गुलामीतून सुटली, अपघातानं वेश्याव्यवसायात गेली आणि तिथं 'सम्राज्ञी' बनली

    • Author, युआन फ्रान्सिस्को अलोन्सो
    • Role, बीबीसी न्यूज वर्ल्ड

महिलांच्या संघर्षाच्या कहाण्या, मग त्या जगाच्या कोणत्याही भागातील असोत, थक्क करणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या असतात. अमेरिकेसारख्या जगातील सर्वात प्रगत, शक्तीशाली देशात 19व्या शतकात काय घडत होतं याची झलक देणारी प्रिसिला हेनरी नावाच्या महिलेच्या अद्भूत आयुष्याची ही कहाणी आहे.

प्रिसिला हेनरी हे नाव बहुतांश अमेरिकेसाठी आणि उर्वरित जगासाठी अपरिचित आहे.

ही एक 19 व्या शतकातील अमेरिकन-आफ्रिकन महिलेची कथा आहे. ही काही एखाद्या हॉलीवूडच्या चित्रपटाची कथा नाही. मात्र त्याहूनही अधिक थक्क, स्तिमित करणारी कथा आहे.

जन्मानंतर हेनरी तिचं बहुतांश आयुष्य गुलाम म्हणूनच जगली होती. मात्र गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर तिनं त्या संधीचं सोनं केलं आणि जिथं तिचा जन्म झाला होता ते घरच तिनं विकत घेतलं. तिनं एक असा व्यवसाय चालवला ज्यावर तोपर्यंत फक्त गोऱ्या कातडीच्या लोकांचंच वर्चस्व होतं. तो म्हणजे वेश्याव्यवसाय.

हेनरीच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीनं अनेक तज्ज्ञांशी संवाद साधला आणि असंख्य कागदपत्रांमधून माहिती मिळवली. हेनरी हे एक असं व्यक्तिमत्व आहे जिनं फक्त समाजातील विविध वंशाच्या लोकांच्या ऐक्यासाठी काम केलं नाही तर वेश्या व्यवसायाची ती जनक आहे. त्याचबरोबर लैंगिक स्वातंत्र्याची ती समर्थक होती.

लांबचा प्रवास

अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठातील प्राध्यापिका असलेल्या अॅशले बी कंडिफ लिहितात की, प्रिसिला हेनरीचा जन्म अमेरिकेतील अलाबामामधील फ्लोरेन्स शहरातील एका मळ्यात झाला होता. अमेरिकेतील वेश्यासंस्कृती या आपल्या पीएच.डीसाठीच्या प्रबंधात अॅशले यांनी हेनरीबद्दल लिहिलं आहे.

सहा भावंडांमध्ये सर्वात मोठी असलेल्या हेनरीनं 1865 पर्यत जेम्स जॅक्सन या दक्षिण अमेरिकन मळेवाल्याच्या शेतात काम केलं होतं. कारण आपल्या ताब्यातील हेनरी आणि इतर गुलामांना त्यांच्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करण्यास जेम्स जॅक्सन तयार नव्हता.

अब्राहम लिंकन यांच्या प्रशासनानं जरी दोन वर्षांआधी मुक्तीच्या घोषणापत्राद्वारे अधिकृतरित्या गुलामांच्या प्रथेवर बंदी घातली असली तरी जेम्स जॅक्सन ते मानण्यास तयार नव्हता.

नंतर गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर हेनरी माऊंड सिटीला गेली. मिसूरी प्रांतातील हे शहर त्यावेळेस हे शहर सेंट लुईस या नावानं ओळखलं जात होतं. हेनरीचं जन्मस्थळ असलेल्या फ्लोरेन्सच्या उत्तरेला 615 किमी अंतरावर हे शहर होतं. तिथं तिनं मोलकरीण म्हणून आयुष्याची सुरूवात केली.

हेनरी सेंट लुईसला गेली. कारण अमेरिकेच्या इतर भागांपेक्षा तिथं नोकरांना, मजूरांना अधिक कमाईची संधी होती, असं अमेरिकन पत्रकार जुलियस हंटर यांनी एसटीएलपीआर या रेडिओ समूहाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ज्युलिअस यांनी 'प्रिसिला अॅंड बेब : फ्रॉम द शॅकल्स ऑफ स्लेव्हरी टू मिलिअनेर मॅडम्स इन व्हिक्टोरियन सेंट लुईस' हे पुस्तकदेखील लिहिलं आहे.

हेनरी आणि आणखी एक महिला साराह बेब कॉनर, या दोघींवर सहा वर्ष संशोधन करताना ज्युलिअसनं असंख्य ग्रंथालयं, सरकारी कागदपत्रं, चर्चची कागदपत्रं आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले लेख धुंडाळले होते.

वेश्याव्यवसायाच्या अंतरंगात

गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर हेनरीनं काही काळ लॉंड्रीमध्ये आणि हॉटेलच्या खोल्यांची सफाई करण्याचं काम केलं. त्यानंतर तिला एका चांगली कमाई करून देणाऱ्या व्यवसायाचा शोध लागला, तो म्हणजे सेक्स.

