येमेनमधला चिमुकला म्हणतो, ‘मला एक बंदूक खरेदी करून द्या, माझ्या पायांवर गोळीबार करणाऱ्यांना मी मारेन’

बदर

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

फोटो कॅप्शन, बदर
    • Author, ओर्ला ग्युरेन
    • Role, बीबीसी न्यूज, येमेन

जर वेदनादायी दु:खाचा काही पत्ता असेल, तर तो ‘अल-रशीद स्ट्रीट, ताईझ, येमेन शहर’ असाच असू शकेल. डोंगररांगांनी वेढलेल्या आणि हुथी बंडखोरांनी वेढलेलं हे ताईज शहर. जगात इतरत्र कुणी कल्पनाही करू शकत नाही अशा संघर्षात इथले तरुण सापडलेत.

काळ्याभोर केसांचा एक चिमुरडा कुबड्यांच्या आधारानं त्या रस्त्यावर अगदी चपळपणे खड्डे चुकवत आपल्यासोबत चालतो.

बदर अल-हरबी असं या सात वर्षांच्या चिमुरड्याचं नाव आहे. येमेनच्या युद्धापेक्षा वयानं थोडा लहान. त्याचा उजवा पाय गुडघ्याशी कापण्यात आलाय. त्याच्या टी-शर्टवर ‘स्पोर्ट’ असं लिहिलंय.

घरामागील अंगणात दगडी विटांवर बदर बसला होता. त्याचा मोठा भाऊ हाशिम त्याच्या बाजूलाच असतो. बदरवरील आघात आपल्यावरच असल्याचं म्हणत त्याला दिलासा देत असतो.

हाशिमची स्थितीही काही वेगळी नाहीय. हाशिमच्याही उजव्या पायाची तशीच अवस्था आहे. त्याचा अंगठा निखळलाय.

बदर आणि हाशिमचे वडील अल-अहरबी नासेर अल-मजनाही सांगतात की, "गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलांना शाळेतून घरी आणत असताना हुथी बंडखोरांनी गोळीबार केला आणि त्यानंतर मुलं शाळेत परतलीच नाहीत."

ते पुढे सांगत होते की, “सगळं पूर्णपणे कायमसाठी बदललं. माझी मुलं आता इतर मुलांप्रमाणे बाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. ते अपंग बनलेत. तसंच, ते अजूनही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना एकप्रकारे मानसिक त्रास सुरू झालाय.”

हाशिम नऊ वर्षांचा आहे. त्याच्या वयाच्या तुलनेत लहान वाटणाऱ्या त्याच्या आवाजत तो सांगत होता की, मला शाळेत जाण्याची इच्छा आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“मला शाळेत जायचंय, शिकायचंय, अभ्यास करायचाय,” असं हाशिमनं मला सांगितलं. मग मी बदरला विचारलं की, “तुलाही शाळेत जायचंय का?” तर त्यावर बदर म्हणाला की, “हो, जायचंय. पण माझा तर एक पाय तुटलाय, मग कसं जाऊ शकेन?”

बदर आणि हाशिम या दोघांसाठी आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतला नसल्याचं त्यांचे वडील सांगतात.

प्रवासासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं ते म्हणतात. तसंच, सध्यातरी या संकटातून कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडे कुठला मार्गही नाहीय.

“आम्ही इथे जरी घाबरून राहत असलो, तरी दुसरीकडे कुठे जाऊन राहता येईल, अशी सध्या आर्थिक ऐपत नाहीय. कारण इतरत्र घरांची भाडं जास्त आहे. ते मला परवडणारं नाहीय. त्यामुळे इथे राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाहीय. मग भले आम्ही जिवंत राहू किंवा नाही,” असं ते सांगतात.

आधी गृहयुद्धसदृश सुरू झालेल्या या संघर्षात आता वेगवेगळे देश इथल्या वेगवेगळ्या गटांना पाठिंबा देताना दिसतायत. सुन्नी सौदी अरेबियानं येमेनच्या आंतरराष्ट्रीय समूहानं मान्यता दिलेल्या सरकारला पाठिंबा दिलाय, तर शिया इराणनं हुथी बंडखोर चळवळीला पाठिंबा दिलाय.

