'मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं', सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले? इतरांच्या आहाराबाबत वारकऱ्यांची भूमिका काय असते?

    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबद केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, मग तुम्हाला काय अडचण आहे? सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

'मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटं बोलत नाही. माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही', असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील.'

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरुन 'सोयीच्या विठ्ठलभक्तीचे समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदयाची थट्टा चालविली आहे', अशी पोस्ट करत टीका केली आहे.

तर, भाजप महाराष्ट्रने त्यांच्या एक्स अकाउंटवरुन सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हीडिओ पोस्ट करत लिहिलंय की, 'सुप्रिया ताईंनी पुन्हा एकदा पांडुरंगाचा आणि वारकऱ्यांचा अपमान केला. शरद पवार गटाचे नेते स्वतःला काय समजतात? उठ-सुठ हिंदूंच्या देवीदेवतांचा आणि परंपरांचा अपमान करतात, स्वतःला देवांचा बाप म्हणवून घेतात, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची वाट्टेल तशी मोडतोड करतात, प्रभु रामाचा अपमान करतात, हिंदूंना आराध्य असलेल्या प्रत्येक गोष्टीचा अपमान करतात.'

आषाढी वारीच्या काळात पालखी मार्गावरील मद्य आणि मांसविक्री करणारी दुकाने यावर बीबीसी मराठीने बातमी प्रसिद्ध केली होती, ती पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

पालखी मार्गावर मद्य-मांसविक्रीचा वाद, इतरांच्या आहाराबाबत वारकरी संप्रदायाची काय भूमिका राहिली आहे?

आषाढी वारीच्या काळात पालखी मार्गावरील मद्य आणि मांसविक्री करणारी दुकाने त्या दिवसाकरीता बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता.

भाजपाचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी या स्वरुपाची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं होतं.

शासनाने त्यांची ही मागणी मान्य केली होती.

आषाढी वारीच्या निमित्ताने निघणाऱ्या मानाच्या दहा पालखी सोहळ्यांतील प्रत्येक पालखी ज्या मार्गाने जाणार असेल, त्या वाटेवरील गावात संपूर्ण दिवसभर मद्य आणि मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय लागू केला आहे.

या प्रकरणावर चर्चा सुरू झाल्यानंतर वारकरी संप्रदायाची इतरांच्या आहाराबाबत काय भूमिका आहे याचा शोध या लेखाच्या माध्यमातून घेण्यात आला होता. हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.

नेमकं काय आहे हे प्रकरण? गेली किमान आठशे वर्षे सुरु असलेल्या वारी परंपरेत याप्रकारचा बंदीचा निर्णय इतिहासात कधी घेतला गेला होता का?

वारकरी संतांची आणि वारकरी तत्त्वज्ञानाची यासंदर्भातील भूमिका नेमकी काय आहे? ते जाणून घेऊयात.

मद्य-मांस बंदीची मागणी आणि अंमलबजावणी

वारीच्या पवित्रतेसाठी आणि भक्तिमय वातावरण अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असल्याचं भाजपच्या फेसबूक अकाऊंटवर म्हटलं आहे.

शासनाच्या आदेशानुसार, स्थानिक प्रशासनाने मद्य आणि मांसविक्री बंद ठेवण्यासाठी संबंधित दुकानदारांना सुचित केले असून, अंमलबजावणी न केल्यास परवाने रद्द करण्याची कारवाई होईल.

तसे होऊ नये, याकरीता धार्मिक भावना लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

यासंदर्भात बीबीसी मराठीशी बोलताना तुषार भोसले यांनी त्यांची भूमिका मांडली.

मागणीविषयी बोलताना ते म्हणाले की, "वारकरी संप्रदायातले लोक हे शुद्ध शाकाहारी असतात. त्यांच्याकडे मद्य-मांस या गोष्टींवर पिढ्यानपिढ्या बंदी असते.

वारी ही साधना आहे. भगवंतांच्या नामात तल्लीन होऊन, साधना करत लोकं पंढरीकडे प्रस्थान करत असतात. अशी साधना करत असताना रस्त्यावरील वाटेमध्ये कुठंतरी मांस टांगलेलं असतं. दारुची दुकानं उघडी असतात. तर त्या साधनेच्या दृष्टीने पावित्र्य जपलं जावं, म्हणून त्या दिवसाकरीता दुकानं बंद असावीत, अशी आमची मागणी होती आणि ती मान्य झाली आहे."