मिसिसिपी आणि मिसूरी नद्यांच्या खोऱ्यातील इतर शहरांप्रमाणं सेंट लुईसमधील बाजारपेठ त्यावेळेस भरभराटीला आली होती.

हंटर सांगतात, ''19 व्या शतकात फक्त साडेतीन लाख लोकसंख्या असणाऱ्या सेंट लुईस शहरात 5,000 वेश्या होत्या.''

अमेरिकेतील यादवी युद्ध संपल्यानंतर सेंट लुईसमध्ये गुन्हेगारी वृत्तीची, अविवेकी, गुलामगिरीतून मुक्त झालेली, साहसी आणि शिकारी लोकं गोळा झाली होती. त्याच्यासोबत शहरात वेश्याव्यवसायदेखील वाढला होता. या व्यवसायातून चांगली कमाई होत होती. 1870 मध्ये स्थानिक प्रशासनानं तात्पुरत्या स्वरुपात वेश्याव्यवसायाला कायदेशीर परवानगी दिली होती. वेश्यांची घरं आणि नोंदणीकृत वेश्या यांच्यावर करदेखील आकारला जात होता.

हेनरी काही ठरवून वेश्याव्यवसायात आली नव्हती. मात्र एका शोकांतिकेमुळं तिचा वेश्याव्यवसायात प्रवेश झाला. ती ज्या हॉटेलमध्ये काम करत होती ते हॉटेल एका जाळपोळीच्या घटनेला बळी पडलं आणि हेनरीचा वेशाव्यवसायात प्रवेश झाला.

तसं पाहता हेनरी काही दिसायला खूप सुंदर, सुडौल बांध्याची होती असं अजिबात नाही. मात्र तिचं व्यक्तिमत्व अगदी कणखर असल्याची काही वर्णनं आहेत. थॉमस होवार्ड नावाचा एक सैनिक तिचा प्रियकर होता. त्याच्याबरोबरच्या नात्यातूनच वेश्याव्यवसायाच्या दुनियेचे दरवाजे तिच्यासाठी खुले झाले.

अर्थात या प्रेमाच्या आणि व्यावसायिक नात्याचा शेवट दुखद झाला. होवार्ड हेनरीच्या मालमत्तेची देखभाल करत होता. मात्र दुर्दैवानं त्यानं तिची फसवणूक केली. हेनरीचा खून झाल्याचंदेखील म्हटलं गेलं. प्रोफेसर कंडिफ यांनी त्यांच्या संशोधनात लिहिलं आहे की फ्लोरेन्स विलियम्स या आधी सैनिक आणि नंतर स्वयंपाकी झालेल्या माणसाच्या सोबतीनं आपण हेनरीला विष दिल्याचा दावा हेनरीच्या भाचीनं केला केला.

1895 मध्ये हेनरीच्या मृत्यूनंतर सेंट लुईसमध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्रकात तिच्या व्यवसायाबद्दल छापून आलं होतं. स्थानिक दस्तावेजांमध्ये नोंदवण्यात आलेल्या माहितीनुसार हेनरीनं 19 ते 30 वर्षादरम्यान वय असणाऱ्या पाच कृष्णवर्णीय महिलांबरोबर वेश्यागृह चालवलं होतं. हे वेश्यागृह गोऱ्या, कृष्णवर्णीय आणि साहसी लोकांसाठी बैठकीचं, भेटण्याचं ठिकाण बनलं होतं.

''त्या काळात सेंट लुईस शहरात एलिझा हेक्रॉफ्ट नावाची एक महिला होती. ती वेश्यागृहांची राणी होती. 1871 मध्ये तिचा मृत्यू झाला. त्या परिस्थितीत हेनरी आणि तिच्या समर्थकांना कृष्णवर्यीय महिलांनी वेश्याव्यवसायात उतरण्याची चांगली संधी दिसली. मृत्यूच्या वेळेस हेक्रॉफ्टची एकूण संपत्ती 3 कोटी डॉलर इतकी होती,'' असं हंटर सांगतात.

व्यावसायिक साम्राज्य

तसं तर सेंट लईसमधील प्रशासनाला पारंपारिकदृष्ट्या वेश्याव्यवसायाबाबत कोणतीही अडचण नव्हती. मात्र यात एक अपवाद होता तो म्हणजे वंशवादाचा. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर अनेक कायदे करण्यात आले होते. ज्यात दुसऱ्या देशातील नागरिकता असणाऱ्या (रंग किंवा वंशाच्या आधारे) व्यक्तीशी विवाह करणाऱ्याला कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली होती. इतकंच काय इतर वंशाच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यावरदेखील कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.

प्रशासनाकडून होणारा त्रास टाळण्यासाठी हेनरीनं गोऱ्या आणि कृष्णवर्णीय लोकांसाठी वेगवेगळी वेश्यागृहं चालवली होती. यात गोऱ्या माणसांना दोन्ही प्रकारच्या वेश्यागृहात जाण्याची परवानगी होती. मात्र कृष्णवर्णीयांना मात्र ही सूट नव्हती.

