कमलताई गवईंनी थेट लेटरहेडवरच लिहून RSS च्या कार्यक्रमाबाबत स्पष्ट केलं; काय म्हणाल्या त्या?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, नागपूर
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, अमरावतीहून
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांनी स्वीकारल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली होती. या कार्यक्रमाला कमलताई गवई या उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे विजयादशमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं अमरावतीत होणाऱ्या संघाच्या विजयादशमी उत्सवावरून वाद निर्माण झाला होता.
कमलताई गवई यांच्या नावाने हस्तलिखितात एक पत्र देखील व्हायरल झाले होते आणि ते पत्र त्यांचे नसल्याचे कमलताई यांचे चिरंजीव राजेंद्र गवई यांनी स्पष्ट देखील केले होते. त्या पत्रावर आपल्याला काही बोलायचे नाही असे कमलताई यांनी स्पष्ट केले.
आपण कोणत्याही व्यासपीठावर गेलो तरी देखील आंबेडकरी विचारच मांडणार आणि विपश्यनेबद्दलच बोलणार, ही माझी भूमिका आहे. विरोधी विचार असला तरी त्या व्यासपीठावर जायचेच नाही अशी माझी देखील भूमिका नाही किंवा तशी भूमिका दादासाहेब गवईंची देखील नव्हती, ते संघाच्या कार्यक्रमाला गेले होते पण त्यांनी हिंदुत्वाचा स्वीकार केला नव्हता, असे कमलताई गवईंनी म्हटले आहे.
कमलताईंचे पत्र
व्हायरल झालेले पत्र आमच्या कुटुंबाशी स्नेह असलेल्या समाजबांधवानेच लिहिलेले असावे. त्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही, असे कमलताईंनी म्हटले.
5 ऑक्टोबरला होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी माझ्या ओळखीतील काही लोक आले होते. आमच्या सर्वांप्रती मंगलभावना व मंगलकामना असतात. त्यामुळे आम्ही सर्वांचे स्वागतच करतो. आमचा बंधूभाव व मैत्रीभाव सर्वांप्रती आहे, असे कमलताईंनी आपल्या पत्रात म्हटले.
पुढे त्या म्हणतात, या कार्यक्रमाचे वृत्त प्रसारित झाल्यावर केवळ माझ्यावरच नाही तर स्मृतिशेष दादासाहेब गवईंवर केवळ टीकाच नाही तर दोषारोपण झाले. आम्ही पण आंबेडकरी विचारालाच वाहून घेतले आहे. दादासाहेब गवई यांचे जीवन तर आंबेडकरी चळवळीलाच समर्पित होते. दुसऱ्या विचारधारेच्या मंचावरही आपले विचार मांडणे गरजेचे असते. त्यासाठी धाडस लागतं, सिंहाचं काळीज लागतं. दादासाहेब जाणून बुजून अशा विरोधी विचारधारेच्या मंचावर जायचे, तिथे वंचितांचे प्रश्न मांडायचे. तो त्यांच्या धोरणाचा भाग होता.
ते संघाचे कार्यक्रमात गेले पण त्यांनी हिंदुत्व कधी स्वीकारले नाही. त्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यावरच भाषण केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानिक विचारांची मांडणी केली असे कमलताईंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कमलताईंनी पुढे म्हटले की जरी मी या कार्यक्रमाला गेले असते तर डॉ. आंबेडकरांचा विचार आणि विपश्यनेबद्दलच सांगितले असते. या वादामुळे आपण व्यथित झालो असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
शेवटी कमलताई म्हणतात, "माझे वय 84 वर्षं आहे आणि माझी प्रकृती बरी नसल्याने मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे.
"कुठेतरी थांबले पाहिजे या कारणाने 05 ऑक्टोबरच्या कार्यक्रमला जाणार नाही एवढे खरे !"..
अमरावतीत 5 ऑक्टोबरला संघाचा कार्यक्रम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील पत्रिका सुद्धा वाटण्यात आल्या आहेत. यामध्ये दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. कमलताई गवई या प्रमुख पाहुण्या असल्याचे पत्रिकेत म्हटलं होतं.
आता त्या या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीये.

नवी दिल्लीतील संघाचे अखिल भारतीय संयोजक नंदकुमारजी देखील पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
2 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्यासाठी हेडगेवार स्मारक समिती इथं कार्यक्रमाची तयारी सुद्धा करण्यात आली आहे.

2 ऑक्टोबरला आरएसएसच्या नागपूर मुख्यालयात कार्यक्रम होतोय. त्यामुळे अमरावतीमध्ये 5 ऑक्टोबरला हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. नरसम्मा महाविद्यालय मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
त्या व्हायरल पत्रात काय म्हटलंय?
आरएसएसच्या पत्रिकेनंतर कमलताई गवई आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्यानंतर त्यांच्या नावाने एक पत्र व्हायरल करण्यात आलं. यामध्ये या बातम्या धांदात खोट्या असून कमलताई या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. "आंबेडकरी विचारानं ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझं घराणं प्रामाणिक आहे. त्यामुळे आपण उपस्थित राहणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही,"
"विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोका विजयादशमी महत्वाची आहे. मला विश्वासात न घेता किंवा माझ्याकडून लेखी होकार न घेता आरएसएसने हे षडयंत्र रचले आहे. हे निमंत्रण मी स्विकृत करत नाही."
असं व्हायरल झालेल्या पत्रात म्हटले आहे. पण ते पत्र खोटे असल्याचे त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई यांनी सांगितले.
'ते पत्र आईंचे नाही'- राजेंद्र गवई
या व्हायरल पत्रानंतर आम्ही कमलताई गवई यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा फोन बंद येत आहे.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून हे व्हायरल झालेलं पत्र कमलताई यांचं नाही, असं त्यांनी म्हटलंय.

राजेंद्र गवई म्हणाले, "संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आईला आलेलं आहे आणि आईनं ते स्वीकारलं आहे. याआधी दादासाहेब गवई सुद्धा संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे. तसंही गवई कुटुंबाचे पक्षाच्या पलीकडे संबंध आहेत."
"अटलबिहारी वाजपेयी आणि गवईसाहेबांचे चांगले संबंध होते. पण, त्यांना पंतप्रधान होण्यासाठी मत पाहिजे होतं ते मत गवई साहेबांनी दिलं नव्हतं. एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलं की आपली विचारधारा बदलते असा अर्थ होत नाही. एकमेकाच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे," असंही गवई यांनी पुढे म्हटले.
आईसाहेबांनी अजून निर्णय घेतलेला नाही. पण, आईसाहेबांच्या मागे मी मुलगा म्हणून खंबीरपणे उभा राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यानंतर आम्ही या प्रकरणाबद्दल संघाच्या काही लोकांसोबत बोललो.
संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे म्हणाले, "कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं आहे आणि त्या या कार्यक्रमाला शंभर टक्के येणार आहेत. ते पत्र खोटं आहे हे सुद्धा समोर आले आहे. पत्र कोणी व्हायरल केलं, का केलं या गोष्टी वेगळ्या आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











