजे. त्या काठीचा आवाज येतो. त्याला वाघ घाबरतो. यामुळे आमचं धाडस आणखी वाढेल. आम्ही मुलांना आणखी सुरक्षित आणू शकतो."

वनविभागाची प्रतिक्रिया

ताडोबा व्याघ्र प्रकल्पानं देखील या महिलांची दखल घेतली असून असाच प्रयोग ताडोबातल्या इतर 105 गावांमध्ये राबवला जाईल, अशी माहिती मोहर्ली वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष थिपे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.

ते म्हणाले, "मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आमच्या गावातील संघर्ष आम्हीच टाळणार यासाठी या महिला पुढे आल्या. त्या शाळकरी मुलांना संरक्षण करतात.

"हे काम मीडियातून लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे 105 गावांसाठी हे लागू केलं जाईल. जे लोक मुलांना असं नेणं-आणणं करतील त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जातील. एकूण टीमला चार हजार दिले जातील. ज्या महिला काम करतील त्यांना इलेक्ट्रीक स्टीक, एक जॅकेट आणि टॉर्च दिला जाईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)