मादुरो आणि त्यांच्या पत्नीला कुठं नेण्यात आलं? कमला हॅरिस यांनी ट्रम्प प्रशासनावर काय आरोप केले?

मादुरो आणि त्यांच्या पत्नी

फोटो स्रोत, Reuters

व्हेनेझुएलाची राजधानी कराकासमध्ये शनिवारी (3 जानेवारी) सकाळी झालेल्या स्फोटांनंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे हल्ले अमेरिकेने केल्याचं सांगितलं. तसंच व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना 'पकडण्यात आले' अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, मादुरो यांना न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आलं असून शनिवारी रात्री त्यांना घेऊन आलेलं विमान न्यूयॉर्कच्या स्टुअर्ट एअर नॅशनल गार्ड बेसवर लँड झालं.

शनिवारी शनिवारी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक नवीन फोटो देखील शेअर केला होता.

आता न्यूयॉर्कमध्ये मादुरो आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला जाईल, अशी घोषणा अमेरिकेच्या अॅटर्नी जनरलने केली होती.

व्हेनेझुएलाच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात तातडीने लष्करी दल तैनात करण्याची घोषणा केली.

तर व्हेनेझुएलाच्या सुप्रीम कोर्टानं उपराष्ट्रपति डेल्सी रॉड्रीग्ज यांनी राष्ट्रपती पदाची जबाबदारी स्वीकारावी असं म्हटलं आहे.

मादुरो आणि त्यांच्या पत्नीला कुठे नेले?

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलं. निकोलस मादुरो यांना ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनच्या (DEA) मुख्यालयातून मॅनहॅटनच्या वेस्ट साइड हायवेने उत्तरेकडे प्रवास करून हेलीपोर्टवर परत नेण्यात आलं असं मानलं जात आहे.

त्यानंतर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि त्यांना ब्रुकलिनमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

तीन हेलिकॉप्टर हडसन नदीवरून उड्डाण करत न्यूयॉर्क बंदरातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीजवळ उतरलं.

मात्र अद्याप याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर आरोप

अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी व्हेनेझुएलासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ही 'बेकायदेशीर' आणि 'विनाकारण' केलेली कारवाई असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मादुरो 'क्रूर' आणि 'अवैध' शासक होता हे खरं असलं तरी ट्रम्प यांच्या कारवाईनंतर अमेरिका अधिक सुरक्षित किंवा शक्तीशाली बनत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

"सत्तापालट किंवा तेलाच्या नावाखाली लढलेली युद्धं शक्तीप्रदर्शन म्हणून सादर केली जातात, परंतु ती शेवटी अराजकतेत रूपांतरित होतात आणि त्याची किंमत अमेरिकन कुटुंबांना मोजावी लागते," असे हॅरिस म्हणाल्या.

अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस.

ही कारवाई अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी किंवा लोकशाहीला चालना देण्यासाठी नाही, तर त्यामागे तेलाशी संबंधित हितसंबंध आहेत आसा आरोपही माजी उपराष्ट्रपतींनी ट्रम्प प्रशासनावर केला.

"त्यांना खरंच याची काळजी असती तर त्यांनी ड्रग्ज तस्कराला माफ केलं नसतं. तसंच मादुरोच्या साथीदारांशी व्यवहार करत व्हेनेझुएलातील विरोधकांना बाजूला केलं नसतं," असं हॅरिस म्हणाल्या.

व्हेनेझुएलाच्या सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारावा, असं म्हटलं आहे.

व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज. (फाइल फोटो)

रॉयटर्सच्या माहितीनुसार, यापूर्वी व्हेनेझुएलाच्या उच्च न्यायालयानं 'प्रशासकीय सातत्य राखण्यासाठी आणि देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी' डेल्सी रॉड्रिग्ज यांना ही जबाबदारी सोपवणे आवश्यक असल्याचं म्हटलं होतं.

देशाची परिस्थिती, सरकारचे कामकाज आणि सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत कोणती कायदेशीर चौकट लागू होईल? हे ठरवण्यासाठी ते या प्रकरणावर अधिक विचारमंथन करेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

भारताने जारी केली मार्गदर्शक तत्वे

भारतानं शनिवारी रात्री नागरिकांना व्हेनेझुएलाच्या प्रवासाबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली. लोकांनी व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयानं व्हेनेझुएलामध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि मर्यादित हालचाली करण्याचं आवाहन केलं आहे .

