पॅड, पँट की कप? मासिक पाळीसाठीचं कोणतं उत्पादन पर्यावरणपूरक आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अॅना सँटी
अमेरिकेत दरवर्षी मासिक पाळीसाठी वापरली जाणारी तब्बल 20 अब्ज डिस्पोजेबल उत्पादनं वापरून टाकली जातात. अर्थात पुन्हा वापरता येण्याजोग्य असलेल्या पर्यायांची विस्तृत श्रेणी आहे.
त्यात पॅड्स, पँट्सपासून ते मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या कपपर्यंतचा (मेन्स्ट्रुअल कप) समावेश आहे. यातील कोणती उत्पादनं, पर्याय सर्वात टिकाऊ, पर्यावरणपूरक आहेत आणि ते किती सुरक्षित आहेत, याचा अॅना सँटी यांनी शोध घेतला आहे.
काही वर्षांपूर्वी एका वीकेंडला माझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर गेले असताना, त्यातील एकीनं सांगितलं की, तिनं मासिळ पाळीसाठीच्या पॅंट्स घातल्या आहेत. एकदाच वापरून फेकायच्या पॅड आणि टॅम्पन्सऐवजी पर्यावरणपूरक उत्पादन वापरावी यासाठी त्यांनी त्या पॅंट्सचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता.
मी त्याबद्दल थोडंसं ऐकलं होतं. मात्र, त्याचा वापर करणारं कोणीही माझ्या परिचयात नव्हतं. त्याबद्दल मी नेहमीच थोडी साशंक होते. ते पुरेसा रक्तस्त्राव शोषून घेत असतील का? अशी शंका मला वाटत होती.
माझ्या मैत्रिणीनं मला त्याच्या वापराबद्दल पटवून दिलं आणि तेव्हापासून ते माझ्या पसंतीचं उत्पादन आहे.
मात्र, आज जेव्हा मी स्थानिक सुपरमार्केटमधील मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांकडे पाहते, तेव्हा तिथे उपलब्ध असलेल्या पर्यायांनी मी थक्क झाले आहे.
तिथे कितीतरी पॅड्स आणि टॅम्पन्स आहेत (त्यातील काही ऑरगॅनिक आहेत, तर बहुतांश नाहीत), तिथे अनेक प्रकारचे कप्स आहेत, तर मासिक पाळीसाठीच्या काही पॅंट्स आहेत.
मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांच्या वापरातून निर्माण होणारा कचरा
तरीही, एकट्या युरोपमध्ये दरवर्षी एकदाच वापरता येणारी मासिक पाळीसाठीची 49 अब्ज उत्पादनं वापरली जातात, तर अमेरिकेत दरवर्षी जवळपास 20 अब्ज उत्पादनं वापरली जातात. यातून तब्बल 2,40,000 टनांचा घन कचरा निर्माण होतो.
जगभरात डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स हे मासिक पाळीच्या वेळेस सर्वाधिक वापरले जाणारे उत्पादन आहे. डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्समध्ये 90 टक्क्यांपर्यंत प्लास्टिक असू शकतं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा तयार होतो आणि तो जमिनीत पुरला जातो.
हा मुद्दा लक्षात घेऊन, मासिक पाळीसाठीचं सर्वात पर्यावरणपूरक, टिकाऊ उत्पादनाच्या शोधात मी निघाले.
दर महिन्याला जगभरात 1.8 अब्ज महिलांना मासिक पाळी येते, हे लक्षात घेता, फ्रान्स आणि अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांच्या एका गटानं चार श्रेणींतील मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांच्या निर्मितीपासून ते वापरून फेकण्यापर्यंत आणि त्याचा कचरा तयार होण्यापर्यंतच्या चक्राचं मूल्यांकन केलं.
या श्रेणी म्हणजे डिस्पोजेबल नॉन-ऑरगॅनिक (बिगर सेंद्रिय) आणि ऑरगॅनिक (सेंद्रिय) पॅड्स आणि टॅम्पन्स (अॅप्लिकेटरसह); पुन्हा वापरता येणारे पॅड; मासिक पाळीसाठीचं अंतर्वस्त्र आणि मासिक पाळीसाठीचे कप.
