700 हून अधिक लोकांचा जीव घेणारा, ‘सोन्याचा पाऊस’ पाडणारा मुंबईच्या गोदीतील बोटीवरचा स्फोट

    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

1945 साली अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाल्याचं आपल्या सर्वांना माहिती आहे.

हिरोशिमा आणि नागासाकी शहरात झालेले बॉम्बस्फोट आजवरच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली स्फोट म्हणून ओळखले जातात.

पण, हे दोन बॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकले नव्हते, तोपर्यंतचा त्या काळातील सर्वात शक्तिशाली स्फोट कोणता होता?

तर, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच एप्रिल 1944 मध्ये मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये झालेला S.S. फोर्ट स्टायकिन जहाजाचा स्फोट त्यापैकी एक म्हणता येऊ शकेल.

काळाच्या ओघात ही घटना आता अनेकांच्या विस्मरणात गेलेली आहे. विशेष म्हणजे अत्यंत कमी प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या या घटनेची दाहकता आजही लेखांमधून समजून घेता येऊ शकते.

14 एप्रिल 1944 रोजी मुंबई बंदरात फोर्ट स्टायकिन या जहाजात दोन महाभयानक स्फोट झाले होते. या स्फोटात 700 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातं, मात्र, याविषयी अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

या स्फोटामुळे बसलेले हादरे पुण्यापर्यंत जाणवले होते. मुंबईतील अनेक इमारती कोसळल्या. ट्राम आणि रेल्वेसेवा दोन दिवस बंद पडली होती.

इतकंच नव्हे तर व्हिक्टोरिया डॉकचं स्फोटामुळे झालेलं नुकसान भरून काढून बंदर पुन्हा सुस्थितीत उभं करण्यासाठी मजुरांना पुढचे तब्बल 6 महिने मोठी मेहनत घ्यावी लागली.

या स्फोटात मुंबईच्या अग्निशमन दलातील 66 जवान शहीद झाले होते, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशात 14 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान अग्निशमन शहीद सप्ताह पाळण्यात येतो.

जाणून घेऊ, या फोर्ट स्टायकिन जहाजाची संपूर्ण कहाणी.

ब्रिटिश मालवाहू जहाज S. S. फोर्ट स्टायकिन

दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. फेब्रुवारी 1944 मध्ये इंग्लंडच्या लिव्हरपूल येथील बर्कनहेड बंदरावरून फोर्ट स्टायकिन नावाचं एक जहाज भारताच्या दिशेने निघालं होतं.

ब्रिटिश सरकारच्या मालकीचं हे जहाज दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युद्धोपयोगी साहित्याची ने-आण करण्यासाठी तैनात करण्यात आलेलं होतं. बर्कनहेडवरून कराचीमार्गे हे जहाज मुंबईत दाखल होणार होतं.

मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक आणि संशोधक नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘अज्ञात मुंबई’ या पुस्तकात फोर्ट स्टायकिन जहाजासह गोदीतल्या स्फोटाचं सविस्तर वर्णन करण्यात आलं आहे.

नितीन साळुंखे लिहितात, 'फोर्ट स्टायकिन हे 424 फूट लांब, 7142 टन वजन असलेलं अजस्त्र असं हे जहाज होतं. जहाजात लढाऊ विमानांचे, जहाजांचे सुटे भाग, वेगवेगळ्या क्षमतेचे बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्या, हत्यारं, भू आणि पाणसुरुंग, गंधक आणि अतिशय संहारक क्षमतेचा, जवळपास 1400 टन वजनी दारूगोळा भरलेला होता.'

'दारूगोळ्यांव्यतिरिक्त जहाजावर 10 लाख पाऊंड किंमतीच्या सुमारे 382 किलो वजनाच्या अस्सल सोन्याच्या विटाही चढवण्यात आलेलं होतं. हे सोनं बँक ऑफ इंग्लंडमधून भारताच्या रिझर्व्ह बँकेत जमा करण्यासाठी पाठवण्यात येत होतं. प्रतिपेटी 12 किलो 700 ग्रॅम अशा एकूण सोन्याच्या विटांनी भरलेल्या 30 लाकडी पेट्या जहाजात ठेवण्यात आलेल्या होत्या.'

