धमक्यांमुळे स्वतःचा देश सोडावा लागलेले बीबीसीचे 310 पत्रकार काय सांगतात?

- Author, स्टेफनी हेगार्टी
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
आपल्या देशातून पलायन करत (निर्वासनात) काम करणाऱ्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या पत्रकारांची संख्या 2020 नंतर दुपटीनं वाढून जवळपास 310 झाली आहे.
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यावरून रशिया, अफगाणिस्तान आणि इथियोपियातील संघर्ष आणि पत्रकारांवरील कारवाईची माहिती मिळते.
इराणसह इतर देशांमधील हे पत्रकार एका दशकापेक्षा जास्त काळापासून परदेशात निर्वासनात राहत आहेत.
त्यांच्यापैकी अनेकांना तुरुंगवास, जीवे मारण्याच्या धमक्या आणि ऑनलाइन तसंच प्रत्यक्ष छळाचा सामना करावा करावा लागत आहे.
"निर्वासित किंवा हद्दपार होणाऱ्या पत्रकारांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, ही बाब पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक आहे," असं मत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक लिलियान लँडर यांनी व्यक्त केलं.
तालिबाननं ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतला, त्यावेळी बीबीसीनं त्यांच्या बहुतांश पत्रकारांना परत बोलावून घेतलं होतं. महिला कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी नव्हतीच, शिवाय अनेक पुरुष कर्मचाऱ्यांनाही धमक्यांचा सामना करावा लागला.
म्यानमार आणि इथियोपियामध्येही पत्रकारांवर प्रचंड दबाव असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं त्यांनाही स्वतंत्रपणे काम करणं कठिण ठरलं.
'आईच्या अंत्यविधीलाही जाता आले नाही'
बीबीसी पर्शियनचे पत्रकार जियार गोल हे या पत्रकारांपैकी एक आहेत. ते म्हणाले की, "माझ्या घरी खूप सेक्युरिटी कॅमेरे होते. मुलीची शाळा बदलण्यासाठी मला इशाराही देण्यात आला होता."
जियार 2007 पासून इराणला परत गेलेले नाहीत. त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यविधीसाठीही त्यांना जाता आलं नाही.

चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं कॅन्सरनं निधन झालं तेव्हापासून ते अधिक सावध झाले.
"मला काही झालं तर माझ्या मुलीचं काय होईल? हेच कायम माझ्या मनात सुरू असतं," असं ते म्हणाले.
"इराणमधील प्रशासन अधिक कठोर झालं आहे. अत्यंत कठोर निर्बंध आहेत. आंतरराष्ट्रीय समुदाय काय विचार करेल, यानंही त्यांना काही फरक पडत नाही."
पत्रकार संरक्षण समितीतील जोडी गिन्सबर्ग यांच्या मते, गेल्या तीन वर्षात आर्थिक आणि कायदेशीर मदतीचा लाभ घेणाऱ्या निर्वासनातील पत्रकारांच्या संख्येत 225% वाढ झाली आहे.
"तुरुंगात असणाऱ्या पत्रकारांचा आकडा विक्रमी आहे. तसंच पत्रकारांच्या हत्येचा आकडाही 2015 नंतर सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे," असंही त्या म्हणाल्या.
रशिया, इराण आणि सौदी अरेबियासारख्या सरकारांना देशांतर्गत आणि बाहेरील परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असल्याचं पत्रकारांची गळचेपी केली जाते.
लंडनमध्येही झाला हलला
युक्रेननं घुसखोरी केल्यानंतर बीबीसी रशियनच्या निना नाझारोव्हा यांना घर सोडावं लागलं. विमान मॉस्कोवरून उड्डाण घेत असताना त्यांनी पतीकडं पाहिलं तर ते रडत असल्याचं निना यांच्या लक्षात आलं. त्यांचे पतीही पत्रकार आहेत.
"मी सुन्न झाले होते. तो दिवस होता 4 मार्च 2022 चा. त्याचदिवशी नवा सेन्सॉरशिप कायदा लागू झाला होता. मी युद्धाला युद्धच म्हणत होते आणि कदाचित त्यासाठी मला अटकही झाली असती," असं त्यांनी म्हटलं.