ते मऊ, लवचिक सिलिकॉन किंवा रबरापासून बनलेले असतात. त्यात मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या रक्तस्त्रावातील 20-30 मिली (जवळपास दोन चमचे) रक्त शोषलं जाऊ शकतं.
या अभ्यासात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या आठ निदर्शकांची तुलना करण्यात आली. यात जागतिक तापमानवाढीची क्षमता, जीवाश्म संसाधनं, जमिनीचा वापर, पाण्याचा वापर, कर्करोजजन्य परिणाम, पर्यावरणाची हानी करणारे परिणाम, असिडीफिकेशन आणि युट्रोफिकेशन यांचा समावेश आहे.


पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
फ्रान्स, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये वर्षभर हा अभ्यास करण्यात आला. यात या उत्पादनांच्या निर्मितीपासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या परिणामांचा विचार करण्यात आला.
या तिन्ही देशांमध्ये आणि पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेता, मासिक पाळीच्या वेळेस वापरण्यात येणारे कप स्पष्टपणे सर्वात चांगले होते. म्हणजेच ते सर्वाधिक पर्यावरणपूरक होते.
त्यानंतर मासिक पाळीच्या वेळेस वापरायची अंतर्वस्त्रं, पुन्हा वापरता येणारे पॅड्स यांचा क्रमांक होता. सर्वात शेवटी एकदाच वापरता येणारे पॅड्स आणि टॅम्पन्सचा क्रमांक लागला.
मासिक पाळीच्या वेळेस वापरले जाणारे कप आकारानं छोटे आणि वजनानं हलके असतात तसंच ते 10 वर्षांपर्यंत टिकू शकतात.
पाण्याचा वापर वगळता, ऑरगॅनिक आणि नॉन-ऑरगॅनिक अशा दोन्ही डिस्पोजेबल पॅड्सचा सर्व आठ श्रेणींमध्ये सर्वाधिक परिणाम होता.
जागतिक तापमान वाढ किंवा हवामान बदलाची क्षमता आणि संसाधनांच्या ऱ्हासासंदर्भात नॉन-ऑरगॅनिक पॅड्सचा परिणाम सर्वाधिक होता.
मॅन्युफॅक्चरिंगमुळे जागतिक तापमानवाढ होते आणि यातील जवळपास निम्मा परिणाम पॉलीइथिलीनच्या निर्मितीतून होतो (पॉलीइथिलीन हे पेट्रोलियमवर आधारित प्लास्टिक आहे).
जागतिक तापमान वाढीची क्षमता म्हणजे दिलेल्या विशिष्ट कालावधीत उष्णता शोषून घेण्याची आणि वातावरणाचं तापमान वाढवण्याची हरितगृह वायू उत्सर्जनाची क्षमता.
मात्र या अभ्यासातून समोर आलेला एक धक्कादायक निष्कर्ष, विशेषकरून अभ्यास करणाऱ्यांसाठी, म्हणजे सर्व पाच श्रेणीतील उत्पादनांमध्ये ऑरगॅनिक कॉटन पॅड्सचा परिणाम सर्वाधिक होता.
"या उत्पादनांचे पर्यावरणावर होणारे परिणाम प्रामुख्यानं कच्चा मालाचं उत्पादन आणि सेंद्रिय उत्पादनाशी जोडलेले आहेत. त्याचे पर्यावरणावर मोठे परिणाम असू शकतात," असं मेलॅनी डुझिक म्हणतात. त्या माईन्स पॅरिस-पीएसएल विद्यापीठातील हा अभ्यास करणाऱ्या गटातील एक तज्ज्ञ आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पांरपारिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतून कमी उत्पादन मिळतं. त्याचा अर्थ पारंपारिक कापसाइतकंच सेंद्रिय कापसाचं उत्पादन करण्यासाठी अधिक पाणी आणि जमिनीची आवश्यकता आहे. याचप्रकारचे निष्कर्ष, सेंद्रिय आणि बिगर-सेंद्रिय कापसाचे टॅम्पन्सच्या बाबतीत देखील दिसून आले.
उत्पादनानुसार, त्याच्या जीवनचक्राचे वेगवेगळे टप्पे किंवा भाग कार्बन उत्सर्जनावर परिणाम करतात.