''गोऱ्या लोकांसाठी व्यवसाय करत तिनं व्यवसाय वाढवला, मात्र तिनं कृष्णवर्णीयांच्या विरोधात असणारे कायदे मोडले नाहीत,'' असं कंडिफ सांगतात.

''हेनरीला वाटायचं की हे कायदे कृष्णवर्णीय पुरुषांना गोऱ्या महिलांशी बोलण्यापासून रोखतात. गोऱ्या लोकांसाठी मात्र अशा प्रकारचे कायदे नाहीत,'' असं कंडिफ पुढं सांगतात.

''वंशाधारित वेश्यागृहं चालवण्यासाठी हेनरीनं पोलिसांशी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले होते. त्यामुळंच तिचा व्यवसाय सुरळीतपणं सुरू होता.'' असं कंडिफ यांनी त्यांच्या संशोधनात म्हटलं आहे.

या धोरणामुळंच हेनरीला तिच्या व्यवसायाचा आणखी विस्तार करता आला. दिवस लोटले तसे तिनं सेंट लुईसमध्ये अनेक घरं विकत घेतली होती. त्या घरांचं रुपांतर तिनं वेश्यागृहात केलं होतं. काहीवेळा तिनं ही घरं वेश्यागृह चालवणाऱ्या तिच्या सहकाऱ्यांना भाडेतत्त्वावरदेखील दिली होती.

शिक्षणाचा अभाव ही बाब महिलांना संपत्ती निर्माण करण्यास रोखू शकत नाही. 1895 मध्ये हेनरीचा मृत्यू झाला त्यावेळेस तिच्याकडे तब्बल 1 लाख अमेरिकन डॉलर्सची संपत्ती जमा झाली होती. आज त्याचं मूल्य 37 लाख अमेरिकन डॉलर्स इतकं आहे. म्हणजेच जवळपास 30 कोटी रुपये.

''प्रत्येकाशी उत्तम संबंध राखत हेनरीनं व्यवसाय वाढवला होता. वेश्याव्यवसाय चालवत असताना तिनं लैगिंक संबंधांबाबतची मर्यादा ठेवली नव्हती. त्यामुळंच त्याबद्दल कुठंही लिहिलं जात नाही.'' असं अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक, माली कॉलिन्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

''बाजारात कशाची मागणी आहे याचं हेनरी पूर्ण आकलन होतं. मिसिसिपी नदीच्या खालच्या अंगाला सेंट लुईस शहर होतं. व्यापारी आणि खलाशी या शहरात व्यापारासाठी येत असत. याच गोष्टीचा फायदा घेत हेनरीनं वेश्यागृहांची वाढ होणाऱ्या या भागात वेश्याव्यवसायावर एकहाती वर्चस्व मिळवलं. तिच्या मालकीची असंख्य वेश्यागृह होती.'' असं कॉलिन्स सांगतात.

आयुष्याच्या अखेरच्या काळात हेनरी आपल्या जन्मस्थानी म्हणजे अलाबामा इथं परतली. मात्र यावेळेस ती एक मोलकरीण नव्हती तर एक मालक बनून आली होती.

विशेष गोष्ट म्हणजे ज्या मळ्यात ती आणि तिची भावंड जन्माला आली होती, जिथं ते आयुष्याचा बराच काळ गुलाम म्हणून जगले होते, तोच मळा, मालमत्ता हेनरीनं विकत घेतली.

कॉलिन्स पुढं सांगतात, ''राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर प्रसारमाध्यमांनी या गोष्टीची दखल घेतली होती. त्यांनी या घटनेचं वर्णन करताना म्हटलं की पुढील शतकाची सुरूवात होण्याआधी कृष्णवर्णीय पुरुष आणि महिलांच्या आयुष्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा क्षण आहे.''

अर्थात त्यावेळच्या प्रसारमाध्यमांनी हेनरी आणि तिच्या व्यवसायातील अधिपत्यावर मात्र लक्ष केंद्रित केलं नव्हतं.

''दुष्ट आणि उपद्रवी म्हातारी प्रिसिला हेनरीचा मृत्यू-दुष्ट प्रिसिला हेनरी मरण पावली,'' हेनरी मरण पावल्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी अशा आशयाचे मथळे दिले होते. तिच्या विचारांबाबत नकारात्मक दृष्टीकोन बाळगण्यात आला होता.

काळ पुढे लोटला तसा हेनरीच्या आठवणी विस्मृतीत गेल्या. मात्र जेव्हा हेनरीचा मृत्यू झाला तेव्हा ती किरकोळ गोष्ट नव्हती.

न्यूयॉर्कमधील वृत्तपत्रांनी तिच्या मृत्यूची बातमी दिली होती. सेंट लुईसच्या रस्त्यांवर तिला शेवटचा निरोप देण्यासाठी शेकडो लोकांनी रांगा लावल्या होत्या, अशी माहिती सेंट लुईस हिस्टोरिकल प्रेस असोसिएशनद्वारे प्रकाशित ''पायोनिअर्स, रुल ब्रेकर्स अॅंड रेबल्स: 50 अनस्टॉपेबल वुमेन ऑफ सेंट लुईस'' या पुस्तकात दिली आहे.