16 महिन्यांच्या मुलाला त्यांनी बरोबर घेतलं, दोन लहान सुटकेसमध्ये अगदी मोजकं सामान भरून स्वस्तातलं तिकिट बुक करून ते तुर्कीला निघाले.
त्याठिकाणी आठवडाभर राहिल्यानंतर ते दुबईत आठवडाभर राहिले. युद्धाच्या खूप पूर्वी त्यांनी या सुट्यांसाठी प्लॅनिंग आणि बुकिंग केलेलं होतं. त्यानंतर ते माँटेनेग्रोला गेले आणि त्यानंतर रिगाला पोहोचले. याठिकाणी बीबीसीनं निर्वासनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक ऑफिस तयार केलं होतं.

यावर्षी एप्रिल महिन्यात निनाचे सहकारी आणि बीबीसी रशियनच्या प्रतिनिधी इलिआ बाराबानोव्ह यांना परदेशी एजंट ठरवण्यात आलं. खोटी माहिती पसरवून युद्धाला विरोध केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्यासह बीबीसीनं हे आरोप फेटाळले असून हे प्रकरण कोर्टात पोहोचलंय.
देशाबाहेर गेल्यानंतरही पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांचं सत्र सुरुच आहे. मार्च महिन्यात इराण इंटरनॅशनलच्या प्रेझेंटरला त्यांच्या लंडनच्या घराबाहेर पायाला चाकून भोसकण्यात आलं होतं.
ब्रिटिश दहशतवाद विरोधी पोलिसांनीही बीबीसी पर्शियनच्या युके मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना असलेला धोका वाढला असल्याचं म्हटलं आहे.
'आमचं बोलणं कोणीतरी ऐकतं'
2022 मध्ये बीबीसी पर्शियनचे प्रेझेंटर राणा रहिमपोर यांची कार फोडण्यात आली होती. कारमध्ये एक ध्वनी उपकरण असल्याच्या संशयातून हा हल्ला झाला होता. त्यांचं आणि त्यांच्या आईचं एक संभाषण इराण सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. सरकारला पाठिंबा आहे असं भासावं म्हणून तो ऑडिओ एडिट करण्यात आला होता.
जेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी नेटवर्कनं त्यांची बदनामी करण्यासाठी या इंटरव्ह्यूचा वापर केला त्यावेळी राणा यांनी पत्रकारिता थांबण्याचा निर्णय घेतला.
"प्रशासन त्यांच्या कृत्यांमध्ये एक पाऊल पुढं जात आहे. माझ्याबरोबर जे काही घडलं तो माझ्या बदनामीबरोबरच मला शांत करण्याचाही प्रयत्न होता," असं राणा म्हणाले.
पण या प्रकारानं त्यांचे मित्र आणि सहकारी अधिक तणावात आले आहेत.
"मी प्रत्येकवेळी इराणमध्ये आईशी बोलत असतो, तेव्हा आमचं बोलणं कोणीतरी ऐकत आहे, हे मला माहिती असतं," असं बीबीसी पर्शियनच्या आणखी एक प्रेझेंटर फरनाझ गाझिझादेह यांनी सांगितलं.
"ते तुम्हाला उध्वस्त करण्यासाठी काही ना काही मार्ग शोधतीलच. त्यामुळं हे अत्यंत भयावह आहे."
फरनाझ 21 वर्षांपासून इराणला परतलेल्या नाहीत. त्यांच्यासह इतर 9 सहकाऱ्यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याचं त्यांना नुकतंच समजलं आहे. हॅकर्सनं इराणच्या न्यायव्यस्थेतून काही माहिती लीक केल्यानंतर त्यांना याबाबत समजलं.
यापूर्वी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं बीबीसी पर्शियनच्या कर्मचाऱ्यांवर हिंसाचार, द्वेषयुक्त भाषण आणि मानवाधिकारांचं हनन केल्याचा आरोप केला होता.
ब्लॉग लिहिला म्हणून शिक्षा
फरनाझ यांच्या पतीला एक ब्लॉग लिहिल्याप्रकरणी 25 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या मुलासह त्या दोघांनी देश सोडला होता.
