सौदी आणि येमेन बंडखोराच्या संघर्षात लाखो लोकांवर उपासमारीची वेळ

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या कित्येक दशकात पडला नसेल असा भयंकर दुष्काळ येमेनच्या पुढ्यात येऊन ठाकला आहे.
"योग्यवेळी मदत दिली नाही तर लाखो लोकांना या दुष्काळाला सामोरं जावं लागेल," असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्यानं दिला आहे.
सौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी येमेनवर घातलेले निर्बंध उठवावेत, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी घडामोडींचे अंडर सेक्रेटरी जनरल मार्क लोवकॉक यांनी केली आहे.
येमेनच्या हौदी बंडखोरांनी रियाधच्या (सौदी अरेबियाची राजधानी) दिशेनं क्षेपणास्त्र डागल्यानं
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली युती झालेल्या राष्ट्रांनी येमेनकडे जाणारे हवाई, सागरी तसेच जमिनीवरील सगळे मार्ग बंद केले आहेत.
इराणला या बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवता येवू नये म्हणून या निर्बंधाची गरज होती, असं सौदी अरेबियानं म्हटलं आहे.
इराणनं बंडखोरांना शस्त्रास्त्र पुरवण्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे.
हौदी बंडखोर 2015 पासून सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रांच्या युतीशी लढा देत आहेत.
बुधवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत याबद्दल माहिती दिल्यानंतर लोवकॉक बोलत होते.
"जर हे निर्बंध लवकरात लवकर उठवले नाहीत तर येमेनला फार मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो," असं सुरक्षा परिषदेला सांगितल्याची माहिती लोवकॅक यांनी पत्रकारांना दिली.
"गेल्या काही दशकातला हा सर्वात मोठा दुष्काळ असेल आणि त्यात लाखो लोकांचा बळी जाईल." असंही ते पुढे म्हणाले.

या आठवड्याच्या सुरूवातीलाच संयुक्त राष्ट्र आणि रेड क्रॉस संघटना यांनी इशारा दिला होता की या निर्बंधांचे परिणाम सर्वदूर असतील.
लाखो येमेनी नागरिक जगण्यासाठी बाहेरून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.
क्लोरिनच्या गोळ्या तसंच जवळपास 9 लाख लोकांना लागण झालेल्या कॉलराची औषध घेऊन जाणारं आपलं जहाज अडवलं, असं रेड क्रॉस संघटनेनं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, ABDO HYDER/Getty Images
संयुक्त राष्ट्रांच्या मते जवळपास 70 लाख येमेनी नागरिक दुष्काळाच्या छायेत आहेत.
सामान्य माणसाला जगण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट येमेनमध्ये आयात करावी लागते.
पण आता अन्न, इंधन किंवा औषधं यापैकी काहीही देशात येऊ शकत नाही.
- हेलिकॉप्टर अपघातात सौदी राजकुमाराचा गूढ मृत्यू
- येमेनमधून आलेलं क्षेपणास्त्र सौदी अरेबियानं पाडलं
- सौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का?
संयुक्त राष्ट्रांच्या मते सौदी अरेबिया आणि सहकारी राष्ट्रांनी 2015 पासून येमेनमधल्या गृहयुद्धात हस्तक्षेप करायला सुरूवात केली.
त्यानंतर झालेल्या संघर्षात आतापर्यंत 8670 लोकांचा बळी गेला आहे.
यापैकी 60 टक्के लोक हे सामान्य नागरिक आहेत.
तसंच 49,960 लोक जखमीही झाले आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








