अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला का केला? मादुरोंना ताब्यात घेण्यामागचं कारण काय?

ला कार्लोटा लष्करी तळावर उद्ध्वस्त करण्यात आलेले अँटी एअरक्राफ्ट युनिट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ला कार्लोटा लष्करी तळावर उद्ध्वस्त करण्यात आलेले अँटी एअरक्राफ्ट युनिट
    • Author, व्हेनेसा बुशश्चल्यूटर
    • Role, लॅटिन अमेरिका एडिटर, बीबीसी न्यूज ऑनलाइन

"सुरक्षितपणे आणि योग्य पद्धतीनं सत्तेचं हस्तांतरण करेपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाचा कारभार चालवणार आहे," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

व्हेनेझुएलावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं अध्यक्ष निकोलास मादुरो यांना ताब्यात घेतलं, त्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आले.

मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेत आणण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर अंमली पदार्थांच्या संबंधी आरोप ठेवण्यात आले आहेत.

मादुरो सरकारविरोधात अमेरिकेने दबावतंत्राचे धोरण अवलंबले होते. त्यानंतर हे हल्ले झाले आहेत. मादुरो सरकारमुळं मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि गुन्हेगार अमेरिकेत पाठवले गेले, असा ट्रम्प प्रशासनाचा आरोप आहे.

पण ही परिस्थिती या टप्प्यापर्यंत कशी पोहोचली, ते जाणून घेऊ.

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला लक्ष्य का केलं?

व्हेनेझुएलाचे लाखो स्थलांतरित अमेरिकेत आले असल्यांच सांगत त्यासाठी ट्रम्प यांनी मादुरोंना दोषी ठरवलं आहे.

2013 पासून देशातील आर्थिक संकट आणि दडपशाहीमुळे व्हेनेझुएलाचे अंदाजे 80 लाख लोक देश सोडून गेले आहेत आणि अमेरिकेतील हे लोक त्यांपैकीच आहेत.

मादुरो यांनी तुरुंगं आणि मनोरुग्णालयं रिकामी करून त्या लोकांना अमेरिकेत पाठवण्यास भाग पाडल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणते पुरावेही दिलेले नाहीत.

ट्रम्प अमेरिकेत ड्रग्ज, विशेषतः फेंटॅनाइल आणि कोकेनच्या तस्करीवर लक्ष केंद्रित करत आहेत.

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या दोन गुन्हेगार टोळ्या - ट्रेन डी अरागुआ आणि कार्टेल डे लॉस सोलेस - यांना परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) म्हणून घोषित केलं आणि यातील दुसऱ्या टोळीचं नेतृत्व मादुरो स्वतः करत असल्याचा आरोपही केला.

विश्लेषकांनी सांगितलं की, कार्टेल डी लॉस सोलेस ही एक संघटना नाही, तर हा शब्द भ्रष्ट अधिकार्‍यांचं वर्णन करण्यासाठी वापरला जातो, ते व्हेनेझुएलातून कोकेन घेऊन जाण्यास परवानगी देतात.

ट्रम्प यांनी मादुरो यांना पकडण्यासाठी बक्षीस दुप्पट केलं आहे आणि मादुरो सरकारला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार असल्याचे जाहीर केलं आहे.

परंतु, मादुरो यांनी ते 'कार्टेलचे प्रमुख' असल्याचा आरोप ठामपणे फेटाळला आहे. अमेरिका त्यांच्याविरोधात 'ड्रग्जच्या युद्धाचा' बहाणा करून त्यांना पदावरून हटवून व्हेनेझुएलाच्या अफाट तेलसाठ्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रतिआरोप केला आहे.

अमेरिकेने व्हेनेझुएलावर दबाव कसा आणला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ट्रम्प यांनी गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता सांभाळली तेव्हापासूनच त्यांना मादुरो यांच्या सरकारवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली होती.

सर्वात आधी ट्रम्प प्रशासनानं मादुरो यांना पकडण्यासाठी माहिती देणाऱ्याला जाहीर केलेलं बक्षीस दुप्पट केलं.

सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या सैन्यानं दक्षिण अमेरिकेतून अमेरिकेत अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप करत जहाजांना लक्ष्य करायला सुरुवात केली.

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेच्या सैन्याने आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेत ड्रग्ज वाहून नेत असल्याच्या संशयावरून 30 पेक्षा जास्त बोटींवर हल्ले केले. यात 110 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प प्रशासन म्हणतं की, ते ड्रग्ज तस्करांविरुद्ध एका गैर-आंतरराष्ट्रीय (नॉन इंटरनॅशनल) लष्करी संघर्षात सामील आहेत. या तस्करांवर ते अमेरिकेविरोधात अनियमित युद्ध करत असल्याचा आरोप आहे.

