शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचा 'अंतिम निर्णय' किती काळ लांबवू शकतील?

फोटो स्रोत, ANI
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असतांना सोमवारी (24 जुलै) विधिमंडळाच्या लॉबीमधले काही फोटो समाजमाध्यमांवर खूप व्हायरल झाले. ते फोटो एकमेकांना दिलेल्या अलिंगनाचे होते, मैत्रीचे होते, खेळीमेळीच्या भावनेचे होते, आनंदाचे होते, अगदी नैसर्गिक भावमुद्रांचे होते, सगळं काही आलबेल आहे असं सांगणारे होते.
फोटो पाहणारी प्रत्येक व्यक्ती सांगेल की त्यात कोणताही तणाव नव्हता, राग नव्हता, त्रागा नव्हता, नाराजी नव्हती.
हे फोटो राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन 'विद्यमान' प्रदेशाध्यक्षांचे होते. एक होते जयंत पाटील आणि दुसरे होते सुनील तटकरे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यावर मूळ पक्ष आपलाच आहे असं सांगणा-या दोन विरोधी गटांमधले हे प्रदेशाध्यक्ष. जयंत पाटील हे शरद पवारांच्या गटाचे, ज्यांनी तटकरेंचं निलंबन केलं आहे. तर सुनील तटकरे हे अजित पवारांच्या गटाचे, ज्यांनी जयंत पाटील यांना पदावरुन दूर केलं आहे.
पक्ष फुटल्यानंतर विरोधी गटांमध्ये गेलेल्यांच्या परस्परांबद्दलच्या भावना किंवा व्यवहार कसे असतील याबद्दल सर्वसाधारणपणे काही कल्पना असतात. जरी त्या अगदी शिवसेनेसारख्या 'गद्दारी'च्या भाषेपर्यंत प्रत्येक पक्षाच्या जातील अशी शक्यता नसली तरीही, जणू काही घडलंच नाही असंही असू शकणार नाही.
मग तरीही हे मैत्र काय सांगतं? हे काय 'राजकारण' आहे? 'राष्ट्रवादी' मध्ये नेमकं काय 'शिजतंय'?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
हे फोटो आणि त्यावरुन पक्षातील विरोधी राजकीय भूमिकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यावर जयंत पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
"आमचे व्यक्तिगत संबंध असू शकतात. त्याचे राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही," असं त्यांनी म्हटलं.
पण अशा खुलाशांनी आपोआप सगळं पुसलं जाईल असं नाही. किंबहुना, 2 जुलैला अजित पवारांचा सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यावर, गेल्या काही दिवसांतल्या घडामोडींवरुन एकूणच राष्ट्रवादीच्या बंडाबद्दल, त्याच्या खरे-खोटेपणाबद्दल, अजित पवार-शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल, आमदार-खासदारांच्या एका बाजूला असण्याबद्दल, पक्षाच्या भविष्याबद्दल सगळ्यांच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
त्या संभ्रमाला दूर केलं जाईल असं स्पष्ट उत्तर मिळालं नाही आहे. पठडीतले खुलासे केले गेले आहेत, पण त्यानं संभ्रम दूर होत नाही. प्रश्न केवळ या फोटोचा नाही. त्याअगोदरही एकामागोमाग एक कृती अशा झाल्या आहेत की त्यातून प्रश्नच अधिक निर्माण झाले.
अजित पवारांनी निवडणूक आयोगात सांगितलं की, आता ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, पण मग सगळ्या मंत्र्यांना आणि आमदारांना घेऊन ते शरद पवारांना सलग दोन दिवस भेटले. आपला फोटोही बंडखोरांनी वापरु नये असं सांगितल्यानंतर शरद पवारही या विरुद्ध भूमिका घेणा-या आमदार-खासदार आणि नेत्यांना भेटले, बोलले.
पक्ष फुटल्यावर एकमेकांविरुद्ध आक्रमक भाषा वापरणारे दोन्ही गट, काहीच दिवसांमध्ये एकमेकांबद्दल फारसे बोलेनासे अथवा मवाळ झाले. शरद पवारांनी छगन भुजबळांच्या येवल्यामध्ये पहिली सभा घेतली,
मात्र, त्यानंतर बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा जाहीर केलेला कार्यक्रम पावसाचं कारण देऊन रद्द केला. दौरेही झाले नाहीत. ब-याच काळात स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषदही घेतली नाही आहे.
