शरद पवारांनीच पहाटेचा शपथविधी घडवून आणला? पवारांच्या 'या' विधानाचा अर्थ काय?

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी हा सर्वाधिक नाट्यमय घडामोडींपैकी एक आहे. राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे.

2019 निवडणुका भाजप-शिवसेनेने एकत्रित लढवल्या. मात्र मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं. शिवसेनेने भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार तयार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे का भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार असं सरकार आहे याविषयी संभ्रम होता.

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं. पुढच्या दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गडगडलं. याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याआधीही हा विषय टाळला होता.

पुरेसा पाठिंबा नसल्याने तीन दिवसात हे सरकार कोसळलं. या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लिन चिट मिळाली. राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत झालेल्या शपथविधीची अनेक दिवस चर्चा होती.

आता पुन्हा हा शपथविधी चर्चेत आला आहे.

या सगळ्याची शरद पवार यांना कल्पना होती असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.

काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख केला. शपथविधीसंदर्भात थेट शरद पवारांशी बोलणी झाली होती. शरद पवारांना आम्ही शपथ घेणार माहीत होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या संमतीनेच सगळं झालं होतं. पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

एवढंच नाही जेव्हा राजकारणात विश्वासघात होत असतो आणि तुमच्यापुढे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा चेहरा बघत बसायचा नसतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मात्र ते असत्य बोलत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार

पण आता शरद पवारांनी पुन्हा एकदा या शपथविधीबद्दल एक विधान केलं आहे.

पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली, असं पवार यांनी म्हटलं. तुम्हाला पहाटेच्या शपथविधीसंदर्भात कल्पना होती यावर त्यांनी थेट भाष्य केलं नाही पण समझने वालों को इशारा काफी होता है असं सांगितलं.

बुधवारी (22 फेब्रुवारी) पुण्यात बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली.”

म्हणजे तुम्हाला पहाटेच्या शपथविधीसंदर्भात कल्पना होती, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. समझनेवाले को इशारा काफी है असं म्हटलं.

शरद पवारांनी थेट कोणतंही विधान केलं नसलं तरी पहाटेचा शपथविधी ही त्यांनी ठरवून केलेली खेळी होती? त्यांना याची कल्पना होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोश्यारींची काय भूमिका?

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भगतसिंह कोश्यारी

“दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे आले होते. त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे बहुमत असेल तर सिद्ध करा. त्यातल्या एका पक्षाच्या नेत्याने आम्हाला आमदारांच्या सह्या असलेलं पत्र दाखवलं त्यानंतर शपथविधी झाला आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. पुढे कोर्टात जेव्हा आव्हान देण्यात आलं त्यावेळी त्यांनी माघार घेत राजीनामा दिला”, असं माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

'त्या वक्तव्याने पवारांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब '

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“भाजप-शिवसेनेचं सरकार होत नसेल तर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अन्य पक्षांना/आघाड्यांना सरकार स्थापण्यासंदर्भात संधी द्यायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही.

फडणवीस-अजित पवार एकत्र येत सरकार स्थापन झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली. राष्ट्रपती राजवट संपावी यासाठी हा एक मार्ग आहे असं पवारांना लक्षात आलं. त्यांनीच ही खेळी रचली”, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकोश अकोलकर यांनी सांगितलं.

“तीन दिवस सरकार पडेपर्यंत शरद पवार, अजित पवार आणि संबंधित सगळ्यांनी उत्तम अभियन करत हे बंड असल्याचं भासवलं. हे सगळं शरद पवारांनीच घडवून आणलं यावर त्यांच्या बुधवारच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झालं आहे”, असं अकोलकर यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “तीन दिवस सरकार असेपर्यंत अजित पवारांना सिंचन प्रकल्पासंदर्भातील आरोपांमधून क्लिन चिट मिळाली. हे असं करता येऊ शकेल याची पवारांना कल्पना होती. अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपबरोबर सरकार स्थापणार, अजित पवार यांच्यासह ते आमदार माघारी येणार ही पवारांचीच खेळी होती.या खेळीची खुद्द देवेंद्र फडणवीसांना कल्पना येऊ नये ही खरी मेख आहे”.