पण इराणमधील फरनाझ यांच्या वडिलांना इराणच्या सुरक्षा रक्षकांकडून धमक्या दिल्या जातात. तुमचा नातू कोणत्या शाळेत जातो हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळं मुलीला परतायला सांगा असं ते त्याच्या वडिलांना म्हणायचे.

फोटो स्रोत, Getty Images
2022 मध्ये फरनाझ यांचा भाऊ प्रचंड आजारी होता. त्यावेळी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना त्याला उपचारासाठी नेण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर सहा आठवड्यांनी त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. सहा महिन्यांतच त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला.
"मी कधीही यातून पूर्णपणे सावरू शकणार नाही. मला कुटुंबासाठी, माझ्या आईसाठी खरंच मला त्याठिकाणी राहायचं आहे. पण मी राहू शकत नाही," असं त्यांनी म्हटलं.
बीबीसी पश्तोच्या शाझिया हया यांच्यासाठीही निर्वासनातलं जीवन अपराधी भावनेनं भरलेलं आहे.
तालिबाननं अफगाणिस्तावर ताबा घेतला त्यावेळी 2022 मध्य त्यांना काबूलला नेण्यात आलं. त्यांचे आई-वडील आणि भाऊ मात्र काबूलमध्येच होता.
"त्या रात्री अंदाजे 2 वाजता मी घर सोडलं. त्यावेळी मी का माहिती नाही, पण भावाची नीट भेटही घेतली नाही. त्याचा मला सर्वात जास्त पश्चात्ताप होतो. मी इथं मुक्त आहे, पण ते एकप्रकारे तुरुंगात आहेत," असं त्या म्हणाल्या.
त्याशिवाय ऑनलाईनही प्रचंड छळ केला जातो.
"एवढ्या मारण्याच्या धमक्या येतात की, मी मेसेज चेकही करू शकत नाही. काही वेळा लैंगिक आणि अनेकदा खूप घाणेरडे मेसेज असतात," असं फरनाझ म्हणाल्या.
मनाने अजूनही देशातच
वन वर्ल्ड सर्व्हिसच्या एका पत्रकारांनी त्यांच्या देशातील आक्रमक नेत्यांच्या भीतीनं ओळख जाहीर न करता माहिती दिली. सरकारनं जर आमच्या पासपोर्टचं नुतणीकरण केलं नाही, तर आम्ही कुठल्याही देशाचे राहणार नाही हीच सर्वात मोठी भीती असल्याचं त्यांनी सांगितलं.
यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी सर्वात त्रासदायक बाब म्हणजे, त्यांना त्यांच्याच देशाबाबत लांबून माहिती द्यावी लागत आहे.
शाझिया अफगाणिस्तानात वेगवेगळ्या ठिकाणी फिरून त्याठिकाणच्या महिलांशी चर्चा करायच्या. पण आता त्यांना एका अस्पष्ट फोन संभाषणांतून त्यांचा विश्वास जिंकावा लागतो. अफगाणिस्तान आणि इराणमध्ये सामान्य लोकांना फक्त बीबीसीशी बोलल्याच्या कारणावरूनही धमकी दिली जाते.
निना यांनीदेखील त्यांचं काम अधिक कठिण असल्याचं म्हटलं. कायम डेस्कवर अडकून राहावं लागतं. पण त्यामुळं जे लोक इतर कोणालाही सांगत नाही, अशा गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेण्याचं कौशल्य वाया जात असल्याची चिंता त्यांना वाटते.
त्याशिवाय कुटुंबांमध्ये होणारे सोहळे आणि त्यात मुलाचे लाड होताना पाहणंही त्या मिस करतात. "प्रेम अजूनही आहे, पण ते खूप दुरून आहे," असं त्या म्हणतात.
निर्वासनात राहणं आणि काम करणं हे अधुरं जीवन असल्यासारखं आहे, असं फरनाझ म्हणतात. "तुम्ही खऱ्या अर्थानं जीवन जगत नाही. मी या देशात राहते आता मी ब्रिटीश आहे, पण तसं होत नसतं. तुम्ही निर्वासनात असले तरी मनानं देशातच राहता."