2014 च्या सप्टेंबर महिन्यात हुथी बंडखोरांनी सरकारला हद्दपार करत येमेनची राजधानी सनावर ताबा मिळवला. यानंतर सौदीच्या नेतृत्त्वातील युतीनं हस्तक्षेप केला. या युतीला अमेरिका आणि यूकेनं पाठिंबा दिला. सरकार स्थापन करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं आश्वासन सौदीनं दिलं.

येमेन

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

आठ वर्षं आणि हजारो एअर स्ट्राईकनंतरही हुथी बंडखोरांनी येमेनच्या राजधानीवरील आपला ताबा सोडला नाहीय. सौदी आता यातून काढता पाय घेतंय.

तिकडे ताईजमध्ये बदर आणि हाशिम अजूनही झोपल्यावर अचानक गोळीबाराच्या आवाजानं दचकून उठतात.

“मोठ्या स्फोटांचा आवाज येतो, गोळीबाराचा आवाज येतो. ते अंदाधुंद गोळीबार करतात. माझ्या बाजूलाच कुठेतरी स्फोट झाल्यासारखं मला वाटत राहतं. आमचं घर उडवलं जाईल की काय, असं वाटत राहतं,” असं बदर सांगतो.

आम्ही तिथून शेजारच्या घराकडे गेलो. तिथंही एका मुलाचं बालपण उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आम्हाला दिसलं.

तीन वर्षांचा चिमुकला आमीर त्याच्या वडिलांच्या मांडीवर शांतपणे झोपला होता. त्या चिमुरड्याला कृत्रिम उजवा पाय लावण्यात आला होता. शरीफ अल-आमरी असं आमीरच्या वडलांचं नाव आहे.

बदर आणि हाशिमला अपंगत्व आलं, त्याच दिवशी काही तासांच्या अंतरानं आमीरवरही आघात झाला.

गोळीबारावेळी आमीर एका नातेवाईकाच्या घरी होता. गोळीबारात त्याचे काका आणि सहा वर्षांचा चुलत भाऊ मरण पावले. आमीर गोळीबारातून बचावला, पण त्याच्या स्मरणशक्तीवर या घटनेचा मोठा परिणाम झाला.

शरीफ त्यांच्या मुलाबद्दल सांगतात, “गोळीबारानंतर हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत त्याला सर्व आठवत होतं. काकावर गोळीबार झाला, भावावर गोळीबार झाल्याचं तो बोलत होता. घटनास्थळावरील गोळीबाराचा धूर आणि रक्तपाताबद्दल तो बोलत होता. आता मुलांना खेळताना तो पाहतो, तेव्हा मात्र तो नाराज होतो आणि म्हणतो, मला एक पाय नाहीय.”

आमीर

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

फोटो कॅप्शन, आमीर आणि त्याचे वडील

किंबहुना, येमेनमधील या रस्त्यावरील प्रत्येक घरात कमी-अधिक प्रमाणात एकसारखीच भीती आहे.

मुनीर यांच्या घरात या वेदना अधिक आहेत. एकजण मला मुनीर यांच्या घराकडे घेऊन गेला. मुनीर यांच्या घराच्या शेजारीच म्हणजे 20-30 मीटरवरच हुथी बंडखोर राहतात.

“आमच्या समोरच स्नायपर आहेत. खिडकी उघडली की ते दिसतात. तुम्ही बाहेर बागेत गेलात, तर ते तुम्हाला मारून टाकतील,” असं मुनीर सांगतात.

“ताईजमध्ये आम्ही भीतीच्या छायेत राहतोय. इथल्या लोकांना कणभरही कल्पना नाहीय की, ते कधी मिसाईल किंवा स्नायपरनं मारले जातील. ईश्वर करो नि येमेनमध्ये शांतता येवो आणि पूर्वीसारखं येमेन महान बनो,” असं मुनीर म्हणतात.

तिथेच आम्ही मुनीर यांचा मोठा मुलगा मोहम्मदला भेटलो. मोहम्मद 14 वर्षांचा असून, तो व्हिलचेअरवर असतो. त्याच्या शाळेवर गोळीबार झाला, तेव्हा इतर विद्यार्थी त्याला तिथेच सोडून पळून गेले. आता मोहम्मदला काळजी वाटते की, कधी घरावर हल्ला झाला, तर कुटुंबाला त्रास होईल.