सुरक्षिततेच्या कारणास्तव या लाकडी पेट्या पोलादी पेट्यांमध्ये घालून वेल्डिंग करून सीलबंद करण्यात आलेल्या होत्या. या पेट्या दारुगोळा ठेवलेल्या ठिकाणीच ठेवलेल्या होत्या.

45 वर्षीय कॅप्टन अलेक्झांडर नायस्मिथ हे या जहाजातील सामान विभागाचे प्रमुख होते. जहाजातील सामान धोकादायक असल्याने त्यांना चिंता वाटत होती.

शिवाय, युद्धही सुरू होतं, त्यामुळे शत्रूंच्या जहाजांनी हल्ला केल्यास काय परिस्थिती ओढावेल, याचा विचार ते संपूर्ण प्रवासात करत होते.

धोका विचारात घेऊन कोणत्याही कर्मचाऱ्याला जहाजावर धुम्रपान आणि मद्यपान करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

कराची बंदरावरचा गोंधळ

24 फेब्रुवारी 1944 रोजी लिव्हरपूलवरून निघालेलं हे जहाज मजल दरमजल करत 30 मार्चला कराचीला पोहोचलं. कराची बंदरावर लढाऊ विमाने आणि जहाजांचे सुटे भाग आणि इतर किरकोळ सामान उतवण्यात आलं.

खरं तर हे जहाज इंग्लंडवरून निघताना घाईघाईने निघालेलं असल्यामुळे आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे चीफ इंजिनिअर अलेक्स यांनी कराचीमध्ये जहाजाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण त्यासाठी त्यांना परवानगी मिळाली नाही.

बोटीतील दारूगोळा आणि सोनं हे लवकरात लवकर मुंबईला पोहोचवणं आवश्यक आहे. दुरुस्ती रखडली, तर कामात विलंब होईल, म्हणून अधिकाऱ्यांनी दुरुस्तीला परवानगी देण्यास नकार दिला होता.

पण, 30 मार्चला कराचीला पोहोचलं तरी जहाज पुढील 10 दिवस तिथेच थांबून होतं. त्याचं कारण म्हणजे जहाजावरचं सामान उतरवल्यानंतर निर्माण झालेली मोकळी जागा.

महायुद्धाच्या काळात जहाजांची संख्या मर्यादित होती. प्रत्येक जहाजांवर ठासून सामान भरलेलं असायचं. त्यामुळे सामान पाठवण्यासाठी सोय सहजासहजी व्हायची नाही.

यामुळेच कराची बंदराच्या अधिकाऱ्यांना फोर्ट स्टायकिनमधील मोकळ्या जागेत सामान भरून मुंबईला पाठवण्याचा मोह आवरता आला नाही. सामान भरण्यासाठी त्यांनी जहाज इतके दिवस कराचीत थांबवून ठेवलं.

इंग्लंडहून निघताना कराचीतून सामान घ्यावं लागेल, याची कल्पना नायस्मिथ यांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ते यावर प्रचंड चिडले होते. पण अधिकाऱ्यांच्या मर्जीपुढे त्यांचं काहीएक चाललं नाही. युद्ध सुरु असल्याने एक फूटदेखील मोकळी जागा जाऊ द्यायची नाही, असा वरून आदेश असल्याचा जप त्यांनी लावलेला होता.

अखेर, नायस्मिथ यांचा विरोध न जुमानता जहाजातील रिकाम्या जागेत कापसाने भरलेली 87 हजार पोती, 300 टनांपेक्षा जास्त कच्च गंधक, 10 हजारांपेक्षा जात इमारती लाकडाचे मोठे ओंडके, राळ, 100 पिंप भरून तेल, विविध धातूंचं भंगार, तांदळाची पोती यांच्याशिवाय मासळीपासून बनवलेलं खत आदी वस्तू लादण्यात आल्या. कापसाची पोती तर नेमकी स्फोटकं असलेल्या कप्प्यातच ठेवण्यात आली होती.