ममदानींची प्रतिक्रिया

न्यूयॉर्क शहराचे महापौर जोहरान ममदानी यांनी त्यांना मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्कमधील तुरुंगात ठेवण्याच्या योजनेची माहिती मिळाल्याचं सांगितलं.

ही कारवाई म्हणजे युद्धाचं कृत्य आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याचं ममदानी म्हणाले.

झोहरान ममदानी

फोटो स्रोत, Getty Images

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झोहरान ममदानी यांनी पोस्ट करत म्हटलं की, "सत्ता परिवर्तनासाठीचा हा थेट प्रयत्न न्यूयॉर्कचे लोक आणि शहरातील व्हेनेझुएलाच्या नागरिकांवर थेट परिणाम करणारा असेल.

माझं प्राधान्य त्यांच्या सुरक्षेला आहे. प्रशासन या परिस्थितीवर नजर ठेवून गरजेनुसार पावलं उचलेल. "

व्हेनेझुएला

फोटो स्रोत, Truth Social/CBS

फोटो कॅप्शन, न्यूयॉर्कमध्ये लँड झालेलं मादुरो यांना घेऊन आलेलं अमेरिकेचं विमान (डावीकडे), तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केलेला निकोलस मादुरो यांचा हा फोटो (उजवीकडे).

दरम्यान, शनिवारी झालेल्या या हल्ल्यांनंतर व्हेनेझुएलात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाने एका निवेदनात अमेरिकेच्या लष्करी आक्रमणाचा निषेधही केला.

शनिवारी, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी राष्ट्रपती जिवंत असल्याचा पुरावा मागितला होता. मादुरो आणि त्यांच्या पत्नीची कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, "अमेरिकेने व्हेनेझुएला आणि त्यांचे नेते, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर मोठा हल्ला यशस्वीरित्या सुरू केला आहे. मादुरो यांना त्यांच्या पत्नीसह पकडण्यात आले आहे आणि देशाबाहेर नेण्यात आले आहे."

दरम्यान, मादुरो अद्याप सापडत नसल्याने व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो जिवंत असल्याचा पुरावा मागितला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरो यांना अमेरिकेत आणले जात असल्याची घोषणा करत एक नवीन फोटो शेअर केला.

ट्रम्प यांनी शनिवारी (3 जानेवारी) रात्री (भारतीय वेळेनुसार) ट्रुथ सोशलवर एक नवीन फोटो शेअर केला. ते म्हणाले, "यूएसएस इवो जिमावर (युद्धनौका) निकोलस मादुरो."

यापूर्वी, फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले होते की, व्हेनेझुएलाच्या नेत्याला या युद्धनौकेतून अमेरिकेत आणले जात आहे.

या फोटोमध्ये, मादुरो यांच्या डोळ्यावर पट्टी, अंगात राखाडी ट्रॅकसूट आणि कानांवर हेडफोन घातलेले दिसत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा हा फोटो प्रसिद्ध केला.

फोटो स्रोत, Truth Social

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा हा फोटो प्रसिद्ध केला.

फोटो जारी केल्यानंतर लगेचच, डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथील त्यांच्या मार-ए-लागो निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की "सुरक्षित, न्याय्य आणि समंजसपणे सत्तेचे हस्तांतरण होईपर्यंत अमेरिका व्हेनेझुएलाला "चालवेल".

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराचे, त्यांच्या "प्रचंड वेग, शक्ती, अचूकता आणि क्षमता" याबद्दल कौतुक केले.

त्यांनी सांगितले की, व्हेनेझुएलाचे सैन्य "आमची वाट पाहत होते" आणि त्यांचे "अनेक जहाजे" बाहेर होती.

ट्रम्प म्हणाले की, "तयार स्थितीत" असूनही, व्हेनेझुएलाचे सैन्य "पूर्णपणे घाबरले आणि खूप लवकर पराभूत झाले."

त्यांनी पुढे म्हटले की, या कारवाईदरम्यान एकही अमेरिकन सैनिक मारला गेला नाही, तसेच अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांचे किंवा उपकरणांचे नुकसान झाले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो त्यांच्या पत्नीसह 'पकडले' गेले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो त्यांच्या पत्नीसह 'पकडले' गेले आहेत.

ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने "समुद्रमार्गे येणाऱ्या 97 टक्के ड्रग्ज वाहतुकीला नष्ट केले आहे" आणि असा आरोप केला की, ड्रग्ज वाहून नेणारी प्रत्येक बोट सरासरी 25 हजार लोकांना मारते.

त्यांनी असाही आरोप केला की, बहुतेक ड्रग्ज व्हेनेझुएलातून येतात. मात्र, बीबीसी या आकडेवारीची पुष्टी करत नाही.

अमेरिकेच्या अॅटर्नी जनरल पामेला बाँडी यांनी सांगितले आहे की, निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांच्यावर न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यात खटला चालवला जाईल.

पामेला बाँडी यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं, "निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेविरुद्ध नार्को-दहशतवाद करण्याचा कट रचण्याचा, कोकेन आयात करण्याचा कट रचण्याचा आणि मशीन गन व धोकादायक उपकरण बाळगण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे."

"त्यांना लवकरच अमेरिकन भूमीवर अमेरिकन न्यायालयांमध्ये अमेरिकन न्यायाला सामोरे जावे लागेल," असंही बाँडी यांनी म्हटलं.

असं असलं तरी, मादुरो यांच्या पत्नीवर कोणते आरोप लावले जातील हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

ट्रम्प यांचे व्हेनेझुएलावर हल्ल्याचे आदेश

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी बीबीसीची अमेरिकेतील संलग्न वृत्तसंस्था सीबीएस न्यूजला सांगितलं की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील लष्करी तळांसह अनेक ठिकाणांवर हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये अनेक भागांत स्फोट झाल्याची बातमी मिळत आहे. ज्या परिसरांमध्ये स्फोट झाले आहेत त्यात लष्करी तळांचाही समावेश आहे.

हे स्फोट प्रत्यक्ष पाहाणाऱ्या लोकांच्या माहितीनुसार, या शहराच्या मध्यवर्ती भागी असलेल्या लष्करी हवाई तळ ला कार्लोटा आणि मुख्य लष्करी तळ फिएर्ते तिऊनालाही स्फोटांची झळ बसली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या कथित स्फोटांचे व्हीडिओ प्रसिद्ध होत आहेत.

तिकडे अमेरिकास्थित सीबीएस न्यूजने सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलंय की, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलात लष्करी तळांवर हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून या आक्रमणाचा विरोध केला आहे.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी देशात आपत्कालीन स्थिती जाहीर केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा, व्हेनेझुएलाने मागितले पुरावे

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं की, "अमेरिकेने व्हेनेझुएला आणि त्यांचे नेते, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर हल्ला यशस्वीपणे केला असून, त्यांना त्यांच्या पत्नीसमवेत ताब्यात घेऊन देशाबाहेर नेण्यात आले आहे."

ट्रम्प यांनी पुढे लिहिलं, "ही कारवाई अमेरिकेच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. याबाबतची माहिती लवकरच दिली जाईल. आज सकाळी 11 वाजता मार-ए-लागो येथे पत्रकार परिषद होणार आहे."

स्फोटानंतर व्हेनेझुएलाच्या राजधानीत ज्वाळा उठल्याचे चित्र होते

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, स्फोटानंतर व्हेनेझुएलाच्या राजधानीत ज्वाळा उठल्याचे चित्र होते

अमेरिकन अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या सहयोगी सीबीएस न्यूजला सांगितले आहे की राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन लष्कराच्या डेल्टा फोर्सने ताब्यात घेतले आहे.

डेल्टा फोर्स ही अमेरिकन लष्कराची दहशतवादविरोधी सर्वात मोठी युनिट आहे.

दरम्यान, व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रोड्रिग्ज यांनी सांगितलं आहे की सरकारकडे राष्ट्राध्यक्ष मादुरो किंवा फर्स्ट लेडी सीलिया फ्लोरेस यांच्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की सरकारने दोघेही जिवंत असल्याचा "तत्काळ पुरावा" मागितला आहे.

व्हेनेझुएलाने काय म्हटले?

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या हल्ल्यांबाबत अद्याप अनेक बाबींविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. उदाहरणार्थ, या हल्ल्यांत लष्करी पायाभूत सुविधांचे किती नुकसान झाले आहे आणि किती लोक जखमी किंवा मृत झाले आहेत, याची स्पष्ट माहिती नाही.