विरोधकांची दोन दिवसांची दुसरी बैठक जेव्हा बंगळुरूला झाली तेव्हा शरद पवार पहिल्या दिवशी गेले नाहीत. फक्त दुस-या दिवशी गेले. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही ते बोलले नाहीत. पाटण्याला त्यांच्या सोबत असणा-या सुप्रिया सुळे बंगळुरुमध्ये मात्र दिसल्या नाहीत.
इकडे, अजित पवार 'एनडीए'च्या बैठकीसाठी दिल्लीला गेले. म्हणजे राष्ट्रवादी सत्ताधा-यांच्या बैठकीलाही होती आणि विरोधकांच्याही.

फोटो स्रोत, Getty Images
बंड झाल्यावर पहिल्या काही दिवसांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर पक्षांतर्गत कारवाया केल्या गेल्या. शिवाय पक्षांतरबंदी कायद्यानुसार विधानसभा अध्यक्षांकडे काही याचिकाही करण्यात आल्या.
निवडणूक आयोगातही जावं लागलं. पण त्यानंतर सगळी ही कायदेशीर नियमलढाई थंड आहे. त्यावर पुढे काहीच झालं नाही आणि ना कोणी आग्रही आहे. शिवाय, शिवसेनेसारखा 'राष्ट्रवादी'तला कोणताही गट हे प्रकरण न्यायालयापर्यंत नेण्याच्या प्रयत्नातही दिसत नाही.
आज बंडाला जवळपास महिना होत आला तरीही नेमके दोन्ही गटांकडे नेमके किती आमदार आहेत याचा आकडा कोणालाही माहित नाही, ना कोणी तो स्पष्ट सांगते आहे.
काही आमदारांनी भूमिका जाहीर केली आहे, तर काही दोन्हीकडे दिसले आहेत. काही अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे बरेचसे आमदार अधिवेशनाला येण्याचंही टाळत आहेत.

फोटो स्रोत, ANI
पण दुसरीकडे राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांना, जे अजित पवारांसोबत गेले नाही आहे त्यांनाही, चालू अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मोठा फंड देण्यात आला आहे. त्यातला सगळ्यात जास्त हा जयंत पाटील यांच्या मतदारसंघात देण्यात आला आहे अशी चर्चा आहे.
त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहता, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अद्याप संदिग्धता आहे आणि अंतिम निर्णय अजूनही व्हायचा आहे असंच दिसतं आहे.
अजित पवारांनी त्यांचा निर्णय घेतला आहे आणि ते नऊ सहका-यांसह जाऊन भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. शिवाय त्यांनी पक्षावरही दावा सांगितला आहे. शरद पवारांनी 'आपण भाजपासोबत जाणार नाही' अशी भूमिका जाहीर केली आहे.
पण तरीही पक्षाच्या भविष्याबद्दल जी एक तणावपूर्ण शांतता आहे, वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रश्न निर्माण करणा-या ज्या झालेला अथवा न झालेल्या कृती आहेत आणि अनेक घडू शकण-या शक्यता ज्या राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत, त्या पाहता असं चित्र आहे की अजूनही राष्ट्रवादीचा अंतिम निर्णय व्हायचा आहे. अर्थात पक्षाच्या केंद्रस्थानी शरद पवारच असल्यानं त्यांच्या चालींवर सगळ्यांचं लक्ष आहे.
अजूनही शरद पवारांना मनवण्याचा प्रयत्न?
राष्ट्रवादी आणि भाजप, दोघांच्याही वर्तुळातुन असं समजतं आहे की शरद पवार यांना मनवण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार त्यांच्यासोबत असलेल्या मंत्री आणि आमदारांसहित दोनदा शरद पवारांना भेटायला गेले.
सगळ्यांनी पवार यांना भाजपासोबत पक्षानं जावं अशी गळ घातली. पवार यांनी त्यावर काहीही उत्तर दिलं नाही असं पक्षातर्फे आजवर सांगण्यात आलंय.