यासंदर्भात डुझिक म्हणतात, "डिस्पोजेबल उत्पादनांच्या बाबतीत, ते कच्च्या मालाचं उत्पादन आणि निर्मितीमुळे होतं. कारण यातील बऱ्याचशा उत्पादनांमध्ये प्लास्टिक असतं. त्याचा जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम होतो."
"तर पुनर्वापर करण्यायोग्य उत्पादनांच्या बाबतीत, त्यांची निर्मिती आणि वापराच्या टप्प्यांमुळे, विशेषकरून वीजेच्या आवश्यकतेमुळे जागतिक तापमानवाढीवर मोठा परिणाम होतो."
सर्व पुनर्वापर करण्यायोग्य उत्पादनं वापरताना पाणी आणि वीजेची आवश्यकता आहे. मात्र मासिक पाळीच्या वेळेस वापरायच्या पॅंट्स पुनर्वापर पॅड्सपेक्षा याबाबतीत अधिक चांगल्या असतात.
कारण एरवी दुसऱ्या प्रकारचं अंतर्वस्त्र परिधान केलं गेलं असतं आणि ते धुतलं देखील गेलं असतं.
"मासिक पाळीच्या वेळेस वापरला जाणारा कप हा जरी यात सर्वोत्तम असला तरी मासिक पाळीच्या वेळेस वापरायचं अंतर्वस्त्र हा देखील एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे पर्यावरणावरील कमी परिणाम होतात," असं डुझिक म्हणतात.
आपण त्यांची काळजी कशाप्रकारे घेतो, त्याचा देखील एकंदरित परिणामावर प्रभाव पडू शकतो. उदाहरणार्थ, वॉशिंग मशीनवर कमी तापमान सेट करून आणि मशीन पूर्ण क्षमतेनं भरलेलं असताना धुणं.
प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण
या अभ्यासात प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र अभ्यासानुसार, रॅपर्स, विंग्स आणि अठेसिव्ह (डिंक) यांच्यासह प्रत्येक पारंपारिक पॅड यामुळे साधारण 2 किलो नॉन-बायोडिग्रेडबल प्लास्टिक म्हणजे चार प्लास्टिक पिशव्यांइतक्या प्लास्टिकची पर्यावरणात भर पडते.
या प्लास्टिकचं विघटन होण्यासाठी अंदाजे 500 ते 800 वर्षांचा कालावधी लागतो. अभ्यासात असंही म्हटलं आहे की अमेरिकेत 80 टक्के पारंपारिक टॅम्पन्स आणि 20 टक्के पारंपारिक पॅड्स शौचालयात टाकले जातात. त्यामुळे गटारं तुंबतात आणि मायक्रोप्लास्टिक महासागरांमध्ये सोडलं जातं.
या अहवालापूर्वी, 2021 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानं मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची तुलना करणाऱ्या उत्पादनांच्या अनेक जीवनचक्रांचं विश्लेषण केलं होतं. यात कार्बन उत्सर्जन आणि संसाधनांचा होणारा ऱ्हास यांचाही समावेश होता.
या अभ्यासातील एक तज्ज्ञ फिलिप्पा नॉटन केप टाऊनस्थित टीजीएच थिंक स्पेस या स्वयंसेवी संस्थेच्या संचालक आहेत. ही संस्था ऊर्जा, हवामान बदल आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करते.
फिलिप्पा म्हणतात की आकडेवारीच्या अभावामुळे, मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या शेवटी त्यातील प्लास्टिकचा परिणामाची नोंद जीवनचक्राच्या मूल्यांकनात व्यवस्थित केली जात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
फिलिप्पा म्हणतात, "प्लास्टिकचं विश्लेषण असं केलं जातं की जणूकाही ते जमिनीत गाडलं जातं किंवा जाळलं जातं. त्याउलट जमिनीत गाडलं गेलेलं प्लास्टिक कार्बन उत्सर्जनाचा विचार करता प्रत्यक्षात चांगलं ठरतं."
"कारण प्लास्टिकचं विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे त्यातून होणारं कार्बन उत्सर्जन जमिनीखालीच अडकून राहतं. ते एकप्रकारे कार्बन गाडण्याचं काम करतं."