वारकरी परंपरेची 'मांसाहारा'संदर्भातील भूमिका

याआधी, पालखी मार्गावर अशा स्वरुपाची बंदी कधी घालण्यात आली होती का, असा प्रश्न आम्ही 'होय होय वारकरी' या ग्रंथाचे लेखक हभप ज्ञानेश्वर बंडगर यांना विचारला.

ते म्हणाले की, "गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून कमी-अधिक उच्चारवाने देहू-आळंदी-पंढरपूर यांसारख्या वारकरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मांस-मद्यविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी होताना दिसते आहे.

फार पूर्वी काही अशा मागण्या झालेल्या नव्हत्या. तसेच, पालखी मार्गावरील दुकाने बंद करण्याचा निर्णयदेखील यावेळी पहिल्यांदाच घेण्यात आला आहे."

मांसाहाराबाबत वारकरी संप्रदायाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत बीबीसी मराठीनं आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त अभय टिळक यांच्याकडून माहिती घेतली.

ते म्हणाले की, "माळ घातली की 'अभक्ष्यभक्ष' आणि 'अपेयपान' हे दोन्हीही वर्ज्य आहे. त्यामुळे, या दोन्हीही प्रकारांशी वारकऱ्यांचा संबंधच येत नाही. एकूणातच, तामसी खाणं-पिणं आणि मनातले विकार यांचा संबंध प्रस्थापित झालेला आहे.

ज्याला आपण सात्विक दिनचर्या म्हणतो, तो जर आपण अध्यात्मिक पाया मानला तर त्याला ज्या गोष्टी बाधक आहेत, त्या करु नयेत, इतकं साधं वारकरी संतांचं तत्त्वज्ञान आहे."

दुसऱ्या बाजूला, ज्याला आजच्या भाषेत 'बहुजनी' म्हणता येईल, अशा बुद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, वारकरी अशा बहुतांश परंपरा या शाकाहारी आहेत, असं ज्ञानेश्वर बंडगर सांगतात.

ते म्हणतात की, "वारकरी संप्रदाय हा शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे, यात काहीच शंका नाही. विशेषत: सनातन धर्मातील यज्ञयागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी हिंसा व्हायची, त्याला वारकरी संप्रदायाने विरोध केलेला आहे.

उदाहरणार्थ, 'मुख बांधोनी बोकड मारा । म्हणती सोमयाग करा,' हा अभंग थोड्याफार शाब्दिक फरकाने तुकोबा, नामदेव आणि एकनाथ अशा तिन्ही संतांच्या नावावर आहे. आशय एकच की, त्यांनी यज्ञातल्या हिंसेला वारकरी म्हणून विरोध केलेला आहे. थोडक्यात, हिंसेला विरोध असल्याने ते शाकाहारी आहेत."

इतरांच्या मांसाहाराबाबत वारकऱ्यांची भूमिका

वारकरी परंपरा शाकाहाराचा पुरस्कार करत असली तरी महाराष्ट्रातील वारकरी वगळता मोठा जनसमुदाय मांसाहार करत आला आहे, हे वास्तव आहे.

या मांसाहारी लोकांबद्दल तसेच मांसविक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांबद्दल वारकरी संतांची भूमिका नेमकी काय आहे, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल.

शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी अनेक जण संत तुकोबांच्या एका अभंगाचा दाखला देत आहेत.

तो अभंग असा,

उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भक्ती देखोनियां ॥१॥

दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥

चर्म रंगूं लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेले विणी ॥२॥

सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥३॥

मांसविक्रीच्या संदर्भाने वारकऱ्यांची भूमिका काय आहे, हे आपल्याला तुकोबांच्या या प्रसिद्ध अभंगातून समजून घेता येऊ शकतं, असं ज्ञानेश्वर बंडगर सांगतात.

