इस्रायलच्या गाझावरील हवाई हल्ल्यात किमान 400 हून अधिक जणांचा मृत्यू, गाझामध्ये पुन्हा एकदा तणाव

इस्रायल आणि हमासमध्ये शस्त्रसंधी झालेली असताना इस्रायलनं गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत.

यातून गाझामधील तणाव पुन्हा वाढला आहे. जगभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

बीबीसीचे कैरोतील गाझा प्रतिनिधी रश्दी अबुलॉफ, जेरुसलेममधील प्रतिनिधी योलांदे क्नेल आणि सजेरॉटमधील प्रतिनिधी जोन डॉनिसन यांच्यासह ओवेन अमॉसकडून संपादित

इस्रायलनं गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 404 जण मारले गेले असल्याची माहिती हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

टेलीग्रामवरील एका पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनलवर मृतांचा आकडा 413 असल्याचं म्हटलं आहे.

काही पीडित अजूनही ढिगाऱ्यांखाली अडकले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गाझामधील हल्ल्याला अमेरिका जबाबदार, हमासचा आरोप

दरम्यान गाझामध्ये हवाई हल्ला करण्यापूर्वी इस्रायलनं अमेरिकेला त्याची पूर्वकल्पना दिली असल्याची माहिती उघड झाल्यानंतर, हमासनं दिलेल्या ताज्या वक्तव्यात म्हटलं आहे की गाझामधील या नरसंहाराची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेवर आहे.

हमासनं म्हटलं आहे की "युद्धाची व्याप्ती वाढू नये यासाठी प्रयत्न करण्याच्या, अमेरिकेच्या दाव्यांमधील खोटेपणा यातून उघड होतो."

"मानवतेविरुद्धचे हे गुन्हे करणाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जबाबदार धरण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आलं आहे," असं त्या वक्तव्यात म्हटलं आहे.

मुनिर अल-बर्श हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक आहेत. ते म्हणतात की हॉस्पिटलमध्ये 660 हून अधिक जखमींना दाखल करण्यात आलं आहे.

ते पुढे म्हणाले की किमान 326 जण मारले गेले आहेत. 'अजूनही अनेकजण ढिगाऱ्यांखाली आहेत.' याआधी या मंत्रालयानं 330 जण मारले गेल्याची माहिती दिली होती.

ते म्हणाले की मारले गेलेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि मुलं आहेत.

इथे वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. 38 पैकी 25 हॉस्पिटल बंद आहेत, असं अल-बर्श म्हणाले.

"मोठ्या संख्येनं असलेले जखमी आणि हल्ल्यातील पीडितांवर उपचार करण्यासाठी आम्हाला हॉस्पिटल, बेड आणि ऑपरेशन रुमची आवश्यकता आहे," असं अल-बर्श म्हणाले.

हल्ल्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याचं इस्रायलचं म्हणणं

हमासशी निगडित प्रसारमाध्यम असलेल्या फिलास्टिननुसार, हमासनं सांगितलं आहे की त्यांच्या सरकारचे चार अधिकारी इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात मारले गेले आहेत.

मृत्यू झालेल्यांपैकी एकाचं नाव महमूद अबू वफाह आहे. ते गृहमंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी होते.

मृतांमध्ये सरकारी कामाचा पाठपुरावा करणाऱ्या विभागाचे प्रमुख इस्साम अल-दलिस, न्याय मंत्रालायचे अंडरसेक्रेटरी अहमद अल-हट्टा आणि अंतर्गत सुरक्षा सेवेचे महासंचालक बहजत अबु सुलतान यांचा समावेश आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ओरेन मार्मोर्स्टिन म्हणाले की त्यांनी गाझावर हवाई हल्ले केले कारण, "हमासनं शस्त्रसंधी पुढे नेण्यास आणि आमच्या ओलिसांची सुटका करण्यास वारंवार नकार दिला."

"इथून पुढे इस्रायल हमासवर वाढत्या तीव्रतेनं लष्करी कारवाई करेल," असं ते म्हणाले. पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या आधीच्या वक्तव्याप्रमाणेच त्यांचा सूर होता.

मार्मोर्स्टिन म्हणाले की शस्त्रसंधी पुढे नेण्यासाठीच्या ठोस प्रस्तावांना त्यांनी आधी होकार दिला होता. मात्र "हमासनं त्याला नकार दिल्यामुळे आमच्याकडे कोणताही पर्याय राहिला नव्हता. म्हणून त्यांनी गाझावर हवाई हल्ले केले.