अमेरिकेनं त्या बोटींवरील लोकांना 'नार्को दहशतवादी' असं म्हटलं आहे, पण कायदेतज्ज्ञ म्हणतात की, हे हल्ले कायदेशीर सैन्यावरील नाहीत. पहिला हल्ला 2 सप्टेंबरला झाला आणि त्यावर विशेष लक्ष गेलं, कारण पहिल्या हल्ल्यात बचावलेले लोक दुसऱ्या हल्ल्यात मारले गेले होते.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातील माजी मुख्य वकील बीबीसीला म्हणाले की, अमेरिकेचा हा सैन्य हल्ला सामान्य लोकांवर शांतता काळात केलेल्या नियोजित आणि पद्धतशीर हल्ल्यांसारखा आहे.

कार्टेल्स आमच्या देशात विष आणून अमेरिकन लोकांचं जीवन नष्ट करत आहेत, त्यामुळे अमेरिका सुरक्षित ठेवण्यासाठी कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली, असं व्हाइट हाऊसने उत्तर दिलं.

सीआयएला व्हेनेझुएलामध्ये गुप्त ऑपरेशन्स करण्याची परवानगी दिली होती, असंही ट्रम्प यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितलं होतं. त्यांचं प्रशासन पुढे ड्रग्ज तस्करांविरोधात 'जमिनीवर' कारवाई करेल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.

बोटींमध्ये ड्रग्ज असल्याच्या शक्यतेवरून व्हेनेझुएलातील एका डॉकिंगवर अमेरिकेच्या सैन्यदलाने हल्ला केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 डिसेंबर रोजी सांगितलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांनी हल्ल्याचे स्थान सांगितलं नव्हतं.

मादुरो यांना पकडण्यापूर्वीच ट्रम्प यांनी ते अमेरिकेचे मित्र नाही असं सांगितलं होतं.

व्हेनुझुएलात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या निर्बंध लादलेल्या ऑइल टँकर्सवर 'पूर्णतः नौदल नाकाबंदी'ची घोषणा करुन ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर आर्थिक दबाव देखील टाकला. तेल हे मादुरो सरकारसाठी परकीय चलनाचा मुख्य स्रोत आहे.

अमेरिकन मोठ्या प्रमाणात कॅरेबियन बेटावर लष्करी ताकत तैनात केली आहे. त्यांचा मुख्य उद्देश हा अमेरिकेत येणारं फेंटानिल आणि कोकेन यांचा पुरवठा थांबवणे आहे.

अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या जहाजांवर देखरेख ठेवण्यासोबतच या दलाने अमेरिकेच्या नौदल नाकाबंदीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

व्हेनेझुएला अमेरिकेत ड्रग्ज पाठवत आहे का?

ड्रग्ज विरोधी तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, व्हेनेझुएला जागतिक ड्रग्ज तस्करीतील फार मोठा खेळाडू नाही, ते एक ट्रान्झिट देश म्हणून काम करतात, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या ड्रग्जची तस्करी करतात.

त्याचा शेजारी कोलंबिया कोकेनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. परंतु, बहुतेक ड्रग्ज अमेरिकेत दुसऱ्या मार्गाने जातात, व्हेनेझुएलाद्वारे नाही.

अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या (डीइए) 2020 च्या अहवालानुसार, अमेरिकेत जाणाऱ्या कोकेनचा सुमारे तीन चतुर्थांश भाग पॅसिफिक महासागरामार्गे पाठवला जातो, तर फक्त थोडासा भाग कॅरिबियनमधील जलद बोटीने येतो.

अमेरिकेने सुरुवातीच्या काळात बहुतेक हल्ले कॅरिबियनमध्ये केले होते. पण अलीकडच्या हल्ल्यांनी पॅसिफिक महासागरावर लक्ष केंद्रित केलं आहे.

सप्टेंबरमध्ये, ट्रम्प यांनी अमेरिकन लष्करी नेत्यांना सांगितलं की, "हल्ला केलेल्या बोटींवर पांढऱ्या पावडरच्या पिशव्या आहेत, ज्या बहुतेक फेंटॅनाइल आणि इतर ड्रग्जने भरलेल्या आहेत."

फेंटॅनाइल हे एक कृत्रिम ड्रग आहे, जे हेरॉइनपेक्षा 50 पट जास्त शक्तिशाली आहे. अमेरिकेत ड्रग्जमुळे होणाऱ्या मृत्यूंना ओपिओइडचा ओव्हरडोस कारणीभूत आहे.

15 डिसेंबर रोजी, ट्रम्प यांनी एक आदेशावर स्वाक्षरी केली, ज्यात फेंटॅनाइलला 'सामूहिक विनाशाचे हत्यार' म्हणून घोषित करण्यात आलं, आणि हे ड्रग 'अमली पदार्थापेक्षा रासायनिक शस्त्रासारखा आहे', असं म्हटलं.