ते म्हणतात की, " 'सज्जन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे,' अशी ओळ या अभंगात आहे. म्हणजे, वारकरी संप्रदायातलेच एक संत असे आहेत, जे मांसविक्री करत होते. त्यांचं मांस विकायला स्वत: पांडुरंग आला होता, अशी वारकऱ्यांची धारणा आहे.

दुसरं असं आहे की, 'सज्जन कसाई' हे नाव सुद्धा प्रतिकात्मक आहे. वारकरी परंपरेसाठी 'कसाई'देखील 'सज्जन' आहे. त्यांचा व्यवसाय काही का असेना, पण त्यांची पांडुरंगावर निष्ठा आहे, भक्ती आहे आणि ते सचोटीने त्यांचं त्यांचं काम करत आहेत, एवढं पुरेसं आहे. मग असा कोणताही व्यवसाय करायला वारकऱ्यांची बंदी असायची कारण नाही."

यासंदर्भात आपलं विश्लेषण मांडताना अभय टिळक म्हणतात की, "या अभंगामध्ये भागवत धर्माची अशी भावना दिसून येते की, हातामधून जेव्हा कुठलंही कर्म घडतं, तेव्हा त्या कर्मामागची भावना आणि त्यामागची वृत्ती शुद्ध असणं, अपेक्षित आहे.

आता सज्जन कसाई हा स्वत: भागवतभक्त आहे, पण मांसविक्री हा त्याचा व्यवसाय आहे. भागवत धर्माची जी निष्काम कर्माची संकल्पना आहे, की कर्म करायचा, पण कर्त्याचा अहंकार ठेवायचा नाही, ते ईश्वरार्पण करायचं, या भावनेतून सज्जन कसाई हे कर्म करतोय. हे त्यामागचं तात्त्विक स्पष्टीकरण आहे. पण, प्रश्न असा आहे की, हे आपल्याला वारकरी नसलेल्या सगळ्यांवरच लादता येईल का?"

जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त हभप दिनकर शास्त्री भुकेले यांच्याकडूनही याबाबत जाणून घेतलं. ते वारकरी संप्रदायाचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असून त्यांची 'वारकरी वैष्णव संप्रदाय' आणि 'विठोबाचा धर्म जागो' अशी दोन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

ते म्हणाले की, "वारकरी संप्रदायानं व्यवसायाचा त्याग करायचा नाही, हे तत्त्व अंगीकारलेलं आहे. गोरोबा काका, नामदेव शिंपी, तुकाराम महाराज, सज्जन कसाई यापैकी कुणीही आपला व्यवसाय सोडलेला नाही. व्यवसाय वेगळा आणि परमार्थाचं आचरण वेगळं."

या अभंगाबाबत विचारलं असता तुषार भोसले म्हणाले की, "आम्ही कुणाच्याही खाण्यावर थोडीच बंदी घालतो आहोत.

पण, लाखो वारकरी जर रस्त्याने जात असतील आणि ते शुद्ध-शाकाहारी असल्याने बऱ्याच दिवशी उपवास वगैरे करुन चालत असतील, तर त्यावेळेला त्यांच्या भावनेचा आदर म्हणून आपण एक दिवस अशी दुकाने बंद ठेवू शकत नाही का? असं केल्याने कोणतं एवढं पहाड कोसळणार आहे?"

मेलेली जनावरं ओढणारा चोखोबा आणि अभंगांमधील 'श्वपच' शब्दाचा उल्लेख

चोखोबा हे तेराव्या शतकात तत्कालीन अस्पृश्य जातीत जन्माला आलेले वारकरी संत होते. ते त्यावेळी परंपरेनी देण्यात आलेली कामं करायचे.

'जोहार मायबाप जोहार' म्हणणारे आणि मेलेली गुरं-ढोरं ओढणारे आणि पडेल ती कामं करणारे चोखोबा हे विषमतेनं ग्रासलेले नि त्रासलेले भक्तकवी होते.

ज्ञानेश्वर बंडगर सांगतात की, "चोखोबा स्वत: विठ्ठलाचे भक्त असले तरीही त्यांना मेलेले गुरं-ढोरं ओढावी लागतच होती. तुकोबांच्या अभंगातच 'नरहरीसोनारा घडु फुंकू लागे । चोख्यामेळ्या संगें ढोरें ओढी' असाही विठ्ठलाचा उल्लेख आहे.

