You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनमध्ये थडग्यांचं साम्राज्य, कोव्हिडमुळे नेमके किती मृत्यू झालेत?
- Author, स्टीफन मॅकडॉनल्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चीनच्या उत्तर भागात असलेल्या शांशी प्रांतातले सुतार सध्या कमालीचे व्यग्र आहेत. शवपेट्या बनवण्याच्या कामातून त्यांना अजिबात उसंत मिळत नाहीये. ताज्या लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या शवपेट्यांवर कलाकुसर करण्यात ते मग्न आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते अविरत काम करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
चीनमध्ये कोव्हिडमुळे लोकांचा मृत्यू होण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. त्याचवेळी चीनमध्ये कोव्हिडमुळे नेमके किती लोकांचे मृत्यू झालेत हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
चीनने त्यांची झिरो कोव्हिड पॉलिस डिसेंबरमध्ये रद्द केलीय. त्यानंतर वेगवेगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परिणामी एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्येच्या या देशात 80 टक्के लोकांना कोव्हिडचा संसर्ग झाला आहे.
गेल्या आठवड्यात चीनमध्ये कोव्हिडमुळे 13 हजार जणांचा मृत्यू झालाय. तर डिसेंबरमध्ये संपूर्ण देशभरात 60 हजार लोकांना त्यांचा प्राण गमवावा लागला आहे.
पण हा फक्त रुग्णालयांमध्ये नोंद झालेल्या मृत्यूंचा आकडा आहे. चीनच्या अनेक गावांमध्ये रुग्णालयांची संख्या कमी आहे. परिणामी तिथं होणाऱ्या मृत्यूंचा खरा आकडा समोर येत नाहीये. घरात मृत्यू होणाऱ्या लोकांची नोंद अधिकृतपणे होत नाहीये.
गावात घरांमध्ये कोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंची अधिकृत आकडेवारी जारी करण्यात आलेल नाही. पण मरणाऱ्यांची संख्या फार मोठी असल्याचे काही पुरावे बीबीसीच्या हाती लागले आहेत.
अत्यंस्काराच्या सामानाची विक्री आणि भाव वाढले
बीबीसीने काही भागांमध्ये स्मशानांचा दौरा केला. इथं आम्हाला मोठी गर्दी दिसून आली. शोकमग्न लोक मोठ्या प्रमाणावर शेवपेट्या घेऊन तिथं येताना आम्हाला दिसले. एका गावात एक महिला आणि एक पुरूष टिशय पेपरपासून तयार करण्यात आलेला एक पक्षी ट्रकवर लादत असल्याचं आम्हाला दिसून आलं. हा सारस पक्षी असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. दुसऱ्या जगात (मृत्यूनंतरच्या) लोक सारस पक्षाचा वापर वाहन म्हणून करतात असं ते सांगू लागले. दफनविधीसाठी आणि थडगं सजवण्यासाठीच्या सामानाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलीय. त्यामुळे त्याच्या किंमती वाढल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. शांशीमध्ये अत्यंविधीसंदर्भातल्या उद्योगधंद्यांमध्ये काम करणारे जेवढेही लोक आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की, लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचं कारण आहे कोव्हिड.
अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या मागे आम्ही गेलो आणि तिथं पोहोचलो जिथं हे सामान उतरवण्यात येत होतं. तिथं आम्हाला वांग पिवी भेटले. त्यांच्या वहिनीचा काही वेळापूर्वीच कोव्हिडमुळे मृत्यू झाला होता.
दोन मुलांची आई असलेल्या त्यांच्या 50 वर्षांच्या वहिनीला आधी मधुमेह होता आणि आता कोव्हिड त्यांना झाला होता.
त्यांच्या घराच्या अंगणात अंत्यायात्रेसाठी लागणाऱ्या सामानाचा खच पडला होता. पिवी यांनी सांगितलं की 16 लोक मिळून त्यांच्या वहिनींची शवपेटी घेऊन जातील आणि मग ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतील. कोव्हिडमुळे लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे अत्यंसस्कार कारणं फार महाग झाल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. त्यांच्या वहिनीच्या सन्मानार्थ अंत्यस्काराला जास्तीचा खर्च केला जाणार असल्याचं पिवी यांनी सांगितलं.
