'आई, मला परत गर्भात घेऊन माझा रंग उजळ करू शकतेस का?' केरळच्या मुख्य सचिवांनी नेमकं काय म्हटलं?

सारदा मुरलीधरन

फोटो स्रोत, MUZAFAR A.V.

फोटो कॅप्शन, केरळच्या मुख्य सचिव सारदा मुरलीधरन यांनी सोशल मीडियावर काळ्या रंगाबद्दल त्यांना ऐकाव्या लागलेल्या टिप्पणीबाबत पोस्ट केलीय. या पोस्टवर सध्या मोठी चर्चा सुरू आहे.
    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

त्वचेच्या रंगावरून केल्या जाणाऱ्या भेदभावाबाबत केरळच्या मुख्य सचिव सारदा मुरलीधरन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

याबाबत त्यांनी आधी सोशल मीडियावर एक पोस्ट केली, काहीवेळाने ती डिलीट केली आणि त्यानंतर तीच पोस्ट पुन्हा एकदा रिपोस्ट केली.

मुख्य सचिव म्हणून काम करणाऱ्या एका प्रतिष्ठित महिलेला देखील अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागतो, हे वाचूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुरलीधरन यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलंय, "मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाचं मूल्यमापन करताना केलेली एक टिप्पणी माझ्या कायम लक्षात राहील. माझ्या कार्यकाळाबाबत बोलताना असं म्हटलं गेलं की, माझ्या नवऱ्याच्या गोऱ्या रंगाइतकीच माझी कारकीर्द काळी होती. हम्म्म! मला माझा काळा रंग स्वीकारण्याची गरज आहे असं वाटतं."

सारदा मुरलीधरन या 1990 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांना केरळच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार देण्यात आला. त्याआधी त्यांचे पती व्ही. वेणू हे त्या पदावर होते.

गरिबी निर्मूलन आणि महिला सशक्तीकरण, उपजीविका मिशन, ग्रामपंचायत विकास योजना, अनुसूचित जाती विकास, ग्रामीण विकास आणि उच्च शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी सारदा मुरलीधरन ओळखल्या जातात.

त्या निफ्ट म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रमुख संचालक देखील होत्या.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सारदा मुरलीधरन यांच्या वक्तव्याबाबत बोलताना ज्येष्ठ सामाजिक निरीक्षक एम. जी. राधाकृष्णन म्हणाले, "मुरलीधरन या त्यांच्या कठोर वक्तव्यांसाठी किंवा मग स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अधिकारी नाहीत. साधारणतः त्या अत्यंत मृदू भाषेत बोलतात, त्या एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जातात."

"या प्रकरणात त्यांच्या मनावर अतिशय खोल आघात झाल्याचं दिसत आहे. कुणीतरी यशाचं वर्णन करण्यासाठी 'गोऱ्या' रंगाचा आणि अपयशाचं वर्णन करण्यासाठी 'काळ्या' रंगाचा वापर केला. यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत."

सारदा मुरलीधरन यांनी नेमकं काय लिहिलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आधी केलेली पोस्ट डिलीत करून तीच पोस्ट रिपोस्ट करत मुरलीधरन यांनी लिहिलं की,

"मुख्य सचिव म्हणून माझ्या कार्यकाळाबाबत एक टिप्पणी कानावर पडली. माझा कार्यकाळ तेवढाच काळा होता जेवढा माझ्या पतीचा कार्यकाळ गोरा होता. हम्म्म! मला माझा काळा रंग स्वीकारण्याची गरज आहे."

"आज सकाळी मी ही पोस्ट लिहिली होती, पण मग त्या पोस्टवर पडलेल्या प्रतिक्रियांचा पाऊस बघून मला भीती वाटली आणि ती पोस्ट मी डिलीट केली. मी ही पोस्ट पुन्हा एकदा रिपोस्ट करत आहे कारण, काही हितचिंतकांनी मला सांगितलं की, यामुळे काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. चला तर मग यावर बोलूया."

"मला हे इथे का लिहायचं होतं? तर मी या वक्तव्यामुळे दुःखी झाले होते का? तर याचं उत्तर हो असंच आहे. पण खरंतर मागचे सात महिने नेहमी माझ्या आधी जे अधिकारी (जे त्यांचे पती देखील आहेत) होते त्यांच्याशी सतत केल्या जाणाऱ्या माझ्या तुलनेची मला सवय झाली होती."

"यावेळी वेगळं काय होतं? तर इथे माझा रंग काळा असण्यावरून टिप्पणी केली गेली (अर्थात त्यातही मी एक महिला आहे हेच त्यांना सांगायचं होतं). तुमच्या त्वचेचा रंग काळा असणं ही लज्जास्पद बाब असावी असा त्याचा सूर होता."