आधीच प्रचंड प्रमाणावर दारूगोळ्याचा साठा असलेल्या बोटीत कापूस, तेल, राळ आणि लाकूड असं अतिशीघ्र ज्वालाग्राही सामान भरण्यात आलं. याला नायस्मिथने विरोध दर्शवला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

मुंबई बंदरावरचा गोंधळ

9 एप्रिलला कराचीतून निघून फोर्ट स्टायकिन जहाज 12 एप्रिल रोजी पहाटे मुंबई बंदराबाहेर दाखल झालं. मात्र, कराची बंदराप्रमाणेच मुंबई येथेही फोर्ट स्टायकिन जहाजाबाबत मोठा गोंधळ झाला.

ज्या बोटीवर दारूगोळा आणि स्फोटकं असतो, त्या बोटींनी बंदरात पोहोचल्यावर लाल रंगाचा झेंडा (रेड फ्लॅग) फडकवायचा असतो. ते दिसल्यानंतर या बोटीतील सामान उतरवण्यासाठी पहिलं प्राधान्य दिलं जातं. पण फोर्ट स्टायकिनवर नेमका हा लाल झेंडा नव्हता.

त्यामुळे, जहाज धक्क्याला लागण्यात प्रचंड वेळ गेला. मात्र, व्हिक्टोरिया डॉकच्या धक्का क्रमांक 1 वर लावलेल्या या जहाजावरील सामान उतरवून घेण्याबाबतही मोठी दिरंगाई झाली.

सुरुवातीला अधिकाऱ्यांनी बोटीतील कापसाची पोती, तेलाची पिंप आधी उतरवून घेण्याचं ठरवलं.

त्याचवेळी, स्फोटकं आणि दारूगोळासंदर्भातील सुरक्षिततेच्या नियमांनुसार हे सामान समुद्राच्या बाजूने टप्प्याटप्प्याने उतरवून घेण्याचंही ठरवण्यात आलं. पण त्यासाठी लागणाऱ्या लहान बोटी उपलब्ध नसल्याने हे काम रखडलेलं होतं.

दरम्यान, इंजिनाच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी इंजिनाचे भाग सुटे करण्यास सुरूवात झाली. इंजिनच खोलून ठेवल्याने जहाज आता जागचं हलवणं शक्य नव्हतं. कारण नंतर जे काही घडणार होतं, त्यामध्ये या गोष्टीनेही हातभार लावला.

दुसरा दिवस उजाडला तरी बोटीवरचा बराचसा माल तसाच पडून होता. सोन्याच्या पोलादी पेट्यांनाही तोपर्यंत कुणी हात लावलेला नव्हता. बँकेचे अधिकारी आल्यावर जहाजावरच या पेट्या उघडून पाहतील आणि नंतरच हे सामान उतरवलं जाईल, असं त्यांना सांगण्यात आलं.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जहाजावरच पोलादी पेट्या उघडून पाहण्यासाठी वेल्डिंग मशीन आणावं लागणार होतं. यादरम्यान ठिणग्या उडून बाजूच्या दारूगोळ्याचा स्फोट होण्याची शक्यता होती.

नायस्मिथ यांनी त्याला नकार दिल्यानंतर स्फोटकं उतरवून झाल्यानंतरच या सोन्याच्या पेट्या अधिकाऱ्यांसमोर उघडण्याबाबत निर्णय झाला.

स्फोटकं उतरवून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लहान बोटी 13 एप्रिलच्या दुपारपर्यंत आल्याच नाहीत. त्यामुळे स्फोटकं आणि दारूगोळा जहाजावर तशीच पडून होती. भंगार उतरवण्यासाठी आलेली क्रेन कमी क्षमतेची असल्याने तेही सामान तसंच पडून होतं. मजुरांच्या टोळ्या लाकडाचे मोठे ओंडके उतरवण्याच्या मागे लागले होते.