या हल्ल्यामुळे शस्त्रसंधीच्या चर्चा संपल्या आहेत असं विचारलं असता, ते म्हणाले की शस्त्रसंधी अडीच आठवड्यांपूर्वीच संपली आहे.

"42 दिवसांसाठी शस्त्रसंधी मान्य करण्यात आली होती. करारानुसार, शस्त्रसंधी एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात आपोआप पुढे जात नाही," असं ते म्हणाले.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर चीन, रशिया, संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतरांची प्रतिक्रिया

इस्रायलनं गाझावर हवाई हल्ला केल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वाँग म्हणाल्या की दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचं पालन करण्याचं आम्ही आवाहन करतो. "सर्व नागरिकांचं रक्षण केलं पाहिजे," असं त्या म्हणाल्या.

बेल्जियमचे उपपंतप्रधान मॅक्झिम प्रीव्हॉट यांनी इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ते म्हणाले, "शस्त्रसंधीतून आता मागे हटू नये."

चीननं या परिस्थितीबद्दल 'अत्यंत चिंता' व्यक्त केली आहे. "युद्धाची व्याप्ती वाढेल अशी कोणतीही कृती करणं सर्व बाजू टाळतील," अशी आशा करूया, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले.

रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. यातून तणाव वाढू शकतो, असं ते म्हणाले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्यांमुळे "धक्का" बसल्याचं म्हटलं आहे. शस्त्रसंधीचं पालन करण्याचं "जोरदार आवाहन" त्यांनी केलं आहे.

ओलीस परत आणण्यासंदर्भात इस्रायली सरकारनं हार मानल्याचा ओलिसांच्या कुटुंबियांचा आरोप

इस्रायली ओलिसांच्या कुटुंबियांनी एक वक्तव्यं जारी केलं होतं. त्यात त्यांनी इस्रायलच्या सरकारनं गाझावर नवीन हवाई हल्ले करून ओलिसांच्या बाबतीत हार मारली असल्याचा आरोप केला होता.

इस्रायली ओलिसांच्या कुटुंबियांच्या या गटानं आता एक "आणीबाणीचं आवाहन" केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की ते निदर्शनं करण्यासाठी जेरुसलेमला जात आहेत. कारण त्यांना वाटतं की "ओलिसांना भयंकर धोका आहे."

एक्स या सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये या गटानं लिहिलं आहे की, "यापेक्षा तातडीचं दुसरं काहीही नाही! प्रत्येक दिवसागणिक ओलिसांवरील धोका वाढतो आहे. लष्करी दबावामुळे त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढू शकतो आणि त्यांना घरी सुरक्षित आणण्याचे प्रयत्न अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात."

हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी, रुग्णवाहिकांवरदेखील परिणाम

रेड क्रेसेंट म्हणतं की हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे आणि रुग्णवाहिकांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम झाला आहे.

रेड क्रेसेंट ही वेस्ट बँकस्थित एक मानवीय मदत करणारी संस्था आहे. नेबाल फरसाख या पॅलेस्टाईनमध्ये कार्यरत असलेल्या रेड क्रेसेंटच्या प्रवक्त्या आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्यांमुळे त्यांना "धक्का" बसला आहे.

पीडितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका रुग्णवाहिकेला बॉम्बहल्ल्याचा अप्रत्यक्ष फटका बसला. हॉस्पिटलमध्ये तुडुंब गर्दी झाली आहे. शेकडो जखमी तिथे आले आहेत, असं नेबाल म्हणाल्या.

इजिप्तच्या सीमेवरील रफाह क्रॉसिंग आज बंद आहे. त्यामुळे उपचारासाठी गाझामधून बाहेर पडण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांवर त्याचा परिणाम होतो आहे, असं त्या पुढे म्हणाल्या.

आमची सर्वात मोठी भीती खरी ठरली आहे, असं इस्रायली ओलिसांच्या कुटुंबीयांच्या गटानं म्हटलं आहे.

गाझामध्ये ओलिस ठेवण्यात आलेल्या इस्रायली ओलिसांची कुटुंब आता यासंदर्भात बोलत आहेत.

"इस्रायली ओलिसांचे कुटुंबीय आणि इस्रायली नागरिकांची सर्वात मोठी आता खरी ठरली आहे," असं होस्टेजेस अँड मिसिंग फॅमिलीस फोरमकडून देण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे.

"इस्रायली सरकारनं ओलिसांना परत आणण्याचे प्रयत्न सोडून देण्याचं ठरवलं आहे."

ओलिसांच्या कुटुंबीयांच्या गटानं दिलेल्या वक्तव्यात संताप आणि धक्का व्यक्त करण्यात आला आहे. "आमच्या प्रियजनांना परत आणण्याचे प्रयत्न जाणूनबुजून उद्धस्त केले आहेत," असं त्यात म्हटलं आहे.