"काळा हा फक्त एक रंग नाहीये, तर ते जणूकाही अशुभाचं प्रतिक आहे. काळा रंग कधीच काही चांगलं करू शकत नाही. काळा रंग हा फक्त रंग नसून एका संपूर्ण वर्गाची समस्याच आहे, काळा रंग हा अनेक जुलूम आहे, काळा रंग म्हणजे अंधार आहे."

"पण काळ्या रंगाला का बदनाम केलं जात आहे? हा एकच रंग आहे ज्यात संपूर्ण ब्रह्मांडाचं सत्य सामावलेलं आहे. काळा रंग हा काहीही सोसू आणि शोषू शकतो, हा रंग मानवी संस्कृतीला ज्ञात असणाऱ्या ऊर्जेचा असीमित प्रवाह आहे."

"हा एकमेव रंग असा आहे जो प्रत्येक जागी उपयोगी ठरतो. तुमच्या ऑफिसातील ड्रेस कोड (गणवेश) असो, सांयकाळी परिधान केल्या जाणाऱ्या तुमच्या चमकणाऱ्या वेशभूषेत असो, पावसाची चाहूल असो वा डोळ्यातलं काजळ प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य वाढवणारा हा रंग आहे."

"मी चार वर्षांची होते तेव्हा मला आठवतंय की, मी माझ्या आईला विचारलं होतं. "आई तू मला परत तुझ्या गर्भात घेऊन माझा रंग उजळ करू शकतेस का? मला अधिक सुंदर बनवून पुन्हा एकदा मला जन्म देऊ शकतेस का?"

ग्राफिक कार्ड

"माझ्या 50 वर्षांच्या आयुष्यात मी याच खोट्या प्रचाराच्या दबावाखाली जगत आले की, 'तुम्ही काळे नसाल तर ती खूप चांगली गोष्ट असते.' काळा रंग हे सौंदर्याचं प्रतिक नाही, गोरा रंग अधिक आकर्षक असतो या खोट्या प्रचाराला मीही बळी पडले."

"गोरा रंग म्हणजे तल्लख बुद्धी, या जगात जे काही सर्वोत्तम आहे, संपूर्ण आहे ते सगळं गोऱ्या रंगाचंच असतं असा माझा विश्वास होता. मी गोरी नसल्याची भरपाई करण्यासाठी मला सतत काहीतरी अधिक केलं पाहिजे ही जाणीव देखील माझ्यात तयार झाली होती."

"मला मुलं होईपर्यंत माझ्या याच धारणा होत्या. मात्र, माझ्या मुलांनी त्यांच्या काळ्या रंगाच्या वारशाचा अभिमान बाळगला. ज्या रंगात मला फक्त कुरूपता दिसायची त्याच रंगात त्यांनी सौंदर्य शोधलं होतं. त्यांना माझ्याआधी असं वाटलं की, काळा रंग दिमाखदार असू शकतो. त्यांनी मला देखील हे बघायला शिकवलं की,

काळा रंग म्हणजे सौंदर्य,

काळा रंग म्हणजे दिमाख,

काळा रंग मला समजला तो तेव्हा...

ग्राफिक कार्ड

या पोस्टची चर्चा झाल्यानंतर सारदा मुरलीधरन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांच्या त्वचेच्या रंगावरून करण्यात आलेली ही टिप्पणी एका व्यंगात्मक पद्धतीने करण्यात आली होती.

त्यांनी एएनआयला सांगितलं, "काळ्या रंगाची नेमकी काय अडचण आहे? काळ्या रंगाला केवळ एक वास्तव म्हणून न बघता त्याबाबत वेगवेगळ्या धारणा तयार करण्यात आल्या आहेत. काळं असणं हेदेखील मूल्यवान आणि सुंदर असू शकतं हे स्वीकारणं गरजेचं आहे."

"मला वाटतं की, मी एक महिला आहे आणि माझा रंग काळा आहे याबाबत माझ्या मनात असणाऱ्या असुरक्षिततेला जगासमोर मांडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. मी आता या दोन्ही गोष्टी स्वीकारून अधिक सक्षमपणे जगासमोर येणं गरजेचं आहे."

"माझ्या या कृतीमुळे स्वतःच्या रंगामुळे असुरक्षितता आणि स्वतः अपूर्ण असल्याच्या भावनेचा सामना करणाऱ्या अनेकांना हे समजेल की, त्यांचं स्वतःच असं एक मूल्य आहे आणि त्यांना कुणाच्याही स्वीकृतीची गरज नाही."

मुरलीधरन यांच्या पोस्टवर कशा प्रतिक्रिया आल्या आहेत?

सारदा मुरलीधरन यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेल्या के. जयराज यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी असं काहीही पाहिलं नाही किंवा असं काही झाल्याचं माझ्या ऐकिवात देखील नाही. हा अपवाद असू शकतो. त्यांना नक्कीच काही वेगळा अनुभव आला असेल."

पण हा केवळ त्यांच्या त्वचेच्या रंगाचाच मुद्दा आहे की, त्यांच्या महिला असण्यामुळे या प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत? कारण आजही अनेकांना महिला बॉसच्या हाताखाली काम करायला आवडत नाही.