शिवाय, 'चर्म रंगूं लागे रोहिदासासंगे । कबिराचे मागे शेले विणी,' असं म्हणत विठ्ठल रोहिदासाला चामड्याचं काम करण्यातही मदत करतो, असंही म्हटलेलं आहे."

"थोडक्यात, विठ्ठल स्वत: रोहिदासांना, चोखोबांना, सज्जन कसायाला हीन ठरवली गेलेली अशी काम करण्यास मदत करतो, असं तुकोबांनीच म्हटलं आहे.

गुरे ओढणे, मांस विकणे वा चर्म कमावणे या कामांशी हीनत्व जोडलेलं असलं तरीही वारकरी संप्रदायाने असं हीनत्व नाकारलेलं आहे, हेच यातून दिसून येतं.

ही कामं करणाऱ्या भक्तांचाही वारकरी संतांनी गौरवच केलेला आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या कामामुळे नाही तर त्यांच्या अंत:करणातील भक्तीभावामुळे त्यांची ओळख आज जनमानसात आहे," असं ते सांगतात.

याशिवाय, संतांच्या अभंगांमधील 'श्वपच' या शब्दाकडेही ते लक्ष वेधताना दिसतात.

ते सांगतात की, 'श्वपच' म्हणजे कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांचा वंश होय. त्यांचा उल्लेख संतांनी आपल्या अभंगात ज्या अर्थाने केला आहे, तो अर्थ महत्त्वाचा आहे.

"अशा वंशात जन्माला आलेला 'श्वपच' सुद्धा वारकरी असेल तर तो उच्चवर्णीयांपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा अर्थाच्या एकनाथ महाराजांच्या वगैरे ओव्या आहेत.

तुकोबांचाही अभंग आहे. अर्थात, वारकरी झाल्यानंतर त्यानं मांस खाऊ नये, हे सांप्रदायिक बंधन आहेच. पण, अशा प्रकारच्या वंशात जन्म घेतलेल्या व्यक्तीलाही तुच्छ लेखलं जाऊ नये, अशी संतांची उदात्त भूमिका आहे," याकडे ते लक्ष वेधतात.

मांसविक्री करणारे पण मांसाहार न करणारे वारकरी

वरवी कोळीवाडा असो वा कोकण असो, किंवा बऱ्याच ग्रामीण भागातील पशुपालक शेतकरी असोत, हे वारकरी असूनही मासे-बोकड-कोंबडी विक्रीचा व्यवसाय करतात, असा मुद्दा ज्ञानेश्वर बंडगर मांडतात.

ते म्हणतात की, "हे वारकरी स्वत: खात नसले तरी विक्री व्यवसाय करतात. सांगायचा हेतू असा की, खुद्द वारकरी परंपरेतल्या संतानेच मांस विकलेलं आहे. शिवाय आजच्या काळातले अनेक वारकरी मासे-बोकड हे मांसाहारासाठी प्राणी विकतात.

तेव्हा, व्यवसायाला बंदी घाला, असं संतांनी कुठेही म्हटलेलं नाही. अमुक काळात, अमुक ठिकाणी अमुक पद्धतीने बंदी असावी, अशीही मागणी नाही. म्हणणं एवढंच आहे की, तुम्ही वारकरी झाल्यानंतर मांसाहार करु नये."

दुसऱ्या बाजूला, तुषार भोसले म्हणतात की, "मांस आणि मद्याची पूर्वीच्या काळात एवढी दुकाने नव्हती. त्यावेळी गावाच्या बाहेर कुठेतरी एखादं दुकान असायचं.

आता वसाहती वाढल्याने दुकानंही वाढली आहेत. रस्त्याने टांगलेलं हे मांस वारकऱ्यांना बघवत नाही. आणि म्हणून आम्ही ही मागणी केली आहे. त्यात गैर काय आहे?"

ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार हभप राजाभाऊ महाराज यांनी या निर्णयात वावगं काही नसल्याचं म्हटलं, तसेच सामंजस्य दाखवण्याचा मुद्दाही अधोरेखित केला.

