अमेरिकेचे दरवाजे बंद? वॉशिंग्टन गोळीबारानंतर स्थलांतराबाबत ट्रम्प यांची मोठी घोषणा

फोटो स्रोत, Reuters
- Author, यांग टियानंड आणि जेम्स फिट्झजेराल्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डवर गोळीबार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतराविषयी कठोर धोरण जाहीर केलं आहे.
त्यांनी 'थर्ड वर्ल्ड'मधील देशांतून येणारे स्थलांतर कायमस्वरूपी थांबवणं' आणि परदेशी नागरिकांना मिळणारे सरकारी फायदे बंद करण्याची शपथ घेतली आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेतील सुरक्षा आणि निर्वासितांच्या धोरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.
या निर्णयामुळे अमेरिकेची व्यवस्था पुन्हा नीट उभी राहू शकेल, असं ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर म्हटलं आहे.
त्यांच्या मते, आधीच्या स्थलांतर (इमिग्रेशन) धोरणांमुळे अनेक अमेरिकन लोकांचे फायदे आणि जगण्याच्या सोयी कमी झाल्या आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी या योजनेचे नेमके तपशील किंवा कोणते देश यात येतील, याबद्दल काहीही स्पष्ट केलेलं नाही.
वॉशिंग्टन डीसी येथे एका अफगाण नागरिकाने दोन नॅशनल गार्ड्सवर गोळ्या झाडल्याच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. या गोळीबारात एका गार्डचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या घोषणेवरून त्यांची स्थलांतरावरील भूमिका आणखी कठोर झाल्याचं दिसत आहे. स्थलांतराचा मुद्दा आधीपासूनच त्यांच्या महत्त्वाच्या विषयांपैकी एक आहे.
ट्रम्प म्हणाले की, वॉशिंग्टन डीसीमधील बुधवारी (26 नोव्हेंबर) झालेल्या गोळीबाराने सुरक्षेचा एक मोठा धोका उघड झाला आहे.
त्यांनी असंही सांगितलं की, अमेरिकेत 'ज्यांची इथे गरज नाही' अशा कोणत्याही परदेशी व्यक्तीला ते देशातून बाहेर काढण्यासाठी पावलं उचलणार आहेत.
त्याच दिवशी अमेरिकेने अफगाण नागरिकांच्या सर्व स्थलांतर अर्जांवरचं काम तात्पुरतं थांबवत असल्याचं जाहीर केलं. 'सुरक्षेच्या नियमांची आणि तपास प्रक्रियेची' (प्रोटोकॉल) पुन्हा समीक्षा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
त्यानंतर गुरुवारी (27 नोव्हेंबर) अमेरिकेच्या यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (यूएससीआयएस) या संस्थेनं ते 19 देशांतून अमेरिकेत आलेल्या लोकांना दिलेल्या ग्रीन कार्डची पुन्हा तपासणी करणार असल्याचे सांगितलं.
बीबीसीने या यादीत कोणत्या देशांचा समावेश आहे, असं विचारलं. त्यावर अमेरिकन एजन्सीने व्हाइट हाऊसच्या जूनमधील घोषणेकडे लक्ष वेधलं. त्यात अफगाणिस्तान, क्यूबा, हैती, इराण, सोमालिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांचा समावेश आहे.
ग्रीन कार्डची पुन्हा तपासणी नेमकी कशी होणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
ट्रम्प यांच्या योजनेला कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं. संयुक्त राष्ट्रसंघांच्या एजन्सींकडून त्याला आधीच विरोध झाला आहे.
इतर पावलांबरोबरच, ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार करण्याचा, अमेरिकेत दरवर्षी येणाऱ्या निर्वासितांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्याचा आणि अमेरिकेच्या भूमीत जन्मलेल्या जवळपास प्रत्येकालाच सध्या आपोआप मिळत असलेले नागरिकत्वाचे अधिकार संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
गुरुवारी (27 नोव्हेंबर) रात्री ट्रम्प यांनी दोन भागांमध्ये लिहिलेली पोस्ट त्यांनी आधी लिहिलेल्या पोस्टपेक्षा अधिक कठोर शब्दात होती. त्यांनी "नागरिक नसलेल्यांना सरकारकडून मिळणारे सर्व फायदे आणि अनुदानं थांबवण्याचं" आश्वासन दिलं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की यामुळे 'अमेरिकेच्या व्यवस्थेला अशा धोरणांमधून पूर्णपणे सावरण्यास मदत होईल', ज्यांच्यामुळे अनेक अमेरिकन लोकांचा 'फायदा आणि राहणीमानावर' वाईट परिणाम झाला.
'थर्ड वर्ल्ड' देश
गुरुवारी रात्री ट्रम्प यांनी दोन भागांत कठोर शब्दांत पोस्ट केले. अमेरिकन नागरिक नसलेल्या लोकांना मिळणारे 'सर्व सरकारी फायदे आणि मदतीच्या योजना बंद करणार' असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
राष्ट्राध्यक्षांनी 'अमेरिकेतील सामाजिक गोंधळाला' स्थलांतरित कारणीभूत असल्याचा आरोप केला. आणि 'अमेरिकेचा फायदा न करणाऱ्या कोणालाही' देशातून काढून टाकण्याची शपथ घेतली.