तिरुअनंतपुरममधल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये काम करणाऱ्या स्त्रीवादी संशोधक प्राध्यापक जे. देविका यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना हाच प्रश्न केला.

त्या म्हणाल्या, "दोन्ही गोष्टी असू शकतात. कारण दोन्हींसोबत वेगवेगळ्या समजुती जोडलेल्या आहेत. काळ्या रंगाच्या महिलांना कमी सक्षम मानलं जातं आणि गोऱ्या रंगाच्या माणसांना अधिक सक्षम मानलं जातं."

पण देविका हेही म्हणाल्या, "पण तुम्हाला खऱ्या अर्थाने काळ्या रंगाच्या व्यक्तींचं तेज बघायचं असेल, तर तुम्ही तिरुअनंतपुरममध्ये आंदोलनात बसलेल्या आशा वर्कर्सना बघितलं पाहिजे. कोरोनाकाळात जमिनीवर संघर्ष करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना पाहिलं पाहिजे."

"उन्हामुळे करपलेले चेहरे, धुळीने कोरडे पडलेले चेहरे, घामामुळे निथळलेले चेहरे जेव्हा सेवा करण्याच्या दृढनिश्चयाने झपाटलेले असतात, तेव्हा त्या चेहऱ्यांवरचं तेज तुम्ही बघितलंच पाहिजे. त्या चेहऱ्यावर ना कुठली लिपस्टिक असते, ना कुठला मेकअप. कसल्याही प्रकारच्या रंगभेदाने या आंदोलनाला स्पर्श देखील केलेला नाहीये."

देविका केरळमध्ये सुरू असलेल्या आशा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाबाबत सांगत होत्या.

सरकारने पगारवाढ करण्याचं आश्वासन देऊनही काहीच न केल्याने या कार्यकर्त्या आंदोलन करत असल्याचं बोललं जातंय.

सारदा मुरलीधरन

फोटो स्रोत, MUZAFAR A.V.

फोटो कॅप्शन, शशी थरूर यांनी सारदा मुरलीधरन यांचं त्यांच्या पोस्टसाठी कौतुक केलं आहे.

राधाकृष्णन यांनी देविका यांच्या मताशी ते सहमत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "रंगावरून तर भेदभाव केला जातोच, पण त्या एक महिलासुद्धा आहेत. भारतीय संस्कृतीसाठी ही अगदीच नवीन गोष्ट नाहीये. केरळ देखील यापासून दूर नाहीये."

"गोऱ्यांच्या गुलामीखाली असल्यामुळे आम्ही या रंगाला वर्चस्व आणि सामर्थ्याशी जोडूनच बघितलेलं आहे. या रंगाची प्रत्येक गोष्ट चांगलीच असते अशी आमची धारणा बनली आहे. वर्णभेद ही राष्ट्रीय समस्या आहे."

ते हेही म्हणाले, "साधारणतः एवढ्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या व्यक्ती याबाबत भाष्य करत नाहीत. तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला समजेल की अशा प्रकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक अधिकारी हे तथाकथित उच्च जातीचेच असतात."

"वंचित गटातून किंवा अल्पसंख्याक समुदायातून एखादी व्यक्ती एवढ्या उच्च पदावर पोहोचणे ही गोष्ट अजूनही दुर्मिळ आहे त्यामुळे वर्णभेदाबाबत अधिकारी जरी बोलले तरी ते खासगीतच बोलतात."

मुरलीधरन यांना ओळखणाऱ्या मोहिनीअट्टम नृत्यांगना नीना प्रसाद यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "मी त्यांना ओळखते आणि मी काही प्रमाणात अधिकृतपणे हे सांगू शकते की, त्या हे स्वतःबाबत बोलत नाहीयेत."

"भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या एका गंभीर समस्येबाबत त्यांनी भाष्य केलेलं आहे. आपण हे विसरू नये की त्यांनी वंचित घटकांमध्ये काम केलं आहे. एक महिला म्हणून त्यांच्या साधेपणा आणि प्रतिष्ठेबद्दल आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो."

तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिले, "सारदा शाब्बास, आवाज उठवल्याबद्दल अभिनंदन. सुंदर लिहिलं आहेस!"

यावर काही कारवाई होऊ शकते का?

सारदा मुरलीधरन

फोटो स्रोत, MUZAFAR A.V.

केरळमधील एका आयएएस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं, "या पोस्टमागील कारणाचा शोध घेणं आवश्यक आहे. नागरिक म्हणून किंवा नोकरशहा म्हणून त्यांचे अधिकार भंग झाले होते का? त्यांना हे स्पष्ट करावे लागेल. ही एक हानिकारक टिप्पणी होती का? हेही त्यांना सांगावं लागेल."

दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, "ही पोस्ट त्यांचं एक मत आहे असं वाटतंय. आपल्यापैकी काहींना पोस्टमध्ये केलेली तक्रार समजत नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)