ते म्हणाले की, "हा निर्णय पूर्णपणे सदासर्वकाळ बंदीचा नाही. तो फक्त ज्या दिवशी पालखी त्या रस्त्यावरुन जात आहे, तेवढ्या काळापुरताच आहे. याआधीही जेव्हा जेव्हा बकरी ईद आणि आषाढी वारी एकाच काळात आलेली आहे, तेव्हा मुस्लीम समाजाने आदल्या दिवशी अथवा पालखीच्या दुसऱ्या दिवशी तो सण साजरा करुन सामंजस्य दाखवलेलंच आहे. आता फरक इतकाच आहे, शासनाने ही दुकानं बंद ठेवावीत, असा आदेश यावर्षी काढला आहे."

याबाबत तुषार भोसले म्हणतात की, "अशा गोष्टी सामंजस्याने झाल्या तर उत्तमच. नसेल तर शासनाचेही नियम पाहिजेतच ना? शासनाचे नियम नसतील तर मग कसं होईल.

सगळेच जण सामंजस्याने अशा गोष्टी करत नाहीत, म्हणूनच असे शासकीय निमय फार महत्त्वाचे ठरतात. या वर्षीपासून पालखीमार्गावर हा नियम लागू झाला आहे, याचं आम्ही स्वागत करतो."

एका बाजूला तुषार भोसले धार्मिक भावनांचा मुद्दा पुढे करतात तर दुसऱ्या बाजूला अभय टिळक हट्टापेक्षा स्वयंनिमयन अधिक महत्त्वाचं असून तोच वारकरी धर्म असल्याचं पटवून देतात.

यासाठी ते आणखी एक उदाहरण देतात.

ते म्हणतात की, "महाराष्ट्रात अशीही कित्येक घरं सापडतील, ज्यामध्ये एकच व्यक्ती माळकरी आहे आणि बाकी कुटुंब मांसाहार करतं. वारकरी ही जीवनपद्धती आहे. ती ज्याला पटते, तो ती पाळतोच आहे.

पण हा जो हट्ट आहे, वा आग्रह आहे, तो गैर आहे. त्याऐवजी, स्वयंनियमन महत्त्वाचं आहे. फार तर मांसाहार करण्याचे परिणाम-दुष्परिणाम पटवून देता येऊ शकतात. पण बंदी वा आग्रह करुन फार काही साध्य होत नाही."

'मांसविक्री बंदी प्रबोधनाने व्हावी, सक्तीने नव्हे'

राजकीय पक्षांच्या अध्यात्मिक आघाड्यांचा चर्चेत येण्यासाठीचा हा आटापिटा असल्याचं 'जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थे'चे माजी विश्वस्त हभप दिनकर शास्त्री भुकेले म्हणतात.

पालखी मार्गावरील मद्य आणि गुटखा-तंबाखूच्या व्यसनांची दुकानं नक्कीच बंद असावीत, हा मुद्दा ते ठामपणे मांडतात. मात्र, मांसविक्रीबाबत ते वेगळा मुद्दा मांडताना दिसतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, "वारकरी मांसाहारी नाहीतच. मात्र, आहार हा ज्याचा-त्याचा विषय आहे. यावरुन वेदापासून शास्त्रापर्यंत अनेक मतभेद आहेत. कुठे मांसाहार निशिद्ध मानला जातो, कुठे स्वीकारला जातो.

मात्र, प्रबोधनानेच मांसविक्री बंदी व्हायला हवी. शासनाच्या हस्तक्षेपाने ती होता कामा नये. त्यासाठी सक्ती करुन फारसा उपयोग होणार नाही. कारण, खाणारेही बहुतांश हिंदूच आहेत. मग प्रबोधन हा मार्ग अधिक प्रभावी नाही का," असा मुद्दा मांडून कीर्तनकारांनी याबाबत प्रबोधन करण्याची गरज ते बोलून दाखवतात.

धार्मिक गोष्टीत शासनाचा फार हस्तक्षेप करुन घेणं योग्य नाही, हा मुद्दा पटवून देताना ते म्हणतात की, "आत्मानुशासन हे वारीचं वैशिष्ट्य आहे. जैन-मारवाडी-गुजराती लोकांची नक्कल आपण करण्याची गरज नाही. सकळांना या संप्रदायामध्ये अधिकार असल्यामुळे हा संप्रदाय थोडा अधिक मुक्त असणं आवश्यक आहे आणि तो प्रबोधनानेच होऊ शकतो, सक्तीने नाही.

