'डोळ्यांनी दिसत नाही, पण लोकांचं हसणं ऐकू येतं', 23 वर्षीय अंध कॉमेडीयनची प्रेरणादायी गोष्ट

- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
समय रैना : तू लहानपणापासूनच आंधळा आहेस का?
भव्य : नाही मी नंतर आंधळा झालो, खरंतर कुणाच्यातरी प्रेमात आंधळा झालोय.
युट्युबवर इंडिया गॉट लॅटेन्ट (India's Got Latent) नावाच्या एका शो मध्ये 23वर्षांचा भव्य शाह आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन समय रैना एकमेकांशी बोलत होते.
मागच्या वर्षी (2023) अमेरिकेहून परत आलेल्या भव्यने स्टॅन्डअप कॉमेडी करायचं ठरवलं आणि एकाच वर्षात स्टॅन्ड कॉमेडीमध्ये त्याने नाव कमावलं आहे.
'इंडियाज गॉट लॅटेन्ट' या कार्यक्रमातलं त्याचं सादरीकरण आणि विनोद एवढे व्हायरल झाले की, हा कॉमेडियन नेमका कोण आहे? तो इथपर्यंत कसा पोहोचला? दोन्ही डोळ्यांनी दिसत नसताना लोकांना हसवण्याच्या कलेकडे तो कसा वळला? या आणि अशा अनेक प्रश्नांनी आम्हाला मुंबईतल्या त्याच्या घरी पोहोचवलं.


भव्यशी झालेल्या संवादातून त्याच्या विचारात असणारी स्पष्टता, त्याचा दैदिप्यमान शैक्षणिक प्रवास, त्याच्यातला आत्मविश्वास, स्वतःच्या आयुष्यातील अडचणींवर मात करत जगण्याचा त्याचा दृष्टिकोन हे सगळं काही थक्क करणारं होतं.
कोण आहे भव्य शहा?
भव्यचा जन्म मुंबईतल्या एका गुजराती कुटुंबात झाला. 23 वर्षांचा भव्य जन्मत:च अंध नव्हता.
लहानपणीच्या आठवणी सांगताना भव्य म्हणतो की, "मी 18 महिन्यांचा होतो तेव्हापासूनच मला मोठ्या नंबरचा चष्मा लागला होता. पाचव्या वर्षीच माझ्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया होऊ लागल्या होत्या, मी 11-12 वर्षांचा होईपर्यंत माझ्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, पण अखेर मला त्याच काळात अंधत्व आलं."
भव्यने सांगितलं की, "त्याचकाळात माझ्या आयुष्यात एक मोठा बदल आला. एखादा डोळस व्यक्ती ज्या गोष्टी आणि तंत्रं वापरून जगतो त्या मला सोडाव्या लागल्या आणि बघू न शकणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी, शिकण्यासाठी ज्या वस्तू आणि तंत्रं लागतात, ती मी आत्मसात केली. लॅपटॉप आणि मोबाईलवर एक स्क्रीन वाचू शकणारं सॉफ्टवेअर असतं. त्याच्याच मदतीने मी नोट्स काढू लागलो, अभ्यास करू लागलो, पुस्तकं वाचू लागलो."

भव्यच्या बालपणाबाबत बोलताना त्याची आई तेजल शहा म्हणतात की, "भव्यची दृष्टी जाण्याआधी तो फुटबॉल खेळायचा. त्यानंतर त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया सुरु झाल्या. एका बाजूला त्याची दृष्टी कमी होत होती आणि त्यानुसार भव्यला त्याचे आवडते खेळ बदलावे लागायचे. आधी फुटबॉल, मग क्रिकेट, त्यानंतर मग जिम्नॅस्टिक आणि शेवटी त्याला इनडोअर गेम्स खेळणं सुरु करावं लागलं. मग तो बुद्धिबळ, कॅरम खेळायला लागला त्याच्यासाठी हे खरोखर खूपच अवघड होतं."
एवढ्या अडचणी असूनही भव्यच्या पालकांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी त्याला मुंबईच्या झेवियर्स रिसोर्स सेंटरमध्ये नेलं आणि तिथे भव्य सगळं काही शिकू लागला.
'लहानपणी मी कुणाला हसवू शकतो, असं वाटलं नव्हतं'
स्टॅन्डअप कॉमेडीच्या माध्यमातून हजारो लोकांना आता हसवणारा भव्य लहानपणी मात्र पुस्तकी किडा होता.
भव्य म्हणतो की, "शाळेत असताना मला वाटतही नव्हतं की, मी कुणाला हसवू शकतो. मी खूप गंभीर विद्यार्थी होतो. वर्गात शिक्षकांनी प्रश्न विचारले की हात वर करून शांतपणे उत्तर देणारा, अभ्यासात मग्न असलेला असा विद्यार्थी होतो. मी बोलायला लाजत नव्हतो, पण हो वायफळ बडबडही करायचो नाही, नेहमी अभ्यासाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर बोलायला मला आवडायचं."
शाळेत असताना भव्य कधीच विनोद सांगायचं नाही, वाचायचा नाही, पण तो अकरावीत आला आणि त्याच्यासाठी विनोदाची दारं खुली झाली.
भव्य सांगतो की, "अकरावी बारावीत मी वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागलो. त्या स्पर्धांमध्ये तुमच्या भाषणात चांगली, विषयानुरूप, अभ्यासपूर्ण मांडणी करावी लागते. अशा वातावरणात जर तुम्ही एखादा विनोद करू शकलात तर त्या ठिकाणचा मूड हलका करायला त्याची नक्कीच मदत होते. मी ते करायचो आणि तिथे असलेले लोक हसायला लागायचे, तेव्हाच मला वाटू लागलं की मीही कदाचित विनोद करू शकतो, लोकांना हसवू शकतो. त्यानंतर मी विनोद ऐकायला लागलो, विनोदांचा अभ्यास करायला लागलो आणि विनोद माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग बनले."