व्हेनेझुएलाचे संरक्षणमंत्री व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांनी सांगितलं की, सरकार मृत आणि जखमींबाबतची माहिती गोळा करत आहे. त्यांनी आरोप केला की हे हल्ले निवासी भागांमध्ये झाले आहेत, जिथे सामान्य नागरिक राहतात.

त्यांनी हेही सांगितलं की, व्हेनेझुएला परदेशी सैनिकांच्या उपस्थितीला "विरोध" करेल.

याशिवाय, व्हेनेझुएलाच्या संरक्षणमंत्र्यांनी संपूर्ण देशभर तात्काळ लष्करी दल तैनात करण्याची घोषणा केली आहे.

लोपेझ (उजवीकडे) 2014 पासून मादुरो यांच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लोपेझ (उजवीकडे) 2014 पासून मादुरो यांच्या कार्यकाळात संरक्षण मंत्री आहेत.

स्पॅनिश भाषेत दिलेल्या एका व्हिडिओ संदेशात व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांनी आतापर्यंत व्हेनेझुएलाविरुद्ध झालेल्या "सर्वात मोठ्या हल्ल्या"समोर जनतेने एकजुटीने उभे राहून त्याचा विरोध करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितलं की सर्व सशस्त्र दल तैनात करण्याचे "मादुरो यांच्या आदेशांचे" पालन व्हेनेझुएला करत आहे.

संरक्षणमंत्र्यांनी म्हटले, "त्यांनी आमच्यावर हल्ला केला आहे, पण ते आम्हाला झुकवू शकणार नाहीत."

प्रत्यक्षदर्शींच्या मते, शहराच्या मध्यभागी असलेले लष्करी विमानतळ 'ला कार्लोटा' आणि प्रमुख लष्करी तळ 'फुएर्ते तिउना' यांनाही याचा फटका बसला आहे. या दोन्ही ठिकाणी झालेल्या स्फोटांचे व्हीडिओही समोर आले आहेत.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर व्हेनेझुएलामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

दरम्यान, शनिवारी पहाटे झालेल्या हल्ल्यांनंतर, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. हे हल्ले अमेरिकेकडून त्यांच्या देशातील तेल आणि खनिजांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याआधी व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमधील अनेक भागांत जवळपास एकाच वेळी अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रभावित झालेल्या भागात लष्करी तळांचा समावेश होता.

व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमधील अनेक भागांत जवळपास एकाच वेळी अनेक स्फोटांचे आवाज

फोटो स्रोत, Reuters

दरम्यान, व्हेनेझुएला सरकारने या हल्ल्याचा निषेध केला असून या आक्रमणाचा विरोध केला आहे..

व्हेनेझुएला सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे की, "अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाने व्हेनेझुएलाविरुद्ध केलेल्या अत्यंत गंभीर लष्करी आक्रमकणाला व्हेनेझुएला आंतरराष्ट्रीय समुदायासमोर फेटाळून लावतो, त्याचा विरोध आणि तीव्र निषेध करतो."

ही घडामोड ट्रम्प प्रशासनाकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर टाकल्या जात असलेल्या दबावानंतर समोर आली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप आहे की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी पसरवण्यात सहभागी आहेत.

व्हेनेझुएलाच्या राजधानीत अनेक स्फोटांची नोंद

व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्यानंतर व्हेनेझुएलाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाने केली आहे.

देशभरातील हवाई क्षेत्र बंद करण्याचा विचार केला पाहिजे, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर व्हेनेझुएलाकडून हा आरोप करण्यात आला आहे.

व्हेनेझुएलाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "ही व्हेनेझुएलाच्या लोकांविरुद्ध आणखी एक अतिरेकी, बेकायदेशीर आणि अन्याय्य आक्रमकता आहे."

अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

खरं तर अमेरिकेला कायदेशीररीत्या दुसऱ्या देशाचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा अधिकार नाहीये. पण, ट्रम्प यांच्या ऑनलाईन पोस्टमुळे हवाई प्रवासामध्ये अनिश्चितता नक्कीच निर्माण होऊ शकते.

तसेच, त्यांच्या पोस्टमुळे विमान कंपन्यांना तिथे काम करण्यापासून रोखता येऊ शकतं, अशीही शक्यता निर्माण झाली आहे.