"प्रत्यक्षात, मासिक पाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनाची प्रत्येक वेळेस शिस्तबद्धपणे कचरा व्यवस्थापनाद्वारे विल्हेवाट लागत नाही. ते अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर कचरा म्हणून पडलेलं असतं."
"ते समुद्रात मायक्रोप्लास्टिकच्या स्वरुपात राहतं. तसंच प्लास्टिकच्या उत्पादनात अजूनही खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं."
अधिक पर्यावरणपूरक उत्पादन कोणतं?
यूएनईपीच्या (UNEP)अहवालात मासिक पाळीच्या वेळेस वापरला जाणारा कप (मेन्स्ट्रुअल कप) पर्यावरणाच्या बाबतीत नेहमीच मोठ्या फरकानं सरस ठरतो.
नॉटन म्हणतात, "एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत असं होणं हे खूप दुर्मिळ आहे. कपमुळे कार्बन उत्सर्जन होत नाही असं अजिबात नाही. मात्र कप हे खूपच छोटं आणि हलकं उत्पादन आहे. त्यामुळे इतर उत्पादनांच्या तुलनेत त्याचा परिणाम देखील कमी आहे."
नॉटन पुढे म्हणतात, "या अभ्यासांमध्ये आपण नेहमीच 'ब्रेक इव्हन पॉईंट्स'बद्दल बोलतो. एकदाच वापरायोग्य उत्पादनाच्या तुलनेत, उत्पादन आणि त्याच्या वापराच्या टप्प्यांमध्ये होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाची भरपाई होण्यापूर्वी तुम्हाला पुनर्वापरायोग्य उत्पादन किती वेळा वापरावं लागतं?"
"अनेक उत्पादनांच्या बाबतीत त्याचं प्रमाण बऱ्याचवेळा खूप जास्त असतं, म्हणजे 100 पट असतं. मेन्स्ट्रुअल कपच्या कार्बन उत्सर्जनाचा ब्रेक इव्हन होण्यापूर्वी त्याचा वापर तुम्ही फक्त एक महिना करू शकता."
दोन्ही अभ्यासातून संदर्भाचं महत्त्व समोर येतं आणि अधोरेखित होतं की हरितगृह वायू उत्सर्जन हा उत्पादनं आणि उत्पादन प्रक्रियेमुळे होणाऱ्या अनेक परिणामांपैकी एक आहे.
"आपण काहीही केलं तरी त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार आहे. मात्र हा परिणाम शक्य तितका कमी असावा हा त्यामागचा विचार आहे," असं पॉला पेरेझ-लोपेझ म्हणाल्या. त्या फ्रान्स आणि अमेरिकेत झालेल्या अभ्यास गटातील एक तज्ज्ञ आहेत. तसंच त्या माईन्स पॅरिस-पीएसएल विद्यापीठात संशोधक आहेत.
मासिक पाळीसाठीची उत्पादनं आणि महिलांच्या समस्या
उत्पादनांच्या जीवनचक्राच्या मूल्यांकनात असं म्हटलं आहे की महिला उत्पादनाचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांपलीकडे, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोन आणि पायाभूत सुविधांचा विचार करतात.
पेरेझ-लोपेझ म्हणतात, "हा मुद्दा पर्यावरणासंदर्भातील मूल्यांकन करण्याच्या आमच्या कौशल्य क्षेत्राबाहेरचा होता. मात्र आफ्रिकेतील काही देशांमध्ये, पुनर्वापर करता येणारी उत्पादनं विशेषकरून मेन्स्ट्रुअल कपमुळे काही मुलींच्या बाबतीत शाळेत जाणं किंवा शाळेत न जाणं असा फरक पडू शकतो."
"कारण या मुलींकडे मासिक पाळीच्या वेळेस वापरायच्या उत्पादनं उपलब्ध नाहीत. अर्थात, उपलब्धतेची समस्या सर्वच प्रकारच्या उत्पादनांच्या बाबतीत लागू होते. मात्र मेन्स्ट्रुअल कप मिळणं खूप सोपं ठरू शकतं कारण हे एक छोटं उत्पादन आहे आणि ते बराच काळ टिकतं."