भव्य सांगतो की, "2023च्या सुरुवातीपासूनच मला स्टॅन्डअप कॉमेडी करण्याची इच्छा होती. कारण मला स्वतःला स्टॅन्डअप कॉमेडी बघायला खूप मजा यायची. एखाद्या व्यक्तीसाठी त्याचा आनंद व्यक्त करण्याचं सर्वोच्च माध्यम हे त्याचं खळखळून हसणं असू शकतं. आणि म्हणूनच मी विनोद करायला, त्यांचा आनंद घ्यायला शिकलो. त्यामुळे मलाही स्टॅन्डअप कॉमेडी करावीशी वाटली, आणि 2023 च्या डिसेंबरमध्ये मी माझा पहिला पाच मिनिटांचा 'सेट' (सादरीकरण) लिहिला. तिथून मी मागे वळून बघितलंच नाही."
स्टॅन्डअप कॉमेडीमध्ये कलाकाराला लोकांसमोर उभं राहून विनोद सादर करावे लागतात. समोर बसलेला प्रेक्षकवर्ग कोणत्या पार्श्वभूमीचा आहे, त्यांची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक घडण किती आहे हे सगळं तपासून कलाकाराला प्रेक्षकांचं मनोरंजन करावं लागतं.
भव्य म्हणतो की, "माणूस ओळखण्यासाठी त्याचं मोकळं होणं गरजेचं असतं. दोन व्यक्तींचा संवाद खुलवायला विनोद खूप मदत करतात आणि म्हणूनच मी स्वतःला चॅलेंज दिलं. की लोकसंमोर उभं राहून मी असे विनोद करू शकतो का? या सादरीकरणासाठी मी हे विनोद लिहू शकतो का? आणि मला ते जमायला लागलं. हळूहळू आवडायला लागलं आणि मी स्टॅन्डअप कॉमेडी करू लागलो."
'लोकांचं हसणं दिसत नसलं तरी ऐकू येतं'
स्टॅन्डअप कॉमेडीच्या विश्वात समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे वाचणं महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगून जातात.
भव्य बघू शकत नसला तरी त्याला प्रेक्षकांची नस चांगलीच ठाऊक आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो की, "तुम्हाला दिसत नसलं तरी प्रेक्षकांचा मूड नक्कीच कळू शकतो. हे खूप सोपं आहे. उदाहरणार्थ, हास्य ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला ऐकू येते. अर्थात काही विनोद असे असतात ज्यावर लोक स्मितहास्य करतात, दबक्या आवाजात हसतात आणि ते ओळखण्याच्या पद्धतीही वेगळ्या असू शकतात."

