ट्विटर, अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्यामधून कर्मचाऱ्यांना अचानक का काढून टाकण्यात येतंय?

ट्विटर, मेटा कंपनीकडून जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता अ‍ॅमेझॉन कंपनीच्या 10,000 कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार आहे. न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

ऑनलाईन विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणावर जर ही नोकर कपात केली, तर कंपनीच्या इतिहासातली ही सर्वात मोठी कपात असेल.

ट्विटर, मेटा आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर कपातीची वेळ का आली आहे?

आतापर्यंत कुठे आणि किती कपात झाली? 

बदलतं बिझनेस मॉडेल आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेने संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर या महिन्यात ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 50% कपात केली. यामध्ये 3700 पूर्णवेळ कर्मचारी आणि 4400 कंत्राटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

ट्विटरच्या या नोकर कपातीच्या निर्णयाचा जगभरातील लोकांना धक्का बसला. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कामावरून काढून टाकल्याचे ई-मेल्स कर्मचाऱ्यांसमोर धडकत होते. या पद्धतीने कपात करणे अयोग्य असल्याची चर्चा सोशल मीडियावर जगभरात झाली. 

या धक्क्यातून सावरण्याआधीच नोहेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात 'मेटा' या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मूळ कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याची घोषणा केली. ही संख्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 13 टक्के इतकी आहे.

आर्थिक मंदीचं कारण देत मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा केली.

याचबरोबर 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांपर्यंत भरती थांबवण्याचा निर्णय मेटा कंपनीकडून घेण्यात आला आहे. यापुढे कंपनीमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगितलं गेलं. 

अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत कंपनीकडून अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही.

पण न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉनच्या 10000 कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. सध्या अ‍ॅमेझॉन कंपनीत 1,68,000 कर्मचारी काम करतात. जर ही कपात झाली तर एकूण कर्मचारी संख्येपेक्षा ही कपात 3 % असेल. 

डिझने,लिफ्ट, स्ट्राइप, स्नॅप आणि इतर टेक कंपन्यांनी अलीकडच्या काळात कामगारांना कामावरून काढून टाकलं आहे. काही कंपन्या कपातीच्या तयारीत आहेत. 

ही नोकर कपात करण्याची कारणं काय आहेत? 

या टेक कंपन्या इतक्या मोठ्या प्रमाणात नोकर कपात का करतायेत? हा प्रश्न सगळ्यांसमोरच आहे. पण प्रत्येक कंपनीची कपातीची कारणं वेगवेगळी कारणं समोर येत आहेत.

ट्विटर, मेटा या कंपन्यांनी आर्थिक मंदी आणि कोव्हिडच्या साथीत घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे ही नोकर कपात करण्याची वेळ आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

अ‍ॅमेझॉन कंपनीकडून याबाबत अद्याप काहीही सांगितले गेलं नसलं तरी कंपनी या वर्षाच्या सुरुवातीला प्रचंड नुकसान सहन करावं लागल्याची माहिती समोर आली आहे. 

ट्विटरने जेव्हा 50% नोकर कपात केली, तेव्हा ट्विटर कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विट करून या नोकर कपातीबाबत अधिक माहिती दिली. 

ते म्हणाले, "ट्विटर कंपनीला दररोज 4 दशलक्ष डॉलरचे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचारी कपात करण्याऐवजी आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही." 

मेटा कंपनीकडून केलेल्या नोकर कपातीनंतर कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कोव्हिड महामारीवेळी काही निर्णय चुकल्याची कबुली दिली.

ते म्हणतात"कोविडच्या सुरुवातीस, जग वेगाने ऑनलाइन झाले. ई-कॉमर्सच्या वाढीमुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली. बर्‍याच लोकांचा अंदाज होता की, कोव्हिडची महामारी संपल्यानंतरही अशीच ही परिस्थिती राहील. माझाही तोच अंदाज होता म्हणून मी देखील आमची गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढवण्याचा निर्णय घेतला. 

दुर्दैवाने, हे माझ्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. ई-कॉमर्स केवळ पूर्वीच्या ट्रेंडवर परतला नाही, तर यात मोठी घसरण झाली.

व्यापक आर्थिक मंदी, वाढलेली स्पर्धा आणि जाहिरातींचे सिग्नल कमी झाल्यामुळे आमचा महसूल माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाला. त्यामुळे आम्हाला नोकर कपातीचा निर्णय घ्यावा लागला. माझ्याकडून झालेली ही चूक आहे आणि मी त्याची जबाबदारी घेतो.”

भविष्यातील परिणाम काय? 

ही नोकर कपात कोव्हिडच्या साथीत झपाट्याने झालेला विस्तार आणि त्यानंतर आलेली आर्थिक मंदी, वाढती महागाई याचा हा परिणाम आहे.

या नोकर कपातीमुळे अनेक टेक कंपन्यांवरचा ताण वाढलाय हे खरं असलं तरी कामगार मंत्रालयाच्या अहवालानुसार, 2022 हे वर्ष 2020-21 च्या तुलनेत चांगलं होतं. कोव्हिडच्या काळात जितकी नोकर कपात झाली तितकी या वर्षात झाली नाही."

'टेक' आणि ई- कॉमर्स कंपन्यांवर याचा आता परिणाम दिसत असला तरी त्यामुळे भविष्यात या कपातीचा फार मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसेल असं वाटत नसल्याचं मत या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करताना दिसत आहेत. 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)