You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुप्रिया सुळे : त्यांच्या विचाराचे लोक काहीही बोलतात तेव्हा पाठराखणीचं पाप भाजप नेते करतात
“पहिल्यांदाच असं झालं असेल की विरोधी पक्षनेत्याविरोधात पूर्ण ताकदीनिशी सत्ताधारी उतरलेत. जर कुणाचं काही वेगळं मत असेल तर महाराष्ट्रात अनेक इतिहासकार आहेत त्यांच्याबरोबर ज्यांना ज्यांना या विषयाची चर्चा करायची आहे. आपण एक चांगलं लेक्चर सीरिज करु शकतो. चर्चासत्र ठेऊ शकतो. हा एक भाग झाला. महाराष्ट्रात जेव्हा त्यांच्या विचाराचे लोक काहीही बोलतात तेव्हा त्यांची पाठराखण करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाचे लोक करत असतात”, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्या बारामती इथे बोलत होत्या.
अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भातल्या अधिवेशनामधील उद्गारासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
त्या पुढे म्हणाल्या, “इतिहास खूप महत्त्वाचा असतो. काय सत्य आहे हे पुढच्या पिढीला कळायला हवं. पुढच्या पिढीला आपण महागाई आणि नोकऱ्या या मिळाल्या नाहीत तर आपली पुढची पिढी करणार काय? देशातली महागाई आणि बेरोजागारीच्या स्थितीबद्दल चित्र स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारच्याच डेटामधून या गोष्टी समोर आल्या आहेत. या विषयावर कोणाला चर्चा करायची असेल तर केलीच पाहिजे”.
“भारतीय जनता पक्ष बेरोजगारी आणि महागाईविरोधात आंदोलन करायला उतरला असता तर ते जास्त संयुक्तिक झालं असतं. स्वत:च्या चुका आणि अपयश झाकण्यासाठी ते मुद्दाम विरोधी पक्ष नेत्यांच्या विरोधात कटकारस्थान करत आहेत. त्यांना बोलण्यासारखं काहीच नाही. देशाची अर्थव्यवस्था प्रचंड अडचणीत आहे. हे मी वारंवार सांगते आहे. जगातील मंदीसंदर्भातील अहवालामध्येही याची नोंद झालेली आहे. जगात मंदी आली तर भारतालाही त्याचा फटका बसणार. सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, की डॉलर गिरता है तब देश की प्रतिष्ठा गिरती है. डॉलर रुपयाच्यासमोर सशक्त होतोय.
आमची सरकारला सहकार्य करायची भूमिका आहे. आमची केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला सहकार्य करायची भूमिका आहे. माजी पंतप्रधान आणि जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक असलेल्या मनमोहन सिंगांकडून या परिस्थितीवर काय उपाय करता येईल हे समजून घ्यायला हवं”, असं त्या म्हणाल्या.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविरोधात महाराष्ट्रात निदर्शनं सुरू आहेत. गेले काही दिवस महापुरुषांबद्दल नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांची चर्चा सुरू आहे.
महापुरुषांच्या अवमानाबद्दलच अजित पवार विधानसभेत बोलत होते. यावेळेस त्यांनी छ. संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं.
अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेत तात्काळ प्रतिक्रिया उमटली नसली तरी अधिवेशनानंतर त्यावर राजकीय नेते व्यक्त होत आहेत. संभाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावर अजित पवारांनी माफी मागावी यासाठी दोन दिवस आंदोलनं सुरू आहेत.
‘धरणवीर असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये !’ अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटरवर दिली आहे.
2 जानेवारीपासून पुणे, वढू तुळापूर, अमरावती, नाशिक, सोलापूर, चेंबूर अशा अनेक ठिकाणी अजित पवार यांचा निषेध करण्यात आला आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
अजित पवार यांच्यावर टीका होऊ लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
काल 2 जानेवारी रोजी जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे.
"छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो,” आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे. आव्हाड यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्य केल्याबद्दल त्यांचाही निषेध केला जात आहे.
भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ते ट्वीटरवर लिहितात, “आव्हाड, ठराविक मतांसाठी इतिहासाचे विकृतीकरण करून अकलेचे किती तारे तोडणार आहात ? औरंगजेबाच्या प्रेमाखातर अजून कोणत्या थराला जाणार आहात ? बेताल वक्तव्य करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या @Awhadspeaks यांचा निषेध !”
“इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. ज्या औरंगजेबाने छ. शिवाजी महाराजांना त्रास दिला, माताभगिनींवर अत्याचार केले, महाराष्ट्रातली देवळं तोडली. अशा औरंगजेबाचा पुळका ज्यांना येतो त्यांची वृत्ती कळून येते”, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. तर अमोल कोल्हे यांनी एका व्हीडिओद्वारे अजित पवार यांची पाठराखण केली आहे.
भाजपा मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार लिहितात, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत ! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.”
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवारांचे वक्तव्य हे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण' अशा पद्धतीचे असल्याचं म्हटलं.
"आपण चुकीचे बोललो हे अजित पवारांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे कालही धर्मवीर होते, आजही आहेत आणि इतिहासाच्या अखेरपर्यंत राहतील," असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं.भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केल्यामुळे अजित पवारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हटलं.
अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, असंही तुषार भोसले यांनी म्हटलं.
अभ्यासाशिवाय बोलू नका- माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
राज्यसभेचे माजी सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं,संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहेत हे नक्की आहे,संभाजी महाराज यांनी धर्माचे रक्षण केलं हे कुणी नाकारू शकत नाही,त्यामुळे संभाजी महाराज हे धर्मवीर होते.
“मी नेहमी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणून भाषणाची सुरुवात करतो यापुढे देखील करेन अजित पवार यांनी कोणता संदर्भ देऊन ते बोलले हे माहीत नाही,अभ्यास असल्याशिवाय कोणतंही वक्तव्य करू नये.” “अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा पूर्णपणे चुकीचे आहे, सभागृहात ज्यावेळी बोलताना अभ्यास करूनच बोलावे लागते,माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती आहे,की इतिहासाबद्दल बोलताना इतिहास संशोधक यांच्याकडून माहिती घेऊन बोलले पाहिजे. धर्माचे रक्षक नव्हते हे बोलणं पूर्णपणे चुकीचे आहे,संभाजी महाराज केवळ धर्मवीर होते हे म्हणणारे देखील चुकीचे.धर्माच्या रक्षकाबरोबर स्वराज्यरक्षक देखील होते.”
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)