मात्र अलीकडच्या अहवालांमध्ये खराब प्रकारे फिटिंग असलेल्या, चुकीच्या आकाराच्या मेन्स्ट्रुअल कपमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल इशारा देण्यात आला आहे.
यातून महिलांना मूत्रपिंडाचे तात्पुरत्या स्वरुपाचे आजार होत आहेत आणि काही महिलांना पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्ससारख्या समस्या उद्भवत आहेत.
शाझिया मलिक लंडनमधील पोर्टलँड हॉस्पिटलमध्ये ऑबस्टेट्रिशियन (गर्भधारणा आणि प्रसूती तज्ज्ञ) आणि गायनेकोलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) आहेत.
मेन्स्ट्रुअल कपचा वापर कसा करावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी हे जोपर्यंत किशोरवयीन मुलींना काळजीपूर्वक शिकवलं जात नाही तोपर्यंत त्यांना या कपच्या वापराची शिफारस करण्यास शाझिया नाखूष आहेत.
शाझिया म्हणतात, "गेल्या आठ वर्षांमध्ये, मी मेन्स्ट्रुअल कप वापरणाऱ्या महिला आणि किशोरवयीन मुलींना संसर्ग होताना पाहिलं आहे. जर तुम्ही कप योग्यप्रकारे बसवला नाही तर त्यामुळे मूत्राशय किंवा गुदाशय दाबलं जाऊ शकतं आणि त्यामुळे मासिक पाळीचं रक्त योग्यप्रकारे त्या कपात गोळा होणार नाही."
अनेक वर्षे एकच मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासंदर्भातील धोक्यांबद्दल देखील शाझिया मलिक इशारा देतात. एकाचवेळी दोन कप वापरात असावेत, प्रत्येक कपचा वापर झाल्यानंतर त्याचं निर्जंतुकीकरण करावं. ते दररोज सकाळी आणि रात्री करावं. जर त्या कपची झीज झाली तर तो लगेचच बदलावा, असा सल्ला त्या देतात.
शाझिया मलिक म्हणतात, "मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या रक्तस्त्रावानुसार आणि तुमची प्रसूती योनीमार्गाद्वारे झाली आहे की नाही यानुसार योग्य आकाराचा मेन्स्ट्रुअल कप निवडण्याबाबत अधिक जागरुकतेची आवश्यकता आहे."
"जर जागरुकता वाढवली, त्याचं शिक्षण दिलं तर मेन्स्ट्रुअल कप हे मासिक पाळीच्या वेळेस वापरण्याचं उत्तम उत्पादन आहे."

उत्पादनांची गुणवत्ता, नवीन मानकं आणि महिलांचं आरोग्य
वीमेन्स एनव्हायरमेंटल नेटवर्क (WEN) ही युकेमधील स्वयंसेवी संस्था आहे.
ही संस्था मासिक पाळीच्या उत्पादनांचा वापर करण्यासंदर्भातील दारिद्र्य, पर्यावरणाशी संबंधित कचरा आणि मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये आढळणाऱ्या विषारी रसायनांचा सामना करण्यासाठी मासिक पाळीच्या वेळचं आरोग्य, प्रतिष्ठा आणि पर्यावरणपूरकता कायद्याची (Menstrual Health, Dignity and Sustainability Act) मागणी करते आहे.
वीमेन्स एनव्हायरमेंटल नेटवर्कनं (WEN)यासंदर्भात कॅटालोनियाच्या स्पॅनिश प्रदेशातील नव्या धोरणाचं उदाहरण दिलं आहे. मार्च 2024 पासून कॅटालोनियातील सर्व महिलांना मासिक पाळीसाठीची पुनर्वापर करण्यायोग्य उत्पादनं मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या नेटवर्कच्या चिंतेचा एक विषय अमेरिकेतील एक अभ्यास आहे. या अभ्यासात टॅम्पन्समध्ये शिशासह 16 प्रकारचे धातू आढळले.