फोटो स्रोत, bhavyashah
भव्य सांगतो की, "एखादा विनोद खरोखर चांगला आणि निखळ असेल तर कोणताही माणूस मनमुराद हसल्याशिवाय राहत नाही. ही प्रतिक्रिया ओळखणं सोपं असतं. पण काही विनोद प्रेक्षकांना अंतर्मुग्ध होऊन विचार करायला लावतात. पण गंमत सांगू? त्या शांततेचाही एक विशिष्ट आवाज असतो. समोर बसलेल्या लोकांच्या श्वासोच्छवासावरूनही मला माझा विनोद मजेशीर आहे की नाही हे कळतं."
'कॉमेडी माझ्यासाठी एक आरामाची जागा आहे'
भव्यने मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटर सायन्समधून पदवी मिळवली आहे. सध्या तो अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणार आहे. भारतात शिकणाऱ्या अनेकांचं अमेरिकेत जाऊन शिकण्याचं स्वप्न असतं. भव्य त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेत पोहोचला आहे. शैक्षणिकदृष्ट्या एवढी मजल मारलेली असताना त्याला कॉमेडीच्या जगात यावंसं वाटणं अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे.
याबाबत बोलताना भव्य म्हणतो की, "कॉमेडी माझ्यातल्या सृजनशीलतेला जिवंत ठेवते. माझ्या मेंदूला अभ्यासातून एक दिशा मिळतेच पण विनोदातून माझ्यातल्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव मिळतो. स्टॅन्डअप कॉमेडीच्या माध्यमातूनच मी या पद्धतीने विचार करू शकतो, काहीतरी नवीन लिहू शकतो आणि स्वतःला एका वेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकतो."

भव्य म्हणतो की, "'इंडियाज गॉट लॅटेन्ट'मध्ये व्हायरल झालेला माझा व्हीडिओ आणि समय रैनाच्या कार्यक्रमात मी केलेलं सादरीकरण अनेकांना माहिती असेल. पण अमेरिकेत 'रुस्टर टी फेदर्स' नावाचा एक कॉमेडी शो होतो. त्या कार्यक्रमात अमेरिकेतले अनेक सुप्रसिद्ध स्टॅन्डअप कॉमेडियन येतात. त्या कार्यक्रमात मी अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो होतो. अंतिम फेरीत मी एक नवीन गोष्ट लिहिली आणि सादर केली पण दुर्दैवाने माझा पराभव झाला. मी ती स्पर्धा जिंकू शकलो नाही पण मला त्यातून खूप काही शिकायला मिळालं. आजही मी विनोद लिहितो तेव्हा मला हे जाणवतं की मला अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे."
'माझ्या आई-वडिलांनी कधीच हार मानली नाही'
भव्य त्याच्या कुटुंबाबत बोलताना म्हणतो की, "भारतीय कुटुंबात तुमचा बहुतांश वेळ कुटुंबासोबतच जातो. त्यामुळे त्यांची भूमिका आणि त्यांचा तुमच्या आयुष्यावरचा प्रभाव खूप मोठा असतो. माझ्या आई बाबांची परिस्थिती अशी होती की त्यांच्या दहा-बारा वर्षांच्या मुलाची दृष्टी गेली होती आणि काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. पण त्यांनी कधीच हार मानली नाही आणि मला वेगवेगळ्या संस्थांमध्ये घेऊन गेले मला जगण्याच्या सन्मानाने जगण्याच्या लायकीचं बनवलं आणि आज मी इथे आहे."

अंध मुलांच्या पालकांनी काय केलं पाहिजे याबाबत बोलताना भव्यची आई तेजल शहा म्हणतात की, "मी एवढंच सांगेन की, तुमचा मुलगा किंवा मुलगी कशीही असो, त्याच्यावर शंभर टक्के मेहनत करा, कंटाळा करू नका. मला अनेकांनी म्हटलं होतं की तुम्हाला दोन मुलं आहेत मग अशा मुलावर तुम्ही एवढे कष्ट का घेताय? त्यांना मी एवढंच म्हणाले होते की, जर त्यांच्यासाठी एक वेगळा समाज नाहीये, त्यांना याच समाजात जगायचं आहे, तर त्यांना आपण त्यायोग्य बनवायलाच पाहिजे. त्यामुळे मी भव्यला त्यासाठीच तयार केलं आहे. माझ्या दोन्ही मुलांना मी समान वागणून दिलीय. त्याला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. त्यामुळे कधीच हार मानू नये."
आयुष्यातल्या अडचणींबाबत बोलताना भव्य म्हणतो की, "रडणं खूप कंटाळवाणं आहे. तुम्हाला तुमचं नवीन वास्तव स्वीकारावं लागतं. तुम्ही किती रडगाणं गाणार आहेत हे संपूर्णतः तुमच्यावर अवलंबून असतं. दुःखी होऊन काही मिळत नाही त्यामुळे अडचणीतून मार्ग काढणं महत्त्वाचं आहे, मी हेच करतो नवनवीन मार्ग शोधतो आणि जगत राहतो. शेवटी असंच सांगेन की तुम्ही कुणाशीही तुलना करू नका, प्रत्येकाची परिस्थिती असते. मार्ग काढा. आणि दिव्यांग व्यक्तींबाबत एवढंच म्हणेन की स्वतःला कधीच कमी समजू नका."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