तिसरा दिवस, रखडलेलं काम आणि धुमसणारा धूर

तीन दिवस झाले तरी जहाजावरचं सामान उतरवून घेण्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं. 14 एप्रिलच्या दिवशी फोर्ट स्टायकिन जहाजाच्या बाजूला 10-12 इतर जहाजे उभी होती. सकाळपासून सामान उतरवण्याचं काम फारसं पुढे गेलं नाही.

दुपारच्या वेळी, साधारपणे साडेबारा वाजता जेवणाच्या विश्रांतीदरम्यान स्टायकिनपासून चार-पाच जहाज सोडून थांबलेल्या जहाजावरच्या दोन अधिकाऱ्यांचं लक्ष स्टायकिनवर गेलं. खालून धूर येत असल्याचं त्यांनी पाहिलं. पण नंतर धूर नाहीसा झाल्याने भास झाल्याचं वाटून ते निघून गेले.

12.45 लाही धक्क्यावर उभ्या असलेल्या पोलिसांनी असा धूर पाहिला. पण धक्क्यावर आगी लागण्याच्या घटना नेहमी घडत असल्याने तिथली लोक पाहून घेतील, म्हणून त्यांनीही दुर्लक्ष केलं.

दुपारी दीडनंतर पुन्हा काम सुरू करण्यासाठी जहाजावर गेलेल्या मजुरांनी भंगार सामानाचा एक मोठा गठ्ठा हूक लावून बाहेर काढताच आत धुमसत असलेल्या धुराचे प्रचंड लोट बाहेर आले.

लगेच फायर अलार्म वाजवण्यात आला. फायरमन आग नेमकी कुठे लागली ते पाहण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण धुरामुळे त्याला आत जाताच आलं नाही. बोटीवरच्या पंपाने आग विझली नाही, फायर ब्रिगेडला कॉल दिला गेला. दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या धक्क्यावर पोहोचल्या.

आग किती मोठी आहे, किंवा बोटीवर स्फोटके आहेत किंवा नाही, याची कल्पना नसल्यामुळे त्यांनी केवळ दोन बंबगाड्या पाठवून दिल्या होत्या. पण नंतर पुन्हा कॉल गेल्यावर त्यांनी पुन्हा 10-12 बंबगाड्या पाठवून दिल्या.

जहाजात दोन नंबरच्या कप्प्यात आग लागल्याचं निष्पन्न झालं. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, कापसाची पोती आणि सोनंही ठेवलेलं होतं. त्यामुळे आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले.

आग विझता विझत नव्हती. काय करावं, कुणालाच काही कळत नव्हतं. जहाज दूर न्यावं तर इंजीन खोलण्यात आलेलं होतं. अखेर, धक्क्याच्या बाजूकडील जहाजाचा धातूचा भाग उष्णतेमुळे वितळायला लागल्यानंतर मात्र सर्वांचे धाबे दणाणले.

बघता बघता आगीचे मोठे लोळ जहाजाबाहेर दिसू लागले. त्यामुळे कॅप्टन नायस्मिथने सर्वांना त्वरित जहाज सोडण्याचे आदेश दिले, लोक जहाजापासून दूर जाऊ लागले.

दोन स्फोट आणि हाहाकार

दुपारी 4 वाजून 6 मिनिटांनी फोर्ट स्टायकिनवर पहिला स्फोट झाला. या स्फोटात जहाजाचे दोन तुकडे झाले. एक तुकडा समुद्रातच राहिला तर दुसरा तुकडा उडून अर्धा किलोमीटरवरील एका इमारतीवर जाऊन आदळला.

स्फोटाने धक्क्यावरच्या इमारती जमिनदोस्त झाल्या. पाण्याचे पाईप फुटले, आग विझवण्यासाठी आलेले बंब लांब उडाले.

