गाझाच्या भग्न शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावर न फुटलेले बॉम्ब, नागरिकांवर जीवघेणं संकट

इस्रायलच्या लष्करानं एप्रिलच्या सुरुवातीला गाझामधील खान युनूस शहरातून बहुतांश सैनिक परत बोलावले आहेत. त्यानंतर बॉम्ब हल्ल्यांमुळं या शहराची झालेली भग्नावस्था दर्शवणारे फोटो जगभरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

विस्थापित पॅलिस्टिनी त्यांच्या घरी परतत असून, पुन्हा तिथं काय करता येईल याचा अंदाज ते घेत आहेत. पण याठिकाणी ठिकठिकाणी पडलेले स्फोट न झालेले बॉम्ब हा त्यांच्यासाठी मोठा धोका आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी प्रकरणांच्या समन्वय कार्यालयानं (UNOCHA) नुकताच खान युनूस या ठिकाणी आढावा घेतला आहे.

"रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात स्फोट न झालेले बॉम्ब आणि दारुगोळा पडलेला आहे. त्यामुळं नागरिकांना धोका होऊ शकतो," असं या कार्यालयानं निवेदनात म्हटलं आहे.

या पथकाला मुख्य चौक आणि शाळांच्या आतमध्ये 450 किलो वजनाचे स्फोट न झालेले बॉम्ब आढळून आले आहेत.

संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलच्या लष्करानं (IDF) याठिकाणी हजारो बॉम्ब टाकले असल्याचं लष्करातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

स्फोट न झालेले बॉम्ब बाजुला करून नागरिकांना संरक्षण देणारं संयुक्त राष्ट्रांचं एक खास पथक गाझामध्ये आहे. यूएन माइन अॅक्शन सर्व्हिस (UNMAS) असं या पथकाचं नाव आहे.

चार्ल्स (मुंगो) बिर्च हे संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेचे प्रमुख आहेत. युक्रेनच्या तुलनेत गाझामध्ये खूप जास्त प्रमाणात ढिगारा असल्याचं त्यांचं मत आहे. ते म्हणतात की, "याठिकाणी अनेक प्रकारची स्फोटकं आहेत. त्यात मोठ्या आकाराच्या एअरक्राफ्ट बॉम्बसह, रॉकेट आणि इतर शस्त्रांचा समावेश आहे."

बिच यांच्या मते, मारा करण्यात आलेल्या स्फोटकांपैकी अंदाजे 10% स्फोटकं निकामी ठरतात म्हणजे त्यांचा स्फोट होत नाही.

इस्रायलकडून जमिनीखाली असलेल्या बोगद्यांमधील सुविधांना लक्ष्य करण्यासाठी एअरक्राफ्ट बॉम्बचा वापर केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हमासनं इस्रायलवर हल्ला करण्याच्या आधी UNMAS नं गाझा पट्टीतून पूर्वीच्या संघर्षादरम्यान जमिनीत पुरले गेलेले 21 एअरक्राफ्ट बॉम्ब बाहेर काढले होते.

हा प्रत्येक बॉम्ब काढण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. पण त्यानंतर सगळं काही बदलून गेलं.

7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर हल्ला केला त्यावेळी बिर्च हे उत्तर गाझामध्ये होते. या हल्ल्यात हमासनं 1200 इस्रायलींची हत्या केली आणि 250 जणांना गाझामध्ये बंदी बनवून आणलं होतं.

त्यावर इस्रायलनं आक्रमकपणे प्रत्युत्तराची कारवाई केली.

संरक्षण मंत्री योव्ह गलांत यांनी IDF नं 26 दिवसांच्या युद्धात गाझा शहरावर 10000 बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याची माहिती दिली.

"ती अत्यंत गंभीर परिस्थिती होती," असं बिर्च यांनी म्हटलं.

मार्च महिन्याच्या अखेरीस अमेरिकेनं इस्रायलला 900 किलोपेक्षा जास्त वजनाचे 1800 आणि 225 किलो वजनाचे 500 बॉम्ब देण्याची परवानगी दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या डेमोक्रेटिक पार्टीचे काही सदस्य आणि उजव्या विचारसरणीच्या काही गटांच्या आवाहनानंतरही हा निर्णय घेण्यात आला होता.

या मोठ्या आकाराच्या बॉम्बचा संबंध यापूर्वी गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी करणाऱ्या हवाई हल्ल्यांशीही जोडण्यात आला होता.

हमासच्या प्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गाझामध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यांमध्ये किमान 33970 पॅलिस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

बॉम्ब हल्ल्याची कारवाई

इस्रायल हल्ल्यात कोणती शस्त्रं वापरतं याचा त्यांच्याकडून कधीही स्पष्टपणे उल्लेख केला जात नाही. पण ते सोशल मीडियावर ज्या पोस्ट करतात त्यातील विमानांवर शस्त्रांचे फोटो असतात. त्याचाच ते युद्धात हल्ल्यासाठी वापर करत असावेत, हा अंदाज तर्कसंगहत ठरू शकतो.

गाझामध्ये झालेलं प्रचंड नुकसान पाहता इस्रायलनं अनगाइडेड एमके-84 हे 900 किलो वजनाचे बॉम्ब टाकले आहेत, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलमधील शस्त्रतज्ज्ञ ब्रायन कॅस्टनर यांनी सांगितलं.