ती एक उत्कृष्ट स्त्री होती. म्हणून त्यांचा अंत्यसंस्कार भव्य करण्यासाठी आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचं आहे, पिवी पुढे सांगत होते.
वाढतं संक्रमण आणि थडग्यांची वाढती संख्या
चीनमध्ये दरवर्षी चिनी नववर्षाच्या निमित्ताने कोट्यवधी तरूण लोक त्यांच्या शहर किंवा राज्यांमध्ये जातात. कुटुंब आणि मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी हा महत्त्वाचा काळ मानला जातो.
चीनमधला हा सर्वांत मोठा सण आहे. ज्या गावांमध्ये हे तरुण प्रवास करणार आहेत त्या गावांमध्ये आता फक्त वयस्क राहत असल्याचं चित्र आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्यांना कोव्हिडचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रवासी लोकांमुळे कोव्हिड देशाच्या दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जे फार घातक ठरू शकतं.
गावातील नातेवाईक कोव्हिडमुळे संक्रमित झालेले नसतील तर गावाला न जाण्याचा सल्ला सरकारनं शहरातील लोकांना दिला आहे.
आपल्या गावात छोटा दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टर दोंग योंगमिंग यांना वाटतं की त्यांच्या गावातव्या 80 टक्के लोकांना कोव्हिड होऊन गेला आहे.
ते सांगतात, “आमच्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण आधीपासूनच आजारी होता. गावातला हा एकमेव दवाखाना आहे. तसंच ज्यांचा मृत्यू झालाय त्यांना आधापासूनच कुठलीतरी व्याधी होती.”
या भागात मृत्यू झालेल्या लोकांना त्यांच्या शेतात पुरलं जातं त्यांच्या अवतीभवती शेती केली जाते किंवा मग तिथं गोठा बांधला जातो.
मृत्यूपेक्षा जगण्याची ओढ
या भागातल्या रस्त्यांवरून जातांना रस्त्याकडेच्या शेतात अनेक नव्या कबरींवरील मातीचे ढिगारे आम्हाला दिसले. या ढिगाऱ्यांवर लाल झेंडेदेखील लावण्यात आले होते. या कबरी अगदी अलीकडच्याच असल्याचं एका मेंढपाळानं आम्हाला सांगितलं.
त्यांनी सांगितलं, इथं ज्येष्ठ नागरिकांना मृत्यूनंतर दफन केलं जातं. इथं अशा अनेक कबरी सध्या बनवण्यात आल्या आहेत.
त्यांनी सांगितलं की इथं काही हजार लोक राहातात आणि नुकत्याच येऊन गेलेल्या कोव्हिडच्या लाटेत किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे.
ते सांगत होते की, “इथं गेल्या काही दिवसांपासून दरोरोज कोणी ना कोणी मरतच आहे. गेल्या महिन्यापासून हा सिलसिला थांबण्याचं नावच घेत नाहीये.”
पण, या दुर्गम भागातल्या लोकांमध्ये मृत्यू आणि जीवनाकडे पाहाण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन आहे. ते सांगतात की ते नेहमी प्रमाणे यंदा देखील नवीन वर्षाचं स्वागत तेवढ्याच धुमधडाक्यात करतील.
त्यांना सांगितलं, “माझा मुलगा आणि सून आता लवकरच इथं येणार आहेत.”
मी त्यांना विचारलं ज्या प्रमाणात शहरातून गावाकडे येण्याचा लोकांचा ओढा आहे त्या प्रमाणात इथं कोव्हिडचं संक्रमण वाढलं आहे का?
त्यावर त्यांनी सांगितलं, “लोकांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, तुम्ही लपून राहिलात तरी तुम्हाला संक्रमण होऊ शकतं. आमच्यापैकी अनेकांना आधी कोव्हिड होऊन गेला आहे आणि आम्ही आता सुखरूप आहोत.”
त्यांच्यामते आता कोव्हिडचा सर्वांत कठिण काळ संपलेला आहे. लोकांच्या मते आता मृत्यूपेक्षा जीवनाला महत्त्व दिलं पाहिजे. ही वेळ आता जिवंत असलेल्या लोकांबरोबर व्यतित करण्यासाठी ना की कबरींबरोबर.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)