या सुरु असलेल्या चर्चांचाच एक भाग म्हणून दोन्ही गटातर्फे कोणीही समोरच्या बाजूवर टीका करत नाही आहे. पक्ष एकसंध रहावा असं आम्हाला वाटतं असं अजित पवार गटातर्फे सांगण्यात आलं. याचा अर्थ सध्या एकच होतो, तो म्हणजे पक्षानं भाजपासोबत जाणं. त्याचा दुसरा मार्ग म्हणजे अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडणं. पण ते सध्या शक्यतेच्या कक्षेत दिसत नाही.
शरद पवारांसह 'राष्ट्रवादी' पक्षाला भाजपासोबत युतीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रानं 'राष्ट्रवादी कॉंग्रेस' मधल्या काही वरिष्ठ सूत्रांच्या आधारानं बातमी दिली आहे की 'एकसंध' राष्ट्रवादीला सोबत आणण्यासाठीच्या फॉर्म्युल्यावर काम चालू आहे.
पक्षांतर्गत शरद पवारांच्या बाजूला असलेली कमी ताकद, अजित पवारांचं संख्याबळ आणि वयाचा विचार करता आजच्या घडीला अजित पवारांसोबत संघर्षाचं फलित काय या विचारातून नवी तडजोड होऊ शकते असं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ANI
या बातमीनुसार, केंद्रात मध्ये राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळतील ज्यात सुप्रिया सुळेंचा समावेश असेल, राज्याच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांना घेतलं जाईल आणि ते प्रदेशाध्यक्षपदीही कायम राहतील. शिवाय असंही म्हटलं गेलं आहे की शरद पवारांची सहमती मिळवण्यासाठी अजित पवारांना मुख्यमंत्रिपद भाजपाला द्यावं लागेल.
शरद पवारांचं बंगळुरूला एकच दिवस जाणं आणि सुप्रियांनी तिथे जाणं टाळणं हे या फॉर्म्युलासाठीचा सिग्नल होता असंही त्यात म्हटलं आहे.
अर्थात, या पडद्यामागे चालू असलेल्या या घडामोडींबद्दल राष्ट्रवादीनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
दुसरीकडे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी '2024 च्या निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील आणि अजित पवारांना त्याच्या कल्पना आहे' असं स्पष्ट म्हटलं आहे.
"सध्याच्या राजकीय स्थिती नेमका आघार अजून घ्यायची आहे. ती फ्लुईड आहे. त्यामुळे सगळेच अंदाज घेत आहेत. या रचना म्हणजे एका प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट असतं. या बाजूनं काही द्यायचं आणि त्या बाजूनं घ्यायचं. त्यामुळे जोपर्यंत जे हवं आहे ते मिळत नाही तोपर्यंत ही ओढाताण सुरु राहील. त्याची चर्चा पडद्यामागे चालू आहे. ती पूर्णत्वास जात नाही आहे. त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रिपदाबद्दल विधान अथवा शरद पवारांचं संसदेत विरोधकांच्या बैठकीला जाणं हे पहावं लागेल," असं राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात.
पण हेही स्पष्ट आहे की सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार आणि नेते अनुकूल आहेत. मग शरद पवार त्यांची भूमिका बदलतील का?
"शरद पवारांना पक्षात असं होईल याची कल्पना होती. पण एवढे सगळे पलिकडच्या बाजूला जातील असं वाटलं नव्हतं. तो एक धक्काच आहे. त्यामुळे या स्थितीत या लोकांचं मान्य करण्याचा पूर्वी कधीही नव्हता एवढा दबाव त्यांच्यावर आहे असं दिसतंय," असं पवारांचं राजकारण जवळून बघितलेल्या कॉंग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं.
डेडलाईन
आपले सगळे पत्ते पूर्णपणे न दाखवता राखून ठेवत, संदिग्धता आणि संभ्रम ठेवून चाली रचणं हे पवारांच्या राजकारणाचं वैशिष्ट राहिलं आहे. त्यानं प्रतिस्पर्धीही द्विधा मनस्थितीत राहतो. पण त्यासाठी पक्षाच्या दाव्याची लढाई शिवसेनेसारखी न लढणं, 'राष्ट्रवादी'चे नेते एकाच वेळेस सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाड्यांमध्ये सहभागी होणं यामुळे तयार झालेला संभ्रम सध्याच्या परिस्थितीत कायम ठेवला तर उपयोग होऊ शकेल?