त्या पुढे म्हटलं आहे की इस्रायल आणि हमास यांनी "शस्त्रसंधीचं पालन करावं".

त्यांनी युद्ध संपवण्याचं वचन देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी "आतापर्यंत जे जाहीर केलं आहे आणि ज्याप्रमाणे कृती केली आहे, ते पुढे नेण्याचं" आवाहन देखील केलं आहे.

इस्लायलनं म्हटलं आहे की गाझामध्ये अजूनही 59 ओलीस आहेत. त्यातील 24 जण जिवंत असल्याचं मानलं जातं.

आज सकाळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे की "आमच्या ओलिसांची सुटका करण्यास हमासनं वारंवार नकार दिल्यानंतर" आणि शस्त्रसंधी पुढे नेण्याच्या "आमच्या सर्व प्रस्तावांना" हमासनं नकार दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

पॅलेस्टिनी नागरिकांचं गाझामधून पलायन

इस्रायलच्या सैन्यानं अलीकडेच गाझातील अनेक भागातून निघून जाण्याचे नवीन आदेश दिले आहेत.

हवाई हल्ले सुरू असल्यामुळे, अनेक पॅलेस्टिनी लोक त्यांना सुरक्षित वाटत असलेल्या भागांमध्ये पलायन करत आहेत.

इस्रायलनं गाझातील लोकांना दक्षिणेत खान युनूसकडे किंवा गाझा सिटीच्या पश्चिम भागात जाण्याचा सल्ला दिला आहे.

रोसेलिया बोलन युनिसेफच्या प्रवक्त्या आहेत. युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रसंघांची मुलांसाठी सेवाभावी काम करणारी संस्था आहे. रोसेलिया दक्षिण गाझामधील अल-मवासीमध्ये आहेत.

"प्रत्येकासाठीच ती एक अतिशय कठीण रात्र होती," असं त्यांनी बीबीसी रेडिओ 4च्या टुडे कार्यक्रमात सांगितलं.

"प्रचंड मोठ्या स्फोटांच्या आवाजानं त्यांना जाग आली. आमचं गेस्ट हाऊसला हादरे बसत होते. पुढील 15 मिनिटं, जवळपास दर पाच-सहा सेकंदं आम्हाला स्फोटांचे आवाज येत होते," असं त्या म्हणाल्या.

त्यांनी बाहेर ओरडण्याचे आणि सायरन आवाज ऐकू येत असल्याचं सांगितलं. आकाशात विमानांचा आवाज घुमत होता.

"या बॉम्बहल्ल्यांपूर्वी मदत पुरवठा, मानवीय मदत, इंधन, स्वयंपाकाचा गॅस थांबवण्यात आला होता आणि युनिसेफद्वारा संचालित पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला होता," असं त्या म्हणाल्या.

"15 महिन्यांच्या युद्धात इथली आरोग्यव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली आहे," असं बोलन म्हणतात.

त्या ज्या मुलांशी बोलल्या, ती मुलं युद्धामुळे "अत्यंत घाबरली आहेत, त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे" आणि हवाई हल्ले थांबले पाहिजेत, असं त्या म्हणाल्या.

'आता पुरे झाले' - पॅलेस्टिनी नागरिकांचा शोक

"शस्त्रसंधी कुठे आहे?" असा प्रश्न, गाझा सिटीजवळील शेजैया भागातील त्यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यानंतर, कमाल अबु अल-अट्टा विचारतात.

"इकडे पाहा, किती लोक मारले गेले आहेत. जवळपास 100 जण शहीद झाले आहेत. ही गोष्ट स्वीकारण्यासारखी नाही. ही शस्त्रसंधी अजिबात नाही. आता पुरे झाले," असं ते रॉयटर्स या वृत्तसंस्थेला म्हणाले.

मोहम्मद बदेर हे आणखी पॅलेस्टिनी म्हणाले, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात त्यांची मुलगी मारली गेली आहे.

"आम्ही झोपलेलो होतो. तेव्हा अचानक बॉम्बहल्ल्यामुळे आम्हाला जाग आली. त्यांनी आमच्या शेजारपाजारी बॉम्बहल्ले केले...आम्हाला एक मुलगी एका ढिगाऱ्याखाली सापडली. आम्ही तिची आई आणि वडिलांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं," असं ते म्हणाले.

अखेर ढिगाऱ्याखाली त्यांना त्यांच्या मुलीचा मृतदेह सापडला, असं ते म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.