तसंच विच? (Which?)या युकेतील मासिकाच्या एका अहवालात, मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या पॅंट्समध्ये "चांदीचं अनावश्यक उच्च प्रमाण" आढळलं. गंध आणि स्वच्छतेसंदर्भातील समस्यांना तोंड देण्यासाठी अॅंटिमायक्रोबियल एजन्ट म्हणून त्याचा वापर या उत्पादनात केला जातो.
हेलेन लिन या मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या वीमेन्स एनव्हायरमेंटल नेटवर्कमधील मोहिमेच्या व्यवस्थापक आहेत.
त्या म्हणतात की, नियमनापेक्षा नाविन्यपूर्ण बदल अधिक वेगानं होत असताना, अशा प्रकारची रसायनं मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी घातक आहेत.
हेलेन लिन म्हणतात, "या उत्पादनांच्या जीवनचक्राचं मूल्यांकन हा एक रंजक अभ्यास आहे. मात्र त्यात मासिक पाळीसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमधील रसायन अवशेष आणि डिंक या घटकांचा विचार करण्यात आलेला नाही. कारण यासंदर्भातील माहिती उघड करणं कंपन्यांसाठी बंधनकारक नाही."
"त्यामुळे या प्रकारच्या अभ्यासांमध्ये, संशोधक फक्त उत्पादकांनी माहिती दिलेल्या मुख्य सामग्रीवरच लक्ष केंद्रित करू शकतात. पारदर्शकतेचा अभाव म्हणजे या उत्पादनांमध्ये काय आहे याची लोकांना माहिती नसते. लोक त्याचा वापर शरीराच्या अतिशय शोषक अवयवाजवळ करतात."
यासंदर्भात थोडी कायदेशीर प्रगती होते आहे. यात युरोप आघाडीवर आहे. सप्टेंबर 2023 मध्ये युरोपियन कमिशननं, शोषून घेणाऱ्या स्वच्छता उत्पादनांच्या आणि पुनर्वापर करण्यायोग्य मेन्स्ट्रुअल कपच्या संदर्भात एक नवीन EU इकोलेबल मानक स्थापित केलं.
हे मानक जी उत्पादनं त्यांच्या जीवनचक्रात पर्यावरणाशी संबंधित परिणामांच्या मर्यादेची पूर्तता करतात त्यांना दिला जातो.
नॉर्डिक देशांमध्ये, सध्या नॉर्डिक स्वॅन इकोलेबलच्या सॅनिटरी उत्पादनांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी सल्लामसलत सुरू आहे.
नॉर्डिक स्वॅन इकोलेबलमध्ये, संसाधनांची कार्यक्षमता, पर्यावरणावरील कमी परिणाम, बिगर- विषारी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि जैवविविधतेचं संवर्धन या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
2024 मध्ये, मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांमध्ये "कायमस्वरुपी रसायनं" असलेल्या पीएफएवर बंदी घालण्यासाठी नवीन कायदा स्वीकारणारं व्हरमॉंट हे पहिलं अमेरिकन राज्य बनलं.
तर न्यूयॉर्कच्या कॉंग्रेसवुमन ग्रेस मेंग यांच्या नेतृत्वाखालील एका विधेयकात नॅशनल इन्स्टिट्युट्स ऑफ हेल्थ (NIH)नं मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांच्या रचनेचा अभ्यास करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मारिना गर्नर न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत आणि 'द व्हजायना बिझनेस' या पुस्तकाच्या लेखिका आहेत.
त्या युरोपियन युनियनच्या इकोलेबलच्या समतुल्य अमेरिकन मानकाचं स्वागत करतील. मात्र त्या यासंदर्भात एका जागतिक उपक्रमाची मागणी करत आहेत.
मारिना गर्नर म्हणतात, "कंपन्यांनी मासिक पाळीसाठीच्या त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेल्या सामग्रीची माहिती उघड केली पाहिजे आणि त्यातील विषारी घटकांवर नियामक संस्थांनी बंदी घालण्याची आवश्यकता आहे."
"मात्र ही गोष्ट अद्याप झालेली नाही कारण, ऐतिहासिकदृष्ट्या महिलांच्या आरोग्यावर कमी संशोधन झालं आहे आणि त्याला कमी निधी पुरवण्यात आला आहे. मॉडर्न टॅम्पनचा शोध 1931 मध्ये लागला आणि टॅम्पनमधील विविध धातूंच्या पातळीवरील पहिला अभ्यास गेल्या वर्षीच प्रकाशित झाला."
मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांची किंमत, महिलांची सोय आणि पर्यावरण
अनेक वर्षांपूर्वी, मी बहुतांश वेळा मासिक पाळीसाठीच्या पॅंट्स वापरण्यास सुरुवात केली होती. त्या दोन ते तीन वर्षे टिकतात. त्याच्या तीन जोड्यांची किंमत जवळपास 45 पौंड (56.7 डॉलर) असते. 10 पॅडचा एक पॅक जवळपास 2.75 पौंड (3.48 डॉलर) ला येतो.
दर महिन्याला दोन पॅक वापरल्यास तेवढ्याच कालावधीसाठी मला पॅडवर 200 पौंडांपर्यंत (252.7 डॉलर) खर्च करावे लागले असते. तर एका मेन्स्ट्रुअल कपसाठी जवळपास 20 पौंड (25.2 डॉलर) खर्च येतो.
ज्या लोकांना टॅम्पन वापरणं सोयीचं वाटतं त्यांच्यासाठी ते वापरणं तुलनेनं सोपं आहे. मात्र घराबाहेर असताना किंवा सार्वजनिक शौचालयात असताना ते काढणं, साफ करणं आणि पुन्हा घालणं कमी सुलभ ठरू शकतं.
नियमित पोहणारी व्यक्ती, म्हणून मी पुढील काळात मासिक पाळीसाठीचं स्विमवेअर वापरण्याचा विचार करते आहे. अर्थात लीक होण्याच्या शक्यतेमुळे मला चिंता वाटते (जे लोक त्याचा वापर करतात त्यांनी ते लीक होत नसल्याची खात्री मला दिली आहे).
मासिक पाळीच्या वेळेस वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या जीवनचक्राच्या मूल्यांकनात डिस्पोजेबल सेंद्रिय उत्पादनं पर्यावरणासाठी सर्वात वाईट असल्याचं म्हटलं आहे.
मात्र ज्या वेळेस मासिक पाळीसाठीच्या पॅंट्स सोयीच्या नसतात, तेव्हा मी डिस्पोजेबल, सेंद्रिय कापूस, प्लास्टिक-मुक्त आणि कंपोस्टेबल ब्रॅंडचा वापर करते.
ते उत्पादन तुम्ही तुमच्या अन्नपदार्थांच्या कचराकुंडीत टाकू शकता (ते सुपरमार्केट आणि हेल्थ स्टोअरवर सहज उपलब्ध असतं).
पेरेस-लोपेझ म्हणतात की अभ्यासात उत्पादनाच्या जीवनचक्राच्या शेवटी कंपोस्टिंगचं मॉडेलिंग करण्यात आलं नव्हतं. "यासंदर्भात पुढील अभ्यास होण्याची आवश्यकता आहे."
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अधिक चांगले पर्याय निवडताना, मेन्स्ट्रुअल कपसारखा तुलनेनं फायदेशीर पर्याय मिळणं दुर्मिळ आहे. मात्र मला वाटतं की जे लोक मासिक पाळीसाठीच्या उत्पादनांची निवड करण्याच्या स्थितीत आहेत, ते विविध पर्यायांना प्राधान्य देतील.
पेरेस-लोपेझ म्हणतात, "हा एक उत्तम उपाय आहे. शक्य असेल तेव्हा पुनर्वापर करण्यायोग्य उत्पादन निवडा."
पेरेस-लोपेझ पुढे म्हणतात, "मात्र जर तुमच्या संपूर्ण चक्रासाठी एखादं विशिष्ट प्रकारचं उत्पादन वापरणं तुम्हाला सोयीचं वाटत नसेल किंवा जर एखाद्या विशिष्ट कारणास्तव तुम्ही पुनर्वापर करण्यायोग्य उत्पादन वापरू शकत नसाल, तर तुम्ही अनेक उत्पादनांचा एकत्रितपणे वापर करू शकता. त्यातून सुद्धा तुम्ही बदल घडवू शकाल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