समुद्रात एक मोठी लाट उसळून आजूबाजूची दहा-बारा जहाजं पाण्यात बुडाली. शेजारी उभ्या असलेल्या तीन टनी जहाजाचे तुकडे होऊन परिसरात विखुरले गेले. त्या तुकड्यांखाली कित्येक माणसे मेली.

काही समजण्याच्या आतच 4 वाजून 20 मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता कितीतरी पटींनी जास्त होती.

स्फोटामुळे गोदी परिसरातील लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तारा तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

स्फोटानंतर न उडालेले बॉम्ब, बंदुकीच्या गोळ्याही इतरत्र पसरल्या होत्या. अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना त्याच्या दगड-विटा पडून इतर बॉम्बचा स्फोट झाल्याच्या बातम्याही त्यानंतर येत होत्या.

या संपूर्ण घटनेत सुमारे 2 कोटी पाऊंड मालमत्ता नष्ट झाली, असा अंदाज वर्तवला जातो.

आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या 66 जवानांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकूण जीवित हानी नेमकी किती झाली, याची काही कल्पना नाही. पण 500 ते 700 जणांचा यामध्ये मृत्यू झाला, असा अंदाज वर्तवला जातो.

अनेकजण बेपत्ता झाले. काही माणसांची प्रेतं ओळखण्याच्या स्थितीत नव्हती. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात मृतदेह सापडत होते.

या घटनेनंतर विविध प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या.

सोन्याचं काय झालं?

स्फोटानंतर बंदरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पारशी व्यक्तीच्या घराचं छप्पर फाडून एक धातूचा मोठा तुकडा उडून पडला. हा तुकडा डोक्यावर पडला तर आपला जीव गेला असता असा विचार करत तो त्या तुकड्याकडे पाहत होता.

भानावर आल्यानंतर त्या व्यक्तीला समजलं की ही तर सोन्याची वीट आहे. तब्बल 28 पाऊंड वजनाची ती सोन्याची वीट होती.

विशेषतः जहाजावरील 382 किलो सोन्याच्या साठ्याबाबतचं वर्णन तर अतिशय रंगवून करण्यात आलं.

पारशी व्यक्तीच्या घराचं छप्पर फोडून सोन्याची वीट सापडली, त्याचं वर्णन अनेकांनी अतिशयोक्ती स्वरुपात ‘सोन्याचा पाऊस’ म्हणून केलं.

पण पारशी व्यक्तीबाबतच प्रसंग वगळला तर अशा प्रकारच्या बातम्या इतर ठिकाणी आढळून आल्या नाहीत.

फोर्ट स्टायकिन जहाजावर दोन नंबरच्या कप्प्यात तळाला सोनं ठेवलेलं होतं. पोटाली पेट्या उघडून काही सोनं उडालंही असेल, पण स्फोटकांमुळे ते ते समुद्राच्या तळात खोलवर रुतून पडल्याची शक्यता जास्त आहे.

2009 मध्ये फेब्रुवारी महिन्यात व्हिक्टोरिया डॉकमध्ये गाळ काढण्याचं काम सुरू होतं, तेव्हा एका कामगाराला सोन्याची बिस्किटे सापडली होती. ती 1944 ची असल्याचं सिद्ध झालं. त्याशिवाय 1980 साली एकदा बंदरातील गाळ काढताना 10 किलो वजनाची सोन्याची वीट आढळून आली होती. ती सरकारजमा करणाऱ्या कर्मचाऱ्याला 1 हजार रुपये रोख बक्षीस दिल्याची नोंद आहे.

अशा प्रकारे कित्येक किलो सोनं व्हिक्टोरिया डॉकच्या गाळात रुतून बसलेलं असू शकतं. अनेकांना ते सापडलेलंही असू शकतं किंवा नाहीसुद्धा.

पण या सोन्याच्या या साठ्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्यांच्या वाटेला कदाचित फोर्ट स्टायकिन जहाजावरच्या दारूगोळ्यांच्या साठ्यातील न फुटलेले बॉम्बही येऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही.

संदर्भ :

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)