तीन हजारहून अधिक दिवसांपासून ताईजला अक्षरश: वेढा घातला गेलाय. सरकार आणि हुथी सैन्याच्या संघर्षात हा भाग युद्धभूमी बनलाय. इथल्या तरुणांनाही सोडलं नाहीय. तेही यात भरडले गेलेत.

स्थानिक डॉक्टरनं आम्हाला सांगितलं की, 2015 पासून आतापर्यंत त्यांनी 100 अपंग चिमुकल्यांवर शस्त्रक्रिया केल्यात. यातले कुणी हुथी गोळीबारात जखमी झाले होते, कुणी खाणीत, तर कुणी एखाद्या स्फोटात.

हुथी बंडखोरांच्या हल्ल्यात गेल्या काही वर्षांत अनेक चिमुरडे एकतर अपंग झाले किंवा मृत्यूच्या विळख्यात सापडले. तसंच, सौदी अरेबियाच्या नेतृत्त्वातील कोएलिशननं केलेल्या एअरस्ट्राईकमध्येही अनेक बळी गेलेत. शिवाय, सरकारच्या लष्कराच्या कारवाईतही अनेकजण बळी पडले. सगळीकडून जीव जातायेत, रक्तपात होतोय.

संयुक्त राष्ट्रानं गेल्यावर्षी मध्यस्थी केल्यानंतर येमेनमधील हा संघर्ष थोडा कमी झालाय. मात्र, इथे अद्याप शांतता नाहीय. केवळ संघर्षाची तीव्रता काहीशी कमी झालीय.

सौदी अरेबिया आणि इराणनं सकारात्मक पावलं पडल्यानंतर थोडं बरं आहे. सौदी आणि हुथी यांच्यात चर्चा झालीय. पण सूत्रांच्या माहितीनुसार, ही चर्चाही आता थांबलीय. येमेनम सरकारच्या स्वत:च्या ज्या लढाऊ संघटना आहेत, त्यांच्याशी यातली कुठलीही चर्चा झाली नाहीय.

येमेन देश तुटल्यासारखा झालाय. आणि तोही असा की, पुन्हा जोडलाच जाऊ शकत नाही.

मार्च 2015 मध्ये युद्ध वाढल्यापासून मी येमेनला येत आहे. ही माझी सातवी भेट आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय शांततेच्या पावलांबद्दल बोलत असताना, प्रत्यक्षात मात्र निराशादायक चित्र आहे.

दक्षिणेकडील भागात तीन आठवड्यांपासून होते, तिथे बोलताना असं वाटत राहतं की, हे निरोपाचं संभाषण आहे.

सध्याची स्थिती अशीच राहिली, तर येमेन कसा तग धरून राहील, याबाबत अनेकांना शंका आहे. हुथी बंडखोर शांतता प्रस्थापित करतील, याबाबत सुद्धा अनेकजण साशंक आहेत.

“ते राज्य करण्यासाठी आपल्याकडे दैवी अधिकार असल्याचा दावा करतात. पैगंबर त्यांचे आजोबा होते, असाही ते म्हणतात. ते बंदूक सोडून निवडणुका घेतील, असं मला अजिबात वाटत नाही,” असं ताईजमधील एका व्यावसायिकानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.

दक्षिण-पश्चिम येमेनमधील विस्थापितांच्या शिबिरांचा प्रभारी असलेल्या गमाल महमूद अल मसरही म्हणतात की, “हुथी बंडखोर शांतता प्रस्थापित करतील, या भ्रमत आंतरराष्ट्रीय समुदाय आहे.”

हुथी बंडखोरांच्या ताब्यातील उत्तरेकडील भागात, जिथं 32 दशलक्ष येमेनवासिय राहतात, तिथे जायचं होतं. मात्र, हुथी बंडखोरांनी आम्हाला परवानगी नाकारली. सना येथील मानवाधिकार कार्यकर्ते म्हणतात की, राज्यकर्ते अधिकाधिक दडपशाही करत आहेत.