ट्रम्प यांनी ही पोस्ट 'हॅपी थँक्सगिव्हिंग' शुभेच्छा म्हणत टाकली होती. परंतु, त्या पोस्टमध्ये पूर्णपणे स्थलांतरविरोधीची भाषा वापरलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प म्हणाले की, सोमालियातील लाखो शरणार्थी मिनेसोटा या राज्यावर पूर्णपणे कब्जा करत आहेत. यासाठी त्यांनी त्या राज्यातील डेमोक्रॅटिक नेत्यांवर टीका केली.
"अमेरिकेची व्यवस्था पुन्हा नीट उभी राहावी यासाठी 'थर्ड वर्ल्ड'मधील देशांतून होणारे स्थलांतर कायमस्वरुपी थांबवणार आहे," असं ट्रम्प यांनी लिहिलं आहे.
'थर्ड वर्ल्ड' हा शब्द पूर्वी गरीब आणि विकसनशील देशांसाठी वापरला जात असे.
व्हाईट हाऊस आणि यूएससीआयएसने अद्याप ट्रम्प यांच्या या योजनेबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.
राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीच अफगाणिस्तान आणि इतर 11 देशांमधील नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालली होती, हे देश प्रामुख्याने आफ्रिका आणि आशियातील आहेत. त्याच्या पहिल्या कार्यकाळातही अनेक बहुसंख्य मुस्लीम देशांमधील नागरिकांच्या प्रवासावर बंदी लागू केली होती.
वॉशिंग्टन डीसी गोळीबाराचा संशयित अफगाणी
वॉशिंग्टन डीसीमधील गोळीबाराचा संशयित, रहमानुल्ला लकनवाल, 2021 मध्ये अमेरिकेत आला होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर स्थलांतरांविषयीची घोषणा करण्यात आली.
अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्यासोबत काम केलेल्या अफगाणी लोकांना अमेरिकेच्या माघारीनंतर एका विशेष इमिग्रेशन योजना जाहीर केली होती. त्या योजनेनुसार लकनवाल हा अमेरिकेत आला होता.
त्या वेळी तालिबानने अफगाणिस्तानचा पुन्हा ताबा घेतला होता, ज्यामुळे अमेरिकेला सहकार्य केलेल्या लोकांविरोधात सूड उगवण्याची भीती होती.
लकनवाल याने एकदा सीआयए सोबत काम केलं होतं, असे एजन्सीच्या सध्याच्या संचालकांनी सांगितलं.
लकनवाल यांनी 2024 मध्ये आश्रयासाठी अर्ज केला होता. यावर्षीच्या सुरुवातीस त्याचा अर्ज मान्यही करण्यात आला होता, असं एका अधिकाऱ्याने बीबीसीच्या अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजला सांगितलं.
तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता हातात घेण्यापूर्वी हजारो लोक अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी धावपळ करत होते.
त्यावेळेस लकनवालनं अमेरिकेच्या सैन्याला काबूल विमानतळाचं रक्षण करण्यास मदत केली होती, अशी माहिती त्यावेळेस त्याच्यासोबत काम केलेल्या एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं बीबीसीला दिली.
लकनवालला पाच अपत्ये आहेत. नऊ वर्षांपूर्वी कंदहार स्ट्राईक फोर्सच्या युनिट 03 मध्ये तो भरती झाला होता.
त्याच्या युनिटला स्थानिक पातळीवर स्कॉर्पियन फोर्सेस म्हटलं जात असे. हे युनिट सुरूवातीला सीआयएच्या अंतर्गत काम करत होतं. मात्र नंतर ते नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सिक्युरिटी या अफगाण गुप्तहेर विभागासाठी काम करत होतं.
लकनवाल जीपीएस ट्रॅकर तज्ज्ञ होता, असं माजी लष्करी अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं. त्यानं लकनवाल हा एक "उत्साही, खेळाडू आणि आनंदी व्यक्ती होता" असं म्हटलं.

सीएनएनशी बोललेल्या अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, लकनवालनं जेव्हा सीआयएबरोबर काम करण्यास सुरूवात केली होती तेव्हा आणि तो अमेरिकेत गेला तेव्हा, अशा दोन्ही वेळी अमेरिकेनं त्याच्याबद्दल गुप्तपणे कसून तपास करून माहिती घेतली असेल.
लकनवालच्या बालपणीच्या एका मित्रानं न्यूयॉर्क टाईम्सला सांगितलं की लकनवालनं त्याच्या युनिटमध्ये काम केल्यानंतर त्याला मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
हल्ल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. परंतु, तो सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
ट्रम्प यांनी या हल्ल्याला 'दहशतवादी कृत्य' म्हटलं आहे.
ट्रम्प दुसऱ्या दिवशी म्हणाले की, ज्यांना गोळी लागल्याचं सांगितलं जात होतं त्यापैकी एक नॅशनल गार्डचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नॅशनल गार्डचं नाव सारा बेकस्ट्रॉम आहे. त्या अवघ्या 20 वर्षांच्या होत्या. त्या व्हर्जिनियाच्या होत्या. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या नॅशनल गार्डच्या त्या सदस्य होत्या.
अमेरिकेच्या थँक्सगिव्हिंग सुट्टीदरम्यान सारा यांनी स्वेच्छेने डीसीमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली होती, अशी माहिती अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी सांगितलं.
जखमी असलेला दुसरा नॅशनल गार्ड 24 वर्षीय अँड्र्यू वुल्फची 'मृत्यूशी झुंज' सुरू असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