काही राजकीय निरिक्षकांच्या मते सध्या स्थिती अशीच ठेवून, टोकाची कोणतीच भूमिका न घेता, काय घडतंय हे पाहत राहणं आणि निवडणूक जवळ येईल तसा एकून रागरंग पाहून बाजू ठरवली जाईल. पण तोपर्यंत दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचं राजकारण चालू राहू शकेल का?
पवारांचं राजकारण जरी लवचिक आणि बेरजेचं असलं तरीही आज अशी संदिग्धता कायम ठेवणं अवघड असेल. एक कारण म्हणजे मित्रपक्षांचा विश्वास.
कॉंग्रेसप्रणित 'इंडिया' मधले मित्रपक्ष सध्या शरद पवारांच्या बाजूनं उभे असले तरीही पक्ष नेमका कुणाकडे आहे याचं उत्तर त्यांनाही हवं असणार.
भाजपाही अजित पवारांकडून किती काळ संदिग्धता सहन करु शकेल. पक्षात दोन गट आहेत पण तरीही सगळे हातात हात घालून आहेत, सत्तेतही आहेत आणि विरोधातही आहेत, ही रचना दोन्हीकडचे मित्रपक्ष समजून घेतील का? घेतलंच तर चालू देतील का? हा प्रश्न विश्वासाचा आहे.
नव्या राजकीय आघाड्यांसाठी वेळेची डेडलाईन आहे. वर्षभरापेक्षा कमी अंतरावर लोकसभेच्या निवडणुका आल्यानं जागावाटप, उमेदवार निवड हे त्यांना करावं लागणार आहे. महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी'चं प्राथमिक जागावाटप आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विस्कटलं गेलं आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'चा अंतिम निर्णय लवकरात लवकर होणं हे त्यांच्यासाठी आवश्यक असेल.

फोटो स्रोत, ANI
जरी त्यातूनही असाच 'स्टेटस को' कायम राखला तरीही जी कोणती पुढची निवडणूक येईल तेव्हा शरद पवार आणि 'राष्ट्रवादी'ला निर्णय घ्यावाच लागेल की पक्ष एकसंध आहे की वेगवेगळा आहे. कारण तेव्हा पक्षाचे 'एबी फॉर्म' आणि चिन्ह याचा प्रश्न निर्माण होईल. कोणासाठी अधिकृत आणि कोणासाठी अनधिकृत.
महाराष्ट्रात आता एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील, नाही तर थेट लोकसभा निवडणुका. त्या निवडणुकांच्या अगोदर पक्ष एक आहे की वेगवेगळे गट आहेत, हा निर्णय घ्यावा लागेल.
त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मतदारांना संभ्रमित ठेवणं पक्षाला लाभदायक ठरेल का? राष्ट्रवादी एकत्र आहे की वेगळी, हे बंड आहे की सगळं समजून चाललेलं आहे असे प्रश्न मतदार आणि कार्यकर्त्यांमध्येही आहेत. जसा हा संभ्रम वाढत जाईल, त्यांच्यातली अस्वस्थता वाढत जाईल. निवडणुकांसाठी राहिलेला वेळ पाहता ती कायम ठेवणं हिताचं असणार नाही.
शरद पवारांनी आपली भाजपासोबत न जाण्याची भूमिका अद्याप कायम ठेवली आहे. मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांच्या 'इंडिया' या आघाडीच्या झालेल्या बैठकीत ते स्वत: उपस्थित राहिले.
आता मुंबईमध्ये येत्या महिन्याभरात 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. त्याअगोदर 'राष्ट्रवादी'बद्दलच्या संभ्रम संपणार का हा प्रश्न केवळ 'इंडिया' साठी नव्हे तर 'एनडीए'साठीही सर्वात महत्वाचा आहे. अर्थात राजकारणात कधीकधी निर्णय न घेणं हेही निर्णय घेणंच असतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