फेंटॅनाइल प्रामुख्याने मेक्सिकोत तयार होतो आणि बहुतेक वेळा दक्षिणेकडील सीमेवरून जमिनीवरील मार्गाद्वारे अमेरिकेत येतो.

डीइएच्या 2025 च्या अहवालात अमेरिकेत आलेल्या फेंटॅनाइलच्या तस्करीमध्ये व्हेनेझुएलाचा उल्लेख नाही.

'निकोलस मादुरो कोण आहेत?'

निकोलस मादुरो

फोटो स्रोत, Reuters

डाव्या विचारसरणीचे अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या युनायटेड सोशलिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएलामुळे (पीएसयूव्ही) निकोलस मादुरो राजकारणात पुढे आले.

पूर्वी बस चालक आणि कामगार संघटनेचे नेते असलेले मादुरो, चावेझ यांच्यानंतर सत्तेत आले आणि 2013 पासून ते देशाचे अध्यक्ष आहेत.

चावेझ आणि मादुरो गेली 26 वर्षे सत्तेत असताना त्यांच्या पक्षाने संसद (नॅशनल असेंब्ली), बहुतांश न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोग यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर नियंत्रण मिळवलं आहे.

2024 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मादुरो विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. परंतु, विरोधकांनी एकत्रित केलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार एडमंडो गोन्झालेझ यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

मारिया कोरिना मचाडो यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर, त्यांच्या जागी एडमंडो गोन्झालेझ हे विरोधकांचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते.

'हुकूमशाहीतून लोकशाहीकडे शांत आणि न्याय बदल घडवण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल', ऑक्टोबरमध्ये मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.

प्रवासबंदी झुगारून देत आणि अनेक महिने लपून राहिल्यानंतर, डिसेंबरमध्ये मचाडो यांनी ओस्लोला जाऊन हा पुरस्कार स्वीकारला होता.

त्यांनी व्हेनेझुएलाला परत जाणार असल्याचं सांगितलं. मात्र तसे केल्यास त्यांना अटक होण्याचा धोका आहे, कारण तेथील सरकारने त्यांना 'फरार' घोषित केलं आहे.

कॅरिबियनमध्ये अमेरिकेने तैनात केलेले दल किती मोठे आहे?

अमेरिकेने कॅरिबियनमध्ये 15,000 सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत विमानवाहू युद्धनौका, गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर्स तसेच पाण्यात आणि जमिनीवर हल्ला करू शकणारी जहाजे आहेत.

अमेरिकेच्या नौदल ताफ्यात जगातील सर्वांत मोठी विमानवाहू युद्धनौका USS जेराल्ड फोर्ड याचाही समावेश आहे.

10 डिसेंबर रोजी व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ एक तेल टँकर ताब्यात घेण्यापूर्वी अमेरिकन हेलिकॉप्टरने या जहाजावरून उड्डाण केल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेने म्हटले की हा टँकर व्हेनेझुएला आणि इराणमधून निर्बंधित तेल वाहतुकीसाठी वापरला जात होता. व्हेनेझुएलाने ही कारवाई 'आंतरराष्ट्रीय दरोडा' असल्याचे म्हटले.

यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या पाण्यात आणखी दोन टँकरना लक्ष्य केले आहे.

शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी म्हटले की अमेरिकन नौदल अद्याप त्याच स्थितीत सज्ज आहे.

व्हेनेझुएला किती तेल निर्यात करतं आणि ते कोण घेतं?

मादुरो सरकारने न वापरलेल्या तेलाच्या साठ्यांवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिका असा प्रयत्न करत असल्याचा आरोप व्हेनेझुएला सरकारने केला होता. हे आरोप यापूर्वीच अमेरिकेने फेटाळले आहेत.

व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ पहिला तेल टँकर जप्त केल्याची घोषणा केल्यानंतर, ट्रम्प यांनी पत्रकारांना "आपण हे तेल ठेवून घेणार आहोत, असा माझा अंदाज आहे," असं म्हटलं होतं.

तेल हे मादुरो सरकाराच्या विदेशी कमाईचा मुख्य स्रोत आहे, आणि या क्षेत्रातून मिळणारा नफा सरकारच्या बजेटच्या अर्ध्याहून जास्त आहे.

अमेरिकेच्या एका अहवालानुसार, व्हेनेझुएलाजवळ जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचे साठे असल्याचे पुरावे आहेत, पण ते त्याचा फारसा उपयोग करत नाहीत.

अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या (इआयए) म्हणण्यानुसार, तांत्रिक अडचणी आणि बजेटच्या मर्यादांमुळे व्हेनेझुएलाने 2023 मध्ये जगातील फक्त 0.8 टक्के इतक्याच कच्च्या तेलाचं उत्पादन केलं.

सध्या व्हेनेझुएला दररोज सुमारे 9 लाख बॅरल तेल विकतं. चीन त्यांचा सर्वात मोठा ग्राहक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)