शिवाय, जर पालखीतही एक दिवसही बहुतांश हिंदू धर्मीय लोकच संयम पाळणार नसतील आणि त्याकरीता कायदा करावा लागत असेल, तर मग आम्हा वारकऱ्यांची ही विफलताच म्हणावी लागेल."

पालखीच्या मार्गावर मांसाहार करुन आलेले नव्हे तर तंबाखू-गुटखा खाऊन थुंकणारे आणि दारुचं व्यसन करणारे लोक अधिक असतात, हे ते ठामपणे सांगतात.

ते म्हणतात की, "मुळात बहुतांश लोक पालखी काळात मांसाहार न करण्याचा संयम बाळगतातदेखील. पण, आपण काहीतरी वेगळे आहोत, या प्रसिद्धीपोटी काही लोक अशा मागण्या करतात आणि चर्चेत येतात. पूर्वी वारकरी संप्रदाय हा शुद्ध, संयमी, शांत आणि राजकारणापासून अलिप्त असा फक्त आणि फक्त ईश्वरनिष्ठ संप्रदाय होता.

आता तो प्रत्येक बाबतीत 'राजकारणाशी जवळीक म्हणजे भूषण', असं मानणारा होत चालला आहे. म्हणूनच, आता पक्षांच्या आघाड्या वारकऱ्यांमध्ये निघाल्या आहेत. हा संप्रदायाचाच एकप्रकारे पराभव आहे," असंही ते उद्वेगानं म्हणाले.

इतकी वर्षे चालत आलेल्या वारीच्या घडामोडींमध्ये शासनाचा संबंध राहिलेला नाही, असं मत अखिल भारतीय साहित्य संमलेनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी बीबीसीशी बोलताना मांडलं. वारीचं बदलतं स्वरुप या विषयावर त्यांच्याशी बीबीसीने बातचित केली.

त्या मुलाखतीमध्ये त्या या विषयासंदर्भात म्हणाल्या की, "वारीच्या घडामोडींमध्ये शासनाचा संबंधच येत नाही. वारकरी ही संपूर्ण खासगी, वैयक्तिक अशी भूमिका आहे. मात्र आता, शासन त्याच्यामध्ये येत आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत अशा सगळ्या व्यवस्था, यंत्रणा वारीच्या नियोजनात येत आहेत. तर अशा वारीमध्ये भक्तीतत्त्व किती आहे आणि पर्यटनतत्त्व किती आहे, याचा शोध आपण घेतला पाहिजे."

दुसऱ्या बाजूला, शाकाहारी भाडेकरूलाच फ्लॅट भाड्याने देण्याचा आग्रह धरत काही सोसायट्यांमध्ये मांसाहारी लोकांना फ्लॅट दिला जात नाही, अशा बातम्या वारंवार येतात. याचंच उदाहरण देत अभय टिळक आपला मुद्दा आणखी पुढे नेताना दिसतात.

ते म्हणतात की, "या पद्धतीने आपल्या धर्मविचाराचं मत लादणं, यातून खरं तर हाती काहीच लागत नाही. यातून फक्त 'कडवटपणा' वाढीस लागतो."

जे वारकरी आहेत, ते या गोष्टी पाळतच आलेले आहेत आणि ते पाळणारच आहेत, असंही ते म्हणतात.

"धार्मिक-सांस्कृतिक-राजकीय वा आहारविषयक असा कुठल्याही बाबतीतला कडवटपणा हाच मुळात संतविचारांशी विसंगत आहे. मुळात संतविचार हा प्रेमाने हृदयपरिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असणारी ही परंपरा आहे.

इथे कोणत्याही प्रकारचा धाक, जबरदस्ती अथवा कडवेपणा हा संतपरंपरेशी विसंगत आहे. त्यामुळे, या प्रकारची आवाहनं करणाऱ्यांनी याचं भान ठेवणं गरजेचं आहे. समाजव्यवहारातील धर्मभावना, आहाराच्या परंपरेने घडत आलेल्या सवयी आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टी वेगळ्याच ठेवल्या जाव्यात," असं त्यांना वाटतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)