हेलिकॉप्टर अपघातात सौदी राजकुमाराचा गूढ मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
येमेनच्या सीमेजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सौदी अरेबियाच्या एका राजकुमारासह काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
सौदी अरेबियाच्या सरकारी न्यूज चॅनलनुसार प्रिंस मंसूर बिन मुकरीन असं मृत राजकुमाराचं नाव आहे. ते असीर प्रांताचे गवर्नर होते. प्रिंस मंसूर यांचे वडील मुकरीन अल सऊद सौदी अरेबियाचे माजी राजकुमार होते.
सौदी अरेबियाच्या दक्षिणेत आभा शहराजवळ झालेल्या या अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
या अपघातात कुणीच वाचलं नाही, असं सौदी न्यूजने म्हटलं असून या भागावर सध्या हवाई निगराणी ठेवली जात आहे.
सौदी अरेबियात लागोपाठ घडामोडी
एक दिवसाआधीच या भागात सौदी अरेबियानं एक क्षेपणास्त्र पाडलं होतं. शनिवारी संध्याकाळी येमेनमधून सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राचा राजधानी रियाधवर असतानाच सौदी अरेबियानं वेध घेतला आणि ते पाडलं होतं.

फोटो स्रोत, AFP
रियाध विमानतळाजवळ याचा जोरदार स्फोटा ऐकू आला आणि त्या क्षेपणास्त्राचे काही तुकडे विमानतळ परिसरात पडल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिल्याचं सौदीच्या अधिकृत वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
हे क्षेपणास्त्र किंग खालीद आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेनं डागण्यात आल्याचं येमेनमधील हौदी बंडखोरांशी निगडित वृत्तवाहिनीनं सांगितलं आहे.
भ्रष्टाचारविरोधी कारवाई
सौदी अरेबियात नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरोधी एजंसीनं 11 राजकुमारांसह चार मंत्री आणि डझनभर पूर्व मंत्र्यांना ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, FAYEZ NURELDINE/AFP/GETTY IMAGES
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शाही आदेशांवरून देशाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वात एक भ्रष्टाचारविरोधी समिती स्थापन करण्यात आली. या समितीची स्थापना झाल्याच्या काही तासांतच सौदी अरेबियातील नेत्यांची धरपकड सुरू झाली.
सौदीचे अरबपती राजकुमार अलवलीद बिन तलत यांनाही ताब्यात घेण्यात आलं. त्यांनी ट्विटर आणि अॅपल सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
मोहम्मद बिन सलमान यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे प्रमुख मंत्री प्रिंस मितब बिन अब्दुल्ला आणि नौदल प्रमुख अब्दुल्ला बिन सुल्ताम बिन मोहम्मद अल-सुल्तान यांनाही बडतर्फ केलं आहे.
सौदी प्रेस एजंसीनुसार, या नव्या समितीला कुणाच्याही विरोधात अटक वाँरट काढण्याचा अधिकार असून प्रवासावर बंदीही घालण्याचा अधिकार आहे. अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की ताब्यात घेतलेल्या लोकांवर कुठले आरोप लावण्यात आले आहेत.
कोण आहेत युवराज सलमान?
जानेवारी 2015 मध्ये किंग अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज यांचं निधन झाल्यानंतर मोहम्मद बिन सलमान यांचे वडील सलमान 79व्या वर्षी किंग झाले.

फोटो स्रोत, FAYEZ NURELDINE/AFP/GETTY IMAGES
याच वर्षी त्यांचे चुलत भाऊ मोहम्मद बिन नायेफ यांना हटवून मोहम्मद बिन सलमान हे क्राऊन प्रिंस अर्थात युवराज झाले. मोहम्मद बिन नायेफ यांच्याकडील गृहमंत्री पदही काढून घेण्यात आलं होतं.
त्यावेळी 31 वर्षांचे असलेले मोहम्मद बिन सलमान हे जगातील अग्रणी तेल निर्यातदार देशाचे सर्वांत प्रभावशाली व्यक्ती झाले होते.
31 ऑगस्ट 1985 ला सलमान यांचा जन्म झाला. तत्कालीन युवराज सलमान बिन अब्दुल अजीज अल सौदी यांची तीसरी पत्नी फहदाह बिन फलह बिन सुल्तान यांचे सर्वांत ज्येष्ठ पुत्र आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