आम्ही अल-रशीद रस्त्यावरून बाहेर पडत होतो, तेव्हा आम्हाला बदर घराबाहेर बसलेला दिसला. तो तिथं एकटाच होता. तर आमीरला त्याचे वडील सायकलवरून फिरवताना म्हणत होते, “घाबरू नकोस, मी आहेस सोबत तुझ्या.”

भविष्यात तुला काय हवंय, असं त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं.

त्यावर आमीर म्हणाला की, “मला एक बंदूक खरेदी करून द्या. मी माझ्या बंदुकीनं माझ्या पायांवर गोळीबार करणाऱ्यांना मारेन.”

आमीरचे शब्द लहान मुलाचे होते खरे, पण ते भीतीदायक वाटले.

येमेनी मुलांसमोर उपासमारीचं संकट

दमवणाऱ्या उकाड्यात एका दुचाकीवरून आम्ही तीन तास प्रवास करत होतो. खडबडीत भागातून जिथे काही ठिकाणी रस्ता होता, काही ठिकाणी फक्त दगड.

पण राजा मोहम्मदसमोर आपला आजारी मुलगा अवामला ताईजमधील लहान मुलांच्या दवाखान्यापर्यंत नेण्याचा हा एकमेव मार्ग होता.

तांबड्या समुद्रावरचं बंदर असलेल्या मोका शहरात राजाचं घर आहे. तिथून ताईजपर्यंतच्या या प्रवासाकरिता राजाला आपली 10 दिवसांची कमाई खर्च करावी लागली. हा खर्च होता साधारण 20 हजार येमेनी रियाल म्हणजे 1100 रुपये.

अवाम जेव्हा येमेनी स्वीडिश हॉस्पिटलमध्ये पोहोचला – या इस्पितळाचे स्वीडिश संस्थापक कधीच इथून गेले असले तरी नाव बदललेलं नाही – तेव्हा त्याचं वजन आणि इतर तपासणीसाठी कर्मचारी सरसावले. पण तो तीव्र कुपोषणाचा बळी आहे हे सांगायला कुठल्या चाचण्यांची गरज नव्हती. त्याचे सुकलेले खांदे आणि सुजलेलं पोट पाहूनच त्याची परिस्थिती कळत होती.

राजा – जो एकूण पाच मुलांचा बाप आहे – गेलं वर्षभर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धडपड करतोय.

"त्याला नेहमीच ताप असतो," आवामच्या उशालगत उभा राहून त्याला पुठ्ठ्याच्या पंख्याने वारा घालणारा राजा मला सांगत होता.

"मोकामधल्या सगळ्या दवाखान्यांमध्ये आम्ही जाऊन आलोय. त्यांनी आम्हाला इथे येण्याचा सल्ला दिला. मी कसाबसा माझ्या मुलांना जेवू घालतो. कधीकधी फक्त चहा आणि पाव खाऊन दिवस काढतो. कधीकधी अख्खा महिना तसाच जातो."

भूक येमेनच्या पाचवीला पूजलीय, पण या युद्धामुळे ती आणखी तीव्र झाली. या संघर्षाने लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, किमती गगनाला भिडवल्या, सुमारे 40 लाख लोकांना पलायन करायला भाग पाडलं आणि देशातल्या अर्ध्याअधिक आरोग्य सुविधा बंद पाडल्या.

राजा याच युद्धामुळे बेघर झाला. "आतापर्यंत सहा ते सात वेळा आम्हाला घरदार सोडून पळ काढावा लागलाय," तो सांगतो. "दरवेळी आम्हाला नवीन ठिकाणी जावं लागतं कारण भूसुरुंगांची आम्हाला भीती असते. "

जन्मापासूनच राजाच्या आणि इथल्या सगळ्याच मुलांचा भुकेने पाठलाग केलाय. पाच वर्षांखालील सुमारे पाच लाख येमेनी मुलं पराकोटीच्या कुपोषणाच्या विळख्यात अडकली आहेत आणि जगण्याची धडपड करतायत असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.

