You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियासोबत युद्धासाठी दक्षिण कोरियाचे तरुण तयारी का करत आहेत?
- Author, जुना मून
- Role, बीबीसी कोरियन
किम जुंग-हो यानं घरातच आपत्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या वस्तूंचं किट तयार केलं आहे. यदाकदाचित उत्तर कोरियासोबत दक्षिण कोरियाचं युद्ध सुरू झालं तर त्यासाठीची तयारी तो करतो आहे.
या 30 वर्षीय तरुणाला वाटतं की आज अशक्य वाटणारं हे युद्ध कधी झालंच, तर या तयारीचा त्याला पहिल्या 72 तासात जगण्यासाठी उपयोग होईल.
पाणी आणि शिजवून वाळवलेल्या भातासारख्या आपत्कालीन खाता येतील अशा गोष्टींची तयारी त्यानं करून ठेवली आहे. शिवाय नकाशा, होकायंत्रही ठेवलं आहे, कारण युद्धजन्य परिस्थितीत मोबाईल नेटवर्क किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद पडण्याची शक्यता असते.
इतकंच नाही तर त्यानं शरीरासाठी चिलखत आणि गॅस मास्कचीदेखील तयारी केली आहे. त्याचं म्हणणं आहे की लष्कराकडं कदाचित पुरेशी उपकरणं नसतील, त्यामुळं स्वत:च तयारी करणं योग्य ठरेल. किम जुंग-हो सारखेच दक्षिण कोरियातील 31 लाख लोक देशाच्या राखीव सैन्याचा भाग आहेत.
''मी सोल शहराच्या मध्यवर्ती भागात राहतो. फक्त एका क्षेपणास्त्राच्या हल्ल्यानं हे सारं काही नष्ट होईल या विचारानंच मला कापरं भरतं,'' असं एक विदयार्थी सांगतो, तो पदवीसाठी हायड्रोजन ऊर्जेचा अभ्यास करतो आहे.
सोल शहर दक्षिण कोरियाची राजधानी आहे. दक्षिण आणि उत्तरकोरियादरम्यान 1953 मधल्या तहानुसार सीमाभागात जे लष्कर विरहित क्षेत्र घोषित झालं, त्यापासून सोल शहर 30 मैल दूर, म्हणजे काहीसं सुरक्षित अंतरावर आहे.
मात्र आता कोरियन द्वीपकल्पात तणाव वाढतो आहे. अण्वस्त्रधारी उत्तर कोरियानं यावर्षी आतापर्यंत चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. एप्रिलमध्ये नवीन घन इंधन असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. हे क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या ग्वाम शहरापर्यत पोचू शकतं.
(उत्तर कोरियासह, अमेरिका, युक्रेन, रशिया, इस्रायल, पॅलेस्टाईन यांच्यासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा- आंतरराष्ट्रीय बातम्या)
अशात उत्तर कोरियासोबत युद्ध झालंच, तर त्यासाठी किम जुंग हो सारखे तरुण तयारी करत आहेत. सध्या त्यांची संख्या कमी असली तरी ती वाढते आहे.
आपात्कालीन स्थितीसाठी अशी तयारी करणाऱ्यांना इंग्रजीत प्रेपर्स असंही म्हणतात.
काकाओ या दक्षिण कोरियात लोकप्रिय असलेल्या सोशल मेसेजिंग अॅपवर सध्या प्रेपर्सचे असे चार गट आहेत ज्यात जवळपास 900 सदस्य आहेत
त्याचबरोबर ''द सर्व्हायव्हल स्कूल-दॉम कॅफे'' या 2010 पासून सुरू असणाऱ्या आणि प्रेपर गटात 25,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत.
'प्रेपर्स'ची वाढती संख्या
दक्षिण कोरियात अशा प्रेपर्सच्या संख्येत होणारी वाढ उत्तर कोरियाच्या अधिक आक्रमक भूमिकेमुळं दोन्ही देशात वाढलेला तणाव अधोरेखित करते.
जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाचे प्रमुख किन जोंग उन यांनी दक्षिण कोरिया हा आपला पहिल्या क्रमांकाचा शस्त्रू असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी असंही जाहीर केलं की दोन्ही कोरियांचं शांततेच्या मार्गानं एकीकरण होणं आता अशक्य आहे.
ही अभूतपूर्व बाब असल्याचं नाम सुंग वूक सांगतात. सुंग वूक कोरिया विद्यापीठात राजकीय अर्थशास्त्र शिकवतात.
म्हणजे आता उत्तर कोरिया दक्षिण कोरियाला आपलं भावंड मानत नाही आणि त्याचा अर्थ असा होतो की उत्तर कोरिया दक्षिण कोरियाविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतो.
