You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आता गोवरची साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.
गोवर (measles) हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो. पण जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं?
जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून.
पाहा ही सोपी गोष्ट
1. गोवर काय आहे?
गोवर हा साथीचा आजार आहे, जो पॅरामिक्सोव्हायरस मुळे पसरतो.
गोवर झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर हवेतून हे विषाणू नाकावाटे शरीरात प्रवेश करतात आणि साधारणपणे दुसर्या आठवड्यात गोवरची लक्षणं दिसू लागतात.
गोवरग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कानेही गोवरची लागण होऊ शकते.
2. गोवरची लक्षणं काय?
लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी – ताप, खोकला, घसा दुखणं, अंग दुखणं, डोळ्यांची जळजळ होणं, डोळे लाल होणं, अशी लक्षणं दिसून येतात.
त्यानंतर 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येतं. कधीकधी तोंडातही पांढरे डाग दिसतात.
3. लक्षणं आढळल्यावर काय करायचं?
गोवरची लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. रक्त तपासणी करून रोगाचं निदान झाल्यावर लगेच औषधं सुरू करा.
घरगुती उपचारांच्या भानगडीत पडू नका, कारण तोवर रोगाची तीव्रता वाढू शकते, आणि पुढे यातून न्यूमोनियाही होऊ शकतो.
4. गोवर कुणाला होऊ शकतो?
गोवरचा सर्वांत जास्त धोका लसीकरण न झालेल्या लहान मुलांना असतो. त्यापाठोपाठ गरोदर महिलांनाही गोवरची लागण होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय लसीकरण न झालेली कुठलीही व्यक्ती गोवरच्या तावडीत सापडू शकते.
5. गोवरची लस कोणती? किती डोस घ्यायचे?
बाळांना गोवर आणि रुबेला आणि गालगुंड अशा तीन रोगांवरची एकत्रित लस, अर्थात MMR vaccine दोन टप्प्यांमध्ये दिली जाते - पहिला डोस बाळ साधारण 9 ते 12 महिन्यांचं असताना तर दुसरा डोस 16-24 महिन्यांचं असताना.
6. लहानपणी लस घेतली असेल तर आत्ता पुन्हा घ्यावी का?
नाही. जर लहानपणी तुम्ही लशीचे दोन्ही डोस घेतले असतील तर तुम्हाला गोवरपासून आयुष्यभरासाठी संरक्षण मिळतं.
7. व्हिटामिन ए चा डोस कशासाठी?
अनेकदा ज्या बालकांमध्ये व्हिटामिन ए ची कमतरता असते, त्यांच्यात गोवरची लक्षणं जास्त तीव्रतेने दिसतात. शिवाय या रोगाची लागण झाल्यावर शरीरातले द्रव पदार्थ कमी होतात, ज्यामुळे व्हिटामिन ए ची पातळी घसरते.
यासाठीच गोवरच्या रुग्णांना पोषक आहार सुरू ठेवून, दिवसाला व्हिटामिन ए चा एक डोस दिला जातो. यामुळे मृत्यूचं प्रमाणही कमी झाल्याचं आढळून आलं आहे.
8. कडुनिंब, मंतरलेलं पाणी खरंच फायद्याचं?
अनेकदा पुरळ आणि ताप आला की खाज सुटते, त्यामुळे साहजिकच पहिला घरगुती उपाय म्हणजे कडुनिंबाचा पाला अंघोळीच्या पाण्यात टाकला जातो.
याविषयी महाराष्ट्राचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, “याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. हा रोग विषाणूजन्य आहे आणि याची लक्षणं पाहून उपचार केले जातात. पण पुरळ येतं त्या ठिकाणी खाज सुटते म्हणून पू होऊ नये, यासाठी लिंबाचा पाला जंतूनाशक म्हणून वापरला जातो."
9. गोवर जागतिक साथ आली आहे का?
गोवरची सध्या जागतिक साथ नाहीय, पण अनेक देशांमध्ये ठिकठिकाणी याचा उद्रेक पाहायला मिळतोय.
अगदी मुंबईतही काही मृत्यू झाले आहेत. याचं एक कारण म्हणजे कोरोना साथीदरम्यान जगभरात अनेक गोष्टी खोळंबल्या, त्यातच सुमारे 4 कोटी मुलांचं गोवरचं लसीकरण झालं नाही, असा WHOचा अंदाज आहे.
गोवरपासून हर्ड इम्युनिटीसाठी समाजात 95 टक्के लसीकरण झालेलं असणं गरजेचं असतं, पण सध्या हे प्रमाण जगभरात 81 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने, गोवरचा उद्रेक ठिकठिकाणी होऊ शकतो, अशी भीती WHOने व्यक्त केली आहे.
डॉ. प्रदीप आवटे सांगतात की “महाराष्ट्रात सध्या लसीकरणाची स्थिती ही चांगली आहे, सुमारे 90 टक्के. पण काही पॉकेट्समध्येच हा आकडा सरासरीपेक्षा कमी आहे, त्यामुळे तिथे उद्रेक पाहायला मिळतोय. मात्र देशात अनेक राज्यांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 5 ते 6 पट जास्त गोवरचे रुग्ण पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे देशपातळीवर सध्या या लसीकरण मोहिमेला गती देण्याचं काम सुरू आहे.”
10. गोवर किती घातक?
पूर्वी गोवरची साथ दर दोन-तीन वर्षांनी यायची, आणि यामुळे जगभरात दरवर्षी 26 लाख मृत्यू व्हायचे. 1963 साली गोवरवरची लस शोधण्यात आल्यानंतर जगभरात लसीकरण मोहीम सुरू झाली.
पण आता लस उपलब्ध असतानाही एकट्या 2021 मध्ये जगभरात 1 लाख 28 हजार मृत्यू गोवरमुळे झाले होते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बाळाची MMRची लस घ्यायची राहिली असेल तर न चुकता त्याला द्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)