राजा मोहम्मद

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

फोटो कॅप्शन, राजा मोहम्मद

आवामसमोर आणखी एक धोका आहे. त्याला रक्ताचा कॅन्सर असल्याचं निदान झालंय आणि त्यासाठी दीर्घकालीन उपचार करावे लागू शकतील अशीही शक्यता आहे.

एका मुलावर दवाखान्यात उपचार करणं म्हणजे इतर मुलांना उपाशी ठेवायची पाळी अशी राजाची परिस्थिती आहे. दुसऱ्या दिवशी राजा आवामला मोकाला परत घेऊन गेला. आणखी पैसे कमवून आपण मुलाला परत घेऊन येऊ असं त्याने डॉक्टरांना सांगितलं.

एकेकाळी आपल्या कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या मोका शहरातून आता आपल्याकडे अनेक कुपोषित बालकं येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

राजा ज्या रस्त्याने आपल्या मुलाला घेऊन आला त्याच रस्त्याने एका कारमधून आम्ही पुन्हा प्रवास करू लागलो.

एका ग्रामीण आरोग्य केंद्रात आम्ही पोहोचलो. कडेवर आजारी बाळं आणि नखशिखांत बुरखा घातलेल्या महिला तिथे जमलेल्या होत्या. आयांच्या विनवण्या आणि मुलांचं रडणं आसमंतात भरून राहिलं होतं.

तीन खोल्यांचं हे आरोग्य केंद्र सध्या बंदच असतं पण आम्ही तिथे आल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी ते त्या दिवशी उघडलं. आम्ही परदेशी डॉक्टर आहोत असं समजून त्या माता आपल्या लेकरांवर उपचार करा म्हणत आमच्याकडे सरसावल्या.

एका स्थानिक डॉक्टरनी आम्हाला सांगितलं की तिथले कर्मचारी संपावर आहेत आणि ते कोणत्याही पेशंट्सना तपासणार नाहीत. "आम्ही त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही," असं डॉ. अली बिन अली डोबेरा म्हणाले.

"चार महिने आम्हाला पगार मिळालेला नाही. आमच्यातले काही लोक आता पैसे देणारी नोकरी शोधणार आहेत कारण आमची मुलंही उपाशी आहेत."

ज्या परदेशी संस्था काही कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च उचलत होत्या त्यांनीही मदत पाठवणं बंद केलंय. निधीच्या अभावापोटी मोका आणि येमेनच्या पश्चिम किनारपट्टीवरची नऊ आरोग्य केंद्र बंद पडली आहेत.

देशभरात सगळीकडेच मदत यंत्रणांनी आवरतं घेतलेलं दिसतं. संयुक्त राष्ट्रांच्या फूड प्रोग्रामनेही उत्तरेत आणि दक्षिणेतही मोठ्या प्रमाणात खर्चकपात केली आहे. जर निधीची सोय झाली नाही तर सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत 30 ते 50 लाख लोकांसाठीचा अन्नपुरवठा त्यांना बंद करावा लागू शकतो असा त्यांचा अंदाज आहे.

सफा

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

फोटो कॅप्शन, सफा

परकीय मदतीचा ओघ आटला तसं येमेनी मुलांचा जगण्याचा संघर्ष अधिक बिकट होत गेला.

या गर्दीच्या मध्यभागी 11 महिन्यांची सफा होती. तिचे हात आणि पाय म्हणजे केवळ हाडं आणि त्वचा आहे, तिच्या चेहऱ्यावरची वेदना बोलकी आहे. या मासेमाराची मुलगीही खितपत पडलीय. तिला यकृताचा आजार झालाय.

"तिचे वडील समुद्रात गेलेले असताना ती कधीकधी जेवण सोडते. तिच्यासाठी खाणं आणायचं तर तिचे वडील परत यायची वाट पाहावी लागते," तिची आई उम अहमद कळकळीने सांगत होती.

"मला तिची काळजी वाटते. मला तिच्यासाठी मदत मिळवायची आहे, पण परिस्थिती खूप कठीण आहे."

उम अहमदची मान वाकलीय, तिचे खांदेही उतरलेत. तिच्या कुटुंबाचा इतिहास हा येमेनच्या युद्धाचा इतिहास आहे, रक्त आणि संघर्षाने लिहीलेला.