‘गोष्टी स्पष्ट होण्यापेक्षा संभ्रम राहिलेला चांगला’

शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, TWITTER/@CMOMAHARASHTRA

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

“गोष्टी स्पष्ट होण्यापेक्षा संभ्रम राहणं केव्हाही चांगलं हे शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला पक्कं ठाऊक आहे. म्हणून पहाटेच्या शपथविधीबाबत त्यांनी संभ्रमावस्था राहील असं वक्तव्य केलं आहे.

पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांचं बंड फसलं हे सत्य आहे. अजित पवारांसारखा नेता पक्षातून बाहेर पडणं ही भविष्यातल्या फुटीची कल्पना आल्याप्रमाणे होतं. त्यांना असंतुष्ट ठेवण्यापेक्षा माघारी बोलावून त्यांना यथोचित पद देणं चांगलं असा विचार शरद पवारांनी केला”, असं ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे म्हणाले.

“त्यावेळी बारामतीत आम्ही मोठ्या साहेबांबरोबर असे फलक लागले होते. त्या फलकांना प्रत्युत्तर अजित पवारांच्या समर्थकांनीही फलक लावले. पण गंमत म्हणजे आम्ही मोठ्या साहेबांबरोबर हे शरद पवार समर्थकांनी लावलेले फलक काढण्यात आले.

पवारांनी राजकीय निर्णय घेत अजित पवारांसह अन्य आमदारांना परत बोलावलं. फडणवीस-अजित पवार सरकार शिवसेनेमुळे पडलं”, असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “शरद पवारांना पहाटेच्या शपथविधीसंदर्भात दुजोरा आणि खंडन दोन्ही शक्य नाही कारण एकामुळे अजित पवारांना विरोध दिसू शकतो तर दुजोरा दिल्यास फडणवीसांना समर्थन ठरू शकतं. त्यामुळे शरद पवार संभ्रमावस्था राहील असं बोलत आहेत”.

‘पवारांनी फूट रोखली’

“पहाटेचा शपथविधी आणि अजित पवारांचं बंड याला शरद पवारांचा पाठिंबा होता असं मला तेव्हाही वाटलं नव्हतं आणि आजही वाटत नाही. 1994 ते 2019 या कालावधीत भाजप-शिवसेनेसाठी मुख्य लक्ष्य शरद पवार होते.

'इंडिया टुडे'ने घेतलेल्या सर्वेक्षणात 'सर्वांत तिरस्कारणीय राजकारणी' असं त्यांचं वर्णन झालं होतं. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत शरद पवारांनी भूतकाळ धुवून काढला. आपली प्रतिमा बदलण्यावर त्यांनी भर दिला. सरकार बनवण्यापेक्षा विश्वासार्हता कमावणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं”, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, “अजित पवारांनी काही आमदारांना साथीला घेत देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरीने सरकार स्थापलं. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे कळल्यानंतर शरद पवार तात्काळ कामाला लागले. त्यांनी साम-दाम-दंड भेद असे सगळे पर्याय आजमावून प्रत्येक आमदाराला परत आणलं. धनंजय मुंडे नॉटरिचेबल होते. त्यांनाही एसओएस पाठवून बोलावलं. आमदारांचा पाठिंबा असता तर सरकार टिकलं असतं. शरद पवारांनी ती फूट यशस्वीपणे रोखली”.

“शपथविधीसंदर्भात पवारांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते फडणवीस असत्य बोलतात. ते बरोबरच होतं. बुधवारी केलेलं वक्तव्य पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेलं वक्तव्य होतं. पहाटेचा शपथविधीनंतर अनेक संदर्भ बदलले आहेत, तेही लक्षात घ्यायला हवेत”, असं चोरमारे यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)