अमेरिकेच्या टेक्सासमध्ये अंदाधुंद गोळीबारात 26 ठार

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका चर्चमध्ये जमावावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 26 जण ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विल्सन काउंटी या शहरातील सदरलॅंड स्प्रिंग येथे रविवारी प्रार्थनेच्या वेळी फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हा झाला.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवार संध्याकाळी 5.30 वाजता) हल्लेखोर चर्चमध्ये घुसला आणि त्यानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
26 वर्षांच्या गोऱ्या तरुणानं हा हल्ला केला, असं पब्लिक सेफ्टी डिपार्टमेंटचे संचालक फ्रीमन मार्टिन यांनी म्हटलं. तो संपूर्ण काळ्या कपड्यात होता, असंही ते म्हणाले. असॉल्ट फायर रायफलनं त्यानं हा गोळीबार केला.
डेव्हिन पी. केल्ली असं हलेखोराचं नाव असल्याचं अमेरिकेतील माध्यमांनी म्हटलं आहे. पण, पोलिसांनी मात्र अजून त्याचं नाव जाहीर केलेलं नाही.

फोटो स्रोत, Google
गोळीबार करून हा संशयित हल्लेखोर पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असावा, असं मार्टिन यांनी सांगितलं आहे.
पण तो त्याच्याच बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळं ठार झाला की स्थानिक नागरिकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात ठार झाला, हे आताच सांगता येऊ शकत नाही, असं मार्टिन म्हणाले.
गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या हल्ल्यामुळं झालेलं नुकसान भरून निघणार नाही या शब्दांत त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या हल्ल्यातील पीडितांमध्ये पाच वर्षांच्या बालकांपासून ते 72 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
किमान 20 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती टेक्सासच्या पब्लिक सेफ्टी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्यातील 10 जणांवर सॅन अॅंटोनियामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
चर्चचे पास्टर फ्रॅंक पॉमेरॉय यांची 14 वर्षांची मुलगी अॅनाबेल या हल्ल्यात ठार झाली आहे असं एबीसी न्यूजनं म्हटलं आहे. पॉमेरॉय हे शहराबाहेर गेले होते त्यावेळी हा हल्ला झाला.
आम्ही सेमी ऑटोमेटिक गन फायरिंगचा आवाज ऐकला. आम्ही चर्चपासून 50 यार्ड (अंदाजे 150 फूट) दूर होतो असं कॅरी माटुला यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं.
सॅन अॅंटोनिया या शहरापासून 50 किमी दूर सदरलॅंड स्प्रिंग हे छोटं शहर आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. ते सध्या जपानमध्ये आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"FBI आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी रवाना झालं आहे. मी जपानमधून परिस्थितीचा आढावा घेत आहे," असं ट्वीट ट्रंप यांनी केलं.
"या हल्ल्यामागचं कारण काय होतं हे अजून कळलं नाही," असं सॅन अॅंटोनियाच्या FBI अधिकाऱ्यांनी म्हटलं.
संशयित हल्लेखोर ठार झाला असला तरी इतर शक्यतांची पडताळणी करून पाहण्यात येईल, असं FBI अधिकाऱ्यांनी म्हटलं.
गेल्या महिन्यात लास वेगास येथे एक म्युझिक फेस्टिवलदरम्यान झालेल्या गोळीबारात 58 जण ठार झाले होते.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