उम सात वर्षांपूर्वी विस्थापित झाल्या. त्यांचा दीर एका हवाई हल्ल्यात मारला गेला आणि त्यांच्या पुतणीचा भू-सुरुंगाने बळी घेतला. आपल्या नऊपैकी चार मुलांना त्यांनी कुपोषण आणि यकृताच्या आजारांपायी गमवलंय. आता उपासमार त्यांच्या लहानग्या मुलीसमोर उभी ठाकलीय.

उम अहमद आम्हाला त्यांच्या घराकडे घेऊन गेल्या. त्यांच्या देशाप्रमाणेच घराचीही अवस्था बिकट झालीय. भिंतींवरचा निळा रंग आता मातकट झालाय. घराला नक्षीकाम केलेलं दार आहे, पण आत कोणतंच फर्निचर किंवा खेळणी नाहीत. शालीपासून बनवलेल्या झोळीत त्या सफाला झुलवतात.

त्यांचे पती अन्वर तालेब यांचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. मासेमारीची ही त्यांची तिसरी पिढी, आज आपल्या कुटुंबाला दोन वेळचं खायला घालण्याची त्यांना भ्रांत आहे.

"मी सलग 15-20 दिवस समुद्रात जातो आणि जे मिळेत ते घेऊन येतो," अन्वर बोलत होते, "पण गेल्या तीन महिन्यांत मला काही कामच मिळालं नाही. कधीकधी आमच्या समुद्रातल्या खेपेचा खर्च भागेल इतकीच मिळकत होतं."

अन्वरनी आपल्या 14 आणि 15 वर्षांच्या मुलींचं लग्न लावून दिलं कारण त्यांना पोसणं त्यांना परवडत नव्हतं. आम्ही त्यांना भेटण्याची विनंती केली, अन्वर म्हणाले मी जरी हो म्हणालो तरी त्यांचे पती तयार होणार नाहीत. दोन लहान मुलींचं बालपण असं खुडलं गेलं. या युद्धाचे आणखी दोन छुपे बळी.

सफा

फोटो स्रोत, GOKTAY KORALTAN/BBC

फोटो कॅप्शन, सफाचे आई-वडील

सफाच्या हातात आता वेळ खूप थोडा आहे

एका अधिक सुसज्ज अशा स्थानिक दवाखान्यापर्यंत आम्ही त्यांना घेऊन गेलो, तो दवाखाना सुरू होता. डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं पण तिला गरज असलेले विशेष उपचार दक्षिणेकडेच्या एडन नावाच्या बंदराच्या शहरात मिळतील असंही ते म्हणाले. इथून एडनच्या पाच तासांच्या प्रवासाचा खर्च तिच्या पालकांना परवडणारा नाही.

काही दिवसांनी आम्हाला कळलं की तिचे पालक तिला घरी परत घेऊन गेले, तिच्या खाण्यापिण्याची काय स्थिती असेल याची फक्त कल्पनाच केली जाऊ शकते.

युद्ध, उपासमार आणि गरिबी यांचा इथे एक करुण संगम झालाय. येमेनच्या मुलांनी यातला एक धोका चुकवला तरी दुसऱ्याला बळी पडतील.

जगाचं त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याचाही धोका आहे. अनेक पाश्चात्य देशांना युक्रेनमधील युद्धाचे पडसाद अधिक स्पष्ट ऐकू येतात, पण या अरब द्वीपकल्पातून उमटरणारे टाहो आता त्यांच्या कानावर पडत नाहीत.

आपल्याकडे कानाडोळा करणं अधिक सोपं झालं आहे ही भीती येमेनमध्ये बळावत चाललीय.

तैझ, बादर, हशिम आणि आमीरच्या मुलांना आणि मोकामध्ये उपाशी असलेल्या आवाम आणि सफासारख्या चिमुकल्यांना कोण मदत करेल?

(विट्सके बुरेमा, अहमद बैदर आणि गोकादी कोरालटन यांच्या इनपुट्ससह)

हे वाचलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, श्रीलंकेची सप्तिका, जिच्या जन्मावेळीच लोक म्हणाले, ‘अनाथाश्रमात सोड’

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)