WPL मुळं रिक्षाचालकापासून इलेक्ट्रिशियनच्या मुलीपर्यंत सर्वांना संधी, पण आर्थिक भेदभावाचं काय?

फोटो स्रोत, Instagram/Simran shaikh & Sajna Sajeevan
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
23 फेब्रुवारी 2024. मुंबई इंडियन्सची सजना सजीवन मैदानात उतरली, तेव्हा तिच्या टीमला एका चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती.
पदार्पणातल्या त्या एकमेव चेंडूवर सजनानं षटकार ठोकला आणि विमेन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात मुंबईला विजयी सुरुवात करून दिली.
केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या एका गावात, सामान्य परिस्थितीत वाढलेल्या सजनाचं आयुष्य त्यानंतर बदललं. सजनाचे वडील रिक्षा चालवायचे तर आई स्थानिक नगरपरिषदेत कामाला होती.
"WPL नं मला जो मंच दिला, त्यामुळेच मला भारतीय संघातही खेळण्याची संधी मिळाली," असं सजना अलीकडेच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाली.
29 वर्षीय सजनासारख्याच देशाच्या दूरच्या राज्यातल्या आणि दुर्गम भागातल्या महिला क्रिकेटर्सना डब्ल्यूपीएलनं नवी आशा दिली आहे.
आता 14 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेलं या स्पर्धेचं तिसरं पर्वही भारतातल्या युवा महिला क्रिकेटर्ससाठी पर्वणी ठरेल.

फोटो स्रोत, Getty Images
भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामी सांगते की, या स्पर्धेला मिळणारं मोठं टीव्ही कव्हरेज महत्त्वाचं ठरतं, कारण लहान मुलींना त्यातून क्रिकेटकडे वळण्याची प्रेरणा मिळते आहे. झुलन सांगते, "ही लीग अशा सगळ्या महिलांसाठी नवे दरवाजे उघडते आहे."
डब्ल्यूपीएल ही इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएलप्रमाणेच फ्रँचायझी लीग फॉरमॅटमध्ये खेळवली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
पण डब्ल्यूपीएलमधून महिला खेळाडूंना मिळणारं उत्पन्न हे आयपीएलमध्ये पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा बरंच कमी आहे.
आयपीएलसारखंच व्यावसायिक यश डब्ल्यूपीएलला मिळालं, तरच ही दरी भरून निघेल असं तज्ज्ञांना आणि खेळाडूंना वाटतं.


महिला क्रिकेटमध्ये पैसा
पैशाच्या बाबतीतला हा मोठा फरक असला, तरी डब्ल्यूपीएलही महिला क्रिकेटमधील सर्वात लाभदायक आणि किफायतशीर स्पर्धा बनली आहे.
या स्पर्धेनं महिला क्रिकेटवर किती मोठा प्रभाव टाकला आहे, याविषयी इंग्लंडची माजी कर्णधार आणि डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची प्रशिक्षक शार्लोट एडवर्डस सांगते,
"या स्पर्धेनं खेळ खरंच बदलला आहे. इतर स्पर्धांचा दर्जाही सुधारतो आहे हे पाहून अभिमान वाटतो. पण सगळ्या खेळाडूंना खेळावंसं वाटतं, अशी एकच स्पर्धा आहे, ती म्हणजे डब्ल्यूपीएल."
या आकर्षणामागचं एक कारण म्हणजे डब्ल्यूपीएलमध्ये खेळाडूंना मिळणारा पैसा आणि बक्षिसाची घसघशीत रक्कम, जी इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आर्थिक अडचणींवर मात करून क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक खेळाडूंचं आयुष्य बदलण्याची ताकद डब्ल्यूपीएलमध्ये आहे.
मुंबईची 22 वर्षीय क्रिकेटर सिमरन शेख त्यापैकीच एक आहे.
आपल्या पाच भावंडांसह सिमरन मुंबईतल्या धारावीमध्ये राहते. तिचे वडील झाहीद अली इलेक्ट्रिशियन आहेत आणि दिवसाला जेमतेम 500 ते 1000 रुपये मिळवतात, ज्यावर त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचं पोट अवलंबून आहे.
सिमरन चर्चेत आली, ती डिसेंबर 2024 मध्ये डब्ल्यूपीएल लिलावादरम्यान. त्यावेळी गुजरात जायंट्स या फ्रँचायझीनं तिच्यासाठी 1.9 कोटी रुपयांची बोली लावली.
यंदाच्या WPL साठीच्या लिलावातली ती सर्वात मोठी बोली होती. सिमरनची पार्श्वभूमी पाहता हा आकडा खरंच अतिशय मोठा वाटतो.
पण हाच आकडा मानधनाच्या बाबतीत महिला आणि पुरुष क्रिकेटर्समध्ये केवढी मोठी तफावत आहे, याचीही जाणीव करून देतो.
IPL आणि WPL मधला फरक
WPL च्या लिलावाच्या साधारण महिनाभर आधी IPL साठी लिलाव झाला, ज्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर विक्रमी बोली लागली.
लखनौ सुपर जायंट्स टीमनं ऋषभसाठी 27 कोटी रुपये मोजले. त्यामुळे ऋषभ आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरला.
विराट कोहलीसारख्या काही स्टार खेळाडूंना वर्षानुवर्ष त्यांच्या टीमनं रिटेन केलं आहे. अशा काही खेळाडूंना ऋषभपेक्षाही जास्त बोली लागेल असा अंदाज लावला जातो.