"या बॉम्बसंदर्भातील सर्वात मोठं आव्हान हे त्यांचं 900 किलो वजन हेच आहे. यापैकी अर्ध वजन स्फोटकांचं आणि अर्ध स्टीलचं असतं, आणि ते शेकडो मीटर अंतरावरील नागरिकांना हानी पोहोचवू शकतं. त्यामुळं हे बॉम्ब सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवून नष्ट करणं अत्यंत गरजेचं असतं, भौगोलिकदृष्ट्या गाझा हे अत्यंत लहान आहे. त्यामुळं हे अत्यंत कठिण ठरू शकतं," असंही त्यांनी सांगितलं.

स्फोट न झालेले बॉम्ब सुरक्षित ठिकाणी न हलवता गर्दीच्या ठिकाणी ढिगाऱ्यांखाली तसेच ठेवणं, प्रचंड धोक्याचं आहे असंही त्यांनी सांगितलं.

बीबीसी अरेबिक ट्रेंडिंगनं गाझामधल्या कोणत्या भागातून स्फोट न झालेले बॉम्ब काढले आहेत, याबाबत विचारणा केली. त्यावर "आम्ही अधिक तपशीलवार माहिती देऊ शकत नाही," असं प्रवक्ते म्हणाले.

हमासनं मारा केलेल्या रॉकेटच्या निकामी ठरण्याचं प्रमाणं अधिक असू शकतं. तेही तसेच ढिगाऱ्याखाली राहू देणं धोकादायक ठरू शकतं, असंही कास्टनर म्हणाले. स्फोट न झालेल्या इस्रायलच्या बॉम्बचा हमास पुनर्वापर करू शकतं, याबाबतही त्यांनी माहिती दिली.

ज्या एअरक्राफ्ट बॉम्बचा स्फोट होत नाही आणि ते मातीखाली दबून राहतात, त्यांच्यासाठी 10-15 मीटर लांब खड्डा खोदावा लागतो, असं बिर्च यांनी सांगितलं.

त्यानंतर स्फोटक तज्ज्ञ खाली उतरतात आणि फ्यूज काढून बॉम्ब निकामी केला जातो. पण गाझामध्ये प्रामुख्यानं जमिनीवर पडलेले बॉम्ब हटवणं हेच मुख्य काम असल्याचं बिर्च यांनी सांगितलं.

"गाझाच्या उत्तर भागामध्ये स्फोटकांच्या अवशेषांमुळं नेमकं किती प्रमाणात प्रदूषण होऊ शकतं हे सांगू शकत नाही. कारण त्याचं मूल्यांकनच करणं शक्य नाही. ही एक अभूतपूर्व अशी मोहीम आहे. कदाचित यापूर्वीच्या मोठ्या युद्धानंतर युरोपमध्ये असं काही घडलेलंच नाही," असंही ते म्हणाले.

ह्युमॅनिटी अँड इनक्लुजन (HI) या युकेमधल्या सामाजिक संस्थेनं राफाह या शहरामध्ये परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी दोन बॉम्ब नाशक तज्ज्ञ पाठवले होते.

संघर्षाच्या पहिल्या 89 दिवसांमध्ये 45000 बॉम्ब टाकण्यात आले. सरासरी 14% बॉम्ब निकामी ठरतात किंवा फुटत नाही. त्यामुळं जवळपास 6300 बॉम्ब फुटलेले नसावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

"गाझामध्ये जसजशी परिस्थिती बदलत आहे, तशी लोकांची आजुबाजुला वर्दळ वाढत आहे. आमची सर्वात मोठी भीती म्हणजे, ते लोक जेव्हा घरी परत येतील तेव्हा त्यांना पुन्हा त्यांच्या घराचा ताबा हवा असेल. पण त्याठिकाणी तर प्रचंड नुकसान झालेलं आहे," असं HI मधील स्फोटक नाशक तज्ज्ञ सायमन एलमंट म्हणाले.

"रेक्का आणि मोसूलमधील अनुभवांवरून आम्हाला अंदाज आला आहे की, हा काळ सर्वाधिक जोखमीचा असतो."

जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मते, जवळपास 80% नागरी सुविधांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यात घरं, शाळा, रुग्णालयं, पाणी, स्वच्छतेच्या सुविधा यांचा समावेश आहे.

वर्ल्ड बँक आणि संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार गाझाच्या पुनर्वसनासाठी जवळपास 18.5 अब्ज डॉलरचा खर्च लागू शकतो. ढिगारे उपसण्याच्या मोहिमेत 2.6 कोटी टन साहित्य काढावं लागणार असून, त्याला एक दशक किंवा काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.

UNMAS यांना मोहिमेसाठी 4.5 कोटी डॉलरची आवश्यकता आहे. पण आतापर्यंत त्यांना फक्त 55 लाख डॉलर मिळाले आहेत. युद्ध संपल्यानंतर आणखी निधी मिळण्याची त्यांना आशा आहे.

गाझामध्ये सध्या UNMAS चे 12 कर्मचारी आहेत. मदतीचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून, ते स्फोट न झालेले बॉम्ब आणि इतर शस्त्रे बाजुला करत आहेत. तसंच नागरिकांचं अशा शस्त्रांच्या धोक्याबाबत जनजागरणही करत आहेत.