केबीएस पब्लिक मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटनं केलेल्या सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींपैकी जवळपास 75 टक्क्यांहून अधिक जणांना सुरक्षेविषयी चिंता वाटते. 2021मध्ये हे सर्वेक्षण सुरू झालं, तेव्हाच्या तुलनेत ही संख्या 19 टक्क्यांनी वाढली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्ध अशा जागतिक संघर्षांमुळेही कोरियातील तरुणांना भूराजकीय धोक्यांविषयी चिंता वाटते आहे, असं 'द सर्व्हाव्हल स्कूल-दॉम कॅफे' चे अॅडमिन वू सिआँग यॉप सांगतात.
युक्रेन युद्धाची सुरूवात झाल्यानंतर एका चॅटग्रुपची सुरूवात करण्यात आली. दोन वर्षात या चॅटग्रुपमधील सदस्यांची संख्या दहा पटीने वाढून 500 वर पोचली आहे.
''अशा संभाव्य युद्धासाठी काही तयारी करण्याचा विचार मी माझ्या आयुष्यात कधीही केलेला नाही. पण जरा अवतीभोवती, जगाकडं पाहा. अनेक ठिकाणी युद्ध सुरू झाली आहेत,'' असं पार्क वी बिन सांगते. ती फिटनेस ट्रेनर म्हणून काम करते आणि गेल्या वर्षीच तिनं सीपीआरचं प्रशिक्षण घेतलं होतं.
प्रेपर्सच्या गटांमधले काही सदस्य उत्तर कोरिया बरोबर युद्धाची सुरुवात होण्याआधीच देश सोडू इच्छितात. त्यासाठी ते इतर भाषा शिकत आहेत, पैशांची बचत करत आहेत आणि नवीन कौशल्यं शिकत आहेत.
जे देश सुरक्षित मानले जातात तिथं सुरक्षित आसरा, नागरिकत्व मिळावं यासाठी त्यांनी हे धोरण अंमलात आणलं आहे.
''मी ऐकलं आहे की पॅराग्वेमध्ये जवळपास 1 कोटी वॉन (7,200 डॉलर किंवा 5,800 युरो)मध्ये कायमस्वरुपी नागरिकत्वं मिळू शकतं,'' असं चॅटग्रुपमधील एका सदस्यानं लिहिलं आहे.
आणखी एक सदस्य नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतो की हॉसिआँग शहरातील त्याच्या दोनमजली घराखाली तो एक बंकर बांधतो आहे. बंकरला मजबूती देण्यासाठी त्याने जाड क्रॉंकीटचा थर दिला आहे. त्याचबरोबर या बंकरमध्ये पॉवर जनरेटर आणि स्वयंपाकाची उपकरणे असतील. पत्नी आणि सहा वर्षाच्या मुलासोबत इथे दीर्घकाळ आसरा घेण्याची वेळ आली, तर त्याची तयारी म्हणून तो हे करतो आहे.
या 42 वर्षी सदस्यानं दोन वर्षापूर्वीच ही जमीन विकत घेतली आहे. त्याचं हे घर पिआँगतेक इथल्या अमेरिकन लष्करी तळापासून खूप दूर आहे. युद्ध सुरू झाल्यास या तळावर बॉम्बहल्ला होईल असं त्याला वाटतं.
बऱ्याच कोरियन नागरिकांना वाटतं की अशी तयारी करणारे प्रेपर्स हे अती संवेदनशील लो आहेत. अगदी किमलाही त्याच्या आईनं सर्व्हाव्हल किटवर अनावश्यक पैसा खर्च केल्याबद्दल फटकारलं आहे.
''सध्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियातील संबंध चांगले नसले तरी मला युद्धाची चिंता कधीच वाटली नाही. मी माझं आयुष्य नेहमीप्रमाणंच जगतो आहे,” असं ली यंग-आह या मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या 28 वर्षीय युवकानं बीबीसीला म्हणाला.
दोन्ही कोरियन देशांतलं युद्ध तांत्रिकदृष्ट्या मिटलेलं नसलं, तरी दक्षिण कोरिया आता अधिक गतीमान आणि समृद्ध लोकशाही देश म्हणून प्रगती करतो आहे.
''कित्येक दशकांच्या शांततेमुळं दक्षिण कोरियन लोकांना युद्धाचा तिटकारा आला आहे आणि त्यामुळे लोक काहीसे शिथील राहू शकतात,'' असं मत वू याने व्यक्त केलं.
वाढत चाललेल्या भूराजकीय तणावामुळं प्रेपर्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन झपाट्यानं बदलतो आहे, असं त्याला वाटतं.
स्वत:च्या किटचं समर्थन करताना किम सांगतो, ''तुम्ही विमानातून प्रवासस करता तेव्हा ते तुम्हाला सीट बेल्ट लावायला सांगतात की नाही? अशी सुरक्षा उपकरणं विकत घेणं म्हणजे कारमधील तुमचं सीटबेल्ट बांधण्यासारखंच आहे.''
तर पार्क यांच्या मते ''हे विमा विकत घेण्यासारखंच आहे. मात्र इतर विम्याप्रमाणंच याचा कधी वापर करावा लागू नये असंच सर्वांना वाटतं.”