तुलनेत डब्ल्यूपीएलमधली आजवरची सर्वात महागडी खेळाडू असलेल्या स्मृती मंधानासाठी 2023 साली पहिल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं 3.4 कोटी रुपये मोजले.
म्हणजे स्मृतीवर लागलेली बोली ही ऋषभसाठीच्या बोलीपेक्षा साधारण आठपट कमीच ठरते.
महिला आणि पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या पैशातली ही तफावत डब्ल्यूपीएलपुरतीच मर्यादीत नाही.
खरंतर 2022 साली बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या पुरुष आणि महिला संघांसाठी समान मॅच फी देण्याचं स्वागतार्ह पाऊल उचललं होतं.
पण जगातली सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना अशी ख्याती असलेली बीसीसीआय, भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला आणि पुरुष खेळाडूंसोबत जो वार्षिक करार करते, त्यात अजूनही मोठा फरक दिसून येतो.
तुलना करायची तर, सध्या पुरुषांसाठी वार्षिक कराराची सर्वाधिक रक्कम ही 7 कोटी रुपये एवढी आहे, तर महिलांसाठी ती 50 लाख एवढीच आहे.

महिला आणि पुरुष खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेतली ही तफावत भारतीय क्रिकेटपुरती मर्यादीत नाही.
'द हंड्रेड' या इंग्लंडमधल्या 100-बॉल क्रिकेट फॉरमॅटमधल्या स्पर्धेतही अशी तफावत आहे. इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं, ईसीबीनं समान वेतन देण्यासाठी प्रयत्न करण्याचं वचन दिलं असलं, तरी हा फरक यंदा आणखी वाढणार आहे.
ही तफावत कशामुळे आहे?
भारताच्या महिला टीमची माजी कर्णधार मिताली राज सांगते की, डब्ल्यूपीएल आणि आयपीएलमध्ये अशी तुलना इतक्यात करता येणार नाही.
"डब्ल्यूपीएलचे केवळ दोन सीझन झाले आहेत. तर आयपीएल ही 18 वर्षे जुनी आहे. त्यामुळे दोन्ही स्पर्धांची तुलना करता येणार नाही."
थोडा आणखी वेळ जाऊ द्या, म्हणजे चित्र सुधारेल असं ती सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञही एका गोष्टीकडे लक्ष वेधून घेतात. कंपन्या जेव्हा एखाद्या खेळाडूशी जाहिरातींचा करार करतात किंवा त्यांना स्पॉन्सरशिप देतात, तेव्हा त्यातून काही फायदा किंवा परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते.
पुरुष क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटला मिळणारा प्रेक्षकवर्ग अजून कमी असल्यानं डब्ल्यूपीएल आणि एकूणच महिला क्रिकेटमध्ये येणारा असा पैसा अजून तुलनेनं कमी आहे.
मिताली सांगते, "जसजसं टीव्हीवर मुलीही अधिकाधिक खेळताना दिसतील, तसतसे आणखी स्पॉन्सर्स पुढे येतील."
आयपीएल सुरू झाली तेव्हा 2008 मध्ये या स्पर्धेची व्ह्यूअरशिप म्हणजे टीव्हीवरची प्रेक्षकसंख्या 10.2 कोटी एवढी होती. ती 2024 मध्ये 62 कोटी एवढी वाढली आहे.
तर डब्ल्यूपीएलची प्रेक्षकसंख्या 2023 च्या पहिल्या हंगामात 50 लाखांवरून 2024 साली 10.3 कोटी अशी वाढली आहे.
स्पर्धेतल्या टीम्स आणि सामन्यांची संख्याही कमी असणं, हेही डब्ल्यूपीएलच्या व्ह्यूअरशिपचे आकडे कमी असण्यामागचं एक कारण ठरू शकतं.
2024 च्या हंगामात आयपीएलमध्ये 10 संघ 13 शहरांत 74 सामन्यांमध्ये खेळले.
तर यंदा डब्ल्यूपीएलमध्ये पाच संघ चार शहरांत 22 सामने खेळणार आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी याच मुद्द्याकडे लक्ष वेधून घेतात.
बीसीसीआयनं खेळाडूंना समान वेतन जाहीर केलं होतं, तेव्हा डायना म्हणाल्या होत्या, "हे उत्तम झालं, पण आम्हाला समान वेतनापेक्षा समान संधींची जास्त गरज आहे. महिला क्रिकेटर्ससाठी आणखी सामने, मालिका आयोजित करायला हव्यात."
डायना खेळत होत्या त्या काळात म्हणजे 1970 आणि 80 च्या दशकातल्या पेक्षा आज परिस्थिती बरीच बदलली आहे.
त्या काळात महिलांचे सामने टीव्हीवर दाखवले जात नसत आणि निधी जमा करणं हेच एक मोठं आव्हान असायचं.
पण मागच्या दोन दशकांत ही परिस्थिती बदलली आहे आणि डब्ल्यूपीएलनं त्या बदलाच्या शिडामध्ये वेग भरला आहे.
भारताची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणूनच डब्ल्यूपीएलविषयी सकारात्मक आहे.
ती सांगते, "लोक आता आमचा खेळ पाहतायत. ते आम्हाला ओळखू लागले आहेत. कालही मी प्रवासात काही चाहत्यांना भेटले, तेव्हा त्यांना माहिती होतं की मी आता डब्ल्यूपीएलमध्ये खेळणार आहे. हा बदल पाहून खूप बरं वाटलं. यामुळे आम्हाला आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणाही मिळते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