खरं तर, अमेरिका कॅरिबियनमध्ये आपली लष्करी उपस्थिती वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही लष्करी उपस्थिती ड्रग्ज तस्करीला रोखण्यासाठी आहे, असं त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी ड्रग्ज तस्करीचे अमेरिकेचे दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात की, हे दावे म्हणजे त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो काय म्हणाले?

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, काराकासमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांचा उद्देश "व्हेनेझुएलाच्या धोरणात्मक संसाधनांवर, विशेषतः तेल आणि खनिजांवर ताबा मिळवणे" आणि "देशाचे राजकीय स्वातंत्र्य संपुष्टात आणणे हा आहे."

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आणीबाणीची घोषणा करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी करून तो तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, सर्व राष्ट्रीय संरक्षण योजना "योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत" अंमलात आणण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबतच, त्यांनी "देशातील सर्व सामाजिक आणि राजकीय शक्तींना येऊन या साम्राज्यवादी हल्ल्याचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे."

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कराकसवरील हल्ले त्यांच्या देशाच्या संसाधनांवर ताबा मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी आणीबाणीची घोषणा करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी करून तो तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी "संपूर्ण देशात बाह्य अस्थिरतेची स्थिती जाहीर करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच, सर्व राष्ट्रीय संरक्षण योजना "योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत" राबवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सरकारने "देशातील सर्व सामाजिक आणि राजकीय शक्तींना एकत्रीकरण योजना सक्रिय करण्याचे आणि या साम्राज्यवादी हल्ल्याचा निषेध करण्याचे" आवाहन केले आहे.

बीबीसीच्या पत्रकाराने काय पाहिले?

काराकासमध्ये राहणाऱ्या बीबीसी पत्रकार व्हेनेसा सिल्वा यांनी त्यांच्या खिडकीतून स्फोट होताना पाहिले.

त्यांनी सांगितले की, स्फोटाचा आवाज वीज कडाडल्यावर होणाऱ्या आवाजापेक्षा मोठा होता. त्यामुळे त्यांचे घर हादरले.

राजधानी, काराकास एका खोऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमत होता.

त्यांनी सांगितले, "माझे हृदय धडधडत होते आणि माझे पाय थरथरत होते."

स्फोट इतके जवळ झाले होते की, त्या घाबरल्या होत्या. परंतु ते हल्ले अगदी अचूक दिसत होते, असेही त्यांनी सांगितले.

बॉम्बस्फोटांनंतर काराकसमधील सर्वात मोठ्या लष्करी संकुलाची स्थिती सांगणारा फोटो

फोटो स्रोत, Luis JAIMES / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, बॉम्बस्फोटांनंतर काराकसमधील सर्वात मोठ्या लष्करी संकुलाची स्थिती सांगणारा फोटो

त्या म्हणाल्या, "शहर आता शांत आहे, परंतु प्रत्येकजण अजूनही सर्वजण ठीक आहेत का अशी विचारणा करणारे मेसेज एकमेकांना पाठवत आहेत."

त्यांच्या नातेवाईक व्हेनेसा सिल्वा यांनी आकाशातून काहीतरी पडताना पाहिले आणि 10 सेकंदांनंतर एक मोठा स्फोट ऐकला.

कोलंबियाची प्रतिक्रिया

दरम्यान, व्हेनेझुएलाचा शेजारी देश कोलंबियाने सध्याच्या घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये, कोलंबियाच्या अध्यक्षांनी म्हटले, "गेल्या काही तासांत व्हेनेझुएलामध्ये झालेल्या स्फोटांमुळे आणि असामान्य हवाई हालचालींच्या वृत्तांमुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. याबद्दल कोलंबिया सरकार गंभीर चिंता व्यक्त करते."

अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले, "कोलंबिया संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये नमूद केलेल्या तत्त्वांप्रती, विशेषतः राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर, धमकी किंवा बळाचा वापर प्रतिबंधित करणे आणि आंतरराष्ट्रीय वादांचे शांततापूर्ण निराकरण यांच्याप्रती आपली अटळ वचनबद्धता पुन्हा व्यक्त करतो. या संदर्भात परिस्थिती आणखी बिकट करू शकणारी किंवा नागरिकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या कोणत्याही एकतर्फी लष्करी कारवाईला कोलंबिया सरकारचा विरोध आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)